आकर्षक स्मितहास्याची देणगी लाभलेले अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये आहेत. पण प्रेम आणि विश्वास व्यक्त करणारं शशी कपूरसारखं निर्मळ, नितळ हास्य पडद्यावर कधीच पाहिलं नाही. खोड काढताच येणार नाही अशा त्याच्या सौंदर्यातही हीच आंतरिक मोहकता होती. चित्रपटात आणि जीवनातही जे काही चांगलं होतं, त्याचा शशी कपूर हा विश्वस्त होता.

‘आय कॅन फास्ट अ‍ॅन्ड वेट..’ ‘सिद्धार्थ’मध्ये शीर्षक भूमिका करणारा शशी कपूर ‘तुला काय येतं?’ या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतो. ‘मेरे पास माँ है’ या (‘दीवार’मधल्या) संवादाइतकंच हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्यात त्याच्या कारकीर्दीचं सार, कलेकडे बघण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आणि सभ्य वृत्तीचं दर्शन आहे. हे लक्षात येण्यासाठी त्या वाक्यातला एक शब्द मात्र बदलावा लागेल.. ‘आय कॅन अ‍ॅक्ट अ‍ॅन्ड आय कॅन वेट!’

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…

आपल्याकडे केवळ देखणा चेहराच नाही, तर उच्च दर्जाचा अभिनयही आहे हे दाखवून देण्यासाठी शशी कपूरला प्रदीर्घ वाट बघावी लागली आणि नुसती वाट पाहून भागलं नाही तर चित्रपट काढण्याची जोखीमही पत्करावी लागली. ‘जुनून’ आणि ‘कलयुग’ पाहिले की लक्षात येतं, की ‘चोर मचाए शोर’ अन् ‘फकीरा’मधल्या हसत्या, गात्या, नाचत्या मदनाच्या पुतळ्यामध्ये एक परिपक्व अभिनेताही आहे. स्टारपदाची भरजरी झूल उतरवून अलगद व्यक्तिरेखेत शिरण्याची आणि तिच्यात प्राण फुंकण्याची क्षमता याच्याकडे आहे.

‘जुनून’मध्ये १८५७ च्या उठावाच्या काळात एका ब्रिटिश सुंदरीच्या प्रेमात पडणारा स्वातंत्र्यसैनिक म्हणून शशी कपूर दिसतो. आणि त्याच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या त्या मुलीच्या आईच्या भूमिकेत त्याची पत्नी जेनिफर दिसते. उठाव यशस्वी झाला आणि भारतीयांनी दिल्ली जिंकली तरच तुझी इच्छा पूर्ण होईल, अशी विलक्षण अट मुलीची आई घालते. त्यामुळे त्याच्या निर्धाराला जी धार चढते, ती दाखवताना शशी कपूर नाटकी आणि आक्रस्ताळा झाला नाही. शशी आणि जेनिफर यांच्या वयात मोठं अंतर होतं, ती त्याच्यापेक्षा वयानं मोठी होती (आणि अभिनयानंसुद्धा!) हे सत्य लक्षात घेतलं तरी जेनिफरनं ती भूमिका स्वीकारावी यात धाडस होतं, धैर्य होतं आणि कलेवरची निष्ठाही होती.

‘कलयुग’ हा महाभारताचा आधुनिक अवतार होता. दोन औद्योगिक घराण्यांतली स्पर्धा दाखवणाऱ्या या रूपेरी महाभारतात शशी कपूरकडे कर्णाची भूमिका होती. कर्ण ही हिंदीतल्या सर्व काळातल्या सर्व दिग्दर्शक आणि नायकांची लाडकी व्यक्तिरेखा आहे. आधीच अनौरस आणि त्यात ‘अँग्री’ हीरो- म्हणजे ‘रेडीमेड’ सूडकथा. आणखी काय हवं हिट् सिनेमासाठी?

‘कलयुग’मध्ये असाच मसाला ठासून भरता आला असता. या व्यक्तिरेखेचं ‘अँग्री मॅन’ छापाचं झगझगीत चित्रण करता आलं असतं. त्यामुळे ती उठावदार झाली असती आणि गाजली असती. शशी कपूरचं नाव जिच्याशी कायमचं जोडलं गेलंय अशी भूमिका तोवर झाली नव्हती. ही नामी संधी होती. पण चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल होते. यथार्थ व सौम्य व्यक्तिचित्रणासाठी त्यांचा लौकिक होता. ‘कलयुग’मध्ये त्यास अपवाद करण्याचं कारण नव्हतं. शशी कपूर चित्रपटाचा हीरो होता आणि निर्मातादेखील! त्यानं आग्रह धरला असता तर..

पण शशी कपूरनं तसं केलं नाही. त्याने दिग्दर्शकाच्या कामात तसूभर ढवळाढवळ केली नाही. कर्णाच्या भूमिकेच्या काळ्या, पांढऱ्या, करडय़ा छटा त्यानं आत्मसात केल्या. दोस्तीखातर त्याच्या शत्रूचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या कारवाया करताना विजयानं हरखून जाणारा, पण शत्रूशी असलेलं रक्ताचं नातं उघड झाल्यावर द्विधा झालेला कर्ण शशी कपूरनं सुरेख रंगवला होता. पण..

हा पण त्याच्या संपूर्ण कारकीर्दभर त्याला आडवा जात राहिला. कुणाही नटानं हेवा करावा अशी त्याची सुरुवात झाली होती. बी. आर. चोप्रा (‘धर्मपुत्र’), कृष्ण चोप्रा (‘चार दीवारी’), बिमल रॉय (‘प्रेमपत्र’) या बलाढय़ दिग्दर्शकांचे उत्कृष्ट चित्रपट त्याला मिळाले. आश्चर्य आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे यापैकी कोणत्याच चित्रपटात हिंदी चित्रपटाचा टिपिकलपणा नव्हता. निस्सीम ध्येयवाद, सत्य व अन्यायाची चाड (धर्मपुत्र), तर दुसरीकडे वैवाहिक जीवनाच्या जबाबदाऱ्या समजूत घेताना भांबावून गेलेला नवपरिणीत नायक अशा या  भूमिका होत्या. त्याचे दिग्दर्शक ‘स्टार’करता चित्रपट बनवणारे कारागीर नव्हते. कलाकारापेक्षा त्यांना कथा मोठी वाटत होती. परिणाम..?

तिन्ही चित्रपटांची प्रशंसा झाली. पदार्पणात अभिनयाची मोठी समज दाखवणाऱ्या शशी कपूरचं कौतुक झालं. पण तिन्हींना जेमतेमही आर्थिक यश मिळालं नाही. ‘स्टार’ बनण्याऐवजी शशी कपूरच्या डोळ्यांपुढे भरदिवसा तारे चमकले. स्वप्नवत वाटावं असं पदार्पण दु:स्वप्न ठरलं. कपूर घराण्याचं वलय अशा परिस्थितीत उपयोगी पडणारं नव्हतं. खुद्द राज कपूर त्याला काम द्यायला पुढे आला नाही. शशी कपूरच्या आणि त्याच्या वयात अठरा वर्षांचं अंतर होतं. आणि प्रेम इतकं होतं, की शशी कपूरला राज आपला पहिला मुलगा मानत होता. पण ‘आग’ व ‘आवारा’मध्ये छोटय़ा शशीला काम देणाऱ्या राज कपूरकडे आपल्या धाकटय़ा भावासाठी चित्रपट नव्हता. दुसरं म्हणजे त्या काळात तो स्वत: काम करत होता. इतरांसाठी चित्रपट बनवण्याचं त्याला कारण नव्हतं आणि फुरसतही नव्हती.

‘कपूर घराण्यातूनच प्रतिस्पर्धी’ ही शशी कपूरच्या कारकीर्दीतली नाटय़पूर्ण घटना होती, संघर्ष होता आणि आव्हानदेखील! त्यानं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा राज आणि शम्मी हे मोठे भाऊ गाजत होते. ते दोघे कमी होते म्हणून की काय, दिलीपकुमार आणि देव आनंद जोशात होते. राज-दिलीप-देव या त्रिकुटापुढे सुनील दत्त आणि राजेंद्रकुमार यांनाही जाता येत नव्हतं, तिथे शशी कपूर, मनोजकुमार आणि धर्मेद्र यांची काय कथा! फक्त शम्मी कपूर ‘बदतमीज’ बनून आडदांडपणे त्यांच्याबरोबर ‘चालत’ होता.

