अरुणा ढेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग. दि. माडगूळकर.. तथा ग. दि. मा.! लेखणीचा अक्षय बहर उपजत घेऊन आलेले एक बहुमुखी प्रतिभावंत. सिद्धहस्त कथाकार, कवी, ललित लेखक, अभिनेते, चित्रपटकथाकार , गीतकार, ‘गीत रामायण’कर्ते आधुनिक वाल्मीकी.. साहित्याचं कुठलं दालन त्यांच्या लेखणीनं समृद्ध केलं नाही असं नाही. अशा इंद्रधनुषी व्यक्तिमत्त्वाच्या ग. दि. मां.चं जन्मशताब्दी वर्ष उद्यापासून  (१ ऑक्टोबर) सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचं साहित्यिक व्यक्तिमत्त्व  उकलून दाखवणारे  विशेष लेख.. तसंच दस्तुरखुद्द त्यांनीच  लिहिलेला ‘बामणाचा पत्रा’ हा त्यांच्या रसाळ  लेखणीचा वानवळा  देणारा लेख.. संपादित रूपात!

माडगूळकर म्हणजे ‘थोरली पाती’.. ते देहानं थोरले होते, कुटुंबात थोरले होते, गीतकाव्याच्या परंपरेतही थोरलेच होते आणि मराठी रसिकतेला थोर श्रीमंत करणारे होते! बऱ्याच वेळा विपुल लेखन आणि लोकप्रियता हा साहित्यकाराचा किंवा कलावंताचा दोषच मानला जातो. लोकप्रिय असणं म्हणजे कमअस्सल असणं, सामान्य असणं, गुणवत्तेनं कमी प्रतीचं असणं असं समजलं जातं. ते बहुतांश वेळा खरंही असतं. पण ज्यांच्या बाबतीत हा समज तपासून घ्यावा लागतो आणि दूरच ठेवावा लागतो अशांपैकी होते गदिमा.. आपली अभिरुची समृद्ध करणारे होते ते.

गीत आणि कविता यांच्यामधलं अंतर पुसून टाकलं त्यांनी. आपल्या रसिकतेचा दर्जा वाढवत नेण्याच्या अनंत संधी त्यांनी आपल्या काव्यातून निर्माण केल्या. आपल्याला पुस्तकं वाचायला आवडतं; आपल्याला गाणं ऐकायला,  म्हणायला आवडतं; पण ते का आवडतं, कशामुळे आवडतं याचा शोध घ्यायला उत्सुक करणारी गीतं त्यांनी लिहिली. आस्वादाच्या वेगवेगळ्या पातळ्या शोधत, वेगवेगळ्या जागा शोधत, अर्थाचे वेगवेगळे धागे उकलत आपली अभिरुची आपण समृद्ध करायची असते. माणसामध्ये ती हळूहळू पिकत रसमधुर होत जावी लागते आणि अभिज्ञतेची चोच त्या फळाला लागावी लागते. गदिमांच्या गीतांनी याची उत्कट जाणीव आपल्याला करून दिली. उत्तम गीत ही एक उत्तम कविताच असते याची जाणीव त्यांनी करून दिली.

त्यांनी कथा लिहिल्या. नृत्यनाटिका लिहिल्या. नाटकं लिहिली. कादंबऱ्या लिहिल्या. ललित लेखन केलं. ‘धरती’  मासिकाचं संपादन केलं. मुलांसाठी लिहिलं. ‘रामजोशी’ ते ‘देवकीनंदन गोपाला’पर्यंत जवळजवळ ऐंशी मराठी चित्रपटांच्या कथा लिहिल्या. तेवीस हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. शंभराहून अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

मॅट्रिक परीक्षेचा उंबरा न ओलांडणारा हा माणूस आपल्या प्रतिभाबळावर इतका मोठा झाला, की राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला, विष्णुदास भावे सुवर्ण- पदकाचा सन्मान मिळाला, ग्वाल्हेरच्या नाटय़ संमेलनाचं आणि यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. ‘पद्मश्री’ किताब मिळाला. इतरही अनेक शासकीय-अशासकीय पदांचे आणि गौरवांचे ते मानकरी झाले. आणि याहीपेक्षा मोठं सर्वाधिक गौरवाचं पद त्यांना मिळालं- ते मराठी भावगीत परंपरेच्या सोपानावरून चढत जात मराठी रसिकांच्या हृदयातले अनभिषिक्त असे राजे झाले. केवळ अठ्ठावन्न वर्षांच्या आयुष्याचं ते फलित होतं.

माणसाचा आणि समाजाचाही वर्तमान जसा भविष्याशी तसाच भूतकाळाशी जोडलेला असतो. वर्तमानाच्या उभारणीसाठी त्या भूतकाळातल्या संचिताच्या कोणत्या विटा, कोणते दगड उपयोगी पडतील याचा विवेक जसा शहाणा माणूस करत असतो किंवा जाणता समाज करत असतो, तसा प्रगल्भ कलावंतही करत असतो. माडगूळकर हाडाचे कलावंत होते. संस्कृती-परंपरांमधलं पुष्कळ काही त्यांनी जाणते-अजाणतेपणी वेचलेलं होतं. त्यांच्या काव्याच्या घडणीत त्याचा अचूक आणि देखणा वापर झाला.

त्यांनी आईकडून ओव्या, स्त्रीगीतं, पुराणं ऐकली होती. वाढत्या वयात उत्तम कीर्तनं, प्रवचनं ऐकली होती. स्तोत्रं, पदं, लोकगीतं ऐकली होती. उत्तम वाचलं होतं आणि पाहिलेलंही होतं. त्यांच्या अभिजात प्रतिभेला मौखिक आणि लिखित परंपरांची मोठी रसद होती. शिवाय संस्कृताची अभिज्ञता, श्रद्धेची आणि भावगर्भ तत्त्वचिंतनाची सन्मुखता आणि भाषा म्हणून मराठीच्या स्वभाव-प्रकृतीची जाण त्यांना होती. बाजारूपणा आणि सवंगपणा यांचा स्पर्श नसलेला शृंगार त्यांच्या काव्यात शालीन धिटाईनं त्यागाचा आणि संयमाचा रंग दाखवणाऱ्या शांतरसाचा हात धरून येत होता आणि देशी शब्दांबरोबरच संस्कृत शब्दांचा अर्थवाही वापर सहज होत होता.

त्यांचा शब्द मोठा झाला तो त्यांच्या आशयाच्या बहुमुखी सांस्कृतिक संपन्नतेमुळे. ही संपन्नता म्हणजे मोले घातलेला उमाळा नव्हता. ग्राम्यपणा टाकून शाहिरी आणि अति आध्यात्मिकता टाळून संतवाणी त्यांनी सहज आपलीशी केली. प्रसन्नता हा तर त्यांच्या गीतांचा प्रधान गुण.     आश्चर्य वाटू नये, की मर्ढेकरांसारख्या कवीलाही याच गुणानं मोहिनी घातली होती. माडगूळकरांचा ‘जोगिया’ कवितासंग्रह १९५६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला प्रस्तावना लिहिण्याचं मर्ढेकरांनी ठरवलं होतं. ग. रा. कामतांना त्यांनी १९५३ च्या प्रारंभी एक पत्र लिहिलं होतं, त्यात म्हटलं होतं : ‘प्रस्तावना लिहिण्याचं एकदा कबूल केलं होतं, आजही तीव्र इच्छा आहे. पण कसं जमेल ते खरं. एक तर सध्या माझा माझ्यावरचा विश्वास पूर्ण उडाला आहे. यापुढे काही चांगलं-वाईट का होईना, पण आपल्याकडून काही लिहिलं जाईल असं वाटत नाही.. माडगूळकरांच्या प्रसन्न काव्याला माझ्या प्रस्तावनेचं गालबोट म्हणजेच मी स्वत:चे हात दाखवून अवलक्षण. पण इच्छा आहे.. छापले जातील तसे फॉर्म जरूर पाठवावे..’ ही प्रस्तावना लिहिली गेली नाही. पण ‘वाङ्मयीन महात्मते’चं प्रगल्भ विश्लेषण करणाऱ्या मर्ढेकरांनी पूर्वग्रहविरहित खुल्या रसिकतेनं माडगूळकरांच्या काव्याला दिलेली अशी दाद फार महत्त्वाची आहे. माडगूळकरांची शब्दांची निवड, विशेषणांची योजना, भाषांतराचं सामर्थ्य, अर्थातराची जाणकारी, नाद-लयींची योजना.. दाद कशाकशाला द्यावी? मर्ढेकरांनी मनोमन कशाला दिली असेल?

