भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाचा सर्वागीण अभ्यास मांडू पाहणारे डॉ. अरूण टिकेकर, समाजाच्या उत्कर्ष-अपकर्षांची मीमांसा करणारे टिकेकर, विवेकवादी भूमिका घेणारे टिकेकर, संपादक म्हणून निष्पक्ष भूमिकेचा आग्रह धरणारे टिकेकर आणि समाजसंस्कृतीचा अभ्यास मांडत समाजविषयक चिंतन करणारे टिकेकर आता यापुढे प्रत्यक्षात दिसणार नाहीत. त्यांनी नव्याने केलेली समाजाची चिकित्सा यापुढे वाचायला मिळणार नाही, हा खरोखरच मोठा धक्का आहे.
आता टिकेकरही गेले.. समाजातली एकेका क्षेत्रातली धुरंधर आणि विश्वासार्ह माणसं जेव्हा काळाच्या पडद्याआड जात राहतात तेव्हा या माणसांनी ज्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम केलेलं असतं त्या क्षेत्रातील मागे राहिलेल्या मंडळींना एक प्रकारचं पोरकेपण जाणवायला लागतं. डॉ. अरूण टिकेकर यांच्या अकाली निधनाने अठराव्या ते विसाव्या शतकाचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक संशोधक-अभ्यासकांना आज एक पोकळी जाणवत असेल आणि काहीसे अनाथपण जाणवत असेल तर ती अतिशय स्वाभाविक अशीच गोष्ट आहे. नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. रा. भा. पाटणकर, प्रा. मे. पुं. रेगे, डॉ. अशोक रानडे यांच्या जाण्याने जशी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या मंडळींना काहीतरी मोलाचं गमावून बसल्याची जाणीव झाली, तशीच आज ती टिकेकरांच्या जाण्याने झाली. महात्माजींनी ” A man is but the product of his thoughts; What he thinks, he becomes…” असे जे उद्गार काढले होते ते टिकेकरांसारख्या व्यक्तींच्या बाबतीत अगदी तंतोतंत सार्थ ठरतात. भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाचा सर्वागीण अभ्यास मांडू पाहणारे टिकेकर, समाजाच्या उत्कर्ष-अपकर्षांची मीमांसा करणारे टिकेकर, विवेकवादी भूमिका घेणारे टिकेकर, संपादक म्हणून नि:पक्ष भूमिकेचा आग्रह धरणारे टिकेकर आणि समाजसंस्कृतीचा अभ्यास मांडत समाजविषयक चिंतन करणारे टिकेकर आता यापुढे प्रत्यक्षात दिसणार नाहीत. आणि त्यांनी नव्याने केलेली समाजाची चिकित्सा यापुढे वाचायला मिळणार नाही, हा म्हटला तर खरोखरच मोठा धक्का आहे.
गेली किमान पंचवीस र्वष टिकेकर यांच्याशी माझा निकटचा संबंध आला आणि त्यांच्याशी जुळलेली मैत्री अगदी अखेरच्या दिवसापर्यंत तेवढीच घनिष्ठ राहिली यात टिकेकरांचा वाटा मोठा होता. अगदी अलीकडेच प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक म्हणजे ‘कालान्तर’! त्याच्या प्रकाशनापूर्वी त्यांनी मला केलेला फोन आज स्पष्ट आठवतो. त्यावेळी ते मला म्हणाले, ‘‘तापस, माझ्या प्रत्येक पुस्तकाची पहिली प्रत मी माझ्या सहीनिशी एकेका मित्राला दिली आहे. आपल्या मैत्रीचं तुम्हाला कायम स्मरण राहावं म्हणून यावेळी मी तुम्हाला ‘कालान्तर’ची पहिली प्रत देणार आहे. ती प्रत घ्याल ना?’’ मैत्रीला टिकेकर असे पक्के होते आणि मैत्री वा मित्रांविषयी ते अत्यंत संवेदनशील होते. त्यांनी मित्रांबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल विलक्षण आस्था बाळगली. मी टिकेकरांना ते टाइम्सच्या संदर्भ विभागाचे प्रमुख होते तेव्हापासून ओळखत होतो. त्यांच्याशी मैत्री जुळली ती याच काळात. आमच्यातला समान धागा म्हणजे पुस्तके. त्यांची पुढची सगळी वाटचाल- म्हणजे महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक, ‘लोकसत्ता’चे संपादक, ‘लोकमत’ आणि ‘सकाळ’चे समूह तसेच संपादक संचालक, ‘एशियाटिक लायब्ररी’चे अध्यक्ष ही मी अगदी जवळून पाहिली. आणि याचं काळात प्रकाशित झालेली त्यांची पुस्तके एकेक करून कशी सिद्ध होत गेली तेही मी अनुभवले. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचे लेखन आणि निर्मितीप्रक्रिया यांचा प्रत्येक टप्प्यावरचा मी साक्षीदार झालो, ती फक्त टिकेकरांची इच्छा.
