१२ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाचा शुभारंभ होत आहे.
डॉ. आंबेडकरांनी लंडनमध्ये जिथे शिक्षण घेतले त्या स्थळांना लेखकाने आवर्जून भेट दिली. त्यावेळच्या त्यांच्या नोंदी..
लंडननं अनेक दिवसांपासून आपल्या अंगावर धुक्याची दुलई ओढून घेतली होती. त्यामुळे त्या दिवशी सकाळी सूर्यनारायण प्रकट होताच माझ्यासाठी तो एक शुभसंकेत आहे असं समजून मी बाहेर पडलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्यार्जनाच्या काळात लंडनमधल्या ज्या घरात राहत होते ते प्रत्यक्ष पाहणे हा माझ्या त्या दिवशीच्या भटकंतीचा मुख्य उद्देश होता.
माझा मुक्काम बर्कशायर परगण्यातल्या स्लाव्ह या ठिकाणी असल्यानं प्रथम लंडनमधल्या पॅिडग्टन स्थानकापर्यंत ट्रेननं जाणं क्रमप्राप्त होतं. त्यापुढे भुयारी रेल्वेनं प्रवास करून मी नॉर्दर्न लाइनवर असलेल्या कॅम्डेन भागातील चॉकफार्म या उत्तर लंडनमधल्या एका टुमदार टय़ूब स्टेशनवर उतरलो. चॉकफार्म स्थानकासमोरचा रस्ता ओलांडून प्रिमरोझ हिल्सच्या दिशेनं जाणारा एक लोखंडी पूल पार करताच उजव्या हाताला असलेला किंग हेन्री रोड दिसला. त्या रस्त्यानं केवळ काही पावलं चालून जाताच तिथं मला हवं असलेलं दहा क्रमांकाचं घर दिमाखात उभं असलेलं दिसलं. घराच्या आसपासचा परिसर सुंदर, शांत, आणि स्वच्छ होता. कोणे एकेकाळी ‘प्रिमरोझ हिल्स’ नावानं ओळखला जाणारा हा परिसर वनराईनं व्यापला होता. राजघराण्यातली मंडळी या भागात शिकारीस येत असत. आज हा परिसर श्रीमंत आणि धीमंतांच्या निवासस्थानांनी व्यापलेला आहे.
दहा क्रमांकाचं घर ही स्वतंत्र इमारत नव्हती. तीन-चार घरं एकमेकांना चिकटून उभी होती. इंग्लंडमध्ये अशी अनेक घरं आहेत. इमारतीनं शंभर पावसाळे पाहिले असूनही ती भक्कमपणे उभी होती. कालपरत्वे आवश्यक डागडुजी झालेली दिसत होती. घराचा दरवाजा उत्तम प्रतीच्या लाकडाचा होता. दरवाजाच्या बाजूला िभतीवर एक गोलाकार तबकडी दिसत होती. तिच्यावर फिकट निळ्या अक्षरात लिहिलं होतं- ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर- १८९१-१९५६. इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस लिव्हड् हिअर इन् १९२१-१९२२.’ पाटी वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. काहीशा भारावलेल्या मन:स्थितीत मी त्या घराच्या पायरीवर मस्तक ठेवलं आणि त्या भारतीय महापुरुषाला नि:शब्दपणे अभिवादन केलं. आíथक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सरस्वतीच्या या उपासकानं लंडनमधल्या कुणाच्यातरी मालकीच्या या घरात निवारा शोधून, अनेकदा अर्धपोटी राहून आपला विद्याभ्यास मोठय़ा चिकाटीनं केला होता. मी तिथं गेलो तेव्हा त्या घरासमोर फलक होता- ‘हे घर विकणे आहे!’ एक मात्र निश्चित होते की, घराची मालकी बदलली तरी डॉ. आंबेडकर तिथं एकेकाळी राहत होते हे जगजाहीर करणारी ती गोलाकार तबकडी तिथून हटणार नव्हती.
विकायला काढलेलं ते घर प्रत्यक्षात स्वतंत्र; परंतु एकास एक चिकटून असलेल्या दोन सदनिकांचं मिळून बनलेलं होतं. एक सदनिका केवळ ६२० चौरस फुटांची असून तीत एक बठकीची खोली, एक झोपण्याची खोली आणि लहानसा बगीचा असलेलं उघडं आवार यांचा समावेश होता. तर दुसरी सदनिका १,८८२ चौरस फुटांची होती. तीत एक प्रशस्त बठकीची खोली, लहानसे स्वयंपाकघर असून वरच्या दोन मजल्यांवर पाच खोल्या झोपण्यासाठीच्या होत्या. संपूर्ण घराची विक्री होणार असल्यानं २५५० चौरस फुटांच्या एकूण क्षेत्रफळासाठी पंधरा हजार ब्रिटिश पौंड प्रति चौरस फूट या बाजारभावाने ३१ लक्ष ब्रिटिश पौंड इतके त्याचे विक्रीमूल्य होते. त्याव्यतिरिक्त मुद्रांक शुल्क आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी काही रक्कम आवश्यक असेलच. म्हणजेच भारतीय चलनात हे मूल्य ३२-३३ कोटी रुपयांपर्यंत असू शकेल. हे घर महाराष्ट्र व केंद्र शासन विकत घेऊन तिथं डॉ. आंबेडकरांचं यथोचित स्मारक करणार आहे ही गोष्ट स्वागतार्ह आहे.
डॉ. आंबेडकरांचं निवासस्थान पाहून कृतकृत्य झाल्याच्या समाधानात मी मोर्चा वळवला तो थेट ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्स’ या विश्वविख्यात शिक्षणसंस्थेच्या दिशेनं! त्यासाठी पुनश्च भुयारी रेल्वेचा प्रवास करून हॉलबोर्न स्थानकाबाहेरच्या किंग्ज वे रस्त्यानं चालू लागलो. वाटेत लंडनमधलं प्रख्यात किंग्ज कॉलेज दिसलं. तसाच पुढे गेल्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्स या संस्थेच्या इमारती दिसू लागल्या. किंग्ज वे रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला याच संस्थेचं ‘क्लेमेंट हाऊस’ होतं. शनिवार असल्यानं कॉलेज बंद होतं. चौकशी करावी म्हटलं तर तिथं चिटपाखरूदेखील नव्हतं. इमारतीचं प्रवेशद्वार मात्र थोडं ढकलताच उघडलं गेलं. आसपास कुणी रखवालदार नव्हता. आत सर्वत्र अंधार होता. तरीही मी आत शिरलो. त्याबरोबर सगळे दिवे लागले. माझ्या हालचाली सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याने टिपल्या जात होत्या, हे निश्चित! परंतु मला त्याची पर्वा नव्हती. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे आणि तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय माघारी परतायचं नाही, हा माझा पण होता. एक दरवाजा हाँगकाँग थिएटरच्या दिशेचा मार्ग दाखवीत होता. तो दरवाजा ढकलून आत पाऊल टाकले अन् आपोआप लागलेल्या दिव्यांच्या उजेडात मला त्या पुतळ्याचं दर्शन झालं! पुतळा फुलांच्या हारांमुळे अधिकच शोभिवंत वाटत होता. पाठीमागच्या िभतीवर उंच ठिकाणी आंबेडकरांचं भव्य तलचित्र लावलेलं होतं. ते पाहून माक्षा ऊर अभिमानानं भरून आला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या उच्चतम अभ्यासासाठी जगातली सर्वोत्तम शिक्षणसंस्था असा जिचा लौकिक आहे त्या संस्थेच्या एका दालनात- सरस्वतीच्या त्या पवित्र मंदिरात असं सन्मानाचं स्थान मिळवणारे डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत!
इंग्लंडला येण्यापूर्वी त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली दरमहा साडेअकरा पौंडाची शिष्यवृत्ती घेऊन १९१३ सालच्या जुलमध्ये बोटीचा प्रवास करून अमेरिका गाठली होती आणि न्यूयॉर्क-मॅनहटनमधल्या कोलंबिया विद्यापीठात एम. ए.साठी प्रवेश घेतला होता. आंबेडकरांची बुद्धी इतकी कुशाग्र होती, की अल्पावधीतच त्यांनी ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी’ या शीर्षकाचा आपला शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्याचा स्वीकार करून विद्यापीठानं त्यांना राज्यशास्त्राची एम. ए.ची पदवी बहाल केली. तेवढय़ावर समाधान न मानता त्यांनी काही महिन्यांतच ‘दि नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया- ए हिस्टॉरिकल अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिटिकल स्टडी’ हा आणखी एक विद्वत्तापूर्ण शोधप्रबंध त्याच विद्यापीठाला पीएच. डी.साठी सादर केला. तोदेखील स्वीकारून कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. आंबेडकरांनी तीन वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा अतिशय काटेकोरपणे वापर करून अमेरिकेतला आपला अभ्यासक्रम केवळ दोन वर्षांतच पूर्ण केला आणि किंचितही कालापव्यय न करता ते ऑक्टोबर १९१६ मध्ये लंडनला आले. राज्यशास्त्रात डॉक्टरेट संपादन केल्यावर त्यांना वेध लागले होते अर्थशास्त्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचे! त्यासाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम. एस्सी.साठी आणि डी. एस्सी.साठी प्रवेश मिळवला. कायद्याचा सखोल अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे, ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत त्यांनी ‘ग्रेज इन् ऑफ कोर्ट ऑफ जस्टिस’मध्येदेखील प्रवेशासाठी अर्ज केला. दुर्दैवानं त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यानं त्यांना नाइलाजास्तव मायदेशी परत यावं लागलं. बडोदे संस्थानशी झालेल्या करारानुसार त्यांनी बडोद्यात दरमहा दीडशे रुपयांची नोकरी स्वीकारली. काही दिवसांनी मुंबईत सिडनहॅम कॉलेजमध्ये ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ शिकवण्यासाठी ते प्राध्यापक म्हणून जाऊ लागले. आपलं अर्थार्जन हे अधिक ज्ञानार्जनासाठी आहे असं मानून त्यांनी स्वखर्चानं पुनश्च लंडनला जाण्याची तयारी केली. १९२० च्या सप्टेंबरमध्ये त्यांचे लंडनमध्ये पुनरागमन झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले. लंडन म्युझियमच्या इमारतीतील ग्रंथालयामधला अथांग ज्ञानसागर त्यांनी पिंजून काढला. त्यांची आकलनशक्ती इतकी अफाट होती, की वर्षभरातच त्यांचा शोधप्रबंध तयार झाला. ‘प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स’ हा प्रबंध लंडन विद्यापीठानं स्वीकारून जून १९२१ मध्ये त्यांना एम. एस्सी. पदवी बहाल केली. पुढच्याच वर्षी ‘ दि प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ हा प्रबंध त्यांनी लंडन विद्यापीठाला सादर केला. पुढे त्यात त्यांनी स्वत:च काही दुरुस्त्या केल्यानंतर विद्यापीठानं त्यांना १९२३ सालच्या नोव्हेंबरमध्ये ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही प्रतिष्ठेची पदवी दिली. इंग्लंडमधल्या प्रकाशकांनी या प्रबंधाचं व्यावहारिक महत्त्व जाणून तो ‘इव्हॅल्युएशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन् ब्रिटिश इंडिया’ या शीर्षकानं ग्रंथरूपात प्रसिद्ध केला. या विद्वत्तापूर्ण संशोधनकार्यामुळे आणि ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही ज्ञानशाखांमधले तपस्वी व्यक्ती म्हणून डॉ. आंबेडकर ओळखले जाऊ लागले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समधील त्यांचा अर्धपुतळा हा याचीच साक्ष होय! असं भाग्य लाभलेले ते एकमेव भारतीय आहेत.
लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलेले भारतीय तसे थोडेच आहेत. वानगीदाखल काही नावं सांगायची तर भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन, माजी केंद्रीय मंत्री सी. आर पट्टाभिरामन्, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद प्रदीर्घ काळ भूषवलेले कॉ. ज्योती बसू , भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन्, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि जागतिक बँकेचे चीफइकॉनॉमिस्ट आणि उपाध्यक्ष कौशिक बसू यांची सांगता येतील.
डॉ. आंबेडकरांनी लंडनमधल्या ग्रेज इन् ऑफ कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये बार-अ‍ॅट-लॉसाठी पूर्वीच अर्ज केलेला असल्यानं त्यांना कायद्याचा रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करून बॅरिस्टर होणं सहज शक्य झालं. लंडनमध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर थेट उच्च न्यायालयात वकिली करता येत असल्यानं त्याकाळी अनेक भारतीयांनी लंडनमधल्या इनर टेम्पल, मिडल टेम्पल, लिंकन्स इन् अथवा ग्रेज इनमधून बार-अ‍ॅट-लॉ करणं पसंत केलं होतं. डॉ. आंबेडकरांनी ज्या ‘ग्रेज इन्’मधून कायद्याचं शिक्षण घेतलं ते स्थळ जवळच होतं. भुयारी रेल्वेनं चान्सरी लेन स्थानकावर उतरून ते ठिकाणही मी पाहून घेतलं. आंबेडकरांना ‘बॅरिस्टर’ ही पदवी २८ जून १९२२ रोजी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुढील पाच-सहा महिन्यांत अनेक मौल्यवान, दुर्मीळ ग्रंथ खरेदी केले आणि या ग्रंथांनी भरलेले पेटारे घेऊन त्यांनी १९२३ च्या मार्चमध्ये बोटीनं भारताकडे प्रयाण केलं. ल्ल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा