M. S. Swaminathan News: देशातील ‘हरितक्रांती’ ते शेतकरी आयोग.. अशा तऱ्हेने गेली ६३ वर्षे शेतीविषयक अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांची वाटचाल अथक सुरू आहे. ७ ऑगस्टला ते ९३ व्या वर्षांत प्रवेश करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा धांडोळा..

‘येते उर का भरुन, जाती आतडी तुटून

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण

कुणी कुणाचा, लागून नाही जर?

नाही कोणी का कुणाचा,

बाप-लेक, मामा-भाचा,

मग अर्थ काय बेंबीचा, विश्वचक्री?’

असं मर्ढेकर कळवळून विचारत होते. हिरोशिमा आणि धार्मिक दंग्यांमधील रक्ताची थारोळी पाहून माणुसकीचा शोध ते घेत होते तेव्हा सानेगुरुजी खरा धर्म दाखवत होते. पं. नेहरू ‘अज्ञानाचा व अनारोग्याचा अंधार दूर करून प्रत्येक दु:खिताच्या चेहऱ्यावर हास्य आणता आले तरच महात्म्याला अभिप्रेत अर्थ स्वातंत्र्याला प्राप्त होईल,’ असं भान आणत होते. या काळात गांधी आणि नेहरू यांच्या विचारांमुळे कुटुंब, नातीगोती, जात आणि धर्म या संकुचिततेपलीकडे जाऊन माणुसकीचं नातं निर्माण करणारी पिढी देशभर तयार झाली. तेव्हाच प्रो. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांनी ‘आर्थिक शिडीच्या तळाशी असणाऱ्या अंतिम माणसाचा उदय’ हे व्रत स्वीकारलं. हरितक्रांती ते शेतकरी आयोग.. गेली ६३ वर्षे अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल अथक चालू आहे. ७ ऑगस्ट रोजी ते वयाच्या ९३ व्या वर्षांत प्रवेश करीत आहेत. वयोमानानुसार गुडघ्यांनी असहकार पुकारल्यामुळे आलेल्या चाकाच्या खुर्चीमुळे आता त्यांच्या प्रवासावर काही बंधने आली आहेत, एवढंच. परंतु या वयातही त्यांचा आशावाद व सकारात्मक वृत्ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांच्या लेखी कुणीही शत्रू नाही. त्यांचा संघर्ष गरिबीशी आहे; कोणत्याही व्यक्तीशी नाही. गरीबांचं कल्याण व भूकमुक्ती हा त्यांचा अविरत ध्यास आहे. या व्यापक उद्देशाकरिता ते कुणालाही, कधीही भेटायला आणि सोबत काम करायला तयार असतात. आजच्या कंठाळी व कर्कश्श वातावरणात मंद्र व आर्त स्वर ऐकू येणं अशक्य असतं. आत्मप्रेम, आत्मप्रक्षेपण व आत्मविक्री या मायाबाजारात ‘एकला चलो’ ही वृत्ती घेऊन जगाला प्रेम अर्पण करणारा हा करुणामयी शास्त्रज्ञ आहे.

आजपर्यंत देशात अनेक राजकीय पक्ष सत्तेवर येऊन गेले. त्यांचे आपसात अनेक मतभेद होते. परंतु त्यांना स्वामीनाथन यांच्यासमवेत काम करताना यत्किंचितही अडचण आली नाही. इंदिरा गांधी व मोरारजी देसाई, चरणसिंह व चंद्रशेखर, करुणानिधी व जयललिता हे एकमेकांचे कडवे विरोधक असूनही स्वामीनाथन यांची क्षमता, निष्ठा व ध्येय याविषयी या सर्वाना आदर होता. जनता पक्षाच्या काळात ‘ते इंदिरा गांधींच्या जवळचे आहेत.. त्यांना दूर ठेवा,’ असा हेका धरणाऱ्या सहकाऱ्यांना जयप्रकाश नारायण व मोरारजी देसाई या दोघांनीही ‘ते कोणाही व्यक्तीचे नसून देशाचे आहेत,’ अशी कडक समज दिली होती. सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी स्वामीनाथन यांचा वेळोवेळी शाब्दिक गौरव करीत शेतकरी आयोगाच्या अहवालाची मात्र उपेक्षा केली. तर त्यांच्या अनेक संकल्पनांच्या आकर्षक घोषणा करून अंमलबजावणी बाजूला सारत नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली असली, तरीही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एखादे छोटे पाऊलसुद्धा पुरेसे आहे असे मानणाऱ्या स्वामीनाथन यांच्या अथक प्रयत्नांत मात्र खंड पडलेला नाही.

स्वामीनाथन यांनी १९५४ साली अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठातील जनुकशास्त्र विभागात अध्यापनाची संधी सोडून मायदेशी धाव घेतली होती. आज जनुकीय तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. स्वामीनाथन यांनी १९५५ सालीच शेती संशोधन करताना विकिरणांच्या साहाय्याने उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवण्यास आरंभ करून विकिरण जीवशास्त्र (रॅडिएशन बायोलॉजी) विभाग स्थापन केला. तुभ्रे येथील अणु-तंत्रज्ञान संस्थेमध्ये जाऊन त्यांनी क्ष-किरण, गॅमा किरण व न्युट्रॉन यांचा उपयोग करून नवीन बियाणे निर्माण करण्यासाठी मदत घेतली. अणुऊर्जेचा शेतीसाठी होणारा उपयोग पाहून थक्क झालेल्या डॉ. होमी भाभा यांनी ‘शांततेसाठी अणुऊर्जा’ या विषयावरील जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामीनाथन यांना पाठवले. पुढे २००२ ते २००७ या काळात ‘पगवॉश परिषदे’च्या अध्यक्षपदाची धुरा स्वामीनाथन यांच्यावर होती. (तत्त्वज्ञ बटरड्र रसेल व शास्त्रज्ञ जोसेफ रॉटब्लॅट यांनी जगाला अण्वस्त्र युद्धापासून रोखून विज्ञानाचा उपयोग केवळ शांतता व विकासाकरिता व्हावा, या उद्देशाने १९५७ साली ही परिषद स्थापन केली होती. १९९५ साली शांततेचे नोबेल देऊन रॉटब्लॅट आणि ‘पगवॉश परिषद’ यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.)

विज्ञानाआधी माणुसकीला प्राधान्य देणारे अनेक वैज्ञानिक स्वामीनाथन यांचे घनिष्ठ मित्र आहेत. विज्ञानाच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या डी. एन. ए.च्या संरचनेचे संशोधक जेम्स वॅटसन व फ्रान्सिस क्रिक हे केंब्रिजमध्ये स्वामीनाथन यांचे सहाध्यायी होते. अनेक क्षेत्रांतील प्रगाढ विद्वान आणि वैज्ञानिक त्यांच्या नेहमी संपर्कात होते व असतात. डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई, शांतीस्वरूप भटनागर, वर्गिस कुरियन, अमर्त्य सेन, जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन हे त्यांचे निकटवर्तीय होते व आहेत.