मी अनेकदा त्यांच्याबरोबर काम केलं आणि प्रत्येकदा ते मला समृद्ध करत गेले. त्यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘तारतम्य’ या सदराचा तर मी अनेकदा पहिला श्रोता असायचो. मी जेव्हा त्यांच्या लेखनातून ‘अस्वस्थ महाराष्ट्र’ या शीर्षकाच्या दोन ग्रंथांचं संपादन केलं, तेव्हा आणि नंतर त्यांच्या महादेव गोविंद रानडे यांच्यावरच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला तेव्हा मी अनुभवलेले टिकेकर ‘अस्सल संपादक’ म्हणून कायम स्मरणात राहणारे आहेत. ग्रंथातला प्रत्येक शब्द, प्रत्येक तपशील याविषयी ते इतके जागृत असत, की आपण थक्क व्हावं. १९९३ ते २०१५ या २२ वर्षांत टिकेकरांनी केलेलं सगळं लेखन त्यांचा अफाट व्यासंग आणि त्यांच्या विचारविश्वाचा व्यापक परिसर अगदी मूर्त स्वरूपात सांगणारे आहे. त्यांच्या या विचारविश्वाचं साक्षीदार मला होता आलं, हा मला माझा फार मोलाचा आणि मला घडवणारा ऊर्जास्रोत आहे असं वाटतं. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन मी जेव्हा रुईया महाविद्यालयाचा इतिहास मांडला तेव्हा त्यांनी ‘‘तापस, संस्थेतिहासात आज तुम्ही फार मोलाची भर तर घातलीतच; आणि त्याचं एक उत्तम अनुकरणीय मॉडेल तुम्ही सादर केलं आहे आणि त्याचा मला मोठा आनंद आहे,’’ अशी जी पाठ थोपटली, ती मी कधीही विसरू शकणार नाही.
टिकेकरांशी झालेल्या गप्पा, त्यांच्या लेखनाचा विषय झालेल्या उत्तुंग व्यक्तींबद्दल ते करत असलेलं विश्लेषण, त्यांनी आयुष्यभर जमवलेल्या अतिदुर्मीळ ग्रंथांच्या खरेदीच्या कहाण्या, समकालीन आणि पूर्वकालीन मराठी-इंग्रजी साहित्याविषयीचा त्यांचा व्यासंग, हजार प्रकारच्या संस्कृतीविषयक ग्रंथांबद्दल त्यांना असलेली विलक्षण ओढ हा एक फार मोठा ठेवा आहे. त्यांनी चालू केलेला आणि पुढे अस्तंगत झालेला ‘एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचा क्लब’ त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. आज मागे वळून बघताना आठवतात त्या त्यांच्या घरी दर रविवारी घडणाऱ्या गप्पांच्या मैफली. यात त्यांचे परममित्र कसबेकर, डॉ. जे. व्ही. नाईक, डॉ. अरविंद गणाचारी आणि मी यांचा नेहमीचा सहभाग असायचा. चार तासांची तरी नियमित वाहणारी ती ज्ञानपोई असायची. त्यातला माझा रोल असायचा फक्त श्रोत्याचा. टिकेकर आणि डॉ. नाईक-गणाचारी यांच्यातली वैचारिक चर्चा ही एक फार मोठी वैचारिक मेजवानी असायची. टिकेकर हे अस्सल उदारमतवादी होते. न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर ही त्यांची वैचारिक घराणी होती. त्यामुळे त्यांच्याकडे अगदी विरुद्ध मते समजावून घेण्याची आणि त्याचा काटेकोर तर्कशुद्ध प्रतिवाद करण्याची अफाट शक्ती होती. वैचारिक बहुलतेतून नेमका सर्वसंगत विचार कसा शोधायचा, याचं अनौपचारिक शिक्षण देणारी ही मैफल असायची. या गप्पांसोबत चहा, पातळ पोह्य़ांचा चिवडा, खारे शेंगदाणे असायचेच. कारण या साऱ्याबद्दल टिकेकरांनी कायम प्रेम जपलेले होते. ते अगदी परवापर्यंत.
