आभाळाला गवसणी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त पुणे येथील ‘आयुका’ (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेमार्फत २८ सप्टेंबर रोजी तेथील चंद्रशेखर सभागृहात डॉ. नारळीकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा झाला.

यावेळी ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांनी डॉ. नारळीकरांच्या कथा आणि ‘आयुका’ची विज्ञान प्रसाराची उद्दिष्टे यांच्या आधारे लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आभाळाला गवसणी’ हे लोकनाटय़ सादर करण्यात आले. अनेक कलाकारांसह ‘आयुका’तील विद्यार्थ्यांनीही भूमिका केलेल्या या लोकनाटय़ातून डॉ. नारळीकरांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यातील हा गण..

एका सुपुत्राचा इथे जन्म झाला, जो बुद्धीच्या तेजाने दिपवी जगाला।

विज्ञानाची सीमा भिडवी नभाला, दाही दिशांमधि हो बोलबाला।

अशा गुणवंताला थोर मानावा, मुक्तकंठे त्याचा पोवाडा गावा।

हक्काने मंग त्येचा आशीर्वाद घ्यावा, ज्ञानाचा तेजोमय दीप जळावा।।

काय सांगू राव याची अफाट करणी? आभाळाला थेट घाली गवसणी।

अश्विनी, रोहिणी, कृतिका, भरणी, याच्या घरी समद्या भरती पाणी।

चंद्र-सूर्य-तारे याचे सोबती, राहू-केतू दोघे याला घाबरती (चळचळा कापती)।

याच्या भोवताली ग्रहांचे रिंगण, अवघे विश्वची याचे आंगण।।

गोष्ट मोलाची, मन लावून ऐका- याने स्थापली संस्था ‘आयुका’।

खगोलाचा जणू ज्ञानकोष बाका, उभारती शास्त्रज्ञ गुढय़ापताका।

विज्ञानाच्या कथा लिहिल्या अनेक, सुरस आणिक चमत्कारिक।

सात्विक मनोरंजनाचा आहार, बाळांसाठी केले खुले भांडार।।

जयदेव जयदेव, जय जय जयंता, भक्तांना सांगशी मंत्र गुणवंता।

शिक्षणाचा धर्म देशाचा त्राता, अंधश्रद्धेला टाळा द्या आता।

(छाछूगिरी आता बंद, हाकलून लावा भोंदू संत)

जयदेव जयदेव, जय जय जयंता, प्रेमाभिनंदन स्वीकारी आता।

स्फूर्तीदायक तुझी जीवनगाथा, आदरे तुजपुढती झुकलासे माथा।।

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrophysicist jayant narlikar birthday ceremony celebration
Show comments