फिलिपाइन्सच्या ‘इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे महासंचालक असताना स्वामीनाथन यांनी (१९८२ ते १९८८) चीन, व्हिएतनाम, कांपुचिया, थायलंड, मलेशिया, उत्तर कोरिया, टांझानिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, इराण, इजिप्त, बांगलादेश आणि पाकिस्तानाला भेट देऊन त्या देशांमधील तांदूळ संशोधनाला मदत केली. तिथल्या शेतकऱ्यांचं प्रशिक्षण घडवलं. त्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती कमालीची बिकट होती. व्हिएतनाम, उत्तर कोरियाला सहकार्य करणे म्हणजे अमेरिकेचा संताप ओढवून घेणे होते. पाकिस्तानला साहाय्य हा तर देशद्रोहच मानला जात असे. परंतु तरीही स्वामीनाथन यांनी भूकमुक्तीचा वसा सोडला नाही. संशोधनातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञांना मदत केली. पाकिस्तानबद्दल यत्किंचितही आकस न ठेवता त्यांनी खुल्या दिलाने केलेली मदत पाकिस्तानी नेत्यांची व जनतेची मने जिंकून गेली. पाकिस्तानचे भात उत्पादन उंचावल्याबद्दल कृषीमंत्री अ‍ॅडमिरल जुनेजा, परराष्ट्रमंत्री सरताज अझिझ आणि अध्यक्ष झिया उल हक यांनी जाहीर भाषणांतून स्वामीनाथन यांच्याविषयी १९८६ साली कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा भारतातील वैज्ञानिकही चकित झाले होते.

जगातील बहुतेक राष्ट्रांनी स्वामीनाथन यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे. अनेक देशांनी सर्वोच्च बहुमान बहाल केले आहेत. १९७३ साली ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ने त्यांची फेलो म्हणून निवड केली. अमेरिका व सोविएत युनियन यांच्या शीतयुद्धाचा तो चरमकाळ होता. परंतु या दोन्ही देशांनी, पाठोपाठ चीन व इटली येथील अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी त्यांना आदराने फेलो करून घेतले. नेदरलँडचा ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क’ हा सर्वोच्च बहुमान त्यांना प्राप्त झाला, तर फिलिपाइन्सचा ‘गोल्डन हार्ट प्रेसिडेन्शियल अ‍ॅवॉर्ड’ त्यांना दिला गेला आहे. ‘चार्ल्स डार्विन इंटरनॅशनल अ‍ॅवार्ड फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’, ‘युनेस्को द गांधी गोल्ड मेडल’, ‘द फ्रँकलिन रूझवेल्ट फोर फ्रीडम्स मेडल’ अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी स्वामीनाथन यांच्यावरील ‘द हिंदुस्थान टाइम्स’मधील लेखात ‘प्रेषितांचे मायदेश हेच त्यांचे मोल समजून घेण्यात कमी पडतात,’ अशी खंत व्यक्त केली आहे. स्वामीनाथन मात्र ‘देशभरातील सर्वसामान्य शेतकरी अतिशय जिव्हाळ्याने त्यांच्या जेवणातील घास मला देतात. स्वत:च्या हातांनी केलेले पदार्थ वाढतात. शेतकऱ्यांची ही आपुलकी हाच माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पुरस्कार आहे,’ असं म्हणतात.

२००० साली ‘टाइम’ साप्ताहिकाने निरनिराळ्या भौगोलिक खंडांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या वीस महनीय व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारे विशेषांक काढले. ‘टाइम’ने आशिया खंडाच्या प्रवासातील तीन भारतीय व्यक्तींच्या लक्षणीय कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला होता. महात्मा गांधी, गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्यानंतर त्यांनी स्वामीनाथन यांना स्थान दिले होते. त्यांचा गौरव करताना ‘टाइम’ने म्हटले होते.. ‘दुष्काळाला पराभूत करण्याचा अविरत ध्यास आणि जनुक अभियांत्रिकीमधील त्यांचा गाढा व्यासंग यांची सांगड घालून हरितक्रांतीच्या या जनकाने आशिया खंडामधून दुष्काळाला चीत करण्यात यश मिळवले, याकरिता विसावे शतक त्यांचे सदैव ऋणी राहील.’

