‘बिजली गिराने मै हूं आयी..’

आपल्या त्या गाजलेल्या गाण्यातली ही ओळ श्रीदेवी खरोखरच जगली. वाईट एवढंच, की जीवनात जगली तशी मरणातही जगली. तिचं निधन एकतर आधीच आकस्मिक; आणि ते ज्या प्रकारे झालं, त्याची खबर ऐकणं म्हणजे ‘बिजली गिरणं’च होतं. आयुष्यात न केलेली आणखी एक गोष्ट तिनं जाता जाता केली : ज्या ‘प्रेस’ला तिनं आयुष्यात टाळलं, त्याला तिनं भरभरून बातमी दिली. तीही सनसनाटी बातमी! एरवी ती ‘प्रेस’पासून इतकी दूर होती, की ज्या वृत्तपत्राला मुलाखत द्यायला कोणताही स्टार नकार देत नाही, त्या बडय़ा इंग्रजी वृत्तपत्रालाही तिनं आपल्या बहराच्या दिवसांत मुलाखत दिली नाही. मीडियाशी संबंध राखल्याखेरीज कुणी स्टार होऊ शकतो यावर आज विश्वास बसणं कठीण आहे. पण श्रीदेवीचा आगळा वेगळेपणा इथेही दिसला. ती जन्मजात स्टार होती.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

ती स्टारसारखी जगली आणि स्टारसारखी गेली. काम मिळत नाही म्हणून तिला सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली नाही. विवाहानंतर ती स्वखुशीनं पडद्याआड गेली. वीस वर्षे कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊन ती गेली. जाण्यापूर्वी दोन चित्रपट तिच्या नावावर जमा झाले. ‘इंग्लिश-विंग्लिश’मधलं तिचं पुनरागमन यशस्वी झालं. ‘मॉम’मध्ये भावपूर्णतेपेक्षा थरारच जास्त असला तरी त्याला बऱ्यापैकी यश मिळालं. सोळा वर्षे पडद्याआड असलेल्या श्रीदेवीला तिच्यावर केंद्रित झालेले लागोपाठ दोन चित्रपट मिळाले ही मोठी गोष्ट होती. अर्थात तिचं आधीचं कर्तृत्व त्यामागे होतं. तिचं नाव पुन्हा प्रकाशात असताना तिला मृत्यू आला, यात तिच्या अकाली गूढ मृत्यूचं दु:ख विसरायला हवं.

श्रीदेवीचं स्टार होणं ही श्रींचीच इच्छा होती असं म्हणायला हवं. ज्या ‘सोलवा सावन’ चित्रपटामधून ती हिंदीत आली, किंवा ज्या चित्रपटातून तिच्यातल्या अभिनेत्रीची ओळख झाली तो ‘सदमा’ हे दोन्ही चित्रपट पदार्पणासाठी आदर्श म्हणता येणार नाहीत. त्यात नायिकेपेक्षा विषय उठावदार होते. रूप वा बांधा दाखवायला त्यात वाव नव्हता. ग्लॅमर अजिबात नव्हतं. ‘सदमा’मध्ये तर कमल हासनसारखा अभिजात अभिनेता- आणि तोही दमदार भूमिकेत! नव्या कलाकाराकरता या गोष्टी प्रतिकूलच होत्या. हिंदी सिनेमात तेव्हा श्रीदेवी नवीन कलाकारच होती. पण कमल हासनच्या अभिनयात श्रीदेवीची गुणवत्ता लपली नाही. उलट, ती त्याच्याइतकीच लक्षात राहिली. लहान मुलीसारखा असलेला तिचा पातळ, किनरा आवाज या भूमिकेसाठी हुकमी उपयोगी पडला. तिच्या काळात- ऐंशीच्या दशकापर्यंत- कलाकार उत्तम हिंदी बोलायचे. जागतिकीकरण किंवा खरं तर इंग्रजीकरणामुळे प्रादेशिक भाषा अज्ञातवासात गेल्या नव्हत्या. त्यामुळे श्रीदेवीचा आवाज अडसर ठरण्याची भीती होती. तीही खोटी ठरली. तिच्या बहुतेक भूमिकांना विनोदी डूब होती. त्या आवाजानं तिच्या भूमिकांची रंगत वाढवली.

