ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची नुकतीच झालेली हत्या ही विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा आणखीन एक निर्घृण हल्ला आहे. आपल्या धारदार लेखणीने सामान्यजनांवरील अन्याय-अत्याचारांविरोधात सातत्याने लढा देणाऱ्या या संघर्षरत पत्रकाराच्या व्यक्तित्वाची ओळख करून देणारा लेख..
बंगळुरूमध्ये कन्नड विद्रोही (बंडाय) साहित्य चळवळीचे जनक व नेते आणि कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ख्यातनाम कन्नड साहित्यिक चंद्रशेखर पाटील (चंपा) यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. मधेच एक मध्यम उंचीच्या, पंजाबी पोशाखात असलेल्या आणि किंचित स्थूलतेकडे झुकणाऱ्या, गव्हाळवर्णी बाई चंपांना भेटायला आल्या. चंपांनी त्यांची ओळख करून दिली की, या पी. लंकेश यांच्या कन्या गौरी. ‘गौरी लंकेश पत्रिके’च्या संपादिका. पी. लंकेश यांचे नाव ऐकताच मी एकदम हुश्शारलो. कारण लेखक-पत्रकार म्हणून त्यांचे मोठेपण मला चांगलेच माहीत होते. दोन-चार वेळा त्यांना भेटलो होतो. त्यांची मते मांडण्याची आक्रमक पद्धतही अनुभवली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आक्रमतेमागे प्रचंड असा मानवतावादी दृष्टिकोन असल्याचे थेट जाणवायचे. ते अभ्यासू या अर्थाने कट्टर मार्क्सवादी आणि बसवानुयायी होते.
कुठल्याशा एका भेटीत त्यांनी मला असेही ऐकवले होते की, बसवण्णा हे बाराव्या शतकातील भारतीय कार्ल मार्क्स होते, तर कार्ल मार्क्स हा विसाव्या शतकातील युरोपियन बसवण्णा! त्यांचे बसवण्णांच्या जीवनावरचे ‘संक्रांती’ हे तर माझे अत्यंत आवडते नाटक. कारण बसवण्णांचे क्रांतिकारकत्व मांडणारी कन्नड भाषेत जी मोजकी तीन-चार नाटके आहेत (अगदी गिरीश कार्नाडांचे ‘तलेदंड’ धरून), त्यांत हे नाटक मला नेहमीच प्रथम क्रमांकाचे वाटत आले आहे. एवढय़ा थोर माणसाची कन्या साक्षात माझ्यासमोर होती. मी अत्यंत आदरपूर्वक गौरीअक्कांना नमस्कार केला.
होय, अक्का. चंपा त्यांना ‘अक्का’च म्हणत होते. कन्नडमध्ये बहिणीला ‘अक्का’ म्हणतात. बसवण्णांची सहकारी ‘महादेवीअक्का’ हे शरण साहित्यातील एक अत्यंत उच्चकोटीचे आदरणीय नाव. गौरी लंकेश यांचे एकूण काम पाहिले तर एकविसाव्या शतकातील त्या महादेवीअक्काच होत्या याबद्दल दुमत होऊ नये. मी त्या भेटीत पी. लंकेश यांच्या आदरापोटी अक्कांना नमस्कार केला होता. पण आता या क्षणी अक्कांचे कर्तृत्व नीट उमजल्यामुळे मी खरोखरीच अत्यंत कृतज्ञतेने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आहे.
पुढे आमच्या गप्पा सुरू झाल्या. चंपांनी कलबुर्गी- सरांच्या हत्येचा विषय काढला आणि विनोदाने बोलल्यासारखे ते गौरीअक्कांकडे बघत उद्गारले, ‘‘बघ हं गौरीअक्का, आपण सगळे लिंगायत सनातन्यांच्या बंदुकीचा निशाणा आहोत. तू फारच आक्रमक लिहितेस. थोडं सांभाळून.’’
