‘ऊन उतरणीवरून’ हा अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचा संग्रह सुरेश एजन्सीतर्फे प्रकाशित होत आहे. या संग्रहाला कवयित्री नीरजा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..
अरुणा ढेरे या १९८० च्या दशकात नावारूपाला आलेल्या महत्त्वाच्या कवयित्री. गेली ४० वर्ष सातत्यानं त्या कवितालेखन करताहेत. अरुणा ढेरे यांचा एकूण काव्यप्रवास हा स्वभानाकडून सम्यक् भानाकडे जाणारा आहे. विविध भावभावनांचा मोकळा आविष्कार हे त्यांच्या कवितेचं वैशिष्टय़ आहे. त्यांची कविता ही स्वत:चा शोध घेताना मानवी नात्यांच्या विविध पलूंना स्पर्श करत जाते. मुलगी, मत्रीण, प्रेयसी ते आत्मभान आलेली स्त्री अशा विविध भूमिकांतून ती व्यक्त होते. माणसा-माणसांतील नात्यांचे बंध उलगडत जाते. प्रेमाचे विलोभनीय दर्शन घडवते. क्वचित कधीतरी बाहेरच्या जगातील माणसांकडे डोकावून पाहते. पण ती जास्त रमते ती तिच्या आतल्या जगात. आदिम प्रेरणांचा शोध घेण्याचा ती सतत प्रयत्न करते. सर्जन प्रक्रियेच्या मूळ धारेकडे जाऊन सर्जनाच्या प्रवासाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न करते. याबरोबरच ही कविता विशेषत्त्वानं बोलते ती स्त्रीविषयी, तिच्या जगाविषयी, तिच्या भावभावनांविषयी व तिच्या जगण्याविषयी.
अरुणा ढेरे ज्या काळात लिहायला लागल्या तो काळ चळवळींचा काळ होता. जातीअंताची, वर्गलढय़ाची चळवळ भरात आलेली होती. सामाजिक स्तरावर एक प्रकारची अस्वस्थता भरून राहिलेली होती. या साऱ्याचा प्रभाव त्या काळात लिहिणाऱ्या लेखक-कवींवर पडत होता आणि त्याचे पडसाद साहित्यातून उमटत होते. अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता, स्त्रिया या अशा चळवळींपासून दूरच होत्या. पण १९७५ हे वर्ष महिला वर्ष म्हणून जाहीर झालं आणि भारतीय स्त्रीचा पारंपरिक चेहरा पुसून तिला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू झाला. स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली. या चळवळीत थेट भाग घेणाऱ्या, त्यावर भाष्य करणाऱ्या कार्यकर्त्यां एकीकडे सक्रिय झाल्या होत्या; तर दुसरीकडे आत्मभान आलेल्या स्त्रिया कधी संयत सुरात, तर कधी थोडय़ा आक्रमकपणे साहित्यातून व्यक्त व्हायला लागल्या. अरुणा ढेरे यांच्या लेखनाची सुरुवात याच काळात झाली.
अरुणा ढेरे यांच्या कवितांतून व्यक्त होणारी काही ठळक सूत्रं पाहताना लक्षात येतं, की त्यांना एकूणच सर्जन प्रक्रियेबद्दल विलक्षण कुतूहल आहे. त्या या प्रक्रियेच्या मुळांपर्यंत जाण्याचा आणि निर्मितीचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी तुडवत जातात वाळवंट आणि मलोगणती प्रदेश. या पलीकडच्या प्रदेशात दयाघन कवितेच्या आभाळात नव्या शब्दार्थाचा उदय सापडेल अशी त्यांना आशा वाटते.