श्रीदेवीच्या यशात यश चोप्रांचा मोठा हात होता. ‘चांदनी’ आणि ‘लम्हें’ या चित्रपटांनी श्रीदेवीच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. तोवर तिच्याकडे भरपूर काम होतं. नृत्यनैपुण्य, भरदार मांसल बांधा आणि त्यांचं नि:संकोच प्रदर्शन यामुळे तिला लोकप्रियताही भरपूर मिळाली होती. पण ते सगळे जितेंद्रबरोबरचे दक्षिणी चित्रपट होते. या चित्रपटांची भाषा हिंदी होती, इतकंच. यातल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये जयाप्रदा असायची. हिला अल्लड, टॉमबॉयिश भूमिका; तर ती ‘सोबर’, आदर्श, त्यागमूर्ती स्त्री. तिच्यापाशी सत्यजित रे यांनी मुक्तकंठानं प्रशंसा केलेला ‘मोस्ट ब्युटिफूल फेस ऑन द इंडियन स्क्रीन’! ‘मासेस’च्या टाळ्या-शिट्टय़ा श्रीदेवीला मिळायच्या. मुमताज या खटय़ाळ, देहस्वी नायिकेची उणीव ती भरून काढत होती.

श्रीदेवी आणि जयाप्रदा ही स्पर्धा त्या काळात चांगलीच गाजली. पण त्यांचे चित्रपट नीट पाहिले तर लक्षात येतं की त्यांच्यात स्पर्धा नव्हतीच. उलट, त्यांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांमुळे त्या दोघी एकमेकींना पूरक होत्या.

तरीही स्पर्धा होतीच असं मानायचं तर ती श्रीदेवीनंच जिंकली. जयाप्रदा ससा ठरली आणि श्रीदेवी कासव! दोघींची जितेंद्रपटांमधून सुटका झाली. अमिताभ आणि धर्मेद्र यांच्या चित्रपटांची नायिका जयाप्रदा असणार हे ठरल्यासारखं होतं. जयाप्रदानं मोठीच मजल मारली होती. कारण अमिताभ तेव्हा ‘टॉप’ला गेला होता, तर धर्मेद्रकडे भरपूर चित्रपट होते. श्रीदेवी मिथुन चक्रवर्ती व अनिल कपूर यांच्या चित्रपटांमध्ये दिसू लागली. तेही प्रथम श्रेणीतले नायक होते, पण अमिताभ व धर्मेद्र यांच्या बरोबरीचे नव्हते. साहजिकच जयाप्रदानं बाजी मारली असं वाटलं.

पण हा ‘शॉर्ट टर्म’ फायदा ठरला. अमिताभ राजकारणामुळे काही काळ चित्रपटांपासून दूर गेला आणि धर्मेद्रची मागणी कमी झाली तेव्हा जयाप्रदाला फटका बसला. त्यातून अमिताभ व धर्मेद्र हे ‘सीनियर’ नट असल्यामुळे जयाप्रदा नकळत त्या वर्गात जाऊन बसली. मिथुन, अनिल, सनी देओल आणि बाकीचे समकालीन नट तिचे समवयस्क असूनही निर्माते जयाप्रदाची त्यांच्याशी जोडी जमवायला तयार नव्हते.

