आजचा महाराष्ट्र उभा विभागला गेलेला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी ही विभागणी. ती कोणा एका क्षेत्रापुरतीच नाही. कोणतंही क्षेत्रं घ्या. दोनच कप्पे. ते आणि आपण. आपल्या मताशी सहमत नसलेला म्हणजे आपला शत्रूच- अशी ही थेट भेदनीती आहे. एकेकाळी वैचारिक वादांसाठी गाजणारा महाराष्ट्र त्यातल्या वैचारिक सहिष्णुतेला आज पारखा झाला आहे. कारण वादासाठी लागणारी बौद्धिक क्षमता आणि वैचारिक अधिकार आपण गमावून बसलो आहोत. समाजावर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची जरब आहे, ज्यांच्या अधिकाराबद्दल आणि नैतिकतेबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही अशी माणसंही आता तितकीशी उरलेली नाहीत. जी आहेत ती एकतर काही व्यक्त होऊ इच्छित नाहीत, किंवा मग व्यक्त झालीच तर भलतंच काहीतरी त्यांच्याकडून ऐकावं लागतं. समाजाच्या अवनतीचं हे लक्षण आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ऱ्हासाचा लेखाजोखा मांडणारा लेख..
आताचा महाराष्ट्र उभा विभागला गेलेला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी ही विभागणी. ती कोणा एका क्षेत्रापुरतीच नाही. कोणतंही क्षेत्रं घ्या. दोनच कप्पे. ते आणि आपण.
एखाद्या मराठी चित्रपटावर समजा एखाद्याला मत मांडायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ‘नटसम्राट’ किंवा खूप कलात्मक वगरे म्हणून नावाजला गेलेला ‘किल्ला’! आणि मत मांडणाऱ्याला समजा प्रश्न पडले, की साठ-सत्तरच्या दशकातल्या ‘नटसम्राटा’त आजच्या पाचशे रुपयांच्या नोटा कशा काय बुवा? किंवा कोणाचे तरी वडील हरवले म्हणून लोकांना बडवत सुटणारे ‘नटसम्राट’मधले पोलीस कुठे असतात? किंवा ‘किल्ला’मध्ये रत्नांग्री-चिपळुणातल्या गावातला असूनही चित्पावन इतका काळाठिक्कर कसा? किंवा पाण्यातल्या गळाला मेलेला साप कसा काय लागतो?
या प्रश्नांची जाहीर वाच्यता झाली रे झाली की मराठी-अभिमानी, सांस्कृतिकदृष्टय़ा सजग आणि असा बराच काही असलेला वर्ग झुंडीने अंगावर येतो. त्याचं म्हणणं- आपल्याला आवडणाऱ्या आणि प्रत्येक मराठीभाषकाला आवडायलाच हव्या अशा कलाकृतीबाबत प्रश्न निर्माण होतोच कसा? या प्रश्नावरच तो थांबत नाही. पुढे जाऊन तो विचार करतो.. ज्या अर्थी मराठी कलाकृतीवर प्रश्न निर्माण केले जातायत, त्या अर्थी ते प्रश्न निर्माण करणारा हा नक्कीच मराठीद्वेष्टा असणार. महाराष्ट्रात राहून मराठी कलाकृतीच्या नावाने बोटं मोडतो म्हणजे पापाची परिसीमाच. मिळेल त्या मार्गानं ठोकून काढायला हवं हे पाप करणाऱ्याला.
म्हणजे दोनच गट. चित्रपट आवडणाऱ्यांचा- ‘आपला’! आणि चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा- ‘त्यांचा’! खरं तर तो विरोध नसतो. फक्त त्रुटी दाखवून दिलेल्या असतात. पण तेही आता चालत नाही. सगळ्याच क्षेत्रांचं असं झालंय आता.
विद्यमान सत्ताधाऱ्यांविषयी काही मतं मांडायची आहेत? ती चांगलीच, गुणगान करणारी असायला हवीत. वेगळा विचार मांडण्याचा कोणी प्रयत्न केलाच, तर तो ठरणार लाचार काँग्रेसधार्जणिा. सरकारविरोधात जरा काही प्रतिकूल मत मांडण्याची िहमत कोणी दाखवलीच, तर तसं करणारा हा विरोधकांना मिळालेला असणार, ही ठाम खात्री. सरकारसंदर्भात तर समाजात इतकी विभागणी आहे, की परवा एकजण सांगत होता, तो लोकलमध्ये सहज म्हणाला- ‘काय उकडतंय सध्या!’ तर शेजारच्यानं विचारलं, ‘कॉँग्रेसच्या राज्यात मुंबईत काय बर्फ पडत होतं का?’ याच्या उलटही होतं. म्हणजे एखाद्यानं सरकारचं कौतुक करायचा प्रयत्न केलाच, तरी प्रतिक्रिया अशीच.. ‘हा नक्कीच भाजपवाला किंवा संघवाला दिसतोय.’
