माणसाचं आयुष्य प्रवाही तर असतंच, परंतु ते अनेक धारांनी वाहत असतं. साहित्यिक-कलावंतांना, खरं तर प्रत्येक क्रिएटिव्ह व्यक्तीला, आयुष्याच्या या बहुप्रवाहीपणाची उत्कट जाणीव असते आणि जगण्याच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळणाऱ्या अनेकानेक लहान-मोठय़ा धारांकडे सहृदयतेनं आणि सजगपणे पाहणारी एक अंतर्दृष्टीही या सगळ्यांजवळ असते. विद्या हर्डीकर-सप्रे यांचं ‘मांजरफन’ हे पुस्तक याच अंतर्दृष्टीचा प्रत्यय देणारं आहे.
ललित आणि विनोदी लेखांचा संग्रह असं या पुस्तकाचं ढोबळ स्वरूप आहे. यातल्या लेखांच्या विषयांचं वैविध्य आणि त्या त्या विषयाला अनुसरून असलेली चुरचुरीत किंवा गंभीर लेखनशैली वाचकाला कधी हसवणारी तर कधी त्याचे डोळे भरून आणणारी आहे. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे देशी-विदेशी अनुभवांचा मिश्र गंध. विद्या हर्डीकर-सप्रे गेली अनेक वर्ष
अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. युरोपातल्या काही देशांचा प्रवासही त्यांनी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतलं कोर्ट, विमानतळावरचे कस्टम्सचे नियम, इंग्लंडमधला भवानी तलवारीचा शोध अशा विषयांवर तर त्या लिहित्या झाल्या आहेतच, परंतु त्याच्या बरोबरीनं अस्सल कोकणी मातीतल्या खूप आठवणीही त्यांच्या या लेखनात उमटल्या आहेत.
संवेदनशील मनाची व्यक्ती थोडं स्वास्थ्य मिळालं, की आतल्या-बाहेरच्या विश्वात असोशीनं रमते. विद्या हर्डीकर-सप्रे यांनीही यामुळेच नजरेला दिसणारा, सुखावणारा निसर्ग, हातात आलेलं एखादे पुस्तक, कवयित्री मैत्रीण इथपासून ते देव, भूक, जगण्याची चाकोरी अशा अनेक अमूर्त विषयांनाही स्पर्श केला आहे. या लेखांमध्ये काही किस्से आहेत, काही विचारतरंग आहेत तर काही वर्णनं आहेत. अनुवाद किंवा भाषांतराविषयी लिहिताना त्यांनी रवींद्रनाथ टागोर आणि कवी प्रदीप यांच्या काव्याच्या स्वत: केलेल्या अनुवादाचे दाखलेही दिले आहेत. या दृष्टीनं पाहता हे लेखन एकजिनसी नाही मात्र त्यांनीच वर्णन केलेल्या फुलं-फुलपाखरांसारखं अनेक रंगांचं मिश्रण यात आहे. विद्या हर्डीकर-सप्रे यांची विनोदी लेखनाची शैली ही पु.लंच्या जातकुळीतली आहे. या शैलीत खुसखुशीतपणा आहे, सूक्ष्म निरीक्षणही आहे. परंतु डंख नाही. स्वत:चा साधेपणा हाही त्यांनी विनोदाचा विषय केला आहे आणि पतीसह, मुली-जावई, आई-वडील अशा घरच्या अनेक माणसांच्या स्वभावांची वैशिष्टय़ंही अचूक टिपली आहेत. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांमध्ये अनेकदा आढळणारी अलिप्तता या पुस्तकाच्या लेखनात कुठेही आढळत नाही. कोकणात रुजलेल्या मुलांविषयीची असोशी जशी या लेखनात सापडते, तशी इथल्या मैत्रिणी, नातेवाईक, भारतातली निरनिराळी ठिकाणे आणि इथली जीवनशैली यांच्या विषयीचा जिव्हाळाही अनेक लेखांमधून डोकावतो. मराठी कवितेविषयीचं त्यांचं प्रेम या लेखनातून अधोरेखित होतं आणि मराठी गृहिणीची संसाराविषयीची, सांसारिक गोष्टींविषयीची हौसही स्पष्ट होते.
या पुस्तकाचं खासपण असं, की यातली भाषा आंग्लाळलेली मराठी तर नाहीच, उलट अनेक विस्मरणात गेलेले आणि काही नवे मराठी शब्दही त्यात मराठीला दिले आहेत. अंगुष्टान, वासरी, यांसारखे शब्द आताच्या नव्याच काय पण मधल्या वयाच्या पिढीलाही आठवणार नाहीत. विद्या हर्डीकर यांनी त्यांचा नेमका वापर केला आहे. नेटाक्षरी (ब्लॉग), आडगोंधळ, लेकथा असे काही शब्द त्यांनी स्वत: निर्माण केले आहेत असं दिसतं.
सगळंच लेखन शाश्वताचा टिळा घेऊन जन्माला येत नाही. थोडा मोकळा वेळ मिळाला की काही वाचावं, तेवढय़ापुरता आनंद घ्यावा आणि पुढच्या कामाला लागावं असंही काही साहित्य असतं. ‘मांजरफन’ हे असा आनंद देणारं पुस्तक आहे.
‘मांजरफन’- विद्या हर्डीकर-सप्रे,
ग्रंथाली प्रकाशन,
पृष्ठे- १६०, मूल्य- २०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षां गजेंद्रगडकर

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book by vidya hardikar sapre
Show comments