डोळ्यांत प्राण आणून कुणाची तरी वाट पाहणं आणि त्याचं न येणं म्हणजे काय, यातली आर्तता केवळ प्रियकर/ प्रेयसीच समजूू जाणे. प्रदीर्घ विरह.. येईल म्हणून सारं देहभान हरपून त्या दूरवर सामसूम, नि:शब्द असलेल्या वाटेकडे डोळे लावून बसणं.. अन् संपता संपत नसलेल्या प्रतीक्षेनंतर तो आला की बेभान होऊन परस्परांच्या मिठीत सामावणं.. कविमनालाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्राला अशी एक अनावर ओढ असतेच असते. अशाच अनावर ओढीनं आज प्रत्येक जीवजंतू.. धरती पावसाची प्रतीक्षा करते आहे. गेली दोन र्वष तो रुसलाय जणू. पण आता खूप प्रतीक्षा झाली त्याची. ये ना रे बाबा एकदाचा..
एक प्रतिभावंत चित्रकार होता. चांगलं नाव होतं, कमाई होती. तरल मन. पडलं प्रेमात. काही अडचणी आल्या. झगमगाटी आयुष्याचा वैताग आला. दूर कुठंतरी शांत जागी जाऊन प्रेयसीसोबत राहायचं, असं चित्रकारानं ठरवलं. ठरल्याप्रमाणं रात्री एका रेल्वेत चित्रकार बसला. सकाळी एका स्टेशनावर गाडी थांबली. चित्रकार उतरला. प्रेयसी मागून येणार होती म्हणून प्रेयसीला निरोप धाडला. प्रेयसीची वाट पाहात बसून राहिला. रात्रीच्या गाडीने प्रेयसी येणार होती. गाडी स्टेशनात आली. लोक उतरले, काही चढले. प्रेयसी काही आली नाही. दिवस उलटले. महिने सरले. प्रेयसी आली नाही. चित्रकार वाट पाहातच राहिला. ती ज्या रात्रीच्या रेल्वेने येणार होती, त्या गाडीची रोज वाट पाहूनच तो जेवण करायचा. र्वष उलटली. प्रेयसी आलीच नाही. वाट पाहणं हा त्या चित्रकाराचा श्वासोच्छ्वासाएवढा सवयीचा भाग झाला. ठरलेली रेल्वे रोज येत गेली. स्टेशनवर थांबत गेली. प्रवासी चढत-उतरत गेले. पण प्रेयसी काही उतरली नाही. चित्रकारानेही वाट पाहणं सोडलं नाही. मरेपर्यंत त्या रात्रीच्या गाडीची वाट पाहत राहिला. प्रेयसी आलीच नाही..
थोडय़ाफार फरकानं चाळीसगावच्या केकी मूस या चित्रकाराची ही गोष्ट आजही रंगवून सांगितली जाते. चित्रकाराच्याच नव्हे, तर कुणाच्याच वाटय़ाला असं जीवघेणं वाट पाहणं येऊ नये. ही गोष्ट ऐकल्यावर प्रत्येक जण जिवाच्या आकांतानं प्रेयसीची वाट पाहणाऱ्या चित्रकारासाठी हळहळतो. त्याच्या पारडय़ात आपली सहानुभूती सहज टाकून देतो. न आलेल्या प्रेयसीला खलनायिकेच्या भूमिकेत अलगद लोटून देतो. त्या प्रेयसीच्या न पोचू शकण्यामागं काही अडचणी असू शकतात. त्या प्रेयसीला विरोध झाला असेल. कदाचित कोणी डांबून ठेवलं असेल किंवा प्रवासात त्या प्रेयसीवर एखादा जीवघेणा प्रसंग ओढवला असेल. किंवा चुकून वेगळ्याच स्टेशनावर उतरली असेल. काही बरं-वाईट झालं असेल. अशा अनेक शक्यता असू शकतात. मरेपर्यंत प्रेयसीची वाट पाहणाऱ्या चित्रकाराला दाद द्यायलाच हवी. पण एखादवेळी न पोचू शकलेल्या प्रेयसीचीही बाजू समजून घ्यायला नको का?