डॉ. अरूण टिकेकर हे स्वत: एखाद्या शैक्षणिक संस्थेसारखे होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि संस्कृतीकारण यांचा त्यांचा व्यासंग जसा अफाट आणि अनेकस्तरीय होता, तसाच त्यांचा समाजातील बदलांविषयीचा अभ्यासही अतिशय व्यापक होता. ‘ज्ञान दिल्याने वाढते’ यांवर त्यांची कायमची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी अनेक तरुण मित्र-मैत्रिणींना ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांकडे आकर्षित करून घेतले आणि त्यांची विचारबैठक पक्की केली. एखाद्याला एका विषयात गती आहे आणि त्या विषयात काम करण्याची त्याची तयारी आहे, हे लक्षात आलं की टिकेकर आपला अत्यंत दुर्मीळ ग्रंथसंग्रह त्याच्यासाठी सहज उपलब्ध करून द्यायचे. मागे एकदा त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापक असलेल्या आणि त्याचवेळी जगभरच्या बदलत्या फॅशन्सचा अर्थशास्त्रीय आणि सांस्कृतिक अभ्यास करू पाहाणाऱ्या वर्षां माळवदेला आपल्याकडची संबंधित पुस्तके चक्क झेरॉक्स करून घेण्याची परवानगी दिली होती ते आठवते. टिकेकर हा एकोणिसाव्या शतकाचा एक महामोलाचा जिवंत ज्ञानकोशच होता. त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्यांना त्यांनी एक विचार दिला, एक आगळी ज्ञानदृष्टी दिली आणि त्यांच्यात एक लसलसती उत्सुकता निर्माण केली. पुढच्या पिढीत इतिहासाची आस्था रुजावी, वाढावी आणि त्यांनी वर्तमानाचं सम्यक विश्लेषण करावं, इतकाच असला तर टिकेकरांचा यात सुप्त हेतू मला दिसतो.
टिकेकरांनी ज्या संस्थेवर अतोनात प्रेम केलं आणि त्या संस्थेच्या गुणात्मक विकासाचाच विचार कायम मनात बाळगला, ती संस्था म्हणजे ‘मुंबई विद्यापीठ’! केंब्रिज विद्यापीठाबद्दल बोलताना रसेलने म्हटलं होतं की, “the only place on earth that I could regard as home.” अगदी तशीच काहीशी भावना टिकेकरांनी मुंबई विद्यापीठाबद्दल आयुष्यभर मनात बाळगली होती. म्हणूनच तर त्यांनी या विद्यापीठाचा इतिहास दोनदा इंग्रजीत आणि एकदा मराठीत लिहिला. त्यांचं विलक्षण प्रेम लाभलेली दुसरी संस्था म्हणजे एशियाटिक लायब्ररी. तिथेही त्यांनी अगदी मोलाचं कार्य केलं. या संस्थेला एक नवं भान आणि नवी दिशा देण्याचा त्यांनी सर्जनशील प्रयत्न केला.