१९८७ साली स्वामीनाथन यांना शेती क्षेत्रातील नोबेल मानलं जाणारं पहिलं ‘वर्ल्ड फूड प्राइज’ मिळालं. त्या रकमेत भर घालून त्यांनी १९८८ साली ‘स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली. ‘ग्रामीण भागातील शेती, अन्न व आहार या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता गरीब, महिला आणि निसर्ग यांना जपणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन व प्रसार’ हे या संस्थेचे ब्रीद आहे. हे संशोधन खुल्या पद्धतीचे आहे. लोकांना व इतर संस्थांना या संशोधन व प्रसारात सहभागी करून घेतले जाते. शासकीय, निम-शासकीय, खासगी व स्वयंसेवी अशा सर्व संस्थांना जोडून घेतले जाते. मागील २९ वर्षांत स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील सहा लाख गरीबांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकली आहे. संस्थेने ४,००० पोषण उद्यानांची निर्मिती केली असून १६,२०० हेक्टर जमिनीचा कायापालट केला आहे.

स्वामीनाथन प्रत्येकाला तेवढय़ाच आपुलकीने भेटून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मनापासून ऐकतात आणि मगच त्याला अर्थपूर्ण कृती सुचवतात. यातून हजारो तरुण कृतिप्रवण झाले आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञांना ‘कोळ्यांसाठी मोबाइल हा संकटकाळात बाहेर पडण्याचा मार्ग ठरावा,’ असं सुचवलं. क्वॅम, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, राष्ट्रीय सागरी माहिती यंत्रणा आणि स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘कोळीमित्र मोबाइल’ हे अफलातून जीवनरक्षक उपकरण तयार झाले आहे. अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा हा मोबाइल तमिळ, तेलुगू व इंग्रजी भाषेत चालतो. पाऊस, तापमान ही हवामानाची माहिती, भरती-ओहोटीच्या वेळा, चक्रीवादळाचा अंदाज त्यावर समजतो. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचा इशारा मिळतो. भौगोलिक स्थान-निश्चिती यंत्रणा (जीपीएस) उपलब्ध असल्यामुळे अद्ययावत मोटारीप्रमाणे नावाडय़ांना नावेचे मार्गक्रमण समजते. पाण्याची खोली, खडक अथवा बुडालेली नाव असल्याची माहिती मिळते. अडचण अथवा आणीबाणीच्या प्रसंगी हेल्पलाइनशी संपर्क होऊन संकटाची माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच स्वामीनाथन फाऊंडेशनपर्यंत पोहोचते. भारताच्या आठ हजार कि. मी. लांबीच्या सागरकिनाऱ्यावरील सुमारे ५० लक्ष लोकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर होत असून, त्यापकी ६० टक्के जनता ही दारिद्रय़रेषेखाली आयुष्य जगते. सध्या हा बहुगुणी मोबाइल पाच हजार खेडय़ांमधील कोळ्यांचा खरा साथी झाला आहे. ‘वंचितांपर्यंत पोहोचते तेच खरे तंत्रज्ञान’ ही उक्ती पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवण्याची किमया स्वामीनाथन यांनी करून दाखवली आहे.

शेतकरी हे बियाणांच्या बाबतीत स्वावलंबी असले पाहिजेत, याकडे स्वामीनाथन यांचा कटाक्ष होता व आजही आहे. हरितक्रांतीच्या काळात जगातील आणि देशातील सार्वजनिक संस्थांनी नवीन बियाणे तयार केली. या संस्थांचा नफा कमावणे हा उद्देश कधीच नव्हता. त्या सार्वजनिक हिताकरिता कार्यरत होत्या (व आहेत). शेतकऱ्यांना दरवर्षी नव्याने बियाणे विकत घेण्याची गरज पडू नये यासाठी त्यांनी सरळ व सुधारित बियाणे विकसित केली. खासगी कंपन्यांनी संकरित बियाणे तयार केली. ती मात्र दरवर्षी विकत घ्यावी लागतात. ‘जनुकीय स्थानांतरित बियाणेसुद्धा शेतकरी तयार करू शकतात. त्यात अगम्य अथवा रहस्यमय काहीच नाही,’ असं स्वामीनाथन म्हणतात. जनुकीय स्थानांतरित (जेनेटिकली मॉडिफाइड) बियाणे निर्माण करताना अग्रक्रमाचा प्रश्न आहे. संपूर्ण जगाच्या डोक्यावर सध्या समुद्राच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीचा धोका आहे. त्याकरता त्यांनी खाऱ्या पाण्यात तगून राहील असा तांदूळ तयार केला आहे. स्वामीनाथन फाऊंडेशनला खारफुटीचा (मँग्रोव्ह) जनुक काढून तांदळामध्ये घालण्यात यश आले आहे. हे संशोधन खासगी कंपन्यांच्या हाती पडून त्याचा केवळ त्यांच्या फायद्यासाठी वापर होऊ नये, याकरिता त्यावेळी स्वामीनाथन यांनी संरक्षित स्वामित्व हक्क (डिफेन्सिव्ह पेटंट राइट) घेतले. इतकेच नाही तर स्वामीनाथन फाऊंडेशनने ते स्वामित्व शेतकऱ्यांसाठी खुले केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे गटसुद्धा खारेपण सहन करणारा जनुक घेऊन कुठल्याही पिकाचं नवीन वाण तयार करू शकतात. ‘प्रत्येक शेतकरी हा वैज्ञानिक असतो,’ हे स्वामीनाथन मनापासून मानतात. खासगी कंपन्यांची वांगी व मोहरी यांना तत्परतेने परवानगी देणाऱ्या शासकीय यंत्रणेनं खाऱ्या पाण्यात टिकणाऱ्या तांदळाला मात्र दहा वर्षांपासून अडवून धरलं आहे.

