मी व माझे बंधू आणि शरदकाका यांच्यामध्ये वयाचे अंतर तसे फार नव्हते. त्यामुळे मी त्याला एकेरी नावानेच संबोधित असे. आम्ही तेव्हा डोंबिवलीतील रामनगरमध्ये दांडेकर नावाने ओळखल्या जाणाऱ्या चाळीत राहत होतो. तिथे शरदकाका अधूनमधून येत असे. त्याची माझ्या सवयीसंबंधातली एक आठवण अजूनही ताजी आहे. मला माझ्या हाताची बोटे एकमेकांवर चढवायची सवय लागली होती. तसे करताना एकदा काका जवळ बसला होता. त्याने माझ्या हातावर जोरात फटका मारला आणि तेव्हापासून माझी ती सवय सुटली.

त्याच्या नाटकाच्या वेडापायी वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. त्यामुळे त्याला आई-वडिलांचे प्रेम ते हयात असूनही कधी मिळाले नाही. आमच्या आईची माया त्याला आमच्याकडे येण्यास प्रवृत्त करीत असे. एकदा त्याने एक ग्रामोफोन आणि के. एल. सैगल, पंकज मलिक, के. सी. डे, काननबाला यांच्या असंख्य ध्वनिमुद्रिका आमच्या घरात आणून ठेवल्या. त्या दिवसापासून आमचे घर त्या संगीतात मनसोक्त न्हाऊन निघाले. तोपर्यंत आमच्या आत्याला मी कधी पाहिले नव्हते. ती मध्य प्रदेशात वास्तव्यास होती. ती प्रथमच आमच्याकडे येणार होती. तिला घेऊन मी पुण्याला शरदकाका आणि गोपीनाथकाका यांना भेटवण्यासाठी गेलो. त्याकाळी प्रवास सुखकर होता. म्हणूनच मी लहान असूनसुद्धा तिला पुण्याला घेऊन जाऊ शकलो. तेव्हा शरदकाकाचे नुकतेच लग्न झाले होते.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”

कॉलेजमध्ये असल्यापासूनच तो नाटके आणि एकांकिकांचे दिग्दर्शन करत असे. त्यातूनच उषा वाटवे यांची त्याची ओळख झाली. आणि पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पर्यायाने लग्नबंधनात झाले. आणि उषाकाकूची ‘पूर्णिमा तळवलकर’ झाली. त्याच्या लग्नाला वसंत बापट, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी वगैरे बडी नेतेमंडळी आली होती. प्रा. के. ना. वाटवे यांची ती कन्या. तेव्हा उषाकाकूंनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांचे शिष्यत्व पत्करले होते. आणि डोंबिवलीत त्यांचे गाणे ऐकण्याचा योग आला होता. अत्यंत तयारीने त्या गात होत्या. काका नाटक आणि सिनेमाच्या धावपळीत घरी फारसा नसायचाच. त्यामुळे संसाराचा गाडा उषाकाकूंनी एकटीनेच, पण उत्तम प्रकारे सांभाळला. थोडय़ाच दिवसांत चिरंजीव हेमंत आणि काही वर्षांनी दुसऱ्या चिरंजीवांचे आगमन झाले. त्याचे नाव उमेश. यथावकाश दोघे विवाहबद्ध झाले. दोघेही नोकरीनिमित्त अमेरिकेस गेले. शरदकाकाच्या या सुखी संसाराला पुढे काळ्या ढगांनी ग्रासले. उषाकाकूंना कर्करोगाने गाठले. त्यांना भेटण्यासाठी मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये जात असे. थोडय़ाच दिवसांत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि काका एकटा पडला. काकू असल्यापासूनच एक वयोवृद्ध आजी घरचे सर्व स्वयंपाकपाणी सांभाळत असत. त्या अगदी घरच्यासारख्याच होत्या. त्यांच्या नातीचे सर्व शिक्षण काका-काकूंनीच केले होते. काकू गेल्यावर मुलांनी शरदकाकाला अमेरिकेला बोलावले. तो तिकडे गेलाही. पण नेहमी माणसांच्या संगतीत राहण्याची सवय असलेला शरदकाका तिथल्या एकटेपणाला कंटाळला. लवकरच तो भारतात परतला आणि पुन्हा काही तिकडे गेला नाही. शरदकाकाचा उमेश अमेरिकेत आमच्या घरापासून थोडय़ाच अंतरावर राहतो आणि हेमंत पूर्व अमेरिकेत. एकदा हेमंत आणि उमेश सहकुटुंब आमच्याकडे आले होते. त्यावेळी सगळ्या जुन्या आठवणी  निघाल्या. खूप मजा आली. हेमंतचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. पुण्यात असताना तो चांगला क्रिकेट खेळायचा.

सिनेमाचे शूटिंग संपवून रातोरात दुसऱ्या लांबच्या ठिकाणी नाटकासाठी एसटीचा प्रवास करताना शरदकाकाला एसटी कंडक्टरचे खूप साहाय्य होत असे. त्याच्या ‘करायला गेलो एक’, ‘अप्प्पाजींची सेकेट्ररी’चे असंख्य प्रयोग झाले. त्याचे ‘करायला गेलो एक’ नाटक पाहायला मी आणि माझे वडील एकदा ठाण्याला गेलो होतो. ‘संशयकल्लोळ’मधील फाल्गुनरावाची त्याची भूमिका अप्रतिम होत असे. गणपतराव बोडस हे त्याचे गुरू होते. सिनेमात तो राजा परांजपे यांना गुरुस्थानी मानत असे. एकदा नाटकाला अतिशय अल्प उत्पन्न झाल्यामुळे काका चार दिवस जेवला नव्हता. हे राजाभाऊंना समजल्यावर त्यांनी स्वत:च्या डब्यातील जेवण त्याला दिले आणि पुन्हा असे उपाशी न राहण्याबद्दल बजावले. एका चित्रपटात सारंगीवाल्या उस्तादाची भूमिका करताना त्याने एका उस्तादांची शिकवणी लावली होती. त्याला त्या भूमिकेचा मोबदला तसा फार मिळाला नाही, पण अजूनही रसिकांच्या मनात ती भूमिका अगदी पक्की ठसलेली आहे. अभिनयाच्या दृष्टीने त्याचे अनेक सिनेमे श्रेष्ठ होते. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘ऊन-पाऊस’, ‘रामशास्त्री’, वगैरे.

पुण्यात असल्यास काका रोज सकाळी हाफ पॅण्ट आणि बूट अशा वेशात सारसबागेतल्या गणपतीला जात असे. भिकारदास मारुती हे त्याचे दुसरे श्रद्धास्थान. मी एकदा त्याच्याबरोबर या मारुतीला गेलो तेव्हा तो म्हणाला, की इथे प्रदक्षिणा घालताना इथल्या झाडाची फांदी त्याच्या अंगावर पडणार होती. पण मारुतीच्या कृपेने त्यातून तो वाचला. आणि त्याची भक्ती अधिकच घट्ट झाली.

‘बादशाही’ हे त्याचे नित्याचे भोजनालय. त्याच्या मालकांच्या पंक्तीला बसल्यानंतर तुपाची धार जरा सैल सोडली जायची! शरदकाकाच्या अंगात हुडपणा भरपूर होता. आपल्या टकलावरचा त्याचा विनोद सर्वश्रुतच आहे.. ‘‘सकाळी उठल्यावर आरशात बघताना तोंड कुठपर्यंत धुवायचे, हे मला समजत नाही!’’ एकदा पोटाच्या विकाराने तो आजारी होता. जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होते. एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जाताना वॉर्डबॉयने त्याला विचारले, ‘‘काका, सध्या तुमचा कोणता पिक्चर चालू आहे?’’ तेव्हा काका त्यावर उत्तरला, ‘‘हे तू काढतो आहेस तेच शेवटचे!’’