हा शोध माणसाला कुठं कुठं घेऊन जातो हे सांगता येत नाही. अनेकदा आपण हरवत जातो, भरकटत जातो. कधी अर्ध्यातच कोसळत जातो. पण तरीही नेटानं चाचपडत राहतो गर्द काळोखाच्या आंधळ्या बोटांनी. पण या कवयित्रीला माहीत आहे, या अशा चाचपडण्यातूनच हाताला लागतो टोकदार शब्द आणि उजळून उठतात जगण्याच्या साऱ्या शक्यता-
‘संज्ञेच्या पलतटाला घनगर्द तमाची राने
नागापरि सळसळणारी वाटांची जहरी वळणे
प्रार्थना गहन वाऱ्याच्या घुमतात गुहांच्या कानी
विवरातून उसळत येते जिजिवीषू उज्ज्वल पाणी
पाण्याच्या खोल तळाशी चमचमती स्फटिक किती हे
प्रतिमांचे तोरण कुठल्या अज्ञात घराला आहे’
(संज्ञेच्या पलतटाला)
अज्ञात प्रदेशात सापडणाऱ्या प्रतिमा-प्रतीकांच्या शोधात सारं आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी आहे. खरं तर सर्जनाची प्रक्रियाच विलक्षण असते. आपल्या आत असलेल्या उबेनं कोणतीही सजीव मादी जशी जीव निर्माण करत असते तसंच काहीसं कवितेचं असतं. आपल्या आंतरिक जगात उसळलेल्या कल्लोळाच्या धगीतून निर्माण होणाऱ्या शब्दांचीच कविता होत असते. आयुष्यातले बरे-वाईट प्रसंग, विविध अनुभव, शारीर आणि मानसिक भूक, इच्छा-आकांक्षा अशा अनेक गोष्टींची आपल्या नेणिवेत गर्दी झालेली असते. हे सारे अनुभव नेमक्या शब्दात मांडत गेलो तर त्याचीच कविता होत जाते, हे या कवयित्रीला माहीत आहे.
‘कृष्णसजल भवताली मरणाचा
उग्र सुवास
देहातून नवीनपणाचे पण फुटती
कोवळध्यास’
आपल्या नेणिवेत असलेल्या तमाला फोडून आत खोल तळाशी शिरू पाहणारा लेखक वा कवी किंवा कलाकार चमचमत्या स्फटिकांच्या, म्हणजेच प्रतिमा-प्रतीकांच्या शोधात जातो, त्याला जावं लागतं. संज्ञेच्या एका तीरावर जरी अंधार असला तरी दुसऱ्या तीरावर शब्दांचा प्रकाश असतोच. या अंधार-प्रकाशाच्या सीमारेषेवरच खऱ्या अर्थानं कविता हाती लागत जाते.
प्रत्यक्ष अनुभवापेक्षाही कल्पनेच्या पातळीवरचं जगणं कवीला जास्त आवडतं. फँटसीत रमणं हा जगण्यातले विरोधाभास टाळण्याचाही एक मार्ग असावा. हा मार्ग ही कवयित्रीदेखील अनुसरते. या अज्ञात मार्गावर जाण्यासाठी हाती लागलेला अंधाराचा भक्कम जाड दोर पकडून ती त्या ब्रह्मगुहेकडे निघते. हे असे जाणे म्हणजे वेडेपणा आहे हे माहीत असूनही ‘करू का संज्ञेनंतरचे एक साहस वेडे’ असा प्रश्न ती स्वत:ला विचारते. कारण ब्रह्मगुहेच्या गर्भात फिरणाऱ्या त्या कवडशाबद्दल तिला कुतूहल आहे. तिनं उभारलेलं कल्पित विश्व हे अनेकदा वेगवेगळ्या मिथकांशी जोडलेलं असतं. ते स्पष्टपणे येत नाही, पण त्याचे पडसाद सतत शब्दांतून उमटत राहतात.
‘एकेकदा खरोखरच वाटतं मला
की शब्दांच्या काठावर सापडेल काहीतरी
अगदी आपलं असं
आणि देवमाणूस होऊन कुणी सोबत देईल
स्वत:ला मागे ठेवून मग कधीतरी
पुढे पुढेही जाता येईल’
जमिनीवरची आणि आतलीही ओल जपून ठेवली, तर नवं निराळं खूप निर्माण करता येतं याची जाण कवयित्रीला आहे. म्हणूनच ती नव्या काळाला, नव्या विषयालाही सहज भिडू शकते. अर्थात त्यासाठी कल्पनेच्या जगातून वास्तव जगात यावं लागतं आणि ते तसं येणंही महत्त्वाचं असतं. कवीला त्याच्या आजूबाजूचं जग जाणून घ्यावं लागतं. या जाणून घेण्याच्या प्रवासात वास्तव आणि काल्पनिक जगातील फरकही ठळक होत जातो आणि त्याचा परिणाम त्याच्या लेखनावरही होत जातो. या कवयित्रीलाही एका थांब्यावर हे जग व त्या जगातली दाहकता जाणवते. नकळत तिच्या भाषेत, तिच्या अभिव्यक्तीतही बदल होत जातो. तिला स्वतलाही जाणीव होते, की तिच्या शब्दांचं वागणं आता बदललं आहे. ती म्हणते, ‘माझे पाणी बदलले आहे, माझे जाणे आणि गाणेही बदलले आहे.’
