|| डॉ. विकास कशाळकर
अनेक वर्षांनंतर अरुण कशाळकरांनी आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेतले. रात्री जशी बस गावाच्या वेशीवर आली, तशी त्यांनी ड्रायव्हरला थांबायची सूचना केली. मिणमिणत्या उजेडात त्यांनी संकटमोचन मारुतीला हात जोडले. पाणावलेल्या त्यांच्या डोळ्यांत गतकाळाचा इतिहास चमकू लागला. कुणालाही संगीतातला ‘सा’ माहीत नसणाऱ्या पांढरकवडा या गावात अरुण कशाळकर हे पहिले संगीतसाधक होते. याच मारुतीच्या दर्शनाने नित्यनवीन प्रेरणा घेऊन नवनवीन राग आळवणारे कशाळकर आज अख्ख्या भारताला शास्त्रीय संगीताचे ज्ञानभांडार म्हणून परिचित आहेत. ज्ञानार्जनासाठी खस्ता खाव्या लागतात यात नवीन काहीच नाही. परंतु त्यातून कलेला नवे वळण देणारे फारच थोडे असतात. अर्जनाचे सर्जनात रूपांतर करण्यासाठी वेगळी प्रतिभा लागते. व्यावसायिकतेमध्ये स्वत:च्या कल्पना आणि आनंदाला मुरड घालून लोकरंजन करणारे अनेक कलावंत आहेत, परंतु ते कलेच्या खोल गर्भात शिरू शकत नाहीत.
आज या जन्मभूमीच्या रजकणांना स्पर्श केल्यावर हे सगळे विचार कशाळकरांच्या मनात चमकून गेले. खेळण्या-बागडण्याच्या वयात आळवलेली ‘याद पिया की आये..’ ही ठुमरी आज अनाहूतपणे त्यांच्या मनात निनादत होती. साठ वर्षांपूर्वी वडिलांकडून मिळालेल्या संगीतकलेची छोटीशी पुंजी पदरात घेऊन हा तरुण भविष्य घडवण्यासाठी मार्गस्थ झाला. त्या काळात घरची परिस्थिती थोडी खालावली होती. परंतु जो कलेने श्रीमंत असतो त्याला कुठलीच गरिबी गरीब करू शकत नाही. विलक्षण गोड आवाज, कलेविषयीची आस्था, लोभस स्वभाव आणि प्रचंड आत्मविश्वास या भरवशावर हा तरुण एकेक सीमा पादाक्रांत करीत मुंबईला येऊन पोहोचला. मुंबईत खूप मोह आहेत, तरीही या मायानगरीत त्याचे ध्यान आणि ध्येय कधीच विचलित झाले नाही. कलेचा आत्मा शोधण्यासाठी तो सतत धडपडत राहिला. पं. राम मराठे यांच्यासारख्या चतुरस्र गायकाकडून त्यांनी रागाचा फुलोरा घेतला, तर गजाननराव जोशी यांच्याकडून गायनातील विशुद्धता टिपली. रागगायन म्हणजे केवळ आलाप तानांचे भेंडोळे उकलणे नसून कलेचा मूर्ताकडून अमूर्ताकडे प्रवास असतो, या जाणिवेने ते अस्वस्थ झाले. मोठमोठय़ा संगीत महोत्सवांत तानांच्या फुलबाज्या उडवून टाळ्या घेणाऱ्या समकालीन कलाकारांच्या पंक्तीतून उठून त्यांनी संगीतसाधनेची बैठक मांडली. सन्मान, यश आणि क्षणभंगुर लोकप्रियता झुगारायला किती आत्मिक बळ लागतं, हे त्या वाटेने गेल्याशिवाय समजत नाही.
..भूतकाळातली मनातील विचारांची रिळं सिनेमासारखी गरगर मागे फिरत गेली.
कशाळकरांना कलेतून पैसा, प्रसिद्धी आणि खोटे सत्कार नको होते. खोटे हास्य जसे घातक, तसेच खोटे सत्कारही घातक असतात. त्याच्यामागे न लागता त्यांनी कलाचिंतनात अनेक रात्री जागून काढल्या. गजाननबुवा जोशी आणि राम मराठे यांच्या तालमीनंतर त्यांनी बबनराव हळदणकरांकडे गायनाचे धडे घेतले. इथून त्यांच्या विचारांना नवी पालवी फुटली. बहार रागातली ‘नयी द्रुम नयी पाती, नयी नयी डारीया, तापर भँवरा भयो बस’ म्हणताना नवतेचा अर्थ उमगला. संगीताचा भ्रमर जुन्या फुलावर- जरी ते कितीही सुंदर असले तरीही- बसत नाही, ते नवीन फुलांवरच बसते, हे त्यांनी जाणले आणि त्यातूनच त्यांच्या कलेला बहार आली. सर्जक प्रवाही नोमतोम हा नवीन विचार त्यांनी संगीतात आणला.
