नव्या सहस्रकाच्या उदयाबरोबरच समोर आलेल्या निवडक समर्थ कवींमधील एक नाव म्हणजे- अशोक कोतवाल! ‘मौनातली पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’ आणि आता ‘नुसताच गलबला’ या कविता संग्रहांमधून कालभान देणारा हा कवी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जागतिकीकरण, संगणकीकरण, मार्केटिकरण यांच्या एका गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सध्या जग वेगाने फिरत आहे. या भोवऱ्यात माणूसपण मूल्य, संस्कृती, भाषा हे सगळं नाहीसे होत एकच एक बाजारमूल्य सर्वावर लादलं जातंय. माणसांच्या जीवनातली विविधरंगी विशिष्टता नष्ट होऊन सपाटीकरण सुरू आहे. या भोवऱ्यातच ‘स्टाइलचं आणखी एक इंद्रिय उगवलेली मुलं’ जन्माला आली आहेत, जी विचारतायत- ‘तुमच्या देशात अजूनही उगवतो का हो आस्थेचा चंद्र?’ आजच्या वर्तमानातलं, जीवनाच्या सर्वच पैलूंमधून अंगावर येणारं विदारक वास्तव अशोक कोतवाल यांच्या कवितेतून प्रकट झालंय.
या वास्तवाविषयी सामान्य माणसाच्या मनात उगवलेलं भय कोतवालांच्या कवितेतून उतरलं आहे-
‘मग तो नसतो कुणी
ते असतात सगळे
एकमेकांच्या जीवावर उठलेले’
अशा शब्दांत माणसांना परस्परांविषयी वाटणारा जिव्हाळा, विश्वास, लोप पावून परस्परांच्या नाशाला प्रवृत्त करणारी, माणसांना असुरक्षित करणारी भावना मांडली आहे.
माणूस म्हणून असलेली स्वत:ची ओळख हरवून माणसांना कार्पोरेट जगाचे गुलाम म्हणून जगणं आवडायला लागलं आहे. त्यांनी स्वत:ला जणू ‘विकाऊ चीज’ म्हणून घोषितच केलं आहे. ‘कार्पोरेटची मानसिक उचलेगिरी’ या कवितेत कोतवाल लिहितात-
‘लो मार्जिन हाय प्रॉफिटच्या जमान्यात
तुमची भूक तरी तुमची आहे का
कसे होता एवढे सेलेबल भौ’
वर्तमानात संवेदनशील माणसाला एकांतात आणि कोलाहलातही ‘चिमटय़ा’ घेणाऱ्या अनेक गोष्टी विखुरल्या आहेत. कोतवालांसारख्या कवीला त्या गोष्टी टोचतात, बोचतात, शरमवून टाकतात, उद्वेग आणतात, चीड आणतात, हताश, निराश करतात. कोतवालांच्या कवितेत हे सगळंच भोवतालाला दिलेल्या काव्यात्म प्रतिक्रियांमधून उमलत गेलं आहे.
भोवती प्रचंड कोलाहल माजला आहे. एकापेक्षा एक गंभीर प्रश्नांनी माणसांची आयुष्य घेरली गेली आहेत. त्या सगळ्याचा एक ‘गलबला’ निर्माण झाला आहे. पण हा गलबला ‘नुसताच’ आहे; त्यातून माणसांच्या जीवनाला अर्थ देणारं, आनंद देणारं, शांतता निर्माण करणारं काहीही नाही, असंच कवीला सुचवायचं आहे. आणि आम्ही नुसतेच हा गलबला बघत बसलोय, जणू आमचा त्याच्याशी काही धागादोराच नाही. अशा बघ्यांना ‘आडोसे’ या कवितेत कोतवाल इशारा देतात-
‘सर्व बाजूंनी बघण्यासारखं
खूप काही वाढत जात असताना
आणखी किती दिवस बनवाल स्वत:ला
गडे हो, आडोसे शिल्लक राहतीलच
असे नाही..’
ही कविता तंत्रज्ञानाच्या वाढत्या भस्मासुराविषयी बोलते. माणसामाणसांमधील नाती, संवाद, ओलावा यांची जागा आता मोबाइलनं, समाज माध्यमांनी घेतली आहे. माणसांना तर ‘मोबेलिया’ नावाचा रोग झालाय, असे कोतवाल म्हणतात. ‘मोबेलिया’ या कवितेत ते म्हणतात-
‘तो मोबाइल आहे एक निर्जीव यंत्र
हेच विसरत चाललोय मी..’
मोबाइल, मॉल संस्कृती, बाटलीबंद पाणी यांवर कोतवाल मर्मभेदी भाष्य करतात-
‘पाणी निघून गेलंय धरतीतून
आकाशातून अन् माणसांतूनसुद्धा
ही काही चांगली गोष्ट नाही’
अशा शब्दांत या सर्वव्यापी ‘तल्लखी’चे ते दर्शन घडवतात. ‘पहिला शब्द पाणी’ या कवितेत त्यांनी लिहिलं आहे-
‘कधी काळी नदी, नाला, ओहळ, झरा
तळे अथवा विहीर होता हा शब्द
परवा तर चक्क ‘टँकर’ होऊन आला तो
अन् झोंबला कॉलनीतल्या लोकांशी’
परिस्थितीची विपरीतता या टोकाला गेली आहे, की त्याविरुद्ध आवाज उठवणारेही त्या विषयी गंभीर वाटत नाहीत. तेही माध्यमशरण झाले आहेत. कोतवाल लिहितात,
‘एखाद्या अनुचित कृत्यानं
कुणाच्याही डोळ्यात जहर उतरून येईल
असं खरंच काही उरलंय का येथील हवेत’
‘छन्न वाजत नाही आपली नीती’ ही या सर्व कवितांच्या गाभ्याशी असलेली खंत आहे.
वस्तूंप्रमाणेच माणसांच्या बाबतीतही ‘यूज अॅण्ड थ्रो’ हीच मानसिकता समाजात रुजत चाललेली आहे, ही बाब निदर्शनाला आणताना ‘कपडे’ या कवितेत कोतवाल लिहून जातात-
‘काय झालंय कळत नाही
कपडे माणसांना निवडतायत
की माणसं कपडय़ांना’
माणसांचे हे वस्तुकरण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरलेलं दिसतं. अगदी कवीही त्याला अपवाद नाही. मुळात कवीला समाजात किती किंमत राहिली आहे, असा प्रश्नच आहे. काही अंशी कवीही त्यास जबाबदार आहेत का? असा प्रश्न कवीला छळतो. ते लिहितात-
‘स्वत:ला कवी म्हणवणाऱ्यांनो
तुमच्या अस्त्रातलं सत्त्व
निपटून काढतायत माध्यमं’
इथे माध्यमं ही आजच्या प्रचलित व्यवस्थेचं रूप धारण करतात. पण तरीही, कवीच्या सामर्थ्यांवर त्यांचा विश्वास आहे. ‘नका जाऊ कवीच्या कोमलपणावर हरदम’ अशा पद्धतीने तो विश्वास व्यक्त होतो. वर्तमान भीषण असलं तरी भविष्याविषयी कोतवाल आशावादी आहेत-
‘काही तरी असेलच ना मूलभूत
जे बदलू शकेल वर्तमानात’
ही सकारात्मकता माणसांतील माणुसकी अजून तग धरून आहे याची ग्वाही देणारी आहे.
‘नुसताच गलबला’- अशोक कोतवाल,
पद्मगंधा प्रकाशन,
पृष्ठे- १३६, मूल्य- १५० रुपये.