म्हणजे मुद्दा तोच. आपण किंवा ते.
ही विभागणी नुसती तेवढय़ापुरतीच, फक्त चर्चा वा वादात होऊन प्रश्न संपत नाही. ती प्रत्यक्षातही होते. त्यामुळे हा अमुकांमधला किंवा तो तमुकांचा. एखाद्याला दोन्ही ठिकाणी असण्याचा किंवा कुठेच नसण्याचा पर्यायच उपलब्ध नाही आजच्या समाजात. वरवर पाहता यावर- ‘त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं?’ अशी प्रतिक्रिया असू शकेल कोणाची. पण तशी ती असणाऱ्यांना वास्तवाचं भान नाही, इतकंच म्हणता येईल. कारण ही मतभेदांची दरी आता प्रत्यक्ष समाजात उतरू लागली आहे. सरळसरळ दोन गट पडलेत. ते आणि आपण. ही परिस्थिती निश्चितच काळजी करावी अशी.
याचं कारण महाराष्ट्र हा कधीही, इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर असा नव्हता. मत असणं, मतभेद असणं आणि मतक्य नसलं तरी समोरच्याच्या मताचा आदर करणं, हे या महाराष्ट्राचं वैशिष्टय़ राहिलेलं आहे. महाराष्ट्र हा असा करकरीत बुद्धिवादासाठी ओळखला जायचा. संपादक, लेखक, कलावंत यांनी हा बुद्धिवाद प्राणपणानं जोपासला होता. आणि तसा तो जोपासताना जे काही मतभेद आहेत ते विचारांतले आहेत, व्यक्तिगत नाहीत, हे या महाराष्ट्राला नेहमीच कळत होतं.
त्याचमुळे या महाराष्ट्राला डोळे दिपवणाऱ्या वादांचा झगझगीत इतिहास आहे. आचार्य अत्रे आणि ‘सर्वमंगल क्षिप्रा’कार ह. वि. मोटे यांच्यातील चकमकी, अत्रे आणि पु. भा. भावे यांच्यातील घनघोर वाक्युद्ध, ग्रामीण साहित्यावर पोकळ दावा सांगणारे आनंद यादव आणि अभ्रष्ट मराठीत आपले रसरशीत अनुभव मांडणारे व्यंकटेश माडगूळकर यांच्यातले वाङ्मयीन मतभेद वगरे अशी अनेक उदाहरणं देता येतील. इतकंच काय, पुलंचं ‘ती फुलराणी’ जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा माधव मनोहर यांनी आपल्या नेहमीच्या सडेतोड शैलीत त्यातल्या भाषांतराच्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. तरीही मनोहरांविषयी पुलंच्या मनात कायम आदर होता. आणि पुलंची कलाजाणीव किती समृद्ध आहे, हे माधव मनोहर आवर्जून सांगायचे. हे सर्व आजच्या पिढीला माहिती असेल अशी अपेक्षा असणं हे सध्याच्या काळात सामुदायिक अपेक्षाभंगाचं दु:ख ओढवून घेणारं ठरेल. पण समस्या ही, की राज्याच्या या वैचारिक परंपरांची माहिती नाही, ती करून घेण्याची इच्छा नाही आणि नवीन परंपरा सुरू करण्याइतकी बौद्धिक क्षमता नाही, अशा चक्रात सध्याचा महाराष्ट्र अडकलेला आहे.
का झालं असावं हे?
सध्या जो एक सार्वत्रिक मूल्यऱ्हास आढळून येतो, त्यात याची मुळं आहेत. हा ऱ्हास दुहेरी आहे. एक म्हणजे विचारकक्षेच्या डावीकडे असणाऱ्यांचं कालबा वा नामशेष होत जाणं, आणि त्याचा परिणाम म्हणून उजवीकडच्यांची दांडगाई वाढणं. मुळात उजव्यांना विविधताच मान्य नसते. त्यामुळे ते एकसुरी आणि कंटाळवाणे असतात. पण यांचं वैशिष्टय़ म्हणजे संघटनात्मक कामं, संस्थाउभारणी वगरेंत यांचा हातखंडा असतो. त्यामुळे त्या अर्थानं ते एका मोठय़ा समूहाशी बांधले गेलेले असतात. या तुलनेत डावे तरतरीत, आकर्षक असतात. आपले मुद्दे चटपटीतपणे मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते तरुणांना आकृष्ट करू शकतात. पण यापलीकडे त्यांची मजल जात नाही, ही त्यांची पंचाईत. त्यामुळे ते बांधले गेलेले नसतात आणि समाजाशी त्यांची नाळ जोडली गेलेली नसते. त्यात संस्थात्मक उभारणीची वगरे अगदीच बोंब. परिणामी त्यांच्या हाती एकमेव कार्यक्रम उरतो तो म्हणजे उजव्यांच्या नावे बोटं मोडणं, त्यांची नालस्ती करणं, वगरे. पण हा एककलमी कार्यक्रम तरी किती काळ राबवणार? हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे डावे फक्त प्रतीकात्मकतेत स्वत:ला अडकवून घेतात.
पूर्वीही हे असं होत नव्हतं का?
निश्चितच नव्हतं. याचं कारण त्यावेळचे डावे हे इथली संस्कृती नाकारणारे नव्हते. उदाहरणार्थ, विंदा करंदीकर. हा कडवा कवी जातिवंत माíक्सस्ट. परंतु म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर यांच्यासारख्या रसरशीत कवीला नाकारलं नाही. मार्क्सवादी आहोत म्हणून विंदांनी कधी वारकरी परंपरेला हिणवलं नाही. दुर्गाबाईंनी बुद्धावर विश्लेषणात्मक लिहिलं. पण एकाही दलित नेत्याला वाटलं नाही- त्यांच्या घरावर मोर्चा न्यावा, त्यांचा निषेध करावा, वगरे. कारण दुर्गाबाईंनी आधी बुद्धांचं तत्त्वज्ञान आपल्यात सामावून घेतलेलं होतं. नरहर कुरुंदकरांनी मनू ते मार्क्सवाद ते महंमद अशा प्रचंड मोठय़ा परीघावर भेदक भाष्य केलं. पण त्या महाराष्ट्रानं त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आदरच केला. पण दुर्गाबाई किंवा कुरुंदकर यांना त्यावेळी जे काही लिहिता आलं त्याच्या एक-दशांशदेखील सध्याच्या काळात मांडता आलं असतं का? श्रीपाद अमृत डांगे यांचं कॉम्रेड असणं हे त्यावेळी त्यांच्या संस्कृत वाङ्मय- प्रेमाच्या आड कधी आलं नाही. ‘जाळ्यातला चंद्र’ समजावून सांगणारे म. वा. धोंड हे आणखी उदाहरण. असे अनेक दाखले देता येतील. (सांप्रतकाळी परिस्थिती इतकी गंभीर, की एखादा सहज नुसता म्हणाला, की त्याचं संस्कृत वाङ्मयावर प्रेम आहे, तर लगेच त्याला िहदुत्ववाद्यांच्या गटात कोंबलं जातं.) वर उल्लेख केलेल्या आणि अन्यही प्रज्ञावंतांनी मुळात इथली संस्कृती आत्मसात केली होती. तिच्यावर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्यामुळे त्यांच्या शब्दांना मान होता. त्यांची समाजात एक जरब होती.
म्हणजेच ते समाजाचे नीतीदर्शक होते. समाजाचा तोल जातोय असं लक्षात आलं की आपल्या बुद्धीतेजानं तो पुन्हा साधण्याची त्यांची क्षमता होती. आणि त्यांच्या या क्षमतेवर समाजाचा विश्वासही होता.
आता पंचाईत ही, की हे समाजनौकेचं नीतीसुकाणू धरणारेच कोणी नाहीत. एकेकाळी मराठीतल्या तेजस्वी संपादकांनीही ते काम केलं. एकाच वेळी किंवा आसपास तिकडे मराठवाडय़ात अनंतराव भालेराव, सोलापुरात रंगा वैद्य, इकडे गोविंदराव तळवलकर, प्रभाकर पाध्ये, विदर्भात माडखोलकर वगरे तगडे संपादक होते. त्यांच्या त्यांच्यातही वैचारिक मतभेद होतेच; पण काही किमान मूल्यांवर त्यांची समान निष्ठा होती आणि विचारांवर अव्यभिचारी प्रेम होतं. आता लिहिते संपादक मोजायला एकाच हाताची बोटंही पुरतील आणि तरीही त्यातली काही शिल्लक राहतील. त्याचवेळी लेखनाच्या क्षेत्रातही अशीच अवस्था आली. जे कोणी ज्येष्ठ म्हणवून घेण्याच्या आणि समाजाला चार गोष्टी सुनावण्याच्या क्षमतेचे होते ते विदुषकी बडबडीतच आनंद मानू लागले. अन्य काही आपल्याच कोषात समाजाकडे पाठ करून फुरंगटून बसले. दुसरे काही आपल्या भौगोलिक प्रदेशाच्या आणि जातीपातीच्या सीमांत अडकले.
याच्याशिवाय जो लेखक-कलावंतांचा मोठा वर्ग होता आणि आहे, तो घाऊक प्रमाणावर कार्यकर्ता बनला. हे असं उघड कार्यकर्ता बनणं भलतंच लोकप्रिय आहे सध्या. पण एकदा का एका कोणत्या विचाराचा झेंडा खांद्यावर आला, एका कोणत्या विचाराचा मळवट भरला, की तटस्थता संपली. वाहत्या समाजात वाहतच जायचं असेल तर लेखक, विचारवंत वगरे हवेतच कशाला? समाजातल्या प्रवाहांची क्षमता ओळखून, त्यातला सुष्ट-अनिष्ट भेद दाखवायची तटस्थ क्षमता लेखक, विचारवंतांत हवी. ती या वर्गानं स्वत:च्या हाताने घालवली. सध्या तर परिस्थिती इतकी गंभीर आहे, की अमुक एकाचं नाव घेतलं की तो काय लिहील वा काय बोलेल, हे बसल्या जागी सांगता येईल. विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचा इतका अंदाज बांधता येत असेल तर ते समाजाच्या व्यापक ऱ्हासाचं लक्षण असतं. याचं कारण अशा समाजात तटस्थ स्वरच शिल्लक राहिलेला नाही, असा त्याचा अर्थ असतो.
तेच तर नेमकं आता महाराष्ट्रात होतंय. म्हणजे एका बाजूला ज्यांनी समाजाला दिशा द्यायची तोच वर्ग दिशाहीन, आणि ज्यांना दिशा दाखवायची तो वर्ग सरभरतेतच आनंद मानू लागलेला- अशी स्थिती. याचा दृश्य परिणाम असा, की अशा वातावरणात समाज म्हणून आपण आता एकात्म, एकसंध उरलेलो नाही. समाजाच्या चिरफळ्या उडाल्यात आणि त्यांना सांधायची क्षमता असलेलं कोणी नाही, ही अवस्था.
म्हणजेच हा आजचा महाराष्ट्र शतखंडित आहे. पण यातलाही दैवदुर्वलिास असा, की यातला प्रत्येक खंड पुन्हा ‘ते’ आणि ‘आपण’ असा विभागला गेलेला आहे. या अवस्थेतनं बाहेर यायचं असेल तर या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक परंपरांचे झरे जिवंत करावे लागतील. टीका करणारा हा शत्रू नसतो, त्याला शत्रू ठरवून टीकेची वासलात लावण्यापेक्षा त्याचा सयुक्तिक प्रतिवाद करायला आजच्या महाराष्ट्राला शिकावं लागेल. आपल्याशी मतभिन्नता असणाऱ्याच्या कपाळावर शिक्का मारून त्याला मोडीत काढणं हे अगदी सोपं असतं. किमान बुद्धिमत्ताधारीही ते करू शकतात. पण आपल्या टीकेचा मुद्देसूद प्रतिवाद करायचा असेल तर विचार आणि अभ्यास दोन्हींची गरज असते. नव्या महाराष्ट्राला हे शिकावं लागेल. हे जेव्हा जमतं तेव्हा त्याचा अभिमान आपोआपच वाटतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
यानिमित्तानं एक प्रसंग नमूद करायलाच हवा. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचा. ही भेट झाल्यानंतर लोकमान्यांनी आपल्या अनुयायांना गांधींविषयी जे सांगितलं, ते आजच्या परिस्थितीत फारच उद्बोधक वाटेल. टिळक म्हणाले, ‘‘हा माणूस आपल्या विचारांचा नाही. त्याचे आणि आपले मार्ग भिन्न आहेत. परंतु म्हणून त्यांना विरोध करण्याचे कारण नाही. ते त्यांच्या मार्गाने जाऊ देत. आपण आपल्या मार्गाने जाऊ. पण आपले अंतिम ध्येय एकच आहे.’’
इतका मनाचा मोठेपणा आणि वैचारिक औदार्य दाखवायला आजचा महाराष्ट्र पुन्हा शिकेल, ही अपेक्षा आजच्या महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर बाळगायला काहीच हरकत नाही.
परवा एकजण सांगत होता, तो लोकलमध्ये सहज म्हणाला- ‘काय उकडतंय सध्या!’ तर शेजारच्यानं विचारलं, ‘कॉँग्रेसच्या राज्यात मुंबईत काय बर्फ पडत होतं का?’ याच्या उलटही होतं. म्हणजे एखाद्यानं सरकारचं कौतुक करायचा प्रयत्न केलाच, तरी प्रतिक्रिया अशीच.. ‘हा नक्कीच भाजपवाला किंवा
संघवाला दिसतोय.’
गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
@girishkuber