पांढरकवडय़ाच्या इमाम डोहाचे त्यांना खूपच आकर्षण होते. डोहाच्या गहराईमध्ये त्यांना संगीताच्या सुरांची रत्ने गवसली. कुठेही न अडखळत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात त्यांना लय गवसली. नदीकाठच्या झऱ्याचे निर्मळ पाणी डोक्यावरून नेताना संगीतातील निर्मळ झरे त्यांनी डोक्यात साठवले. रामभक्त मातोश्री आणि ज्ञानेश्वरीवर नितांत श्रद्धा ठेवणारे पिताश्री यांच्या सहवासात भक्ती आणि ज्ञानाचे झालेले संस्कार त्यांच्या जीवनरथाची चाके बनली.
..आज या रथाची पाऊणशे आवर्तने पूर्ण झाली आहेत. त्या नवप्रयोगाचे साक्षीदार सगेसोयरे, भाऊ-बहीण त्यांच्यासोबत या मारुतीच्या मंदिरात आहेत, या कल्पनेने ते सुखावले. कशाळकरांनी मूर्तीला प्रदक्षिणा घातली आणि ते थांबले. आकाशात छानसे चांदणे पसरले होते. या विस्तीर्ण अवकाशात त्यांच्या डोळ्यासमोर गजाननबुवांची छोटीशी छबी दिसू लागली.
‘चक्षुरुंमिलितं येन तस्मै श्री गुरवे नम:।’
पंडित गजाननबुवांकडे डोंबिवलीला शिकताना पुस्तकातले राग आणि तालमीतून मिळालेले राग यांत जमीनअस्मानचे अंतर आहे हे त्यांच्या लक्षात आले. गुरू हा वाटाडय़ा असतो, अंध:कारात भरकटलेल्याला तो ज्ञानप्रकाश दाखवतो. एकेक स्वराची बढत करीत राग मांडणे म्हणजे चिमणीचे घरटे बांधण्यासारखे आहे. रागाचा जर भव्य महाल बांधायचा असेल तर तो स्वरवाक्यांच्या मदतीनेच उभा करायला हवा याची जाणीव त्यांना झाली. रागाचे आरोह-अवरोह हे प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांला शिकण्यासाठी दाखवलेली पाऊलवाट आहे. राग सुंदर मांडायचा असेल तर रागातली आवकजावकाची पद्धत, मांडणीतील विविधता, मिंड, गमक, खटका, बेहलावे यांचा सुयोग्य उपयोग करावा लागतो. पुस्तकातून पाठ केलेले आलाप किंवा तानबाजी म्हणजे गाणे नव्हे. बंदिश हा रागगायनाचा आत्मा आहे. ती केवळ एकदा म्हणून झाल्यावर खुंटीला टांगून ठेवायची वस्तू नसून, गाण्याला प्रवाहित्व देणारी सांगीतिक सामग्री आहे. त्यातले शब्द घेऊन बोलआलाप, बोलताना केल्यामुळे लयीच्या हिंदोळ्यावर श्रोते तुमच्या गाण्यात समरस होतात. सरळ तान, बेहलावा, तिहाई ही गाण्यात आकर्षकता निर्माण करते. असे अनेक साक्षात्कार त्यांना त्या काळात घडले. अनवट रागांना कसे उलगडायचे याची तरकीब त्यांना बुवांकडून मिळाली. कृत्रिम आवाजापेक्षा नैसर्गिक आवाजातील गाणे श्रोत्यांच्या मनाला भावते, ही भावना गजाननबुवांच्या सहवासात पक्की झाली. रियाज म्हणजे रागांची उजळणी नसून रागातल्या नव्या जागा शोधणे आहे. गाण्यात ढिसाळपणा नको, गाणे चुस्त असावे; त्यात पुनरुक्ती नको, तर अभिव्यक्ती हवी, हे त्यांच्या लक्षात आले. पहिल्या आलापात राग उभा राहायला हवा. प्रत्येक सम ही मुखडा घेण्यासाठी नसून दाद घेण्यासाठी असते, ‘क्वांटिटी’ने राग गाण्यापेक्षा ‘क्वालिटी’ने गायला हवेत, असे अनेक विचार गुरूंच्या सान्निध्यात त्यांना कळले. त्यासाठी गुरूचा सहवास करायला हवा, सहवासातून अनुबंध निर्माण होतात आणि त्यातून ज्ञान प्राप्त होते.
