सुशिक्षितांच्या अन् साक्षरांच्या अवतीभोवती काचेवर उमटणाऱ्या शब्दांचाही आता झिम्मा चालू असतो. हवेतून क्षणार्धात प्रकटणारी ती वाक्ये अथवा चित्रे खिशातल्या मोबाइल फोनपर्यंत कशी येतात? शब्दांना असे अदृश्य पंख कधी अन् कसे फुटले? इंटरनेट म्हणजे टेलिफोन व संगणक यांचा संयोग होऊन जग कसे नजदिक आले अन् आपल्या हाताच्या बोटांत सामावले? अशा असंख्य प्रश्नांचा पान- दीड पानाच्या प्रकरणात आढावा घेऊन माहितीचा इतिहास किंवा ज्ञानाचा प्रवास कथन करणारे एक मनोरंजक पुस्तक म्हणजे ‘नवा गुटेनबर्ग : माहिती व प्रसारमाध्यमांची नवी उत्क्रांत झेप!’
माणसाने परस्परांना समजून घेण्यासाठी भाषा कशी शोधली, येथपासून या पुस्तकात माहितीचा खजिना वाचकापुढय़ात ओतला जातो. खाणाखुणा, गुंफाचित्रे, शिळाचित्रे, कोरलेल्या प्रतिमा यांचा माणसाने कसा वापर केला याची सचित्र माहिती हे पुस्तक देते. शब्द मुद्रणापर्यंत पोचला अन् जर्मन योहान गुटेनबर्गला जग बदलून टाकायचे श्रेय कसे मिळते याचा थोडक्यात, पण रंजक इतिहास या पुस्तकात आहे. तिथून पुस्तके, कागद, रेडिओ, टी. व्ही., तारायंत्र, फोन, संगणक आदी संपर्कसाधने कशी घडली याचाही छान उलगडा लेखकद्वय करून देतात.
केवळ तांत्रिक अथवा शोधांची जंत्री देऊन लेखक थांबत नाहीत. माध्यमांचा वापर राजकीय विचारसरणीसाठी का व कोणी करून घेतला, याचीही समीक्षा करतात. यात कम्युनिस्टांचे प्रचारतंत्र, हिटलरचा रेडिओचा वापर त्यांनी नीट समजावून सांगितला आहे. माओ याने चीनची सांस्कृतिक क्रांती म्हणून दडपशाही कशी केली आणि आपली प्रतिमा कशी तयार केली, याचीही मांडणी हे पुस्तक करते.
पत्रकारिता वा संज्ञापन या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. प्रत्येक प्रकरणासाठी कोणती पुस्तके वाचली याची साद्यंत यादी पुस्तकाअंती दिली आहे. या पुस्तकात जेवढी प्रकरणे आहेत त्या प्रत्येक विषयावर जगात खूप पुस्तके आहेत. त्यातून वेचक माहिती घेऊन मराठी वाचकांना (आधी इंग्रजी) पुरवण्याचे किचकट काम या लेखकांनी केले आहे. झेरॉक्स, विकिलिक्स, विकीपीडिया, ट्विटर आदी अतिपरिचित ‘माध्यमां’चाही मोजका इतिहास या पुस्तकात सापडतो.
भांडवलशाहीने आपल्या फायद्यासाठी ही माध्यमसृष्टी निर्मिली याचा मात्र लेखकांना विसर पडला आहे. साम्यवादावर टीका करता करता भांडवलशाहीचा माध्यमांना पडलेला विळखा त्यांना दिसू नये म्हणजे जराशी डोळेझाकच दिसते. प्रस्तावनेत चंद्रशेखर साने संघपरिवारासारखे लिहून ब्राह्मणांचे ज्ञानावरील वर्चस्व, जातिप्रथेचा ज्ञानातील अडथळा जणू आपोआप झाला- अशी मांडणी करतात. ‘पिढय़ान्पिढय़ा जपलेली बौद्धिक कुशलता’ कशी संगणकप्रसाराला कारण ठरली याबद्दल गौरव करून ते ब्राह्मणी ज्ञानव्यवस्थेचे समर्थन करतात. अगदी या पुस्तकात प्रबोधनाचे मोठे प्रकरण असूनदेखील व धर्मावर विज्ञानाने केलेली मात वर्णिली असूनही!
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी या पुस्तकाचा मराठीत केलेला अनुवाद सरस आहे.
‘नवा गुटेनबर्ग’
मूळ इंग्रजी- जयराज साळगावकर/ अमित चटर्जी, अनुवाद- पंढरीनाथ सावंत,
परममित्र प्रकाशन,
पृष्ठे- २३४, मूल्य- ३०० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा