माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता ‘अरुण वाचनमाला’ ही आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व शंकर केशव कानेटकर यांनी संपादित केलेली क्रमिक पुस्तकांची मालिका १९३४ साली प्रकाशित झाली होती. तिचे पुन:प्रकाशन डिंपल पब्लिकेशनतर्फे आज मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने या वाचनमालेच्या संपादकद्वयांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..
प्राथमिक शाळेतील पहिल्या चार इयत्ता पूर्ण झाल्यानंतर मुलांची भाषा विषयात पुष्कळशी प्रगती झालेली असते. कोणत्याही सामान्य विषयांवर थोडेबहुत विचार भाषणातून किंवा लेखनातून सुसंगतपणे प्रकट करण्याइतका त्यांचा शब्दसंग्रहही विविध व व्यापक झालेला असतो. वाक्यांची रचना व शब्दांचे स्वरूप समजण्याइतकी व्याकरणाची माहिती त्यांना असते. वाचनाच्या क्रियेतील प्राथमिक अडचणी या वेळी पुष्कळच नाहीशा झालेल्या असल्याने मनात किंवा मोठय़ाने बऱ्याच अस्खलितपणे त्यांना वाचता येऊ लागते आणि त्यामुळे वाचनाची अभिलाषा व आवड या वेळी त्यांच्या मनात उत्पन्न होते, म्हणून अनुरूप वाचनखाद्य मिळण्यासाठी ती अत्यंत आतुर झालेली असतात.
तथापि, भाषेच्या कलात्मक स्वरूपाशी त्यांची अद्यापि ओळख झालेली नसते. लेखन ही एक कला असून निरनिराळ्या विषयांवरील विचार व भावना प्रकट करण्याचे निरनिराळे प्रकार व पद्धती असू शकतात आणि इतर कलावंतांप्रमाणे लेखकही आपल्या कृतीत सौंदर्य उत्पन्न करू शकतो, याची विद्यार्थ्यांना या अवस्थेत फारशी कल्पना नसते. एकच अर्थ अनेक रीतींनी व्यक्त करण्यासाठी किंवा विचारांच्या अत्यंत सूक्ष्म छटा वठविण्यासाठी शब्दांची योजना कशी करता येते; क्रिया, आकार, रंग किंवा ध्वनी यांचा बोध विशिष्ट शब्दांनीच कसा होतो; मनात दडून बसलेली अनुभवाची व संस्कारांची निरनिराळी अस्पष्ट रेखाचित्रे शब्दांच्या साहाय्याने कशी सचेतन करता येतात; त्याचप्रमाणे शब्दालंकारांच्या व अर्थालंकारांच्या योगाने भाषा डौलदार, गोंडस व शोभिवंत कशी दिसू लागते; सर्व लेखकांची भाषापद्धती ठरावीक प्रकारची किंवा एकसारखी नसून प्रत्येक उत्तम लेखकाचे लिहिण्याचे वळण, शैली किंवा घाट निरनिराळा कसा असतो व त्या त्या लेखकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या लिखाणात कसे प्रतिबिंबित झालेले असते; विशिष्ट विषयावरील विचार प्रकट करण्यासाठी विशेष तऱ्हेचे किंवा पारिभाषिक शब्द कसे योजावे लागतात, इत्यादी अनेक भाषाविषयक व साहित्यविषयक खुब्या व रहस्ये इंग्रजी पहिल्या इयत्तेत पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांना अवगत असणे शक्यच नसते. तसेच प्राचीन व अर्वाचीन काळी स्वभाषेत निर्माण झालेल्या अभिजात व उत्तमोत्तम वाङ्मयाशी व निरनिराळ्या श्रेष्ठ ग्रंथकारांच्या व प्रतिभाशाली कवींच्या निवडक कृतींशी त्यांचा परिचय झालेला नसतो. या सर्व दृष्टींनी विचार केला म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली वाचनाची चटक उत्तरोत्तर वाढवीत जाणे व स्वतंत्रपणे वाचनव्यवसाय करण्याइतके सामर्थ्य व आकलनशक्तीत्यांच्यात निर्माण करणे, कलात्मक व वाङ्मयात्मक दृष्टीने भाषेकडे पाहण्याची त्यांना सवय लावणे, मातृभाषेतील प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयाबद्दल त्यांच्या मनात आदर व अभिमान उत्पन्न करणे, हे दुय्यम शाळेतील भाषाशिक्षणाचे प्रधान हेतू आहेत, हे स्पष्ट आहे. हे हेतू पुढे ठेवूनच ‘अरुण वाचना’च्या पाच पुस्तकांची संगतवार व क्रमवार रचना केलेली आहे.
भाषा विषयापुरताच विचार केला तर विद्यार्थ्यांच्या उपजत प्रवृत्तींना अनिष्ट वळण लागू नये म्हणून त्यांचे शुद्धीकरण करण्यासारखे सामर्थ्यवान, आकर्षक व चतन्ययुक्त वाङ्मय त्यांच्यापुढे ठेवणे या वेळी अवश्य आहे. तसेच या वयात उदित होणारी लैंगिक प्रवृत्ती विशुद्ध व उदात्त करण्यासाठी चित्र, नाटय़, संगीत, काव्य इत्यादी ललितकलांशी विद्यार्थ्यांचा परिचय करून देऊन त्यांची सौंदर्यदृष्टी निर्मळ व निरागस करणे हेही एक महत्त्वाचे कार्य भाषाशिक्षकाला साधावयाचे असते. यावरून भाषा विषय शिकविताना कलात्मक व वाङ्मयात्मक दृष्टी का बाळगायला पाहिजे, हे आता स्पष्ट होईल.
गेल्या पन्नास वर्षांत मराठी साहित्याची सर्वागीण वाढ झालेली असून अनेक नामवंत गद्यलेखकांनी व कवींनी वाङ्मयाच्या निरनिराळ्या दालनांत अत्यंत मोलाची भर घातलेली आहे. लेखनाच्या पद्धती व तंत्रे यांमध्येही आमूलाग्र फरक झालेला आहे. लेखनगुण मोजण्याची मापनेही बदललेली आहेत. जागतिक व राष्ट्रीय राजकारणाची झळ वाङ्मयाला चांगलीच लागलेली आहे. जीवनाकडे बघण्याचे तत्त्वज्ञानही बदलत चालल्याने, त्या अनुषंगाने वाङ्मयाचे बाह्य़ व आंतरस्वरूपही आता पुष्कळच बदलले आहे. या संक्रमणकाळातील निरनिराळ्या प्रकारच्या वाङ्मयांचा व भविष्यकालीन वाङ्मय प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, तर ‘शिक्षणाची व जीवनाची सांगड घालावयाला पाहिजे’ या शिक्षणशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या तत्त्वाशी द्रोह केल्यासारखे होणार आहे! मात्र त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावयाला पाहिजे, की ज्या प्राचीन वाङ्मयाच्या बळकट पायावर आजच्या मराठी भाषेची व साहित्याची इमारत उभारलेली आहे, त्या गतकालीन अभिजात वाङ्मयाशी विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला नाही, तर पूर्वजांनी आपल्यावर केलेल्या अपरिमित भाषाऋणांतून आपण केव्हाही मुक्त होणार नाही.
ज्ञान हेच केवळ शिक्षणाचे अंतिम साध्य आहे, असे समजून विद्यार्थ्यांना निभ्रेळ ज्ञानदान देत सुटणे हा भाषाशिक्षणाचा हेतू नव्हे. पुष्कळशा जुन्या वाचनपुस्तकांची रचना या एकांगी दृष्टीने झाल्यामुळे त्यांना एखाद्या विविध ज्ञानसंग्रहाचे रूक्ष, निरस व भारूड स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. शिक्षकावर अवलंबून राहण्याची विद्यार्थ्यांची परधार्जिणी प्रवृत्ती नाहीशी करून अभ्यासाच्या कामी त्यांना स्वावलंबी करणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. या दृष्टीने विचार केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेच सर्व शालेय पुस्तकांची रचना व्हावयाला पाहिजे, ही गोष्ट अगदी उघड आहे. विद्यार्थ्यांच्या सहजप्रवृत्ती, त्यांच्या विशिष्ट वयातील आवडीनिवडी व भावना आणि आकांक्षा या लक्षात घेऊन वाचनपुस्तकांची रचना केली तरच ती विद्यार्थ्यांवर मोहिनी घालू शकतील.
ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास, मोरोपंत, रघुनाथ पंडित या प्राचीन कवींपासून तो आधुनिक काळात होऊन गेलेल्या केशवसुत, चंद्रशेखर, दत्त, लेंभे, माधवानुज, रे. टिळक, गोविंदाग्रज, रेंदाळकर, ठोंबरे, हिंगणेकर या कवींपर्यंत सर्व कवींच्या, एवढेच नव्हे तर विद्यमान काळी प्रसिद्ध असलेल्या तांबे, बी, माधव जूलियन, यशवंत, गिरीश, अनिल, अज्ञातवासी, गोपीनाथ, ठोकळ, पाटील इत्यादी प्रतिभाशाली कवींच्याही उत्कृष्ट काव्यकृतींची निवड ‘अरुण वाचनां’त केलेली आहे. गद्यलेखकांत विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, शिवराम महादेव परांजपे, अच्युत बळवंत कोल्हटकर, विनायक दामोदर सावरकर, दत्तो वामन पोतदार असे तेजस्वी निबंधकार; किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, गडकरी, वरेरकर, अत्रे हे नाटककार; हरि नारायण आपटे, खांडेकर, यशवंत गोपाळ जोशी, कुमार रघुवीर यांच्यासारखे कादंबरीकार व लघुकथाकार; प्रो. फडके, प्रो. दांडेकर, श्री. अनंत काणेकर यांच्या दर्जाचे लघुनिबंधकार, अशा उत्तमोत्तम लेखकांच्या उत्कृष्ट लेखनशैलीचे नमुने या वाचनपुस्तकांत दिलेले आहेत. त्यामुळे ही पाच वाचनपुस्तके प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयाचे प्रतिनिधित्व उत्तम तऱ्हेने पटवतील अशाच तोलामोलाची झालेली आहेत.
विद्यार्थ्यांचे भाषाविषयक व साहित्यविषयक प्रेम वृद्धिंगत व्हावे व त्यांना त्याबद्दल वाढता उत्साह वाटत राहावा म्हणून भाषाशिक्षकांनी पुढील गोष्टींकडे लक्ष पुरवावे..
१. प्रत्येक वर्गाचे मासिक किंवा नियतकालिक असावे, म्हणजे त्या त्या वर्गातील कल्पक लेखकांना, कवींना व चित्रकारांना उत्तेजन मिळेल. २. नाटय़प्रयोग करण्यासाठी प्रत्येक वर्गाचे एक मंडळ असावे. या मंडळाने अधूनमधून या वाचनपुस्तकांतील किंवा इतर नाटकातील योग्य ते नाटय़प्रवेश वर्गापुढे करून दाखवावेत. ३. प्रत्येक वर्गाचे एक व्याख्यानमंडळ वा चर्चामंडळ असावे. या मंडळाच्या बठकींतून निरनिराळ्या मनोरंजक विषयांची चर्चा व्हावी. ४. वाङ्मयातील चांगल्या चांगल्या कृती जाहीर रीतीने वाचून दाखविण्यासाठी किंवा उत्तम उत्तम कवितांचे गायन करण्यासाठी प्रत्येक वर्गाचे एखादे मंडळ असावे. ५. वेळोवेळी आढळून येणारे गद्याचे व पद्याचे उत्तम नमुने विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत छानदार अक्षरांत उतरून ठेवावेत. ६. दिवंगत झालेल्या प्राचीन किंवा अर्वाचीन साहित्यसेवकांचे ‘स्मृतिदिन’ वर्गात किंवा शाळेत पाळण्यात यावेत. ७. प्राचीन किंवा अर्वाचीन साहित्यसेवकांचे फोटो, हस्ताक्षरे किंवा इतर महत्त्वाच्या आठवणीच्या वस्तू जमवण्यात येऊन त्यांचे एखादे ‘वस्तुसंग्रहालय’ बनविण्यात यावे. ८. निरनिराळ्या सुप्रसिद्ध मासिकांचे व नियतकालिकांचे जुने व नवे अंक विद्यार्थ्यांना मिळण्याची सोय व्हावी. असो.