..मारुतीच्या मंदिरापासून राहण्याच्या ठिकाणापर्यंत ते आता आश्वासक पावले टाकीत चालू लागले. पुन्हा विचारांची रिळे मागे मागे फिरू लागली.
आग्रे का मिजाज
‘अरुण, तू इकडे ये. हे बघ, आज बबनराव येणार आहेत. आपल्या घरी गाणार आहेत. तू त्यांच्या तंबोऱ्याच्या साथीला बस.’ बबनराव त्या दिवशी उत्तम गायले.
‘बबनराव, मी अरुणला तुमच्याकडे गाणे शिकायला पाठवणार आहे. तुम्ही त्याला आग्य्राची गायकी शिकवा..’ बुवा म्हणाले. येथून कशाळकरांच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला. ऑफिस संपल्यावर केनेडी ब्रिजजवळच्या हळदणकरांच्या घरी तालीम सुरू झाली. आपल्या मूळच्या भारदस्त आवाजावर ही भव्याकृती चढवताना गायकीला एक वेगळा रंग चढतो आहे या विचाराने ते सुखावले. बबनराव हळदणकर अतिशय मोकळ्या मनाचे! त्यांनी कशाळकरांच्या कल्पकतेला पूर्ण वाव दिला. रागाच्या स्वभावानुसार स्वरांचे दर्जे बदलायचे असतात, तर बंदिशीच्या शब्दांतून लयसौंदर्य खुलवायचे असते, हा नवीन सिद्धान्त येथे त्यांना शिकायला मिळाला. उत्तम बंदिशींचे कोठार म्हणजे आग्रा घराणे. त्यात बबनराव हेदेखील बंदिशकार होते. जयपूर आणि आग्रा घराण्याची गायकी उत्तमपणे संपादित केलेल्या या गुरूने कशाळकरांची सर्जकता द्विगुणित केली. धनाश्री, पंचम, लाचारीतोडी यांसारख्या रागांवर त्यामुळे त्यांची जबरदस्त पकड बसली. भारदस्त जबडय़ाच्या तानांच्या लडय़ा त्यांच्या आवाजातून निघू लागल्यावर खानदानी उस्तादही अचंबित व्हायचे. रेडिओवर त्यांचे गाणे लागले की ‘कौन उस्ताद गा रहा है?’ हे ऐकायला श्रोते उत्सुक असायचे.
एकदा शिवानंद संगीत महोत्सवात कशाळकरांचा धनाश्री राग ऐकायला खुद्द गजाननराव आणि बबनराव समोर बसले होते! गुंतागुंतीची लयकारी आणि नजाकत ऐकून दोघांनाही फैयाजखाँ साहेबांची याद आली. त्या दिवशीचे वातावरण ‘आग्रा’मय झाले होते. आपण ज्या विचारांनी त्याला बबनरावांकडे शिकायला पाठवले त्याचं सार्थक झाल्याचे बुवांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्या दिवशी ‘बनाव बतिया’ ही भैरवी तर कशाळकर अगदी हुबेहूब फैयाजखाँसारखे गायले!
आग्रा घराण्याच्या दोन-तीन शाखा आहेत. प्रत्येकात एक वेगळी बात आहे. कशाळकरांनी प्रत्येकातील चांगले चांगले वेचून एक छान गुच्छ तयार केला आहे. आग्रा घराण्यातील रागांची काही चलनं वेगळी आहेत. त्या सर्वाचा त्यांनी अभ्यास केला. गायकीचे विश्लेषण करून आपल्याला काय आवडते आणि आपल्या गळ्याला काय शोभून दिसते याचा त्यांनी खोलवर विचार केला. काहीतले रंग घेतले, तर काहीतले ढंग घेतले. रागातली नोमतोम हे आग्य्रातील बलस्थान आहे. त्यांनी ते विकसित केले. एखाद्या छोटय़ा कुंडातून जन्मलेली नदी हळूहळू पुढे डोंगरदऱ्यांतून खळखळत दरीत उग्र रूप धारण करते, तशी कशाळकर यांची नोमतोम शेवटी प्रचंड वेगवान होत त्या वेगावर इतकी स्थिर होते, की त्यातून निर्माण होणारी नादमयता हृदयाला भिडते आणि श्रोते त्याने चकित होतात. त्यानंतर बंदिशीमध्ये शांत, सुंदर रचनाकौशल्याचे दर्शन होऊन बोलबनाव सुरू होतात. लयकारीच्या मनोहारी दर्शनाने सभा भारावून जाते. मध्यलयीकडे झुकलेली ही गायकी पेलणे खरं तर इतकं सोपं नाही. त्याचा ध्यासच घ्यावा लागतो. चोवीस तास लयकारीचा ध्यास लागल्यावर कधी कधी घरची मंडळी त्यांच्यावर वैतागतात. पण त्यांना ते समजण्याइतकीही भ्रांत राहत नाही.