आणि इथेच श्रीदेवीचं कासव जिंकलं! तिला नायकांची कधीच कमतरता भासली नाही. अमिताभसारखा शिखरावरचा नट तिनं ‘खुदा गवाह’मध्ये काम करावं म्हणून तिची मनधरणी करत होता. दक्षिणेकडच्या तिच्याआधीच्या सगळ्या नायिकांप्रमाणे श्रीदेवीदेखील मानी आणि खंबीर होती. वैजयंतीमाला, हेमामालिनी आणि श्रीदेवी कोणत्याही बडय़ा हीरोपुढे झुकल्या नाहीत. आपल्या अटी, शर्ती आणि कायदेकानू लागू करून त्यांनी चित्रपट केले. कुणाची मिजास त्यांनी चालवून घेतली नाही. श्रीदेवीनं आपल्याबरोबर काम करावं म्हणून अमिताभ ‘खुदा गवाह’मध्ये तिला डबल रोल देण्याइतका झुकला. परंतु ‘खुदा गवाह’ने ना अमिताभला लाभ झाला, ना त्याने श्रीदेवीचा लौकिक वाढवला. ते सत्कार्य यश चोप्रांच्या ‘चांदनी’नं केलं. यश चोप्रांनी तिच्यात आमूलाग्र बदल (आजच्या भाषेत ‘मेकओव्हर’) घडवला. तोवरची श्रीदेवी म्हणजे देखणी, पण दक्षिणेकडची ‘टिपिकल’ नायिका होती. भरदार देह, डोळ्यांत ठासून काजळ, केसांत भलीमोठी (आणि विशोभित) फुलं, गडद तांबडे, पिवळे कपडे (मग पोशाख कोणताही असो.) आणि लाऊड मेकअप! चोप्रांनी सर्वप्रथम श्रीदेवीला वजन निम्मं करायला लावलं. मॉडर्न फॅशनचे, पांढऱ्या व इतर सौम्य रंगांचे आणि शालीन पोशाख दिले. थोडक्यात, त्यांनी तिला ‘ती फुलराणी’ बनवलं. तिला ‘पॉलिश’ आणि ‘सॉफिस्टिकेशन’ दिलं. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हळुवार, संवेदनशील पैलू चोप्रांनी उजागर केला. ‘चांदनी’ काही ‘क्लासिक’ चित्रपट नव्हता की श्रीदेवीची भूमिकाही ‘ग्रेट’ नव्हती. पण जितेंद्रच्या चित्रपटांतल्या ‘लाऊड’ नायिकेच्या प्रतिमेतून ‘चांदनी’नं तिची सुटका केली. तिलाही ‘क्लास’ आहे हे दाखवून दिलं.

‘चांदनी’नं घडवलेल्या श्रीदेवीच्या प्रतिभेचा खरा आविष्कार ‘लम्हें’मध्ये दिसला. आपल्यापेक्षा मोठय़ा वयाच्या पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या एका नवयुवतीची ही व्यक्तिरेखा होती. नेहमीची हसरी, बोलकी, खोडकर श्रीदेवी यात होती. पण प्रेमात पडल्यावर ही अल्लड मुलगी ‘मॅच्युअर’ होते आणि तो गडबडून, गोंधळून जातो. बालिश हट्टीपणानं वागून तिच्यापासून दूर जाऊ बघतो. स्वत:ला फसवू लागतो. त्याच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम ती करते आणि आपलं हक्काचं प्रेम मिळवते.

यश चोप्रांनी हा चित्रपट छानच हाताळला होता. पण ऐंशीच्या दशकाचा काळ ही वेगळी प्रेमकहाणी स्वीकारण्याइतका प्रगल्भ झाला नव्हता. ‘लम्हें’ला समीक्षकांची आणि जाणकार प्रेक्षकांची सरसरून दाद मिळाली. पण तिकीट खिडकीवर हा चित्रपट चालला नाही.

‘चांदनी’मध्ये चोप्रांनी श्रीदेवीचा ‘मेकओव्हर’ केला, तसा तिनंही हिंदी सिनेमाच्या ‘हिरोइन’चा केला. तिच्याआधी आपापल्या काळात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मीनाकुमारीपासून पद्मिनी कोल्हापुरे ते माधुरी दीक्षित अन् काजोलपर्यंतच्या सगळ्या नायिका प्रेमळ, समंजस, स्वार्थत्यागी आणि इतरांना सुख देऊन आपल्या वाटय़ाला दु:ख ओढवून घेणाऱ्या होत्या. त्या (व्यक्तिरेखा) चांगल्या होत्या, पण खऱ्या नव्हत्या. स्त्री कशी आहे यापेक्षा तिनं कसं असावं याची पुरुषप्रधान समाज जशी अपेक्षा ठेवतो, तशा त्या होत्या. श्रीदेवीनं प्रथमच आपल्या मर्जीनं वागणारी, आपल्याला हवं ते मिळवणारी/ मागून घेणारी, पैसा आणि आरामशीर जीवन हवं आहे हे न लपवणारी, स्खलनशील.. थोडक्यात म्हणजे हाडामांसाची स्त्री दाखवली. तिला स्वत:च्या इच्छा दडपून त्यागाचं ओझं वागवत सुळावर चढायचं नव्हतं. तिला आनंदानं जगायचं होतं.

‘जुदाई’ नावाच्या तद्दन अविश्वसनीय चित्रपटात ती वैभवाचा उपभोग घेण्यासाठी चक्क स्वत:च्या नवऱ्याला विकते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीकडून कोटय़वधी रुपये घेऊन त्याचं लग्न तिच्याशी लावून देते. ‘इनडिसेन्ट प्रपोजल’ या गाजलेल्या हॉलीवूडपटाची ही दक्षिणसदृश कुटुंबकथेच्या मुशीत घातलेली देशी आवृत्ती होती. त्या अतक्र्य कथेत श्रीदेवीनं अक्षरश: धमाल केली आहे. ‘मिस्टर इंडिया’वर नायकाचं नाव असलं तरी श्रीदेवीची ‘हवाहवाई’च भाव खाऊन जाते. तीच करामत श्रीदेवी ‘जुदाई’मध्ये पुन्हा करून दाखवते. सद्गुणी स्त्रीचं काम करणाऱ्या ऊर्मिला मातोंडकरचा अभिनय सुरेखच आहे, पण भांडेवालीला जुने कपडे विकावे तशा सहजतेनं नवरा विकणारी आणि आलेल्या पैशांतून ‘हाय सोसायटी’तल्या स्त्रीप्रमाणे जगणारी उथळ श्रीदेवी (म्हणजे अर्थात तिची व्यक्तिरेखा) चित्रपट आपल्या नावावर करून जाते.

‘जुदाई’, ‘लाडला’, ‘सुहागन’ यांसारख्या चित्रपटांतून श्रीदेवीनं खरं म्हणजे ‘अ‍ॅण्टी हिरोइन’ला हिंदी चित्रपटांत रुळवलं. मॉडर्न पोशाख घालणाऱ्या, पण आतून परंपरेची पाईक असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीला आणि त्याच परंपरेच्या छायेत जगणाऱ्या देशातल्या प्रेक्षकाला तिनं ही चौकटीबाहेरची, बिनदिक्कत उंबरठय़ाबाहेर पाऊल ठेवणारी स्त्री स्वीकारायला लावली, ही तिची अद्भुत कामगिरी आहे. त्यात तिचं चातुर्यही दिसतं. सुख मागायला न लाजणारी तिची नायिका दुष्ट, कारस्थानी, पाताळयंत्री आणि आतल्या गाठीची स्त्री नाही. ती क्षणिक मोह पडणारी आणि अपरिपक्वतेपणे वागणारी आहे. तिच्या चुकांचा आणि तिचा राग येत नाही, हसू येतं. काही वेळा तर कींव येते. या स्त्रीच्या प्रतिमेला विनोदाची डूब दिली आहे. त्यामुळे तिचा तिरस्कार वाटत नाही. उलट, तिला पुन्हा भेटावं, तिच्या करामती बघावं असंच वाटतं.