‘‘मी आक्रमक नाही लिहीत. फक्त सत्य लिहिते. आणि सत्य खोटय़ा लोकांना नेहमीच आक्रमक वाटते. दुसरी गोष्ट- फक्त लिंगायत निशाणा आहेत; स्वत:ला वीरशैव म्हणवणारे नाहीत. कारण त्यांच्याच हातात बंदूक आहे.’’ गौरीअक्का पटकन् उत्तरल्या. आणि मला पी. लंकेशच बोलल्यासारखे वाटले. वडिलांबद्दल बोलताना गौरीअक्का आपल्यावर त्यांचा कसा प्रभाव आहे आणि मीच कशी त्यांची एकमेव वारस आहे, हेही अभिमानानं सांगू लागल्या.
पी. लंकेश हे इंग्रजी साहित्याचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि कन्नड साहित्यातील कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, पत्रकार व चित्रपटकारही होते. ही सर्व अभिव्यक्तीची विभिन्न माध्यमे त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या आणि लोकप्रियतेने हाताळली. पण लोकप्रियतेसाठी त्यांनी कधीही आपली मार्क्सवादी आणि बसववादी भूमिका सोडली नाही. त्यासाठी कुठलीही तडजोड वा राजकीय आणि सामाजिक दबाव घेतला नाही. प्रसंगी त्याची किंमतही मोजली. ‘प्रजावाणी’ या दैनिकात ते स्तंभलेखन करीत. अत्यंत रोखठोक, परखड आणि जनताभिमुख अशा त्यांच्या लेखनामुळे हा स्तंभ खूपच लोकप्रिय झाला होता. मात्र शासन, सत्ता आणि जाहिरातदारांच्या दबावामुळे ‘प्रजावाणी’चे प्रशासन त्यांना जरा दमाने घ्यायला सांगू लागले. तेव्हा त्यांनी ‘प्रजावाणी’तील स्तंभलेखनच बंद केले आणि स्वत:चे ‘लंकेश पत्रिके’ हे साप्ताहिक सुरू केले. ही घटना १९८० सालची. या साप्ताहिकाला कुठलीही सरकारी वा भांडवलदारांची जाहिरात मिळत नव्हती. पण केवळ सत्यनिष्ठ, रोखठोक शैलीतील सामाजिक विषय हाताळणीमुळे हे साप्ताहिक खूपच जनप्रिय झाले. लंकेश यांच्या मृत्यूपर्यंत (इ. स. २०००) या लोकप्रियतेत घट झाली नाही. त्यामुळे या पत्रिकेचे भागीदार प्रकाशक ही पत्रिका पुढे चालू ठेवण्यासाठी धडपडत होते. पण इथे गौरीअक्कांचा सख्खा भाऊच आडवा आला आणि त्याने पत्रिकेचे सर्व अधिकार- गौरीअक्काच्या भाषेत ‘पुरुषप्रधान व्यवस्थे’मुळे स्वत:कडे मिळविले. वडिलांच्या वैचारिक वारशातून नखशिखान्त मानवतावादी, मार्क्सवादी आणि बसववादी झालेल्या गौरीअक्कांनी मग ‘गौरी लंकेश पत्रिके’ची सुरुवात केली.
या पत्रिकेने मात्र मूळ वडिलांचा वारसा कायम ठेवत प्रचंड जनप्रियता मिळविली. कारण भारतातच नव्हे, तर जगभरात घडणाऱ्या अयोग्य, अन्याय्य आणि खोटारडय़ा गोष्टींबद्दल त्यात अत्यंत रोखठोक, पण सत्यनिष्ठ, शास्त्रीय पद्धतीने आणि मुद्देसूद हाताळणी केलेली असायची. ‘कंड हागे’ म्हणजे ‘जे पाहिले ते’ हे त्यांच्या या पत्रिकेतील स्तंभाचे नाव होते. पण या ‘पाहण्या’मध्ये अतिशय निरामय स्पष्टता, वैज्ञानिकता आणि मानवता असायची. त्यांनी हाताळलेले विषय जरी पाहिले तरी गौरीअक्कांचा आवाका किती प्रचंड होता, हे त्यातून स्पष्ट होते.