बघता बघता राजेश खन्ना नावाचं वादळ आलं आणि त्यानं या तीन महावृक्षांसह झुडपं आणि लव्हाळीदेखील आडवी केली. हे तांडव चालू असतानाच ऋषी कपूर आणि रणधीर व त्यांच्यानंतर थोडय़ाच वर्षांनी राजीव कपूर हे तिघे पुतणेही मैदानात उतरले. शशी कपूरकरताच नव्हे, तर त्याच्यासह दोन पिढय़ांना हा मोठा कठीण काळ होता. त्यात धर्मेद्रनं ‘ही मॅन’ बिरुदाचा लाभ उठवत अ‍ॅक्शनपटांकडे मोहरा वळवला. मनोजकुमारनं हुशारीनं निर्मिती-दिग्दर्शनात उतरून देशभक्तीपर चित्रपटांवर ‘कॉपीराइट’ मिळवला होता. जितेंद्रला दाक्षिणात्य चित्रपटांचा वासूनाका सापडला होता आणि तिथे त्याचा ताथैया यथेच्च सुरू झाला.

राजेश ‘पंत’ गेले; अमिताभ ‘राव’ आले.. आणि अहो आश्चर्यम्! या नव्या सुपरस्टारच्या दरबारात शशी आणि ऋषी कपूर यांना सरदारकी मिळाली. संजीवकुमार हा खराखुरा महानायक अभिनयाच्या बळावर आणि विनोद खन्ना मनगटातल्या बळावर उभा होता. पण संजीवकुमारच्या आयुष्याची दोरी आकस्मिक तुटली आणि विनोद खन्ना अध्यात्माच्या जाळ्यात सापडून दूरदेशी निघून गेला. पण याचा शशी कपूरला फारसा लाभ झाला नाही. त्याला स्थैर्य मिळालं, प्रतिष्ठा शाबूत राहिली; पण त्याचं ‘स्टार रेटिंग’ वाढलं नाही. देखणं रूप आणि उत्तम अभिनय असूनही तो ‘स्टार’ वलय अन् लक्षात राहाव्यात अशा भूमिकांना वंचितच राहिला. त्याच्यापाशी चित्रपटांना तोटा नव्हता. आणि कपूर कुलोत्पन्न असूनही आश्चर्यकारकरीत्या तो दीर्घ काळ ‘स्लिम’ राहिला. याचं श्रेय अर्थातच जेनिफरच्या काटेकोर डाएट-शिस्तीला! रणधीर आणि राजीव हे पुतणे आणि राजेश खन्नासुद्धा पडद्याआड गेला; ऋषीची चमक कमी झाली, तरी शशी कपूरचं प्रसन्न हास्य पडद्याची शोभा वाढवत राहिले. झीनत अमान, नीतू सिंग, डिम्पल या त्याच्या मुलीच्या वयाच्या तारकांबरोबर तो वयाच्या पन्नाशीतही काम करत राहिला आणि साजूनही दिसला. ‘उत्सव’मधला खलनायक रंगवण्याकरिता वजन वाढवण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर शशी कपूरनं अशोककुमारचं सर्वाधिक काळ काम करण्याचं रेकॉर्ड मोडलं असतं. शशी कपूरचे हात तिथेही रिकामे राहिले. वयाआधी शशी कपूरला वजनाची चाहूल लागली आणि त्यानं चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळवला. पण तिथेही त्याचं प्रसन्न, स्नेहल आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आड आलं. प्रेमळ, कुटुंबवत्सल पित्यांचा जमाना अमिताभयुगात संपुष्टात आला. दादाजी, पिताजी, भाईजी आक्रस्ताळे हुकूमशहा झाले. सुशिक्षित, सुसंस्कृत दिसण्यावर मनाई आली. शशी कपूर ‘अन्ना’ किंवा रामा शेट्टी दिसणं शक्यच नव्हतं. तो कधी ‘अँटी-हीरो’सुद्धा दिसला नाही, तर ‘डी’ किंवा आणखी कोणत्या ‘कंपनी’चा दादा कुठून दिसणार?

शशी कपूर हा खरं म्हणजे आपला पहिला इंटरनॅशनल स्टार! हॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्नसुद्धा जेव्हा आपले हीरो बघत नव्हते तेव्हा बॉलिवूडचा हा चिरतरुण वसंत तिकडे काम करून आला. ‘प्रीटी पॉली’ हा हॉलिवूडचा चित्रपट त्यानं केला. वॉल्ट डिस्ने यांच्या ‘पेरेंट ट्रॅप’मधला डबल रोल गाजवणारी हेले मिल्स ही त्या काळातली मोठी स्टार त्याची नायिका होती. ती नायिका प्रवासाला निघते तेव्हा तिला हा गाइड म्हणून भेटतो आणि तिला टॅक्सीतून सर्वत्र फिरवतो. ‘प्रीटी पॉली’ नासिर हुसेन वा एस. मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटांसारखाच होता. सर्वसाधारण! नायिकेच्या डोळ्यांत अश्रू येतात तेव्हा तिच्या चष्म्यावर वायपर्सचे काटे फिरतात, हा या चित्रपटातला एकच प्रसंग लक्षात राहिला. र्मचट-आयव्हरी प्रॉडक्शन्सच्या सहा इंग्रजी चित्रपटांमध्ये शशी कपूर दिसला. पण पहिला ‘हाउसहोल्डर’ आणि शेवटचा ‘मुहाफिज’ वगळता कोणत्याही चित्रपटात काही खास नव्हतं.

तेव्हा टीव्ही नव्हता. सोशल मीडिया नव्हता. मार्केटिंग अ‍ॅन्ड प्रमोशनची कल्पना नव्हती. त्यामुळे पहिलेपणाचं श्रेय असूनही शशी कपूरच्या याही कामगिरीची दखल घेतली गेली नाही. अर्थात इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करण्यावर शशीचं मोठेपण अवलंबून नव्हतं. त्याच्या वाटय़ाला खटकेबाज संवाद आणि लक्षवेधी दृश्यं तशी कमीच आली. पण आपली छाप उमटवायला त्याला एखादं दृश्यही पुरायचं. ‘दीवार’मध्ये पोलीस इन्स्पेक्टर ज्या मुलाला चोर समजून गोळी घालतो, त्यानं फक्त एक ब्रेड चोरला आहे, हे कळताच त्याच्या चेहऱ्यावर उमटणारा पश्चात्तापाचा भाव त्याच्या डोळ्यांत दिसतो. नंतर तो पुष्कळ खाऊ घेऊन त्या मुलाच्या घरी जातो, त्यावेळचा त्याचा वावर त्याचा पश्चात्ताप बोलका करतो. ‘वक्त’मध्ये आईच्या शस्त्रक्रियेखातर तो पैसे घेऊन खोटी साक्ष देतो. पण खोटं बोलणं त्याला जमत नाही. ऐनवेळी त्याचा भलेपणा जागा होतो; तो खरं बोलतो आणि कोसळून पडतो. या प्रसंगांमध्ये शशी कपूरच शोभतो; सच्चा वाटतो. ‘इजाजत’मध्ये तर तो एक शब्दही बोलत नाही. पण त्याचं सहृदय हास्य काम करून जातं. पत्नीला घ्यायला तो स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये येतो तेव्हा ती एका परपुरुषाबरोबर बोलत असते. हाच तिचा पूर्वाश्रमीचा पती आहे, हे तो न सांगता ओळखतो आणि तरीही पत्नीला जाब विचारत नाही. आपल्या मनात संशय नाही, तिनं आपल्याबरोबर यावं, हे तो उमद्या, लाघवी हास्यातून सुचवतो.