या मध्यमवर्गीय स्त्रीबरोबरच आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरावर जगणारी, पण तिथेही आपल्या मनाप्रमाणे जगणारी स्त्री हा श्रीदेवीच्या रूपेरी प्रतिमेचा दुसरा पैलू. जगण्यासाठी ही स्त्री पाकिटमारी किंवा भुरटय़ा चोऱ्या करते, खोटं बोलते, ‘अरे’ला ‘का रे’ म्हणत पुरुषाला हटकते, त्याला आपल्या नखऱ्यांनी आणि विभ्रमांनी उल्लू बनवून कार्यभाग साधते. ‘चालबाज’मधली तिची रोझी तर खुशाल दारू पिते; त्याकरता उधारी करते आणि काही ना काही जुगाड करून दारू मिळवतेच. जगण्याची ही उणी, पण खरी बाजू दाखवायला श्रीदेवीची ही प्रतिमा लाजत नाही, लपवाछपवी करत नाही आणि समर्थनही करत नाही. आला दिवस साजरा करायचा; क्षण न् क्षण जगायचा, मन मारायचं नाही, एवढंच ती जाणते. अशा भूमिकेत ती चित्रविचित्र आणि खरं म्हणजे आखूड, सेक्सी कपडे घालून वावरते. पाचपोच न दाखवता बोलते. तरीही हवीहवीशी वाटते. अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या जमान्यात प्रेक्षकांना अशीच मॅचिंग, ठसकेबाज, नखरेल, बिनधास्त आणि जराशी ‘चालू’ नायिका हवी होती. श्रीदेवीनं त्यांची इच्छा पूर्ण केली. अशा भूमिका विनोदी बनवण्यासाठी तिला तिचा आवाज, तिचा बोलण्याचा ढंग उत्तम साथ देतो. ‘चालबाज’मध्ये डबल रोलमुळे तिला पारंपरिक, सोशिक आणि फटाकडी, फटकळ व बेदरकार अशी दोन्ही रूपं दाखवायला मिळाली.

हसत हसत आणि हसत हसवत काहीही करून दाखवणारी श्रीदेवी दु:खान्त भूमिका आणि सखोल अभिनयही सहजसुंदरपणे करायची. तिच्या अष्टपैलुत्वाचं दर्शन घडवणारा चित्रपट- ज्याचं नाव ‘सुहागन’- मात्र यथातथाच होता. मादाम बोव्हारी गुस्तावच्या अभिजात कथेचं शिवधनुष्य उचलण्याचं धाडस करणाऱ्या शेषाद्री राव नावाच्या दिग्दर्शकाचं कौतुक करावं की कींव करावी, समजत नाही. आयुष्य पूर्णत्वानं जगण्याची लालसा असलेली, पण आपल्याला नेमकं काय हवंय हे न समजल्यामुळे वाहवत गेलेल्या या स्त्रीची अखेर अत्यंत वाईट होते. एकाकी अवस्थेत, बेसहारा स्थितीत तिचा मृत्यू होतो. कौटुंबिक कथेचं आवरण चढवलेली ही कथा मूळ कथेच्या तुलनेत अगदीच सपक झाली होती. पण ही शेवटची अवस्था दाखवताना श्रीदेवी जे काही करून गेली आहे, ते विदारक आहे, प्रत्ययकारी आहे. आणि विश्वास बसू नये इतकं खरं आहे.