‘शेतकरी आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत कोणते अडथळे आहेत?’ असं विचारले असता ते म्हणाले, ‘अंमलबजावणी न करण्यामागची नेमकी कारणं मला माहीत नाहीत. कदाचित अधिकारीवर्ग नाखूश झाला असेल. शेती विभागाचा कारभार शास्त्रज्ञांवर सोपवला जावा; अनुभवी, जाणकार, शेतकऱ्यांच्या नवनवीन समस्यांची व ग्रामीण भागाची बारकाईने जाण असणारे शेतकरी हेच महत्त्वाच्या पदांवर नेमले जावेत, अशा सूचना आयोगाने केल्या होत्या. सार्वजनिक क्षेत्रांनीच शेती संशोधन व विस्तार करण्यासाठी अग्रभागी असले पाहिजे असे माझे मत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांना मजबूत करून त्यांना वाव दिला जावा. परंतु शासनामधील मुख्य प्रवाह हा खासगी क्षेत्रांकडे कललेला आहे. वैयक्तिक नफा हाच व्यवसायाचा उद्देश असल्यावर गरीबांचा विसर पडणारच.’ शेतकरी आयोगाची अंमलबजावणी झाली असती तर भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा चेहरा बदलून गेला असता याची स्वामीनाथन यांना खात्री वाटते. ‘सध्याच्या राजकीय वर्गाला ते नको आहे. नेहरू, शास्त्री, सुब्रमण्यम यांना हवे होते तसे उमदे, उदार राजकारण सध्याच्या राजकीय वर्गाला नको आहे. राजकारण हे विज्ञान आणि प्रगती यांचा पाठिराखा होऊ शकते; तसेच अडथळादेखील! शहरी व ग्रामीण, शेती व उद्योग-सेवा यांच्यामधील तफावत कायम ठेवण्यातच त्यांचे राजकीय (व आर्थिक) हित गुंतले असावे असे वाटते,’ असं ते विषादाने म्हणतात. स्वामीनाथन यांच्या अंतर्बाह्य़ निर्मळपणामुळे आणि ‘गुरुत्व’आकर्षणामुळे भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याची किमया त्यांना सहज साध्य होते. जनुकीय तंत्रज्ञान, मोठी धरणे, अणुऊर्जा, जागतिकीकरण अशा विविध मुद्दय़ांचे कट्टर समर्थक आणि विरोधक, तसेच मध्यममार्गी, एरवी कधीही एकमेकांचा चेहरा न पाहणाऱ्यांचे स्वामीनाथन या एका विषयावर मात्र एकमत असते. त्यामुळे ही मंडळी स्वामीनाथन फाऊंडेशनच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी होत असतात. ७ ऑगस्ट २०१४ रोजी स्वामीनाथन यांच्या नव्वदीनिमित्त आयोजित केलेल्या ‘पारिवारिक शेती आणि भूकमुक्ती’ या परिषदेसाठी जगातील शेतीक्षेत्रात काम करणाऱ्यांची मांदियाळी दाटली होती. नेपाळ, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, मालदिव, म्यानमार, मंगोलिया, श्रीलंका, फिलिपाइन्स, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चीन, सीरिया, इटली, कॅनडा व अमेरिका या देशांतील कृषिमंत्री, शास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्था त्यानिमित्ताने चार दिवस एकत्र आले होते. ‘फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’, ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’, ‘इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट’ या जागतिक संघटनांनी पुढाकार घेऊन स्वामीनाथन यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली होती. लेबेनॉन येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च इन ड्राय लँड एरियाज्’ या संस्थेचे महासंचालक डॉ. मोहम्मद सोल तेव्हा म्हणाले होते, ‘संयुक्त राष्ट्र संघाला एखाद्या वर्षांचे अथवा दशकाचे अग्रक्रम ठरवून देणे, त्यामधील संशोधन व कृती ठरवणे, शास्त्रज्ञ, नेते, अधिकारी व चळवळीतील कार्यकत्रे या सर्वाना कृती देणे- हे ऐतिहासिक कार्य गेल्या ६० वर्षांपासून प्रो. स्वामीनाथन करीत आहेत. एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या आमंत्रणालाही मान देऊन इतके लोक एकत्र येतील असे वाटत नाही.’ तर प्रो. सी. एन. आर. राव तेव्हा मला म्हणाले होते की, ‘असा सोहळा वैज्ञानिकांच्या वाटय़ाला सहसा येत नाही. यापूर्वी १९६८ साली डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अशीच वैज्ञानिकांची दाटी झाली होती. रामन, स्वामीनाथन यांची जातकुळीच वेगळी आहे. वैज्ञानिकांचे तत्त्वज्ञ असूनही स्वामीनाथन सर्वासाठी प्रेरणादायी आहेत.’

या महिन्यातच केंब्रिज विद्यापीठाने स्वामीनाथन फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘भारतामधील धान्यसुरक्षा’ या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच ७ ते ९ ऑगस्टदरम्यान चेन्नईत ‘पोषणाकरिता शेतीयंत्रणा’ या विषयावर परिषद होत आहे. यातून गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवर संशोधन आणि त्यातून शेती-धोरणासाठी सूचना केल्या जातील. अतिशय मृदू व आर्जवी भाषेत स्वामीनाथन पुन्हा एकदा बजावतील.. ‘नोकरशहा त्यांच्या अहवालात शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच ‘लाभार्थी’ असा करतात. वास्तविक आजपर्यंत शेतकऱ्यांना लाभ कधी झाला आहे? सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा मदमस्त लाभ उठवतात ते अस्सल लाभ-अर्थी! यच्चयावत जग हे शेतकरी व वनस्पतींच्या आधारावर जगत आहे. या दोघांनाही काळजीपूर्वक जपणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा करणारा देश अधोगतीच्या वाटेवर असतो.’

आज समस्त नेतेमंडळी, अधिकारी व आत्मरममाण समाजाने त्यांच्या विश्वातून गरीब, शेतकरी व एकंदरीत करुणेला हद्दपार केलेले असताना स्वामीनाथन हे मर्ढेकरांच्या आर्त काव्याची पुन:पुन्हा आठवण करून देत आहेत.

अतुल देऊळगावकर atul.deulgaonkar@gmail.com