आकर्षक स्मितहास्याची देणगी लाभलेले अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये आहेत. पण प्रेम आणि विश्वास व्यक्त करणारं असं हास्य पडद्यावर कधी पाहिलं नाही. खोड काढताच येणार नाही अशा त्याच्या सौंदर्यातही हीच आंतरिक मोहकता होती. त्यात डोळे दिपवणारा झगमगाट नव्हता. तो त्याच्या दोन्ही वडील भावांकडे होता. पण त्यामुळेच राज व शम्मी सुंदर वाटले तरी हवेहवेसे वाटले नाहीत. त्यांच्या रूपात एक प्रकारचा छाकटेपणा होता. शम्मी कपूरचे डोळे तर शिकाऱ्याचे डोळे होते. राज कपूरच्या डोळ्यांत वेदना होती. ती प्रकट व्हायची तेव्हा करुणा वाटायची. पण शशी कपूरच्या चेहऱ्यात जो स्नेह होता, आपुलकी होती, त्यामुळे जो आपलेपणा वाटायचा, ती आश्वासकता राजच्या नजरेत होती. शम्मी कपूरच्या ‘जंगली चार्म’मध्ये आक्रमकता होती; जी शशी कपूरकडे नव्हती. त्यामुळेच की काय, अमिताभबरोबरच्या चित्रपटांप्रमाणे त्याला ‘अभिनेत्री’सारखे नायिकाप्रधान चित्रपटही करावे लागले. अशा चित्रपटांमध्ये तो नेहमी स्त्रीला जपणारा, तिच्याशी आदरानं वागणारा सोबती वा जोडीदार असे. त्यामुळे तर जो जास्त आवडायचा.

टिकून राहायची गरज किंवा ‘विजेता’सारखे चाकोरीबाहेरचे चित्रपट काढण्यासाठी असेल, पण शशी कपूरनं भरपूर चित्रपट केले. ते चित्रपट दुर्लक्षणीय होते; तरी शशी कपूर मात्र तसा नव्हता. ‘प्यार किए जा’ आठवा. त्यात ओमप्रकाशलासुद्धा त्याच्यापेक्षा मोठी भूमिका आहे. हा शुद्ध प्रेमवीर म्हणून हजेरी लावायला होता. पण गॉगल लावून आणि लाल गर्द टी-शर्ट घालून त्यानं एन्ट्री घेतली, तेव्हा पडद्यावर गुलाबांचा ताटवा फुलल्यासारखं वाटलं. त्याचं प्रेमासाठी निदर्शन करणं शंभर टक्के पटलं! या खटाटोपापायी त्याला तुरुंगात टाकतात तेव्हा प्रेयसी त्याला भेटायला जाते. तिच्या ओढणीच्या टोकानं तो डोळे पुसल्याचा आविर्भाव करतो. ते पाहून विरघळणार नाही ते स्त्रीहृदय नसेल!

प्रेक्षक म्हणून आणि पत्रकार म्हणूनही शशी कपूरनं माझ्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण निर्माण केले. दोन्ही नात्यांनी तो जवळचा वाटला; आपला वाटला. ‘दिल ने पुकारा’ हा किती फालतू सिनेमा! ‘वक्त करता जो वफा आप हमारे होते’ या गाण्यानं आणि शशी कपूरनं तोही गोड केला. चित्रपटाची नायिका (राजश्री) त्याला सोडून दुसऱ्या नायकाला (संजय खान) स्वीकारते. हा प्रसंग पाहताना भान न राहवून आमची एक मैत्रीण भर थिएटरमध्ये सात्त्विक संतापानं ओरडली होती, ‘हिला काय वेड लागलंय की काय? शशी कपूर समोर असताना या खुळ्याशी ही कशी लग्न करते?’ आणि यानंतर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल तक्रार न येता मागच्या रांगेतून टाळ्या वाजल्या होत्या!

शशी कपूर दुय्यम भूमिकेत होता की तिय्यम, हा प्रश्नच नव्हता. शेवटी तो शशी कपूर होता. टी-शर्ट आणि फुलांच्या डिझाइनचे शर्ट घालावेत तर शशी कपूरनंच! अगदी सुरुवातीच्या काळात त्याचे दाट, कुरळे, मागे वळवलेले लांब केस अन् मधोमध भांग पाहून आमचा पुरुष नातलग वर्ग त्याला ‘दिनू’ किंवा ‘बाळू’ म्हणायचे. हा शुद्ध मत्सर होता. अशाच रूपाचे हॉलिवूडमधले रायन ओ’नील किंवा वॉरेन बेरी त्यांना आवडायचे. पण शशी कपूर मात्र ‘बाळू’ होता.. म्हणजेच नव्हता! लवकरच त्यानं आपली हेअरस्टाईल बदलली आणि जळाऊ मंडळींना जळण्यासाठी नवं कारण दिलं. असो.

पत्रकार म्हणूनही त्याला भेटणं आनंदाचं असायचं. कारण त्याच्याशी बरोबरीनं वागता-बोलता यायचं. त्याचं वागणं-बोलणं अगदी मोकळंढाकळं, अनौपचारिक, तरीही मर्यादा न सोडणारं असायचं. समोर आल्यावर तुम्ही ‘नमस्कार’ म्हणण्यासाठी तो थांबत नसे. ‘हाय.. हॅलो’ म्हणून हात उंचावून तोच पुढे यायचा. आमच्याबरोबरच्या एका अपंग फोटोग्राफरला तो विशेष आपुलकीनं वागवायचा. दिल्लीच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बऱ्याचदा त्याची गाठ पडायची. अशा वेळी आपण चहा ‘ऑफर’ केला तर तो  कधी नाही म्हणत नसे. पेपर कपमधला तो चहा देताना आम्ही अवघडायचो. त्याच्या घरी अतिशय उत्तम, ‘अरोमा’वाली कॉफी आणि स्वादिष्ट बिस्किटांनी पाहुणचार व्हायचा. पृथ्वी थिएटरमध्ये गाठ पडली तर ‘आयरिश कॉफी’ समोर यायची. या कॉफीप्रमाणे नाटकातल्या वस्तूंनी सजलेली त्याची ‘स्टडी’ लक्षात राहिली आहे. तिथे त्यानं चक्क एका ट्रंकेचा टीपॉय केला होता आणि तिथेच चहाचा ट्रे ठेवला जायचा.

सैफ अली खान सुधारला व बरं काम करू लागला तेव्हा ‘ज्युनिअर शशी कपूर’ म्हणून त्याचं कौतुक झालं. त्याचा ‘जब जब फूल खिले’वरून आमीरचा ‘राजा हिंदुस्तानी’ बनला आणि तुफान चालला. आमीर त्याकाळी तो गोंडस दिसायचा. गोड हसायचा. मात्र शशी कपूरचा निरागस, निष्पाप चेहरा आमीरपाशी नव्हता. त्या चित्रपटात तो दुखावला गेला तेव्हा त्याचा पुरुषी अहंकार दुखावल्यासारखा वाटला. ‘जब जब फूल खिले’मध्ये शशी कपूरला श्रीमंत नायिकेच्या नातलगांनी दुखावलं तेव्हा एक प्रेमिक, एक साधा-सरळ माणूस दुखावल्यासारखं वाटलं आणि पोटात तुटलं.

तो पडद्यावर आणि पडद्यामागेही ‘युनिक’ होता, तसाच त्याच्या निवृत्तीतही! तोच-तोपणाचा कंटाळा आला आणि शशी कपूरनं स्वेच्छानिवृत्ती पत्करली. फिल्मी पार्टी, कार्यक्रम, समारंभ, प्रीमियर.. कुठेही त्यानं हजेरी लावली नाही. हे त्याचं वागणं शानदार होतं. काळ कुणालाही सोडत नाही. शशी कपूरचं राजबिंडं रूप आणि दाट केस त्यानं हिरावून घेतले. पण तो हसला की पूर्वीचाच शशी कपूर वाटायचा. प्रसन्न, लोभस आणि आपल्यातला. अभिनेता म्हणून त्याची आठवण ठेवावी असे दोन उत्तम चित्रपट त्यानं शेवटच्या काळात दिले- ‘न्यू दिल्ली टाइम्स’ आणि ‘मुहाफिज’! आश्चर्यानं मन थरारून जावं अन् आदरानं भरून जावं अशा त्या भूमिका होत्या. पहिल्यात तो पत्रकार होता; दुसऱ्यात विझू घातलेला, पण अहंकार न जळालेला विक्षिप्त, व्यसनी, छंदीफंदी कवी. नेहमीप्रमाणेच वरची पट्टी न लावता, उठावदारपणाचा शोध न घेता शशी कपूरनं या दोन्ही भूमिका चिरस्मरणीय केल्या. पहिल्या चित्रपटाकरिता त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला; तर दुसऱ्याकरिता मूठभर प्रशंसा!

त्या चित्रपटात शेवटी त्याच्या मरणाचाही सोहळा साजरा होतो. ते सुंदर दृश्य अजूनही डोळ्यांसमोर आहे.. आणि शशी कपूरसुद्धा! कारण चित्रपटात आणि जीवनातही जे काही चांगलं होतं, त्याचा तो विश्वस्त होता.

Story img Loader