श्रीदेवीचा हा आवाका बघून मन थक्क होतं. मीडियावाले तिला आता तिच्या मृत्यूनंतर ‘पहिली स्त्री सुपरस्टार’ म्हणत आहेत. ती नि:संशय सुपरस्टार होती. पण पहिली स्त्री सुपरस्टार नव्हती. देविकाराणी, नर्गिस, मीनाकुमारी यांचा या विशेषणावर आधी हक्क आहे. त्यांनी नायकांएवढंच कर्तृत्व गाजवलं. दुय्यम नायकांबरोबर काम करून आपल्या सामर्थ्यांवर अनेक चित्रपट सुपरहिट केले. श्रीदेवी त्यांच्यानंतर येत असली तरी तिच्या मोठेपणात उणीव येत नाही. ती त्यांच्या पुढे गेली. तिनं तर पारंपरिक नायिकेची प्रतिमा बदलण्याचं क्रांतीकर्तृत्व दाखवलं. त्याबद्दल तिचं उदंड कौतुक झालं. अनेकानेक पुरस्कार मिळाले. ‘पद्मश्री’देखील मिळाली. तरीही हळहळ वाटते, की आणखी अशाच चौकटीबाहेरच्या भूमिका करण्याची संधी तिच्या हातून निसटली. तीही केवळ लग्नामुळे. जेव्हा तिच्या कर्तृत्वाला फुलोरा आला त्याच टप्प्यावर तिनं विवाह केला आणि अनेक चांगल्या दिग्दर्शकांची व नायकांची तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा अतृप्त राहिली.

पडद्यावर दुष्टांचा पारिपत्य करणारी श्रीदेवी प्रत्यक्ष जीवनातही कणखर आणि लढवय्यी होती. तिच्या आईवर अमेरिकेत चुकीची शस्त्रक्रिया केली गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हा तिथल्या हॉस्पिटलवर ‘केस’ करून श्रीदेवीनं ती जिंकलीदेखील. (मात्र, त्यापोटी मिळालेल्या सोळा कोटींच्या नुकसानभरपाईमुळे तिचे बहिणीशी संबंध बिनसले असं बोललं जातं. ही आणखी एक शोकांतिका.) कलासृष्टीत असं अफाट यश मिळवणाऱ्या कलावती खासगी जीवनात एकटेपणा, असुरक्षितपणा भोगत असतात. त्यापोटी आपल्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाशी लग्न करतात. सोफिया लॉरेन आणि मीनाकुमारी यांच्याप्रमाणे श्रीदेवीनंही प्रौढ बोनी कपूरमध्ये असाच भावनिक आधार शोधला. त्यासाठी फार मोठय़ा वादळाला तोंड दिलं. पण अखेर तिला सुख मिळालं, हे काय कमी आहे?

पुरुष आणि स्त्री दोन्ही प्रेक्षकांना आवडतील असे श्रीदेवीसारखे कलाकार थोडेच असतात. तिच्याकडे सेक्स अपील होतं, पण ते ‘चीप’ नव्हतं. तिच्यापाशी मादकता होती. म्हणून तर ‘काटे नहीं कटती’सारखी या मादकतेचे विभ्रम दाखवणारी गाणी गाजली. निरागसतेच्या जोडीला श्रीदेवीकडे खेळकरपणा होता. तिच्याइतका सहजसुंदर हास्यअभिनय अभिनेत्रींमध्ये क्वचित दिसतो. ‘मिस्टर इंडिया’मध्ये चार्ली चॅप्लिनची नक्कल तिनं काय झकास केली आहे, याची आठवण ठेवू या. तिचा मृत्यू का व कसा झाला याचं पोस्टमार्टेम करण्यात आता हशील नाही. श्रीदेवीच्या पडद्यामागच्या रूपाचा शोध घेण्यापेक्षा पडद्यावरच्या श्रीदेवीची निरनिराळी रूपं आठवणं हा परम आनंदाचा ठेवा असेल.

  • मॉडर्न पोशाख घालणाऱ्या, पण आतून परंपरेची पाईक असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीला आणि त्याच परंपरेच्या छायेत जगणाऱ्या प्रेक्षकाला श्रीदेवीनं चौकटीबाहेरची, बिनदिक्कत उंबरठय़ाबाहेर पाऊल ठेवणारी स्त्री स्वीकारायला लावली, ही तिची अद्भुत कामगिरी आहे.

Story img Loader