आजवर घर व घराण्याच्या प्रतिष्ठेच्या बुरख्यात अडकलेली आणि सुधारणावादी चळवळींपासून दूर राहिलेली मराठा स्त्री बहुसंख्येने आज रस्त्यावर उतरली आहे आणि समाजावरील अन्यायाबाबत जाब विचारते आहे, हे आशादायी चित्र आहे. मात्र, महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळींच्या वाऱ्याचा कुठचाही झोत मराठा स्त्रीपर्यंत आजतागायत पोहोचू शकलेला नाही. घरादाराची पत, इभ्रत जपण्याचा आटापिटा करणाऱ्या तिला उंबऱ्याबाहेर पडून आपल्या वाटय़ाला आलेली कुचंबणा, चार भिंतीआतली दडपणूक यांविषयी दाद मागण्याचा कुठलाच अवकाश मिळाला नाही. या जनआंदोलनामुळे तिला आज जो आवाज मिळाला आहे त्यातून ती स्वत:वरील अन्याय व शोषणाच्या विरोधातही आता आवाज उठवेल का?

मोठाल्या काठाची भरजरी साडी, गळाभर पाचपदरी हार, मोहनमाळ आणि गच्च पदर ओढलेल्या कपाळावर ठसठशीत कुंकू.. अशी काहीशी मराठा स्त्रीची जनमानसात रूढ असलेली प्रतिमा. हे अंशत: खरं असलं तरी उथळ टीव्ही मालिकांनी तिला आणखीनच अतिशयोक्त बनवून घराघरांत पोहोचवलं. प्रत्यक्षात ही प्रतिमा मूठभर जमीनदार-बागायतदार घरांतल्या खानदानीपणाचा आविष्कार दर्शवणारी आहे. उरलेली बहुसंख्य मराठा स्त्री मात्र या प्रतिमेपासून बरीच दूर आहे. ती पदर खोचून घरच्या तुटपुंज्या शेतीत राबते.. गाईगुरांचं दूध, शेण काढते. ती शेतमजूर आहे. तशीच शेतातला भाजीपाला बाजारात विकायलाही ती बसते. शहरांमध्ये तर ती घरकामगारही आहे. खानावळी चालवणारी आहे. तुटपुंज्या पगाराची लहानसहान कामं करत, नोकरीतून एक-एक पसा जोडत ती संसार रेटते आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

बहुतांशी मराठा स्त्रियांचं आजघडीचं हे एकंदर वर्तमान असंख्य प्रश्नांनी व्यापून राहिलेलं आहे. शिक्षण व रोजगाराबरोबरच आíथक स्तरावर इतरही अनेक समस्या तिची दमणूक करताहेत. नेमका हाच हतबल, अस्वस्थ आक्रोश मराठा जनआंदोलनात आज मराठा तरुणींच्या अमोघ सहभागातून ऐकू येतोय. एका अर्थी तो या आíथकदृष्टय़ा हर पावलावर नाडल्या जाणारींचा प्रातिनिधिक संताप आहे. स्वयंत्स्फूर्तपणे आंदोलनाची वाट चालत असलेल्या या तरुणींपकी अनेक जणी अशा आíथक ओढाताण सोसणाऱ्या कुटुंबांशी नातं सांगणाऱ्या आहेत.

आजपावेतो प्रतिष्ठेच्या बुरख्यातच अडकलेली आणि चळवळी व उठावांपासून दूरच राहिलेली मराठा स्त्री बहुसंख्येने आज रस्त्यावर उतरून आपल्यावरील अन्यायाबाबत जाब विचारतेय, हे काहीसं नवलाचंच आहे. बलात्कारींना फाशीची मागणी, महिला सुरक्षा आणि मराठा आरक्षण या तीन कोनांमधून गडद होत चाललेल्या या जनआंदोलनात कधी नव्हे ते ती आपल्या बांधवांच्या सुरांशी एकमेळ साधत आक्रमक बनत आहे, हेदेखील आशादायी म्हणता येईल. पण यात एक गोष्ट अस्वस्थ करते आहे. ती म्हणजे- या आंदोलनात वरकरणी ती मांडत असलेल्या काही मोजक्या आणि दृश्य प्रश्नांच्या तळालगत बलात्कारवगळता बाई म्हणूनचे इतर जे अनेक धूसर पेच तिच्या अस्तित्वाला लगडून आहेत त्यांचा कुठच्याही स्वरूपातला उच्चार ती अजून करताना दिसत नाहीए. एकोणिसावं शतक पार होता होता ज्या काही सुधारणावादी आणि पुरोगामी चेहरामोहरा असलेल्या चळवळी गतिमान झाल्या, त्या एकतर ब्राह्मणी स्त्रीच्या जगण्याचे तिढे ठळक करणाऱ्या होत्या अथवा दलित स्त्रीचं दमन त्वेषानं मांडणाऱ्या होत्या. त्या अनुषंगाने या दोन्ही स्तरावरच्या स्त्रियांना घराबाहेर पडून आपलं म्हणणं मांडण्याचा विस्तृत अवकाश प्राप्त झाला. परंतु या सर्व सुधारणावादी वाऱ्याचा कुठचाही झोत मराठा स्त्रीपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी जातीय संघर्षांपासून भिन्न अशा सुधारणावादी चळवळीपासून अलिप्त असणारी ती घराण्यातला गोषा आणि घरोबा राखण्यातच मग्न राहिली. त्याबरोबरच जातीय अस्मितेला, प्रतिष्ठेला बळकटी देण्यातच धन्यताही मानत राहिली. घरादाराची पत, इभ्रत आणि घरंदाजपणा जपण्याचा आटापिटा करणाऱ्या तिला उंबऱ्याबाहेर पडून आपल्या वाटय़ाला आलेली कुचंबणा, चार भिंतीआतली दडपणूक यांविषयी दाद मागण्याचा कुठलाच अवकाश मिळाला नाही. यामुळे घरात व घराबाहेर वावरत असणारी आणि तिच्याभोवतीच्या एकूण एक काचांना मान्यता देणारी पुरुषसत्ताक व्यवस्था तिने कधीही प्रश्नांकित केली नाही. या प्रस्थापित व्यवस्थेतूनच तिचं जगणं सीमित केलं गेलंय/ जातंय आणि नीतिनियमांच्या कित्येक रूढ बंधनांत तिला अडकवलं गेलंय/ जातंय, हे आत्मभान जागवणाऱ्या विचारापासून त्यामुळेच ती अजूनही अंतरावरच उभी आहे. आणि बहुसंख्य असूनही प्रागतिक मार्गावर तुलनेने तिची काहीशी पीछेहाट होत राहिली, याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं हे एक मूलभूत कारण म्हणता येईल. सध्याच्या मराठा जनआंदोलनातील मराठा तरुणींचा लक्षणीय नि कृतिशील सहभाग लक्षात घेता या धर्तीवर त्यांच्याकडून काही ठोस भूमिका घेतली जाणं खरं तर अपेक्षित आहे. तसेच बलात्काराशिवाय मराठा स्त्रीवरच्या इतर अन्यायी कोपऱ्यांबाबतही त्यांनी सजग होऊन आवाज उठवणं या घडीला आवश्यक बनलेलं आहे. तुलनेने बलात्कार हा सगळ्यात खालच्या पायरीवरचा हिणकस अत्याचार आहेच; पण तो काही बाईवरचा एकमेव अत्याचार नाही. त्याखेरीज बाईचं जगण जिकिरीचं बनवणारे, तिला माणूसपण नाकारणारे, रूढी-परंपरांनी लादलेले इतर अगणित काच वर्षांनुवष्रे तिच्या अस्तित्वाभोवती दबा धरून आहेत. यातले काही काच निव्वळ बाईपणाचे आहेत, तर काही ‘मराठा बाई’ म्हणून तिच्या वाटय़ाला आलेले आहेत. मराठा समाजाचं आजचं वास्तव पाहता एक जाणवतं, ते म्हणजे- या समाजात सगळंच बदललं आहे असं खचितच नाही, पण काहीच बदललेलं नाही असंही नाही. त्यामुळे या घटकेला अनेक कुटुंबांमधून दिसणारं नऊवारीतील आजी, सहावारीतील आई, चुडीदारमधली सून आणि जीन्समधली मुलगी हे चित्र काळाचं एक प्रवाही स्थित्यंतर सूचित करतं. पण पुढे जाऊन याच घरातली एखादी तरुण विधवा नणंद- जिला पुनर्वविाहाचा हक्क नाही- या चित्राला कित्येक काळ मागे लोटत राहते, हे कसं समजून घेणार? आजही गावागावांत अनेक तरुण विधवा भकास नजरेनं जगणं रेटत आहेत. कुटुंब नि जातीच्या प्रतिष्ठेचं जोखड त्यांच्या मानेवर गच्च आवळलेलं आहे याचा परिपाक म्हणून, तसेच याच जोखडापायी उच्चशिक्षित, कमावती असूनही अनेकींना त्यांच्या इच्छेनं जोडीदार- निवडीची, जातीबाहेर लग्न करण्याची मुभा नाही. उरलेल्यांसाठी मग वेगळी परिस्थिती कशी असेल? ‘आमच्या सुना नोकरी करत नाहीत!’ अशा खानदानी धारणांखाली कित्येकींना शिकूनसवरूनही चार चौकटीतल्या रीतीभातींमध्येच अडकून पडावं लागतं. भरभक्कम हुंडा देण्या-घेण्याचं, थाटात लग्नसोहळे पार पाडण्याचं दिमाखदारी प्रस्थ, पत राखण्यासाठी मुलीचा बाप म्हणून पुरुषांनाही या सगळ्याचा झेलावा लागणारा ताण, हुंडय़ापायी विवाहितांना घरीदारी सोसावा लागणारा छळ हा गुंता दिवसेंदिवस जातीय अस्मितांचे तट दृढ होत चाललेल्या आजच्या काळात अधिकच किचकट बनत आहे. धार्मिक कर्मकांडे आणि अंधश्रद्धांच्या जंजाळातही मराठा बाई विलक्षण गुरफटलेली दिसते. जमीन आणि मालमत्तेत बाईला कायद्यानं देऊ केलेला वारसा हक्क आणि पतीच्या संपत्तीतला वाटा याबाबत सोयीस्कर मौन मराठा समाज राखून आहे. इतर समाजांनीही तेच धोरण अवलंबलेलं आहे. शेवटी बाईच्या दमनाच्या मार्गावर सगळ्याच समाजांचं निर्वविाद एकमत झालेलं आहे ते अगदी पूर्वापार. कधी संस्कृती व संस्कारांचा मुलामा देत, तर कधी रूढी-परंपरांची कोलितं मिरवत बाईला जी उपरेपणाची वागणूक सर्वच जातस्तरांवर कायम मिळत राहिलीय, पुरुषांच्या तुलनेत तिच्या मन व शरीराच्या संवेदनांची हरतऱ्हेनं गळचेपी होत आलीय, या सगळ्याचा अंशत: तरी विचार या आंदोलनातून केला जाणार आहे का, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आणावासा वाटतो. शिक्षण व नोकरीतल्या आरक्षणावरून जे वादंग आज उसळलेलं आहे त्याला भविष्यात यश मिळेलही कदाचित; पण याचा थेट लाभ किती मराठा मुलींना खरोखर मिळू शकणार आहे? शाळा संपता संपताच त्यांचे हात पिवळे करून देण्याची लगीनघाई यातून मिटणार का? (तिचं कोणा परजातीच्या मुलाशी चुकून सूत जुळू नये, या चिंतेने बऱ्याचदा) शिक्षण नि अर्थार्जनासाठी उंबरा ओलांडण्याची संधी प्रत्येकीला मिळणार का? आणि घरातल्या प्रमुख निर्णयांमध्ये तिला मत असणार का? असे काही तळातले प्रश्नही उरतातच.