..आता निवासस्थान जवळ आलेले असते. उद्याच्या कार्यक्रमात काय म्हणावे बरे?
दरस दीजो!
चला आपलीच बंदिश गाऊ या. खरं तर अनेक बुजुर्गानी चांगल्या बंदिशी बांधल्या आहेत. तरीही असं वाटत राहिलं, की अजूनही हा राग एक अंगुली वर उरलाच आहे. बबनराव काय किंवा गजाननबुवा काय, दोघेही उत्तम बंदिशकार होते. प्रत्येकाने आपापल्या घराण्याच्या अंगाने बंदिशी रचल्या. बबनरावांनी ‘रसपिया’ या नावाने केल्या, गळ्यावर चढविल्या. विलायत हुसेनखाँ आणि जगन्नाथबुवांच्या बंदिशींमध्ये एक वेगळीच बात होती. मध्यंतरी निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या बंदिशीही ऐकल्या. त्यांचाही एक वेगळाच ‘फ्लेवर’ आहे. त्यांच्या बंदिशी आणि गायकीचा अभ्यास करताना आपसूकच एक बंदिश रचली गेली. ‘रसदास’ या नावाने करताना ती ‘रसपिया’ यांच्या चरणी अर्पण केली. ती दोन्ही गुरूंना गाऊन दाखवली तेव्हा त्यांनी मनापासून दाद दिली.
‘स्वरार्चना’ या पुस्तकाच्या निर्मितीची ती नांदी होती. मात्र, तेव्हा लक्षात आले की प्रस्थापित बंदिशीतील शब्दांचे अर्थच कळत नाहीत. मग अनेक भाषातज्ज्ञांची भेट घेतली. हिंदीभाषकांचा सहवास केला. तेव्हा समजलं की, साहित्यातल्या शब्दांपेक्षा बोलीभाषेतल्या शब्दांत गेयता जास्त आहे. बंदिशीला साहित्यिक मूल्य अधिक असेल तर ते गीत होईल. म्हणून अस्सल बंदिशीच्या ढंगाच्या- की ज्या गायकीला उपयोगी ठरतात, आणि ज्यात रागरूप अत्यंत ठळक प्रस्थापित होते, अशा १५० बंदिशी रचल्या गेल्या. त्यातून जे भावरंग उधळले, त्यांची प्रशंसा अनेक नामवंतांनी केली. तरुण पिढीतल्या गायकांनाही त्या बंदिशींचे आकर्षण वाटले. कुठल्याही विद्यापीठाच्या परीक्षेत एखादा विद्यार्थी ‘स्वरार्चना’तील बंदिश आवर्जून गातो, हेच त्याचं यश आहे. एरवी संगीतातल्या क्लासमध्ये शिकवलेल्या बंदिशी बोटावर ताल देऊन गायल्या जातात. या पाश्र्वभूमीवर लय-तालाला सुखद धक्के देत नागमोडी वळणाने जाणाऱ्या या बंदिशी श्रोत्यांच्या मनावर पतंगासारख्या तरंगत राहतात. बंदिशीची लज्जत वाढवायची असेल तर त्यात खेच, मिंड तर हवीच; पण एखादी छोटीशी तान गुंफली तर त्याला ओघ प्राप्त होतो. संगीताचार्याच्या परीक्षेला जेव्हा विलायत हुसेनखाँ यांच्या बंदिशीचा अभ्यास केला तेव्हा त्यातून रागशुद्धता कशी जपायची हे समजले. तर खादीम हुसेन यांच्या बंदिशी आत्मसात करताना बंदिशीचा डौल कसा राखावा हे कळले.
**********
..अरे, स्टेजवर जायची वेळ झाली तर! तो चष्मा कोठे आहे? अबब! केवढे राग मनात गर्दी करताहेत.. श्री, झिंझोटी, धनाश्री, यमन, नंद.. पण आज मूड बनतोय पंचमचा! पण आज वेगळी बंदिश गातो.
अंधार दाटायला सुरुवात झाली. दूर गावच्या वेशीवरून मंदिरांच्या घंटांचे नाद ऐकू येत आहेत. तर दूर कुठेतरी नदीच्या अंतप्र्रवाहातून बेहलावे उमटताहेत. मंद मंद वारा सुखावतो आहे. आणि आसमंतात पंचमचे सूर घुमताहेत..
‘आज जागे मोरे भाग..’