मुंबई पोर्ट लॅंड डेव्हलपमेंट कमिटीचा अहवाल केन्द्रीय जहाज मंत्रालयाला डिसेंबर २०१४ मध्ये सादर करण्यात आला. त्यानुसार मुंबई बंदराच्या अखत्यारीतील जमिनींच्या पुनर्विकासाची चक्रे सध्या जोरात फिरू लागली आहेत. त्यासाठी पर्यायी बंदर-विकासनीती अवलंबिली जात आहे. या पुनर्विकासात पर्यावरण, स्थानिक लोकसमूहांचे विस्थापन, बेरोजगार होणाऱ्यांचे पुनर्वसन आदी गोष्टींचा विचार केला गेला आहे का? की धनदांडग्यांच्या विकासापुढे सरकारला कशाची तमा बाळगायची गरज वाटत नाही?
चार-पाच घटना आहेत अवतीभवती घडणाऱ्या. त्या थोडय़ाशा सविस्तरपणे उलगडून बघायला हव्यात मात्र.
‘मुंबई बंदरात उतरणाऱ्या आणि बंदर क्षेत्रातच साठवल्या/ हाताळल्या जाणाऱ्या कोळशामुळे मुंबईतील नागरिकांच्या आणि शिवडीमधील पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील कांदळवनांच्या आरोग्यावरही विघातक परिणाम होत असल्यामुळे मुंबई बंदरात कोळसा हाताळणीला बंदी आणावी..’ अशी जनहित याचिका मुंबई र्मचट्स चेंबर्सच्या नागरी विकास समितीच्या अध्यक्षा आणि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरू आहे. प्रश्न नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा असल्याने न्यायालयाने या प्रश्नावर साहजिकच गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचा कलदेखील योग्य पर्याय मिळाल्यास कोळसा वाहतूक स्थलांतरित करण्याकडे आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टला सुमारे २०% वार्षकि महसूल मिळवून देणाऱ्या या कोळसा वाहतुकीमुळे शेकडो स्थलांतरित कामगारांना अस्थायी रोजगार मिळतो, हे एक नागडं वास्तव असतानाही ‘जनहित’ याचिकेत वा न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेच्या परिघात मात्र कोळसा हाताळणी कामगारांच्या संभाव्य बेरोजगारीबद्दल चकार शब्द नाही.
डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मानखुर्द येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगायतन समूहातर्फे उभारण्यात येणाऱ्या मध्यम आकाराच्या खासगी बंदर प्रकल्पाची पायाभरणी केली. ठाणे खाडीच्या मुखाशी मानखुर्द-वाशी रेल्वे ब्रिजपासून शंभर मीटरवर आणि नव्या मुंबईतील जेएनपीटीपासून दहा सागरी मलांवर हे बंदर उभारलं जातंय. सागरी मालवाहतुकीच्या क्षेत्रात ज्याला कार्गो म्हणतात असा वेगवेगळ्या प्रकारचा माल (किरकोळ, घाऊक, सुट्टा माल) उतरवून घेऊन जमिनीवरून वाहून नेण्यासाठी, जहाजबांधणी व शास्त्रशुद्ध जहाजदुरुस्तीसाठी आणि अर्थातच मुंबईसारख्या प्रमुख बंदरावरील भार हलका करण्यासाठी योगायतनसारख्या मध्यम आकाराच्या बंदराचा उपयोग व्हावा, हा हेतू आहे. योगायतन समूहाचे प्रमुख राजेंद्रसिंह यांनी ‘बिझिनेस लाइन’ (३० नोव्हेंबर २०१५) या वृत्तपत्राशी अधिक खुलासेवार बोलताना सांगितले की, टाटा पॉवरसाठी मुंबई बंदरात येणारा कोळसा उतरवून घेण्यावर योगायतन बंदराचा अधिक भर असेल. मुंबई बंदरात जिथे हा कोळसा उतरवला व हाताळला जातो त्यापासून योगायतन बंदर फार तर २० कि. मी. एवढंच दूर आहे. आणि ‘गुगल अर्थ’ दाखवतं त्यानुसार मानखुर्दच्या किनाऱ्यावरील गच्च कांदळवनामध्येच त्याची उभारणी सुरू आहे!
योगायतन बंदराची पायाभरणी झाल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी विस्ताराने बोलले. ‘मेक इन इंडिया’.. ‘मेक इन महाराष्ट्र’ वगरे झालंच; पण औद्योगिक विकासासाठी जी विकासनीती आखली जातेय त्यामध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीवर, विशेषत: रस्ते, नवे रेल्वेमार्ग आणि नवी बंदरे यांवर विशेष भर असल्याचे सांगताना त्यांनी लवकरच राज्यासाठी ‘नवे बंदर धोरण’ आणत असल्याचेही आवर्जून नमूद केले. मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले राज्याचे बंदरे व वाहतूक खात्याचे मुख्य सचिव गौतम चटर्जी यांचे- ‘राज्याच्या ७२० कि. मी. समुद्रकिनाऱ्यावर दर १०० कि. मी.मागे मोठय़ा मालवाहू जहाजांना सामावून घेणारी बंदरे असावीत असे आमचे प्रयत्न आहेत,’ हे वक्तव्यही खूपच बोलके वाटते.
या पाश्र्वभूमीवर नव्या मुंबईतील जेएनपीटी बंदराजवळ खासगी सहभागातून उभारल्या जात असलेल्या कारंजा बंदराकडे पाहता, किंवा २००९ पासून रत्नागिरी जिल्ह्य़ातील जयगडमध्ये सज्जन जिंदाल यांच्या जे. एस. डब्ल्यू. समूहामार्फत उभारण्यात आलेल्या जयगड बंदराकडे पाहता, रेल्वे मंत्रालयाचा जयगड बंदर कोकण रेल्वेशी अग्रक्रमाने जोडण्याचा निर्णय बघता नव्या विकासनीतीचे पदर उलगडू लागतात.
चार-सहा महिने मागे डोकावलं असता केंद्रीय जहाज व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची डहाणूजवळ वाढवण येथे उच्च क्षमतेच्या मुख्य बंदराची (मेजर पोर्ट) उभारणी करण्याच्या प्रकल्पाला पुनर्चालना देण्याची घोषणा आठवते. ‘संवेदनशील पर्यावरण क्षेत्र’ म्हणून घोषित झालेल्या डहाणूमध्ये पहिल्या एन. डी. ए. सरकारच्या काळात व राज्यात युती सरकारच्या पहिल्या कार्यकालात पुढे रेटण्याचा प्रयत्न झालेला हा वाढवण बंदर प्रकल्प न्यायालयीन हस्तक्षेपामुळे मागे पडला होता. गेल्या ऑक्टोबरपासून आदिवासी संघटना, मच्छिमार संघटना आणि डहाणू-बोर्डी परिसरातील बागायतदार यांच्या प्रतिक्रियांची व विरोधाची वाढती तीव्रता पाहता हा प्रकल्प फएढअउङअॅए करून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न पुनश्च वादग्रस्त ठरू पाहतोय, हे पुरेसं स्पष्ट झालं आहे.
धोरणांच्या गाळात रुतलेली बंदरे
मुंबई बंदराच्या अखत्यारीतील जमिनींच्या पुनर्विकासाची चक्रे सध्या जोरात फिरू लागली आहेत.
Written by मयूरेश भडसावळे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2015 at 02:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles about mumbai port trust