बाईची ही जी सनातन दुखणी आहेत ती निपटून काढायची, हलकी करायची, तर तिच्याभोवतीच्या रूढ चाकोऱ्या सलावल्या गेल्या पाहिजेत. प्रतिगामी श्रद्धांचे जुनाट साचे वर्तमानाच्या संदर्भात नव्याने घडवायला पाहिजेत. त्यासाठी हवं असणारं एक हक्काचं विचारपीठ या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा तरुणींना विनासायास उपलब्ध झालेलं आहे. तशातच ताराबाई शिंदेंच्या निर्भीड, परखड मांडणीचा मूर्त वारसाही त्यांना जातभगिनी म्हणून लाभलेला आहेच. गरज आहे ती या वळणावर त्यांनी काहीसं आग्रही आणि बरंचसं चिकित्सक बनण्याची! आपण मानत व पाळत असलेल्या रूढी-परंपरा समकालाशी किती सुसंगत, नेमक्या कुठल्या अर्थी विसंगत आणि खरंच कालबाहय़ आहेत का, याचं अंतर्मुख होत खोलातून विवेचन करत राहण्याची! यासाठी या परंपरेच्या साखळ्या रोजच्या व्यवहारातून पुरत्या हद्दपार न करताही जगणं सुसह्य़ करायचं, तर आपल्या ‘आज’शी त्यांना कसं जोडून घेता येईल, हा विचार आजच्या पिढीचा मुख्य अजेंडा बनायला हवा. त्यातूनच परंपरेला जोखत राहणं, तिला मूलगामी प्रश्न विचारता येणं आणि झापडबंद मानसिकतेतून बाहेर पडणं त्यांना शक्य होणार आहे. यासाठीचा समजूतदार संवाद या आंदोलनाच्या विचारमंचावर मराठा तरुणींनी सोबतच्या बांधवांशी साधायला हवा. अखेर तेदेखील संस्कृतीचे, रूढीबद्ध प्रतिमांचे बळी आहेतच. संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली बाईचा श्वास गुदमरतोय, तिचा कोंडमारा होतोय हे त्यांना समजून सांगावं लागेल. बाईचं माणूसपण हिरावून घेणारी संस्कृती कवटाळून बसण्यातला फोलपणा त्यांच्या नजरेला आणून द्यावा लागेल. आणि तोही कुठलाही आततायी सूर टाळूनच. मुळात आता बहुतेकींच्या गळ्यातल्या मोहनमाळा आणि हातातल्या पाटल्या कधीच गळून पडल्या आहेत. मागे उरलाय तो निव्वळ चिरेबंदी जात्याभिमान. पण जातीचा, संस्कृतीचा अभिमान बाळगायचा तर त्याचेही आजच्या काळातले निकष तपासावे लागतील. जुने निकष नव्याने घडवावे लागतील. अन्यथा जातीय अस्मितांचं नि पर्यायाने पुरुषी वर्चस्वाचं राजकारण करणारा जात्याभिमान फक्त जाती-जातींमधील विद्वेषाचं, संघर्षांचं रण भडकवत राहील आणि त्याची धग सोसावी लागेल ती सर्वच जातसमाजांच्या अस्मितेची वाहक असलेल्या बाईच्या जातीलाच. कारण ‘बाई’ ही कोटी हाताशी धरत जात-धर्मीय राजकारणाचे फड गाजवत राहण्याचा इतिहास अवघ्या जगभरात फार जुना आहे. तसंही बाईचं जगणं गोठवून ठेवत कोणत्याही जात-धर्माला आजवर इच्छित समाजक्रांती साधता आलेली नाही, हा मुस्लीम मूलतत्त्ववादातून मिळणारा धडा याक्षणी सर्वच समाजांनी नीट लक्षात घ्यायला हवा.