आपण टिकेकरांच्या लेखन कारकीर्दीकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, १९८२ ते २०१५-१६ असा सर्व काळ ते लिहिते राहिलेले आहेत. त्यांच्या सर्व लेखनाचं वर्णन करायचं तर ‘सखोल समाजाभ्यास आणि अपूर्व संवेदनशील असा संस्कृतीभ्यास’ असंच करावं लागेल. त्यांनी संस्थात्म इतिहासाचा जसा एक मापदंड निर्माण केला तसा समाज-संस्कृतीच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा एक मानदंड निर्माण केला. १९८४ पासून देशात जे तंत्रज्ञान विकसित झालं आणि त्यामुळे जे बदल घडले ते टिकेकरांनी आस्थेने पाहिले, तपासले. जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण यांच्या सर्वव्यापी संचारामागोमाग समाजात जी स्थित्यंतरं घडत गेली त्यांचा संस्कृतीकेंद्री परिणाम नेमका काय आणि कसा घडला आहे, याचा त्यांनी घेतलेला शोध एका अर्थाने आपल्याला त्यांच्या लेखनातून जाणवत राहतो. एका अर्थाने असं म्हणता येईल की, टिकेकरांनी मांडलेला शोध हा संक्रमणावस्थेतील समाजाचा आणि संस्कृतीचा शोध आणि बोध आहे. त्यांनी रानडे युगाची आणि त्यांच्या वैचारिक सिद्धान्तांची चर्चा केलीच; पण आजच्या काळात त्याची निकड कशी आहे, तेही ठासून मांडले. समाजाच्या विवेकाला आवाहन करणं आणि त्यांना तयार उत्तरं न देता विचार करायला भाग पाडणं, समाजापुढे प्रश्न मांडणं, ही टिकेकरांची खासियत होती. तो त्यांच्या शैलीचा एक फार मोठा विशेष होता. ही त्यांची खासियत त्यांनी मांडलेल्या प्रत्येक अभ्यासात दिसते. मग तो त्यांनी जन-अभिजन-विजनांच्या संस्कृतीचा ‘जन-मन’(१९९५) मधून घेतलेला शोध असो वा ‘सारांश’मधून समकालीन समाजाच्या संस्कृतीचा सात निबंधांतून घेतलेला शोध असो, किंवा प्रबोधन-पर्वातील सामाजिक बदलांची दशा आणि दिशा यांचा वेध घेणारा ‘कालमीमांसा’ हा ग्रंथ असो; समाज आणि संस्कृती यांचे मूलाधार आणि बदलांचे विचारसूत्र कोणते, याचाच शोध टिकेकरांनी सदैव घेतलेला आपल्याला दिसेल. हीच खासियत आपल्याला त्यांच्या २००४ साली प्रकाशित झालेल्या आणि मुंबई इलाख्याची सचित्र झलक दाखवणाऱ्या ‘स्थल-काल’ या ग्रंथात पानापानातून खुणावत राहते. आजवर मुंबईवर मराठी भाषेत जितकी पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यातले सर्वोत्तम आणि अस्सल विश्वासार्ह पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे. टिकेकरांची एक फार मोठी देणगी म्हणजे त्यांनी सिद्ध केलेला ‘शहर पुणे’ हा दोन खंडांतला इतिहास होय. त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘कालान्तर’ हे पुस्तकही सरकत्या काळाची आणि समाजाची सखोल मीमांसा करणारं आहे. मला वाटतं की, टिकेकर यांच्यासारखा समाजाभ्यासक आणि संस्कृतीचा भाष्यकार ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाची श्रीमंतीही असते आणि तातडीची गरजही असते. डॉ. अरूण टिकेकर अत्यंत विद्याव्यासंगी, अव्वल समाजप्रेमी आणि अर्थात बिनीच्या ग्रंथप्रेमी घराण्याची निर्मिती होते. त्यांनी समाज-संस्कृतीच्या अभ्यासाच्या ज्या वाटा स्वलेखनातून निर्माण केल्या त्या वाटा आपल्याशा करणे आणि नवे नवे अभ्यास समाजापुढे मांडणे, हीच टिकेकरांना खास रुचणारी श्रद्धांजली ठरेल. एक मात्र खरं, की त्यांच्यासारखा विवेकवादी, मूल्याग्रही, सूक्ष्म वैचारिक मांडणी करणारा संवेदनशील विचारवंत निर्माण व्हायला काही कालावधी नक्कीच जावा लागेल. आपल्या या भावी वारसदाराची प्रतीक्षा खुद्द टिकेकरही करीत राहतील यात शंकाच नाही.
vijaytapas@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा