धोबीतलावमधील रंगभवनचं खुलं नाटय़गृह प्रेक्षकांनी खचोखच भरलं होतं. नाटय़गृहाबाहेर ताटकळत असलेले काही प्रेक्षक गडबड करत होते. आतल्या पायऱ्यांवरही बसायला जागा नव्हती. ती राज्य नाटय़स्पर्धेच्या अंतिम फेरीची एक संध्याकाळ होती. साल १९६९. ‘भोवरा’ आणि ‘सैनिक नावाचा माणूस’ या नाटकांमुळे गाजलेल्या नगरमधील महाविद्यालयाच्या थिएटर ग्रुपचा प्रयोग होता. पुण्याची पी. डी. ए. आणि नागपूरच्या दारव्हेकरांची ‘रसिकरंजन’ या नाटय़संस्थांना तेवढीच तगडी प्रतिस्पर्धी संस्था उभी राहिली होती. त्यांच्या नाटकाचं शीर्षकही कमालीची उत्सुकता आणि उत्कंठा निर्माण करणारं होतं.. ‘काळे बेट आणि लाल बत्ती’!

रंगमंचावरच्या अनोख्या वातावरणाचं दर्शन देतच पडदा उघडला. आकाश गडगडत होतं. ढग कडकडत होते. सागरलाटांचं तांडव नृत्य कानावर पडत होतं. अशा वातावरणाला छेद देत एक जोरकस व्यक्ती चमकली. एखाद्या चमत्कारासारखी! लष्करातल्या सेनानीसारखा पोशाख, भेदक नजर, पावलांची ठाम हालचाल. सबंध शरीर म्हणजे मूर्तिमंत जरब! आणि तरीही देखणे, आकर्षक. खर्जाचा आवाज. सारी भूमीच आपल्या पायतळी घेणारा कोण होता तो नाटय़ावतार? सर इंद्रसेन आंग्रे.. काळ्या बेटावरचा सर्वेसर्वा!

Pantnagar municipal higher primary hindi school only two female teachers for classes 5th
घाटकोपरमधील शाळेत ९७ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Nagpur 3rd grad student Kashish Thakur sang poem earning appreciation from Bhuse during inspection
जेव्हा शिक्षण मंत्र्यांना चिमूकलीने ऐकवली कविता…
Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
दूरदेशीच्या ज्ञानवाटा : अमेरिकेतील प्रवेश परीक्षा
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
ashok saraf conferred with padma shri wife nivedita express gratitude
“प्रेक्षकांना नेहमी देवासमान…”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

प्रा. मधुकर तोरडमलांचा इंद्रसेनाच्या भूमिकेतला हा जो साक्षात्कार मी अनुभवला, त्याला आता चार दशकं उलटून गेलीत. पण तोरडमलांचा तो इंद्रसेन बघताना मला आठवण झाली होती ‘पुण्यप्रभाव’ नाटकाची. वृंदावनची. नटवर्य नानासाहेब फाटकांची! तशीच नजर, तीच जरब आणि तेच पदार्पणातच रंगभूमीला कवेत घेणं! प्रथमदर्शनीच प्रा. तोरडमलांच्या इंद्रसेनाने अवघ्या नाटय़रसिकांना पार भारावून टाकलं होतं. दीर्घ कालावधीनंतर तोरडमलांच्या रूपाने मराठी रंगभूमीला एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंग नट सापडला होता.

‘काळे बेट’मध्ये माणसाच्या शिकारीची गोष्ट होती. खजिन्याच्या शोधात एका निर्जन बेटावर आलेला सर इंद्रसेन. त्याच्या हातून तेथील एका आदिवासीची हत्या होते. आणि तेव्हापासून त्याला माणसाच्या शिकारीचाच छंद लागतो. जहाज फुटल्यामुळे त्या बेटावर आलेले वेगवेगळ्या स्वभाव-प्रवृत्तीचे काही लोक आणि इंद्रसेन यांच्यामध्ये हा शिकारीचा खेळ चालू होतो. आणि मग माणसांचे वेगवेगळे रंग आणि ढंग या बेटावर एकमेकांचा पाठलाग करीत राहतात. अशा या सर्वस्वी वेगळ्या कथानकाच्या आणि व्यक्तिरेखांच्या नाटकाने सवरेत्कृष्ट निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, वैयक्तिक अभिनय अशी सर्वच अव्वल पारितोषिके प्राप्त केली होती. आणि त्यांच्यावर मुद्रा होती ती प्रा. मधुकर तोरडमल यांचीच!

