रामदास भटकळ
संगीतकार पद्मभूषण निखिल घोष यांच्या जन्मशताब्दीची सांगता २८ डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा..
पंडित चिदानंद नगरकर यांची जन्मशताब्दी यंदा साजरी होत आहे. तो माझ्या आईचा मामेभाऊ. त्यांच्या लग्नापूर्वी ते बऱ्याचदा आमच्या घरी राहत असत. त्यामुळे कदाचित माझी सगळी मोठी भावंडे संगीतप्रेमी होती. माझा थोरला भाऊ सदानंद माझ्याहून बारा वर्षांनी मोठा. तो मला मफलींना घेऊन जायचा. काही छोटय़ा खासगी बठकी, तर काही सार्वजनिक! त्या दिवसांत बऱ्याच थोरांच्या मफली अगदी जवळून पाहिल्या. रविशंकर, विलायत खान, अलीअकबर खान, पन्नालाल घोष हे सारे त्यांच्या ऐन विशीत जगज्जेते होते. पन्नाबाबूंनी कृष्णाची मुरली पुन्हा निर्माण केली होती आणि बासरीवादन नव्या उंचीवर नेले होते. त्यांना साथ त्यांचे धाकटे बंधू निखिल करायचे. त्यांच्या कित्येक मफिली मी ऐकल्या. ते भाऊ-भाऊ होते हा काही त्यांच्या अप्रतिम जुगलबंदीचा खुलासा ठरत नव्हता. ही किमया त्यांना साधली होती खरी.
तेव्हा माझा त्या दोघांशी परिचय नव्हता. मी कॉलेजात असताना वर्गात उषा घोष नावाची मुलगी होती. ती कोकणीत बोलायची. हळूहळू लक्षात आले, की ही आमची जातवाली एका बंगाली बाबूने हरण करून नेली होती. तो बाबू म्हणजेच निखिलदा!
कॉलेजच्या दिवसांत माझे संगीताचे शिक्षण मागे पडले होते. थोडी श्रवणभक्ती चालायची.. तीही जास्तकरून ऑल इंडिया रेडियोच्या कृपेने. त्या दिवसांत रेडियोवर मोजकेच, पण उत्तम कार्यक्रम व्हायचे. सकाळी सातला धून व्हायची. तिथून आमचा दिवस सुरू. रात्री अकराला ‘क्लोज डाऊन’साठी पुन्हा ती धून ऐकली की मग आम्ही झोपायचो. आमच्या घरी पाय कंपनीचा उत्तम वॉल्व सेट होता. तो आमचा सांस्कृतिक पालक. दुसऱ्या दिवशी कॉलेजात कधी एकदा माझ्या संगीतप्रेमी मित्रांना भेटतो आणि आदल्या दिवशी ऐकलेल्या गाण्यांबद्दल चर्चा करतो असे व्हायचे. या दिनचय्रेमुळे प्रत्यक्ष तालीम न घेताही माझा संगीत व्यासंग चालू राहिला.
प्रकाशक म्हणून मी ग्रंथव्यवहारात वाढत होतो तेव्हा निखिल घोष यांनी ‘अरुण संगीतालय’ या नावाने संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. खारला त्यांच्या घरातच दिवसभर वर्ग चालायचे. निखिल घोष कलाकार असल्याने खूप स्वप्ने पाहायचे. ती स्वप्ने प्रत्यक्षात आणायला लागणारी जिद्द, कामसू वृत्ती आणि व्यवस्थापकीय क्षमताही त्यांच्यात होतीच. िहदुस्थानी संगीत भातखंडे यांनी तयार केलेल्या नोटेशन पद्धतीने लिहिले, शिकवले जाते. म्हणजे त्यासाठी देवनागरी लिपीचे ज्ञान आवश्यक आहे. पाश्चात्त्य संगीत लिहिण्यासाठी स्टाफ नोटेशन वापरले जाते. ते कोणतीही एक भाषा किंवा लिपी न जाणताही वादक-गायकाला वाचता येते. या दोन्हींचा सूक्ष्म मध्य शोधणारी नवीन लिपी ते शोधून काढत होते. त्यासाठी त्यांनी एक पुस्तकही लिहिले होते. छापण्याच्या दृष्टीने त्यात अनेक अडचणी होत्या. कुठून तरी त्यांना माझे नाव कळले. मुख्यत: ग्रंथव्यवसायामुळे माझ्या काही मुद्रक मित्रांच्या साहाय्याने मी त्यांना मार्ग सुचवले आणि पुस्तक तयार झाले.