चित्रमयता किंवा दृक्प्रत्ययाची क्षमता माडगूळकरांइतकी मराठीत फार थोडय़ा कवींजवळ असेल. ‘खेडय़ामधले घर कौलारू’सारखं एखादं गीत आठवलं किंवा ‘शरयूतीरावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी’सारखं गीत समोर आणलं तरी त्या विलक्षण शैलीचं सामर्थ्य कळून येतं. शिवाय गीतातले भावानुरूप वेग-संवेग नियंत्रित करण्याचं त्यांचं कौशल्य पार्थसारथ्याइतकं अद्भुत आहे.

माडगूळकरांची गीतं सहज, साधी, सोपी खरी; पण सूचकतेचा त्यांनी केलेला वापर त्या साधेपणातूनही अर्थाच्या खोल डोहाकडे खेचत नेतो..

‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं

सांगा राघू, मी नाही कधी म्हटलं?’

यासारख्या लावणीत राघूसाठी डाळिंब येतं हे खरंच; पण तशी ही सूचकता ढोबळ आहे. खुमारी आहे ती पुढच्या बोलीतल्या प्रश्नात.. ‘मी नाही कधी म्हटलं?’ या प्रश्नार्थक उद्गारांनी आणखी कितीतरी सूचक प्रश्नांना जन्म दिला आहे. कशाला.. कशाकशाला नाही म्हटलेलं नाही, याचा विचार शृंगाराच्या गडद धुंदीत ओढून नेणाराच आहे. माडगूळकरांनी अशी सूचकता अनेकदा वापरली आहे. कुलवंत अदबीनं वापरली आहे, उत्कट संयमानं वापरली आहे आणि मोहक धिटाईनंही वापरली आहे. शिवाय योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे ती वापरण्याचं त्यांचं औचित्यभानही कमालीचं आहे.

‘नाग काढतो फडा

ग बाई, मज खुडवेना केवडा’

अशा एखाद्या गीतातली सूचकता आणि..

‘येइ, बैस, ये समीप

अधरे हे नयन टीप

दोन ज्योति, एक दीप

मंद प्रभा मग पिवळी

पाहिजेस तू जवळी..’

यांसारख्या गीतातली सूचकता शेजारी ठेवून पाहावी.

‘तो रावण कामी कपटी, तू वसलिस त्याच्या निकटी..’ असं म्हणता म्हणता त्यांचा राम स्वत:ला रोखतो. आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते..’ अशा संक्षेपाशी थांबतो, तेव्हा ती सूचकता तर कमालीची अर्थगर्भ होते.

माडगूळकरांच्या गाण्यांनी असं किती काय काय दाखवलं, उलगडलं, समजावलं आहे. व्यास-वाल्मिकींची प्रतिभा तर विराटाशी झोंबी घेणारी आहेच; पण त्यांचा अनुवंश सांगणाऱ्या कवी-साहित्यकारांच्या प्रतिभेलाही जीवनाच्या सदाहरित गुणाचा स्पर्श झाल्यानं बहराचा आशीर्वाद मिळून गेला आहे. माडगूळकर असे बहराचा आशीर्वाद मिळालेले कवी होते. जीवनात विपरीत तर असतेच; असणारच. पण त्या विपरितावर, अमंगलावर मात करण्याची एक आंतरिक शक्तीही जीवनाकडे असते. हे ज्याला समजलेलं असतं, त्याला मिळालेला बहर अक्षय टिकवताही येतो. माडगूळकरांचा प्रतिभाबहर तसाच उरलेला आहे- अक्षय उत्फुल्ल!

aruna.dhere@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on legendary marathi author g d madgulkar on occasion of birth centenary year
Show comments