कोपर्डी घटनेच्या धर्तीवर बलात्काराच्या व त्या अनुषंगाने आपल्या लेकीबाळींच्या सुरक्षेबाबत मराठा समाजमन टोकाचं संवेदनशील व आक्रमक बनलंय. हे सारं आक्रमक आविष्करण याच लेकीबाळींच्या जगण्यातल्या इतर पेचांची सोडवणूक करण्याकडेही कसे वळवता येईल, त्या प्रश्नांची उमज नि समज त्यांच्यामध्ये कशी उतरवता येईल, या विचारालाही आता गती मिळायला हवी. कारण या टप्प्यावर या लेकीबाळींना आज पुरुष हा निव्वळ रक्षणकर्त्यांच्या भूमिकेत नकोच आहे. तिच्या हक्काची, न्यायाची भाषा बोलणारा, तिच्यावरील हरेक अन्यायाला उच्चार देऊ बघणारा, तिच्यातलं माणूसपण आकळणारा एक समजूतदार पुरुष तिला भोवताली हवा आहे. मग तो जन्मदाता असेल, जन्मबंधू असेल वा तिचा सहचर.

आज मराठा तरुणींचा आवाज मराठा समूहाचा आवाज बनू पाहतोय, तो आंदोलनाच्या अग्रभागी उमटतोय, हे खूपसं क्रांतिशील म्हणता येईल. फक्त या आवाजात आता दबलेले, दडपलेले इतर आवाजही मिसळायला हवेत. काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिलेले मराठा घरांच्या चौकटीतले बाईपणाचे अनेक अनुच्चारित प्रश्नही ठळक व्हायला हवेत. आणि याची जबाबदारीही त्या अर्थाने आता या मराठा तरुणींवर येऊन पडते. मुख्य म्हणजे सातत्याने आपल्या बांधवांच्या भाषेतच त्या बोलत राहिल्याने एक व्यापक बंधू-भगिनीभाव या आंदोलनाच्या वर्तुळात मूळ धरतो आहे आणि मराठा अस्मितेच्या पुरुषसत्ताकेंद्री राजकारणाला तो पोषकच ठरणारा असला तरी यातून मराठा स्त्रियांच्या प्रश्नांचं गाठोड पुन्हा एकवार परिघावर फेकलं जाईल की काय, अशी शक्यता नाकारता येत नाही. हे टाळायचं तर आणि मराठा स्त्री-प्रश्नाला गाभ्यामध्ये आणायचं तर या तरुणींना बरीच सावध, चिकित्सक आणि निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे.

यातूनच कोपर्डीतल्या निष्पाप मुलीबरोबर इतरही अनेकींवरच्या अन्यायाला सर्वार्थाने न्याय मिळू शकेल. या संघर्षांत मराठा बांधवांची, तरुण नेतृत्वाची त्यांना आश्वासक साथ मिळाली तर मराठा समाजक्रांतीच्या इतिहासाला एक नवं पान जोडलं जाईल. मराठा समाजाला आपल्या उत्थानाकरता आवश्यक असलेलं प्रवाहीपणही यातून निश्चितपणे लाभेल. तथापि इथे गरजेचा आहे तो सोयीस्कर नव्हे, तर एक समंजस, पद्धतशीर सुसंवाद! एकंदरच मराठा समाजाचं या सगळ्याच संदर्भात ‘मेटामोर्फसिस’ होण्याची अनिवार्यता या वळणावर निर्माण झालेली आहे.

शुभांगी गबाले shubhangigabale@rediffmail.com

Story img Loader