खरे तर त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले होते. ‘इनाडू’ या तेलगू चित्रवाहिनीसाठी त्यांनी त्यांच्या तरुण वयात पत्रकारिता केली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्याही त्या काही काळ पत्रकार होत्या. शिवाय वेगवेगळ्या इंग्रजीभाषिक मासिके व साप्ताहिकांसाठी त्या स्तंभलेखन करत होत्या. तरीही वडिलांसारखे स्वत:चे साप्ताहिक सुरू करताना मात्र त्यांनी कन्नड या त्यांच्या मातृभाषेचीच निवड केली. अतिशय प्रभावीपणे या भाषेचा त्यांनी आपल्या लेखनासाठी वापर केला. यासंदर्भात आपल्या एका संपादकीयात त्यांनी म्हटले आहे की, भारतातल्या सर्व संतांनी ज्ञानाची मांडणी करताना ते ज्या मातृभाषेत जन्माला आले त्याच भाषेचा स्वीकार केला आहे. कारण त्या जनभाषा होत्या. आणि मूठभरांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी निर्माण झालेल्या संस्कृत भाषेची शोषक वृत्ती त्यांनी जाणली होती. मीही याच संतांची २१ व्या शतकातील वारस आहे. म्हणून मी माझ्या मातृभाषेवर.. माझ्या जनभाषेवर प्रेम करते.
वडिलांसारखीच गौरीअक्कांनी कधीही व्यक्तिगत लाभासाठी स्वार्थी तडजोडी केल्या नाहीत. स्वत:चे अस्तित्व जपण्यासाठी राजकीय दबावापुढे मान तुकवली नाही. त्यांच्याबद्दल बोलताना एम. एम. कलबुर्गीसर एकदा मला म्हणाले होते, ‘‘ही बाई विज्ञाननिष्ठ लिंगायत आहे- जी बसवण्णांना अपेक्षित आहे. आंधळ्या श्रद्धेने ती धर्माकडे पाहत नाही. ही बाई लिंगायत धर्माला मान देते. याचा अर्थच असा, की बसवण्णांचा लिंगायत धर्म हा किती वैज्ञानिक पायावर उभा आहे!’’ सरांचा त्यांच्याबद्दलचा हा शेरा खूप महत्त्वाचा आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्वातील अवैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोषणमूलक असमानता १९३५ सालीच स्पष्ट केली होती. या देशातील सर्व धर्मव्यवस्थांना या ब्राह्मण्यवादाची (तथाकथित हिंदुत्ववादाची) लागण झालेली आहे. लिंगायत धर्मात गेल्या शंभर वर्षांपासून यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक पुरोगामी विचारवंत व कार्यकत्रे धडपत आहेत. कलबुर्गी सरांनी या लढाईला एक शास्त्रीय आणि निर्णायक टोक आणले. त्यांच्या या लढाईत चंपा, गौरीअक्का, के. भगवान आदींसारखी कन्नड सांस्कृतिक जगतातील महत्त्वाची माणसे हिरीरीने सामील झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून या संघर्षांच्या विरोधकांनी कलबुर्गीसरांची निर्घृण हत्या केली. वर्षभरातच गौरीअक्कांचाही बळी घेतला.
माझा बंगळुरूचा पत्रकार मित्र मंजुनाथ सांगत होता, ‘‘गौरीअक्कांना आपल्यावर गोळी चालविली जाईल याची खात्री होती. परंतु तरीही त्यांनी पोलीस संरक्षण घेण्याचेही नाकारले. कारण सत्ताधाऱ्यांची मदत घेणे म्हणजे आणखी एका व्यवस्थेला शरण जाणे, असे त्यांचे म्हणणे होते. मी ज्यांच्या बाजूने लढते, तेच माझे संरक्षक आहेत,’’ असे त्या नेहमी म्हणायच्या. आपण स्वीकारलेल्या कामात आपला संसार आणि पती अडथळा होतील आणि आपल्यामुळे तेही होरपळू नयेत अशी काहीशी त्यांची त्यांच्या घटस्फोटामागे भूमिका होती, असेही मंजुनाथ सांगत होता. पण व्यक्तिश: त्या अतिशय समाजाभिमुख आणि वंचितांबद्दल प्रचंड आस्था बाळगणाऱ्या अशाच होत्या. पण बऱ्याचदा होते काय, की वंचितांबद्दल आस्था असणारे वंचितांतील एखाद् दुसऱ्याच्या हातून चुका झाल्या असतील तर त्याचेही समर्थन करतात. गौरीअक्कांकडून असे कधीच झाले नाही. कारण त्यांच्या काही भूमिका असल्या तरी त्यांची दृष्टी वैज्ञानिकच होती. त्यामुळे नक्षलवाद्यांबद्दल प्रचंड सहानुभूती असूनही नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल त्यांना प्रचंड तिरस्कार होता. तसा तो त्या जाहीरपणे व्यक्तही करायच्या. व्यापक दृष्टीने त्या अन्याय, शोषण या बाबींकडे पाहायच्या. पण त्यासाठी त्या चुकूनही त्यातून होणाऱ्या वंचितांच्या चुकांचे समर्थन करीत नसत.