प्रेम, त्या प्रेमानं दिलेली वेदना, सुख, आनंदाचे तसेच विरहाचे प्रसंग, त्याच्याशी तिचं असलेलं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं नातं व्यक्त करणाऱ्या कविता हे या संग्रहाचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. या नात्यात तक्रार कमी आणि समजूतदारपणा जास्त आहे. जे मिळालं त्याचा आनंद आहे आणि जे निसटून गेलं, संपून गेलं त्याचा तटस्थ स्वीकारही आहे. ‘विलासी चंद्र बाजूला काढून ठेवल्यावर आयुष्याला पडलेले आसक्तीचे सर्पधुंद वेढे आता अस्वस्थ करत नाहीत. ऊनही त्याच्या समजूतदार अस्तित्वासारखे निरामय होत जाते,’ असं स्वतला समजावणारी नात्यातल्या प्रगल्भतेची खूण तिच्या कवितेत सापडते.
पण हे प्रेम केवळ स्वप्नात रंगत नाही. ते वास्तवाची जाणीव ठेवून असतं. अनेकदा उत्कट प्रेम आणि ते भोगू न देणारे समाजाचे संकेत यामध्ये हे दोघे अडकतात आणि मग त्यातून आलेली वेदना स्वीकारून जगत राहतात. हे असं प्रेम अनेकदा अंगावर येणारं एकटेपणही पदरी घालतं. ‘जगण्याचे क्रूर कायदे असलेल्या या जगात आपण परतलो आहोत/ आपल्या झेपावत्या इच्छा मुरडून/ आपापल्या एकटेपणात निर्णायक निर्धाराने’ असं म्हणत स्वत:लाच समजावत राहतं.
काळ बदलला आणि स्त्रिया स्वत:विषयी, त्यांच्या या समाजातील स्थानाविषयी लिहू लागल्या. या व्यवस्थेनं आपल्याला दुय्यम स्थानावर लोटलं आहे याचं भान त्यांना येऊ लागलं आणि त्याविषयी पोटतिडकीनं बोलण्याचं बळ त्यांच्या शब्दांमध्ये आलं. स्त्रियांच्या लेखनात बदल होण्याच्या या टप्प्यावरच अरुणा ढेरे यांचं कवितालेखन सुरू झालं. त्यामुळे आधीच्या कवयित्रींचा प्रभाव आणि स्वत:च्या जगण्याचं भान याचं सुरेख मिश्रण आपल्याला या कवयित्रीच्या कवितेत दिसतं. परंपरेनं स्त्रीला शिकवलेला संयम तिच्यात आहे. पण त्याचबरोबर या परंपरेनं स्त्रीला नाकारलेल्या स्वत्त्वाचा धिक्कारही तिला करावासा वाटतो. त्यामुळेच अनेकदा तिची कविता संयत सुरात सारा उद्वेग व्यक्त करते.
‘सईबाई गं, सईबाई गं, तुझ्या राजाचा तुरुंग मोठा’ असं ती म्हणते तेव्हा वरवर सुखात नांदणाऱ्या, पण मनातल्या मनात कुढणाऱ्या, रडणाऱ्या आणि स्वत:लाच समजावत जगणाऱ्या स्त्रिया आपल्यासमोर आणते. ‘कधी कांडता कुंडता बसावा घाव, तसा बसतो तिच्यावर स्त्रीत्वाचा घाव’ असं म्हणत मनात ठसठसणारी वेदनाही व्यक्त करते.
ही कवयित्री स्त्रीच्या शोषणापेक्षा तिच्या सोसण्याविषयी जास्त बोलते. या परंपरेनं तयार केलेल्या चौकटीत जगताना बाईच्या वाटय़ाला जी वेदना आली आहे ती तिला अस्वस्थ करते आहे.