निखिलदांकडे माणसे जोडण्याची कला होती. मी त्यांच्या कामात गुंतत गेलो. आमचे मित्र आणि व्यवस्थापन तंत्रज्ञ किशोर आरस यांनाही मी तिथे नेले. त्यावेळी निखिलदा अरुण संगीतालयाला एखाद्या विद्यापीठाचे स्वरूप देऊन स्वतंत्र जागा घेण्याच्या तयारीत होते. आमच्या मित्राच्या सूचनेवरून त्यांनी संस्थेचे नाव बदलून ‘संगीत महाभारती’ असे विश्वविद्यालयाला शोभेसे नाव दिले.
तोपर्यंत जुहू-विलेपाल्रे स्कीममध्ये जागा मिळवून त्यांनी नवीन वास्तूही योजली होती. एका बाजूने स्वतंत्र तबलावादन चालू ठेवायचे, शिवाय ते अधिक सुंदर, उज्ज्वल करायचे; अनेकांना शिक्षण द्यायचे.. तेही संगीताच्या सर्व क्षेत्रांत; या वाढत्या संस्थेचा कारभार चालवायचा- तोही नवीन बांधकाम करून.. आणि या साऱ्यासाठी लागणारे धन जमवायचे, माणसे नेमायची. स्वत:चा संसारही वाढत होता.
उषा-निखिल यांना तीन मुले झाली. यथावकाश तिन्ही संगीताच्या क्षेत्रात नाव मिळवून राहिली. नयन सतार आणि तबला दोन्ही वाद्यांत तरबेज आहे. ध्रुव हा सारंगी हे कठीण वाद्य शिकू लागला. मुलगी तुलिका ही आग्रा घराण्याची गायकी गळ्यावर चढवू लागली. सर्वाना निखिलदांचे शिक्षण होतेच; शिवाय त्यांचा संगीतजगतात मोठा राबता असल्याने त्यांना इतरांचेही मार्गदर्शन मिळायचे.
त्यांच्या अनेक स्वप्नांपैकी- खरे तर योजनांपैकी एक महत्त्वाची म्हणजे ‘संगीताचा विश्वकोश’! कोश तयार करणे हे जिकिरीचे आणि वेळकाढू काम. आधी या कोशाचे स्वरूप आणि मर्यादा ठरवून कोणत्या नोंदी द्यायच्या, ते ठरवायचे. या प्रचंड कामासाठी त्यांनी एक संपादकीय समिती नेमली. त्यात वेळोवेळी श्रेष्ठ दर्जाचे संगीतज्ञ नेमले गेले. फक्त मुंबईतलेच नव्हे तर देशभरातले. त्यांच्या मदतीने नोंदींवर कोणाला लिहायला सांगायचे, हे ठरत गेले. त्यासाठी एक उत्तम ग्रंथसंग्रह आवश्यक होता. ग्रंथपाल, हिशेबनीस, संपादक यांची नेमणूक करावी लागली. हे पाहुणे लेखक आणि घरचे कर्मचारी यांचा व्यवहार सांभाळावा लागायचा. त्यासाठी त्यांनी एक व्यवस्थापकीय समिती नेमली आणि माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
इतका मोठा डोलारा सांभाळायचा तर त्यासाठी त्यांना चार हात तर लागायचेच. त्यांच्या दिवसाला चोवीसाहून अधिक तास असावेत. आपल्या मुलांनाच नव्हे, तर उषाच्या नातलगांनाही या ईष्र्येने झपाटून टाकण्याची क्षमता निखिलदांमध्ये होती. मी तिथे जाऊ लागलो तेव्हा ही सर्व मंडळी आनंदाने आणि निरलसपणे काम करताना पाहून थक्क होत असे.
संगीत शिक्षण निरनिराळे वर्ग, परीक्षा इत्यादी पारंपरिक शाळा-कॉलेजप्रमाणे चालायचेच; शिवाय सीना बसीना पद्धतीत निखिलदांच्या मुलाप्रमाणेच अनीष प्रधानसारखे उत्तम तबलजी घडत असतानाही मी पाहत होतो. तिथे कार्यक्रमही होत. दरवर्षी एक मोठा कार्यक्रम करून त्यातून काही धनराशी जमवावी लागत असे. हे सारे करत असताना एक संगीतकार म्हणून स्वत: निखिलदाही वाढत होते. त्यांना मुळात आमीर हुसेन, ज्ञानप्रकाश घोष अशा श्रेष्ठ संगीतकारांची तालीम मिळाली होती. मान्यता पावल्यानंतरही ते अहमदजान थिरकवाँसारख्या उस्तादांना मुद्दाम बोलावून आपला ज्ञानसंचय वाढवीत असत.
माझे तबलाविषयक ज्ञान तुटपुंजे. सुरुवातीला मला वाटायचे, की गायक-गायिकांचे आवाज साहजिकच वेगळे असतात; पण तबला सगळ्यांचा सारखाच वाजणार. पण मी ऐकत गेलो आणि मलाही तबला वाजवण्याच्या पद्धतीवरून वादक ओळखता येऊ लागले. निखिलदा पन्नालालबाबूंना साथ करताना त्यांच्या साथीत बासरीला योग्य असे माधुर्य असायचे. पन्नालाल घोष यांच्या निधनानंतर त्यांनी अनेक श्रेष्ठ वादकांसोबत साथ केलेली मी ऐकली आहे. विशेषत: थिरकवाँच्या सान्निध्यानंतर निखिलदांच्या एकलवादनातही ते एखादी गोष्ट सांगताहेत किंवा गीत गाताहेत असा आभास निर्माण करण्याची ताकद आली होती. त्यांची मुले मोठी तरबेज झाली तेव्हा नयनची सतार आणि ध्रुवची सारंगी यांची जुगलबंदीची साथ निखिलदा अभिमानाने करताना मी ऐकले आहे. अशा मफलींसाठी त्यांनी दौरेही केले.
संगीत मनात जरी रुतून बसले तरी ते वाऱ्यावर विरूनही जाते. तंत्रज्ञानामुळे आजकाल ते ध्वनिमुद्रिका आणि चित्रफिती यांतून बांधून ठेवता येते आणि यूटय़ूबवरून प्रसारित होऊ शकते. तरीही चिरस्थायी स्वरूप हे मुद्रित पुस्तकांनाच लाभते. संगीत विश्वकोशासाठी नोंदी लिहून आल्यावर त्या तपासून घेणे, त्यातील वादग्रस्त मुद्दय़ांवर अधिकारवाणीने निर्णय घेणे, नोंदीतील तपशील ठरले की मग त्यांचे भाषिक स्वरूप पक्के करणे यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणे हे आलेच. म्हणजे वाढता खर्चही आला. हे सारे निखिलदांनी कसे झेपवले, हे मी पाहत होतो आणि अचंबित होत होतो. संपादकीय कामात माझा प्रत्यक्ष सहभाग नसायचा आणि माझी तशी पात्रताही नव्हती. फक्त मदतनीस म्हणून माझा एक मित्र संजय देशपांडे, संपादकीय कामासाठी आमचे एक लेखक मित्र देवदास पिलाई ही माणसे त्यांच्या परिवारात त्यामुळे आली.
अनेक वर्षांच्या अव्याहत श्रमांनंतर ‘एनसायक्लोपीडिया ऑफ म्युझिक ऑफ इंडिया’ तीन खंडांत तयार झाला. यात हिंदुस्थानी संगीताविषयी सविस्तर माहिती अकारविल्हे दिली आहे. कोणाही अभ्यासकाला अत्यंत उपयुक्त ठरेल असे हे काम चिरस्थायी स्वरूपाचे आहे. ते आता हिंदी, मराठीत उपलब्ध करून देणे, ही या थोर संगीतकाराला खरी श्रद्धांजली ठरेल.