एकदा मी त्याला भेटायला गेलो असताना मधू आपटे तेथे आले होते. आचार्य अत्रे यांचे व्याख्यान एस. पी. कॉलेजमध्ये होते. काही जणांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असता शरदकाका आणि त्याच्या मित्रांनी मारणाऱ्यांचा हॉकी- स्टीक्सनी चांगलाच समाचार घेतला. आमचे गोपीनाथकाका तथा नाना हे गांधीवादी. त्यांचे नाव वापरून ‘गोपीनाथ नगर’ या नावाने एका बिल्डरने काही इमारती बांधल्या होत्या. त्यांत अनेक असुविधा होत्या. नानांच्या नावामुळे अनेकांनी तिथे जागा घेतल्या. पण बिल्डरने त्यांना चांगलेच फसवले. त्याने नानांना चौथ्या मजल्यावरची जागा दिली. या इमारतीची लिफ्ट बहुतेक वेळा चालूच नसायची. नंतर कळले, की त्या ब्लॉकमधील एकच खोली त्यांच्या नावावर आहे. हे सगळं कळल्यावर शरदकाकाने त्यांना सांगितले, की तू सामान तयार ठेव. मी तुला पहिल्या मजल्यावरची जागा मिळवून देतो. पण नानांना काही ते पटले नाही.

शरदकाका एम. ए. झालेला होता. बॅ. जयकर यांचा सेक्रेटरी म्हणून त्याने विद्यापीठात नोकरी केली. जयकरांची त्याच्यावर मर्जी होती. पण नाटकाच्या वेडापायी त्याला ही नोकरी गमावावी लागली. आजारीपणाची रजा घेऊन नाटकात काम केले, या कारणास्तव त्याला या नोकरीस मुकावे लागले. कुणीतरी त्याच्या नाटकाची जाहिरात साहेबांच्या टेबलावर ठेवली होती!

शरदकाकाचे अक्षर फार सुरेख होते. त्याचे ड्रॉइंगही चांगले होते. माझ्या वडिलांच्या साहेबांच्या घरी आम्ही गेलो असताना त्याने तेथे असलेले सिंहाचे चित्र कागदावर अगदी हुबेहुब उतरवले होते.

त्याच्या ‘एकच प्याला’चा प्रयोग पुण्यात बालगंधर्वमध्ये होता. त्याचे निमंत्रण आम्हा दोघांना त्याने दिले होते. तो ‘तळीराम’, तर चित्तरंजन कोल्हटकर हे ‘सुधाकर’! प्रयोग उत्तम झाला. छोटा गंधर्वही या प्रयोगाला आले होते. हा त्याचा शेवटचा प्रयोग ठरला. नंतर त्याला अर्धागवायूने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. मी त्याला नियमित भेटायला जात असे. दोन मित्र त्याची अहोरात्र सेवा करत असत. तो नंतर बरा होऊन घरी आला. पुढे गोपीनाथकाकांच्या निधनाची दु:खद वार्ता त्याला कळविण्याची कटू कामगिरी माझ्यावर आली. ती बातमी ऐकल्यावर त्याला खूप दु:ख झाले. त्याला अश्रू अनावर झाले.

जन्मभर नाटक-सिनेमाच्या दगदग केलेला शरदकाका विकलांग अवस्थेत बिछान्यावर पडलेला बघणे क्लेशदायक होते. ‘असं पडून राहण्यापेक्षा एका झटक्यात गेलेलं बरं,’ असे तो म्हणत असे.

अपेयपान तो करत असला तरी नाटक किंवा सिनेमाच्या आड त्याने ते कधी येऊ दिलं नाही. त्याच्या घरासमोरच एक हॉटेल सुरू झाले. तिथे प्रचंड गोंधळ, गोंगाट सुरू असे. त्यामुळे त्याच्या घराच्या खिडक्या कायम बंद असत. या गोंधळापासून कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन राहण्याचा त्याचा विचार होता. पण पुण्यात तशी जागा मिळणे कठीणच; म्हणून की काय त्याने या जगातूनच जाण्याचे पसंत केले.. आणि त्याला कायमची शांती मिळाली.