गेल्या चाळीस वर्षांचा काळ हा खरं तर कोसळलेले आदर्श, तुकडय़ांत विभागलेलं माणसाचं आयुष्य, मोडलेली एकत्र कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्थेतलं शोषण, माणसाला आलेलं वस्तुरूप, स्त्रीशोषण, धर्म आणि जातीच्या नावावर झालेले विध्वंस, आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण अशा अनेक गोष्टींनी भरलेला काळ आहे. या काळात सर्जनशील मनांची झालेली उलघाल, त्यांना आलेलं नराश्य गेल्या चाळीस वर्षांच्या साहित्यातून व्यक्त होताना साहित्यविश्व पाहत आहे. अशा काळात कोणत्याही संवेदनशील मनाला नराश्य येतंच. या कवयित्रीलाही ते आलं असल्याचं दिसतं. आजूबाजूच्या बदलणाऱ्या संदर्भामुळे हे असं भय मनाच्या कोपऱ्यात दाटून आलं असलं, तरी या कवयित्रीचा सूर नकारात्मक लागत नाही. त्यामुळेच अशा काळातही माणसामधल्या चांगुलपणावर असलेला विश्वास आणि एक चिवट आशावाद तिच्या कवितेतून सतत व्यक्त होत राहिला आहे.
हे जगणं जास्तीत जास्त सोपं करत जगण्याचा तिचा सूर या सगळ्या कवितांतून झिरपत राहतो. केवळ परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला अशा परिस्थितीतही नेमकं काय करता येईल, कसं बदलता येईल, याचा विचार ती सतत करत राहते. त्यासाठी ‘टिकवावे लागेल रान बाहेरचे आणि आतलेही, नांगरावी लागतील शेते आणि अडवावे लागेल पाणी, जमिनीवरचे आणि आतलेही’ याची कल्पना तिला आहे.
अरुणा ढेरे यांचा मराठीचा, लोकसंस्कृतीचा आणि आदिबंधांचा अभ्यास, तसेच संस्कृतवरचे प्रभुत्व याचा प्रभाव त्यांच्या एकूण लेखनाच्या शब्दकळेवर पडलेला आहे. कवितेतही तो जाणवतो. अनेक संस्कृत शब्द त्या वापरतात. त्यांच्या आजूबाजूच्या आणि पुस्तकांच्या घरातल्या वातावरणाचे पडसाद त्यांच्या प्रतिमासृष्टीत उमटत राहतात. लहानपणापासून झालेले संस्कार, ज्या वातावरणात तुम्ही वाढलात ते वातावरण आणि तुम्ही केलेला अभ्यास या विविध गोष्टी अशा शब्दकळेच्या मागे असतात. त्यामुळे अरुणा ढेरे यांच्या कवितेत येणाऱ्या प्रतिमा या जास्त मध्यमवर्गीय जाणिवांच्या आहेत का, असा प्रश्नही पडतो. अरुणा ढेरे यांना नवे नवे शब्द त्यामागच्या अर्थासकट, विशेषत: विशेषणं घडवायला आवडतात हे त्यांची कविता वाचली तर लक्षात येतं.
अरुणा ढेरे यांची कविता ही स्वत:चा शोध घेणारी कविता आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या स्त्रीची ही कविता आहे. ही कविता माणसांविषयी, ते राहत असलेल्या जगाविषयी बोलत असली, तरी हे जग वास्तवातील कमी आणि कल्पित जास्त आहे हे ही कविता वाचताना जाणवत राहतं. ही कविता वास्तववादी असण्यापेक्षा सौंदर्यलक्षी जास्त आहे. शोषण, अन्याय, दहशत इत्यादी गोष्टींनी ग्रस्त समाज आणि त्यातलं विस्कटलेलं जगणं या कवयित्रीला जाणवतं आहे आणि ती वेळोवेळी ते व्यक्तही करताना दिसते. असं असलं तरी जगण्यातलं सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न ती सातत्यानं करते आहे. हे असं सौंदर्य तिला अनेकांच्या डोळ्यांत दिसतं. अगदी कोकराच्या डोळ्यातही ते दिसतं. हे चित्र समजून घेऊन आपल्याही आयुष्यात आनंद आणण्याचा तिचा प्रयत्न आहे.