हे नाटक मग साहित्य संघाने घेतले आणि त्याचे अनेक प्रयोग केले. या नाटकाच्या आणि दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या सोबतीने मामा तोरडमलांनी मुंबईच्या व्यावसायिक नाटय़क्षेत्रात प्रवेश केला आणि मुंबईतल्या बुद्धिमान आणि सुजाण कलावंत-दिग्दर्शकांत मोलाची भर पडली.

तोरडमलांनी १४ नाटकं लिहिली. एखाद्या नाटकाचा अपवाद वगळता त्यांनीच ती दिग्दर्शित केली आणि त्यातील प्रमुख भूमिकाही साकारल्या. ‘गरजेपोटी आपण ही नाटकं लिहिली,’ असं आपल्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात ते लिहितात. पूर्वार्धात स्पर्धेची गरज म्हणून, तर उत्तरार्धात उदरनिर्वाहाची! हे खरं असलं तरी लिहिण्याची म्हणून एक गरज असतेच. व्यवसायाच्या गरजेपोटी त्यांना फार काही कलात्मक, तरल वा सूचक लिहिता आलं नसेलही; पण त्यांच्यावर पाश्चात्त्य वाङ्मय व चित्रपटांचा जबरदस्त परिणाम होता.  इंग्रजीचे ते उत्तमच नव्हे, तर लोकप्रिय प्राध्यापक होते. त्यांची लेखणी संवेदनशील होती आणि अभिरुची श्रीमंत होती. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना पटतील, आकर्षित करतील अशीच नाटकं त्यांनी लिहिली यात शंका नाही. पण अन्य तद्दन व्यावसायिक नाटकांसारखा त्यांच्या नाटकांत ढोबळपणा नव्हता. भाबडेपणा नव्हता. कुठलेही नाटक प्रतिगामित्वाचा डंका पिटणारे नव्हते. अतिनाटय़ाचा त्यांना हव्यास होता हे खरं; पण त्यात किंचित भडकपणा होता आणि बरीचशी स्वाभाविकता होती. म्हणूनच त्यांची नाटके प्रेक्षकप्रिय झाली.

वैचित्र्य आणि अतिनाटय़ हा त्यांच्या लेखणीचा स्थायीभाव होता. ‘गुड बाय डॉक्टर’ या त्यांच्या नाटकात याचा प्रत्यय दिसून येतो. कुरूप, कुबडा प्राध्यापक. त्याच्या मुलीच्या हत्येचा त्याने घेतलेला सूड म्हणजेच हे नाटक. त्यात मुलीची करंगळी कापून ती जेवणात टाकण्याची घटना आहे. बाळ चिलयाच्या पौराणिक कथेला दिलेलं हे आधुनिक रूप होतं. त्यात क्रौर्य आणि ज्याला गडदनाटय़ किंवा अलीकडच्या भाषेत ‘हाय ड्रामा’ म्हटलं जातं ते आहेच; शिवाय ‘हंचबॅक ऑफ नोत्र-दाम’ची आठवण करून देणारा कुबडय़ा आहेच.

गंभीर नाटकांच्या बाबतीत हे टोक गाठू पाहणारा कल विनोदी नाटकांच्या बाबतीतही दुसऱ्या टोकाला.. म्हणजेच फार्सच्या दिशेकडे जाणारा होता. मामांकडून साधे-सरळ, नर्मविनोदी नाटक होणे नव्हते. ‘याच्यातून त्याच्यात आणि त्याच्यातून याच्यात’च्या ‘ह-हा-ही’ने साऱ्या महाराष्ट्राला ‘हा.. हा!’ करायला लावले. खरं तर ‘ह’च्या बाराखडीचा वापर त्यापूर्वीही एका जुन्या नाटकात वाचल्याचं मला स्मरतं. पण मामांनी ही बाराखडी अशी चौफेर आणि तुफान वापरली, की त्याचे नाव हेच! ‘हे हे, है है, हो हो!’ ‘तरुण तुर्क’प्रमाणेच ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ हे नाटकाचे शीर्षकच नाटकाचा फार्सिकल प्रकार पूर्वघोषित करणारे होते.

गंमत अशी, की मामा लेखनात जसे नाटय़मय वा फार्सिकल होते तसेच अभिनयातही! व्रात्यपणा वा सभ्य चावटपणाही त्यांच्या अभिनयात मुरलेला होता. म्हणूनच ते शैलीदार अभिनयाचा इंद्रसेन आणि ‘तरुण तुर्क’मधला ‘प्रो. बारटक्के’ सारख्याच समर्थपणे उभा करीत. असा दरारा, करारीपणा मूर्तिमंत करणारे तोरडमलच शारीर अभिनयातून अतिशयोक्तीपूर्ण विनोदी आविष्कार निर्माण करीत असत. प्रा. तोरडमल यांची ही खासियत होती.

तोरडमल इंग्रजीचे प्राध्यापक होतेच; शिवाय शेक्सपिअरच्या नाटकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता, सखोल चिंतन होते. त्यामुळेच शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘गगनभेदी’ या नावाने केलेले मिक्श्चर त्यांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. आपल्या डोळ्यासमोर जगन्मान्य नाटककाराची ही हत्या त्यांना पाहवत नव्हती. ‘गगनभेदी’ नाटक सुधारण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. अनेक वेळा कानेटकरांशी बोलणी केली. स्वत: बरेचसे लेखन केले, सुधारणा सुचवल्या. पण नाटककार हटेनात. अखेरीस नाटक बंद होण्याची शक्यता जमेस धरून तोरडमल स्वत:च्या सुटकेची वाट बघत राहिले. आणि दूरदर्शनवर झालेल्या ‘गगनभेदी’ नाटकाच्या कार्यक्रमामुळे मंदावत चाललेल्या प्रयोगसंख्येने जोराची उसळी मारली.  प्रयोगावर प्रयोग झडू लागले. अन्य नाटकांतलं वैचित्र्य त्यांच्या आविष्काराला आनंद देणारं होतं, पण ‘गगनभेदी’च्या बौद्धिक विचित्रपणाचा त्यांच्या मानसिकतेवर जबरदस्त ताण पडला. त्यांना ते असह्य़ झालं. ‘चंद्रलेखा’ संस्थेला राम राम ठोकायला हे प्रमुख कारण होतं. (संदर्भ- ‘तिसरी घंटा’)

एखाद्या जाणकार आणि खऱ्या अर्थाने सुविद्य असलेल्या निर्मात्याने मामांचं शेक्सपिअरप्रेम व अभ्यास ध्यानात घेऊन त्यांचे ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ मराठी रंगमंचावर आणले असते तर मराठी रंगभूमीला विश्वविख्यात शॉयलॉकचे विलक्षण भेदक दर्शन घडले असते. पण ते घडले नाही. तोरडमलांनी स्वत:ही आपल्या संस्थेतर्फे या ‘व्हेनिस’च्या व्यापाराला निमंत्रण दिलं नाही.

हिटलरच्या शेवटच्या दिवसांवर तोरडमलांना एक नाटक लिहावयाचे होते. त्याबद्दल आपल्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात ते म्हणतात : ‘हिटलरने बर्लिनच्या मंत्रालयाच्या तळघरात शेवटचा आश्रय घेतला. या त्याच्या शेवटच्या दहा दिवसांचे इत्थंभूत वर्णन ‘टेन डेज टू डाय’ या पुस्तकात केले आहे. या दहा दिवसांत त्याचा मित्र आणि मंत्री अल्बर्ट स्पिअर याच्याशी हिटलरचा विलक्षण संघर्ष झाला. आपण हरलो हे लक्षात येताच हिटलरने स्वत:चा नाश करायचा तर ठरवलेच; पण सर्वच जर्मनीचा नाश करण्याचा सैतानी निर्णय घेतला होता. सर्व जर्मन राष्ट्र जाळून नष्ट करावे असा हुकूम त्याने सोडला. पण स्पिअरने या हुकमाविरुद्ध बंड केले. हिटलरला परमेश्वर मानणारा स्पिअर ‘व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे’ या जाणिवेने हिटलरच्या विरुद्ध उभा राहिला. जिवावर उदार होऊन त्याने हिटलरचा हा हुकूम तर पाळला नाहीच; उलट जर्मन राष्ट्र जपणे, प्रत्येक धरण, प्रत्येक पूल, प्रत्येक दळणवळणाचे साधन, प्रत्येक उत्पादनाचे साधन, प्रत्येक संस्कृतीचे साधन जपणे हे प्रत्येक जर्मन माणसाचे परमकर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे, असा उलटा हुकूम त्याने सोडला. या दोन माणसांतला संघर्ष माझ्या नाटकात उभा करण्याचा माझा उद्देश होता. तो अर्धवटच राहिला. आयुष्यात कित्येक गोष्टी करायच्या करायच्या म्हणून तशाच राहून जातात, त्यातलीच ही एक.’

मामा तोरडमल हे शेक्सपिअरभक्त. आणि तरीदेखील त्यांनी शेक्सपिअरचं एकही नाटक रंगमंचान्वित कसं केलं नाही? हा मला पडलेला प्रश्न मी एकदा त्यांना विचारला होता. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘ ‘ऑथेल्लो’ मी करणार होतो. प्रभाकर पणशीकर ‘आयागो’ साकारणार होते. सारी निश्चिती झाली होती. पण तेवढय़ात नाटककार कानेटकरांनी पणशीकरांना परावृत्त केले अािण ‘जिथे गवताला भाले फुटतात!’ हे आपले नाटक करायला त्यांना भाग पाडले. हे ‘भाले’ प्रेक्षकांनी फेकून दिले तरी त्यातला एक भाला माझ्यातल्या ऑथेल्लोला जखम करून गेला. मी ऑथेल्लोला कायमचा दुरावलो.’’ मामांचे हे भोग इथवरच थांबले नाहीत. त्यांना शेक्सपिअरच्या कानेटकरांनी केलेल्या अर्धवट आणि भ्रष्ट व्यक्तिरेखा साकार करण्याचेही नशिबी आले.

‘अलीकडच्या कलावंतांच्या आत्मकथनातून त्यांच्या अपयशाचं विश्लेषण आढळत नाही,’ अशा आशयाचे उद्गार नाटककार महेश एलकुंचवार यांनी अलीकडे एका प्रकाशन समारंभात व्यक्त केले. ही वस्तुस्थिती असली तर मामा तोरडमल यांचे आत्मकथन ‘तिसरी घंटा’ हे या वस्तुस्थितीला अपवाद आहे. आपल्या मद्यपानाची कबुली त्यांनी पुस्तकात मनमोकळेपणी दिली आहे. घरच्यांनाही रात्रभोजनाआधी त्यांचा मद्यपान करण्याचा रिवाज ठाऊक होता. आपल्या मद्यपानाचा त्यांनी कधी बाऊ केला नाही वा त्याचे अवडंबर माजवले नाही. त्यांनी मद्याचा रसिकतेने आस्वाद घेतला. त्यात ते बुडाले नाहीत किंवा वाहूनही गेले नाहीत.

‘काळे बेट आणि लाल बत्ती’ हे नाटक परकीय कथेचे रूपांतर आहे, असा आरोप भाऊ कायंदे यांनी ‘लोकसत्ता’मध्ये करून गदारोळ माजवला होता. त्याला तोरडमलांनी आत्मचरित्रात चोख उत्तर देऊन म्हटले आहे : ‘पण ते काहीही असले तरी एक चूक मी  निर्विवादपणे मान्य केलीच पाहिजे. नाटकाच्या प्रस्तावनेत मी कथाकल्पना बीजरूपाने का होईना, रिचर्ड कोनेल यांच्या ‘द मोस्ट डेंजरस गेम’वरून माझ्या मनात रुजले, याचा ऋ णनिर्देश करायलाच हवा होता. हा एक अपवाद सोडता मी जी- जी नाटके परकीय कल्पनेवरून लिहिली, त्या- त्या नाटकाच्या प्रस्तावनेत असा नामनिर्देश कटाक्षाने केला आहे.’

आपल्या नाटकांबद्दल ते आत्मचरित्रात लिहितात :

‘मी प्रामुख्याने नट- दिग्दर्शक जास्त आणि लेखक कमी असल्याने माझ्या नाटकांवर मर्यादा आल्या. त्याचप्रमाणे प्रयोगापुरता फायदा झाला तो इतकाच, की ती संहिता बंदिस्त रूपात रंगमंचावर उभी राहू शकली. मात्र, तिच्यात प्राण फुंकण्याचे प्रत्येक वेळी साधलेच असे नाही. अशा मर्यादेत लिहिल्या गेलेल्या माझ्या नाटकांचे वाङ्मयीन मूल्यमापन करताना असे वाटते, की ही बहुतेक दुय्यम दर्जाची नाटके आहेत.. लिखाणापेक्षा प्रयोगाकडेच माझे लक्ष केंद्रित झाल्याने त्या मर्यादा आपोआपच माझ्या विचार मांडण्यावर झालेल्या आहेत. वैचारिक परिपक्वतेपेक्षा माझा भर आहे तो विचार मांडण्यातल्या परिणामकारकतेवर. त्यामुळे प्रगल्भ विचारनाटय़ माझ्या हातून लिहून झाले नाही. दीर्घकाळ वाऱ्यावादळांना तोंड देत टिकून राहणाऱ्या शिल्पापेक्षा मोहरमच्या काळात सजणारे रंगीबेरंगी कागदांचे आणि बेगडाचे डोलेच उभे करण्यात मी रमून गेलो.’

एवढा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता अलीकडच्या कुठच्या आत्मकथनात आढळते?

‘तिसरी घंटा’ या आपल्या आत्मचरित्राच्या अखेरीस तोरडमल म्हणतात : ‘या जन्मीच्या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर या नाटकासाठी अंगावर चढविलेल्या जीर्ण वस्त्रांचा निरोप घेताना जी. ए. कुलकर्णीच्या ‘स्वामी’च्या मनात आले तसेच आपल्याही मनात यावे, असे मला वाटते.’

येथे तोरडमल दीर्घ कविता सादर करतात. त्यातील शेवटच्या कडव्यात तोरडमल म्हणतात-

‘मी अंधारात लाल प्रकाशात दडपून

चिरडला गेलो नाही,

तर मीच हिरव्या कारंज्याप्रमाणे वर आलो आहे,

हेदेखील इतरांना कळू दे,

म्हणून तू असाच वर जा.’

सर, तुम्ही कृतार्थ जीवन जगलात. निवृत्तीच्या काळात तुम्हाला वेळ खायला उठला नाही. तुम्हीच वेळेला खायला दिलंत. विपुल साहित्यनिर्मिती केलीत. रंगभूमीला आणि साहित्यालाही तुम्ही भरभरून दिलेत. तुम्हीच दिलेल्या आनंदाने निरोप देतो..

गुड बाय प्राध्यापक तोरडमल! गुड बाय! बाय बाय!

कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com

Story img Loader