अक्कांच्या हत्येनंतर त्यांच्या मृत्यूची अनेक कारणे अनेक पद्धतीने आणि स्वत:चे स्वार्थ वा हितसंबंध सांभाळण्याच्या आवेशाने सांगितली जात आहेत. अगदी ज्या हिंदुत्ववादी तत्त्वज्ञानाच्या त्या कट्टर विरोधक होत्या- त्यासाठी खाजगीत वा सार्वजनिक अशा कुठल्याही ठिकाणी- त्या त्याला विरोध करताना कसलाही मुलाहिजा बाळगत नसत. त्याच हिंदुत्ववाद समर्थक पक्षांनी त्यांच्या खुन्याचा शोध घ्यावा म्हणून मोच्रे काढले. यात खुद्द त्यांचा सख्खा भाऊही सामील आहे. मंजुनाथ सांगत होता की, एकदा त्याला अक्का म्हणाल्या म्हणे की, ‘‘माझी लढाई माझ्या घरापासूनच सुरू आहे. आणि माझ्या सोबतीला माझ्या घरी फक्त वडील आणि बसवण्णा एवढेच आहेत.’’ ही मंडळी नक्षलवाद्यांकडे त्यांचे खुनी म्हणून निर्देश करताहेत. अक्कांनी नक्षलवादाचे समर्थन केले नाही. पण त्यांच्या चळवळीबद्दल त्यांना सहानुभूती होती. कारण त्यांना ती लोकचळवळ म्हणून मान्य होती. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. कर्नाटकातले पाच महत्त्वाचे नक्षलवादी पुढारी त्यांच्या मत्रीमुळेच शरणागत झाले. नक्षलवादी कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न होता. नक्षलवाद्यांनाही त्या आपल्या कधी शत्रू वाटल्या नाहीत. उलट, त्यांचे मत्रीपूर्ण संबंध होते. साकेत राजनसारखा नक्षलवादी- ज्याचा पोलिसांना कधीच शोध लागत नव्हता- त्याची भेट घेऊन त्याचा फोटोदेखील त्यांनी आपल्या पत्रिकेत छापला होता.
एक सत्य आहे की आमच्या पहिल्याच भेटीत चंपा म्हणाले होते की, ‘‘लिंगायत सनातन्यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहेत.’’ कलबुर्गीसरांनी लिंगायतांच्या स्वतंत्र धर्माची चळवळ सुरू केली. आम्ही हिंदू नाही, कारण बसवण्णांनी शोषणमूलक धर्माचा त्याग केला होता, ही त्यांची भूमिका होती. या भूमिकेतून एक मोठी लढाई कर्नाटकमध्ये सुरू होऊन आता ती दक्षिण भारतात व महाराष्ट्रात पसरते आहे. या चळवळीतील अनेक पुरोगामी विचारवंतांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. तशीच आहुती आता गौरीअक्कांनी दिली आहे. खरे तर सत्ताधारी कुणीही असोत, समाजात कुठेही आणि कसल्याही प्रकारचा अन्याय घडो, चुकीच्या गोष्टी घडो, गौरी लंकेश यांनी त्याविरोधात आपली लेखणी शस्त्र म्हणून वापरली. मग ते कर्नाटकातील खाणमालक असोत किंवा गोरखपूरच्या दवाखान्यात मृत्यू पावलेल्या बालकांसाठी तिथले डॉक्टर कफील खान यांना केवळ मुस्लीम म्हणून टाग्रेट करण्याचा प्रयत्न असो; गौरी अक्का सतत अन्यायाच्या विरोधात उभ्या राहिल्या. कारण निरामय लोकशाही आणि मानवतावाद याच्या त्या खंद्या पुरस्कर्त्यां आणि समर्थक होत्या.
राजा शिरगुप्पे
rajashirguppe712@gmail.com