एकांगी विचार करण्याचा अजून एक प्रकार. ओंकारेश्वराच्या घाटावर नदीचा पार नाला झालाय. त्या ड्रेनेजच्या पाण्यात पिंड विसर्जित करणं म्हणजे पितरांना नरकात लोटल्यासारखं वाटतं. पण घाटावर आत्म्याची आळवणी अव्याहत सुरूच आहे. पिंड, कावळा आणि आत्मा असं सगळंच काखोटीला मारलेल्या काही माणसांचं सोडा. बाकी बरीच सश्रद्ध माणसं असतात. ही माणसं पितराच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून घाटावर किती भावुक झालेली असतात. डबडबल्या डोळ्यांनी कबुल्या देतात. वचनं देतात. जबाबदाऱ्या घेतात. स्वगतासारखा संवाद सुरू असतो. पिंडाला शिवणाऱ्या कावळ्याची वाट पाहण्याचं दृश्य मन हेलावणारं असतं. तो कावळा सहज आत्मा होऊन जातो.
झाडावर उच्छाद मांडणारे कावळे पिंडाला शिवत नाहीत तेव्हा आत्म्याला कटघऱ्यात उभं केलं जातं. अतृप्त आत्म्याची विनवणी केली जाते. इथल्या मातीवर उभे असले तरी हे लोक त्या क्षणी अलौकिक जगात असतात. ते कावळ्यांचा लौकिक विचार करीत नाहीत. लौकिक जगातले कावळे रोज रोज पिंडाचा तोच भात खाऊन कंटाळले असतील किंवा खाऊन-खाऊन कावळ्यांना अजीर्ण झालं असेल. काही कावळ्यांनी डाएटवर असल्यामुळं भात सोडला असेल. अनेक शक्यता असू शकतात. ही दुसरी बाजू कुणी विचारातच घेत नाही. कारण तो वाट पाहण्याचा भावुक क्षणच व्यापून असतो.
न पोचलेल्या प्रेयसीला कृतघ्न ठरवल्याप्रमाणं आपण पावसाला दूषणं देतो. त्याच्या अडचणी मात्र समजून घेत नाही. कुठल्याही परिस्थितीत पिंडाला शिवायला आम्हाला कावळा हवा असतो. कावळ्याची आर्ततेनं वाट पाहण्याची भावुक अवस्था आणि पावसाची वाट पाहण्याची अवस्था यात खूप साम्य दिसतं. माणसाने स्वत:ला केंद्रस्थानी ठेवूनच भाषेची, संस्कृतीची रचना केली. पण परिस्थितीची किंवा निसर्गाची पूरक रचना करणं शक्य नाही. मग ‘मान्सून वेळेत येणार’पासून ते ‘मान्सून लांबला’च्या मध्ये प्रचंड ओरड सुरू होते. आला, थांबला, ओसरला.. अशी परिस्थिती थिरकत असते. पिंडाचं जाऊ द्या, पण आपणही पावसाच्या स्पर्शाकरिता अधीर झालेले असतो. दरवर्षी नव्या पावसाचा देहाला स्पर्श झाल्याशिवाय मुक्ती नाही. अलौकिक आत्म्याशी संवाद साधणाऱ्या सश्रद्ध माणसासारखी भावुक अवस्था होते आपली. सारं अस्तित्व पणाला लागतं. विनवण्या-प्रार्थना करतो आपण. नवस बोलतो. धावा करतो. पावसाला हाका मारतो.
नारायणा, येऊ दे रे
आमुची करुणा
पाणी पाड रे
नवसे-सायासे लेकुरे होत नाहीत हे माहीत असतं तसं नवसानं, प्रार्थनेनं पाऊस येत नाही हेही माहीत असू शकतं. पण मनाला गुंतवून ठेवावं लागतं. पाऊस पर्यावरणातील एक अनियंत्रित घटना आहे. हे कळूनही पावसासाठी दरवर्षी भावुक व्हायला होतंच. देवाच्या कळसावर पाप-पुण्याच्या पताका फडकू लागतात. खेडूत माणूस सहज बोलून जातो, ‘पाप लई झालं मर्दा, मंग पाऊस येईनच कसा?’ जिथं कुठलीच कमांड देता येत नाही. कुठलीच कळ दाबता येत नाही. कुणाला आदेश देऊन उपयोग नाही. तिथं हा ‘नारायण’ येऊन ठाण मांडतो. बिचारा ‘नारायण’ तरी काय करणार? एक वेळ बसल्याजागी वाट पाहणं तरी सोपं आहे. वेळेत पोहचणं त्याहूनही महाकठीण आहे. पोहचणाऱ्याला येईल त्या संकटाला तोंड देत धडपडून यावं लागतं. आपण पावसाच्या नावानं बोटं मोडतो तेव्हा पाऊस तिकडे अल निनोच्या क्रूर कोठडीत बंद असतो. बाहेर पडण्यासाठी रक्तबंबाळ होऊन दरवाजाला आतून धडका देत असतो. त्यालाही इकडं येण्याची प्रचंड ओढ असते. जास्त दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा पट्टा हे तर पावसाचं भागधेय झालंय. मान्य आहे, दुष्काळ ठाण मांडून बसलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. प्यायलाही पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करताना बायका उन्हात करपतायत. ढोरांना चारा नाही. टँकरचा आवाज आता शत्रूच्या बॉम्ब वर्षांव करणाऱ्या विमानासारखा वाटतोय. शहरी माणसांनाही दुष्काळाची जाणीव झालीय. भोवताल तर करपूनच गेलाय. मनंही कोरडी झालीयत. आरती प्रभूंचा धावा पुढय़ात आहे.
ये रे घना, ये रे ऽऽ घना
न्हाऊ घाल माझ्या मना
हे सगळं खरं असलं तरी पावसाची बाजूही समजून घ्यायला हवी. या दुष्काळी प्रदेशातील कवीचे शब्द, पावसावर प्रसन्न कविता लिहिण्यासाठी तरसतायत. कुणी हौस म्हणून हातात काळा झेंडा घेऊन उभा नसतो. परिस्थितीत बुचकळलेले शब्द नकारात्मक होत जातात.
पाऊस लहरी आहे, पण बेजबाबदार नाहीए. आणि हो, त्यानीच हे सारं निर्माण केलंय, मग त्याला काळजी तर असेलच ना. पर्जन्यसूक्त आहे म्हणून बाकी सगळी सूक्तं निर्माण झाली. हे अरण्य, रान, शिवार, डोंगर, दरी, समुद्र, नदी, झाड, फूल, फळ, जनन- प्रजनन, पानापानांतलं हरितद्रव्य, कणाकणातली आद्र्रता, ग्रंथीचं स्रवणं, शुक्राणूचं तरंगणं सारं सारं पावसा तुझ्यामुळेच आहे. अखिल जीवजातीचा मैतर आहेस तू.
काळाच्या अंगणात
अमावास्येचा अंधार नव्हता उमगलेला
वर्ष, महिने, वार अशा चौकटीही
नव्हत्या आखलेल्या
त्याच्या कितीतरी आधीपासून
तू येतोस,
तू वाहून आणलीस दिनदर्शिका
जी फडकते आमच्या भिंतीवर,
तुझ्यामुळेच संस्कृती उगवून आलीय
या मातीवर,
झाडांना पानातून थरथरणं
नद्यांना नागमोडी चालणं
तू शिकवलंस,
तुझ्या भरोशावरच
आम्हाला लागते तहान,
मातीत दबा धरून बसलेल्या
बियांची तपश्चर्या येते फळाला,
पक्ष्यांना घरटं
आणि कवींना गाणं
तू समजावून सांगितलंस..
पावसाचं हे आदिम अस्तित्व चराचरांत भिनलंय. ‘सी’ व्हिटॅमिन म्हणजे काय, हे माहीतही नसतं तेव्हा खाल्लेल्या चिंचांची निरपेक्ष चव अद्भुत असते. मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता चिंऽऽब झालेला क्षण अलवार असतो. सर्दी होईल, ताप येईल म्हणून खिडकीतून पाऊस पाहणाऱ्यांच्या पिंडाला पाऊस शिवत नाही. बोरकर, ग्रेस, शांताबाई, पाडगांवकर, महानोर आदींच्या पावसाळी कविता वॉच पाकिटात ठेवून भटकण्याचंही एक वय असतं. पावसाच्या नावानं शाळेला बुट्टी मारता येते तशी पावसाच्या निमित्तानं छत्रीतली जागा अधिक मोठीही होऊ शकते. पत्र्यांच्या माडीत पावसाची झड लागल्यावर झोपून राहण्यातली चैन ज्याने केलीय त्यालाच माहीत. आपण गोधडी पांघरून गुडुपचुप असताना पत्र्यावर पावसाचा ताशा वाजत असतो. बरेचदा सकाळी जाग आली तरी ताशा सुरूच असतो. फक्त कधी ताशाची तडम्तडम् वाढते, तर कधी मंद होते. पाऊस म्हणजे कांदाभजी खाण्याची मौज- इथंच अडकलेल्या अनुभूतीनं कालिदासाकडं एकदा बघावं. दूरदेशीच्या प्रेयसीला निरोप देण्यासाठी कालिदासानं मेघांना कामाला लावलं. पाऊस प्यालेला कवीच एवढी अफाट तरलता बाळगू शकतो. एरवी दुप्पट पैसे देऊनही आपलं पत्र कुरियरवाला वेळेत पोहचवत नाही. पाऊस म्हटल्याबरोबर दोन त्रासदायक अनुभव अपरिहार्यपणे समोर येतात. प्रेयसी आणि दुष्काळ. एक त्रास हवाहवासा आहे, तर दुसरा अनुभव जीवघेणा आहे. निरागस लेकरासारखा पाऊस दुडदुडत येतो. एवढय़ा प्रगत तंत्राच्या काळातही नाटकातील साधं दृश्य बदलायचं असलं तरी अंधार करून खाटखूट करावी लागते. इथं तर साऱ्या सृष्टीचंच रूपडं बदलायचंय. थोडंफार मागं-पुढं होणारच. डोळ्यांत प्राण आणून पावसाची वाट पाहणाऱ्यांचे चेहरे आपण नेहमी पाहत असतो. पण इकडे येण्यासाठी जिवाच्या आकांतानं तडफडणाऱ्या पावसाची ओढ कधी चर्चेचा विषय होत नाही. किती वर्षांपासून पाऊस येतोय. आला नाही की ओरडा होतो. मनमुराद पाऊस आल्यावर आपण भानावर नसतो. एवढय़ा दूरवरून संकटांना बाजूला सारीत लेकरू ओढीनं येतं. लेकराला डोकं पुसायला साधा कोणी टॉवेल देत नाही. चहा-पाणी विचारण्याचं तर सोडाच!
पावसावर लिहिलेल्या सगळ्या कविता पुढय़ात घेऊन बसलो. अपराधी वाटलं. सगळ्या कविता नकारात्मक होत्या. सृष्टीचं रंध्र रंध्र पाहा किंवा संस्कृतीचा पाया खोदून बघा, पाणीच दिसेल. तरीही पावसाचं चित्रण नकारात्मकच. कारण अनुभवच तसा होता. वॉश बेसिनला पाणी नाही म्हणून अस्वस्थ होणारे पाहताना, पंचवीस दिवस नळाला पाणी न येताही जगणारे लोक डोळ्यांसमोर येतात. अपराधीपण अधिक गडद होतं. दुष्काळ आहे. आधीही होता. कदाचित पुढंही असेल, पण प्रत्येक वेळी या कोरडय़ा दुष्काळाचा गळा धरण्याची खरी हिंमत पावसातच आहे. त्याला शिव्या द्या किंवा त्याच्यावर ओव्या रचा; शेवटी तोच देऊ शकतो हिरवा रंग या करपलेल्या मातीला. हे सारं मनोमन पटलं म्हणून सगळी नकारात्मकता झटकून वाजवली पावसाच्या गाभाऱ्यातली घंटा..
पाऊस पडावा
कोंब कोंब व्हावा
मातीतून गाणं
उगवावं
इथं पुन्हा निखळ पावसाची कविता उमटलीच नाही. ‘कोंब-कोंब व्हावा’ या मागणीमध्ये दुष्काळाची अदृश्य दहशत आहेच. नुसते हिरवे गालीचे अंथरून जमणार नाही; पडणाऱ्या पाऊस थेंबाचं धान झालं पाहिजे. कारण नंगी तलवार हातात घेऊन वस्त्यावस्त्यांतून भूक फिरत असते. मानवाची जातच नष्ट करण्याची क्षमता भुकेत आहे. नदी मनसोक्त वाहत नाही. तलावाची आटून मैदानं झाली. धरणांच्या टाक्या झाल्या. म्हणजे फुटक्या राजकारण्यांसारखं नशीब. वीतभर फणा काढून तहान छाताडावर बसलेली. अशा वेळी पावसाला मायबापा, दयाघना, वरुणराजा, घननिळा अशा हाका मारण्याशिवाय काही पर्याय नाही. आम्ही पावसाला ‘मायबापा’ म्हणतो म्हणून आमची संस्कृती मोठी, अशी पाठ थोपटून घेण्याची गरज नाही. रंगमंचावरचा नट प्रेक्षकांना ‘मायबाप’ म्हणतो तेव्हा नटाचं औदार्य चर्चेला येतं. पण प्रेक्षक हे खरोखरच सर्वार्थाने मायबाप असतात. प्रेक्षकांशिवाय नटाच्या अस्तित्वाला अर्थच नाही. असंच पावसाशी जोडलेलं आपलं अस्तित्व आपल्या पूर्वजांनी समजून घेतलं म्हणून पाऊस देव झाला. मायबाप झाला. आपलं अस्तित्व हादरतं, पणाला लागतं, तिथं भक्तिभाव निर्माण होतो. पायीची वहाण, पायी बरी म्हणून लाथाडलेली चप्पल पूजनीय होते. आपल्याला उजळून टाकणाऱ्या अस्तित्वाने स्पर्श केलेली वस्तूही ‘विशेष’ होते. अध्यात्मात आणि प्रेमात असा उत्कट भाव पाहायला मिळतो. मग प्रेयसीनं मंदिरात काढून ठेवलेल्या चप्पललाच फूल वाहिलं जातं. ते एक भारलेपण असतं. उगीच कुणी कुणाचा पूजक होत नाही. त्या अस्तित्वाचा लख्ख साक्षात्कार होतो तेव्हा नाती जोडली जातात. असे पावसाचे साक्षात्कार होत गेले. प्रचीती येत गेली आणि पाऊस एक अपरिहार्य कुलदैवत होऊन बसला. पर्जन्यसूक्त जन्माला आलं. लोकसंस्कृतीत पाऊसगाण्यांची तोरणं लोंबू लागली. पावसावर कविता लिहिल्याशिवाय कवींना कविपणाचा परवानाच मिळेना. खरं म्हणजे पावसात भिजला नाही तो माणूस नाही आणि पावसावर कविता लिहिली नाही तो कवीच नाही.
पावसाची वाट पाहणाऱ्या लोकांची करुण कहाणी ‘चिमणी- कावळ्या’च्या गोष्टीएवढी प्राचीन झालीय. आदिम काळापासून धापा टाकत येऊन पोहचणाऱ्या पावसाची कैफियत जाणून घ्यायची वेळ आलीय. त्यात आपण चालवलेली पर्यावरणाची नासाडीही उजागर करावी लागेल. पाऊस जीवघेणी वाट पाहायला लावतो हे खरं आहे. पण त्यानंच निर्माण केलेलं तोच नष्ट करणार नाही. कधी कधी रुसतो. अचानक बेपत्ता होतो. जीवजातींचे मरणासन्न हाल होतात. जिथं प्रेम आहे तिथं रुसवा येतोच. रुसायला आता जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. एरवी रुसायला प्रत्येकालाच आवडू शकतं. आमच्या गावातला एक तापट पोरगा बापाशी भांडला. रुसून कुठंतरी निघून गेला. सगळ्यांना वाटलं, डोक्यातला राग शांत झाल्यावर येईल वापस. पण पोरगं आलं नाही. र्वष लोटली. घरच्यांनी शोधाशोध केली. शेवटी तेरा-चौदा वर्षांनी पोरगं स्वत:हून वापस आलं. तापटपणा शांत झाला होता. डोईच्या जटा, दाढी वाढली होती. एखादा साधू संन्यासी दिसू लागला. घरच्यांना आनंद झाला. न्हाव्याला बोलावून त्याच्या जटा साग्रसंगीत कापण्यात आल्या. पोरगं शेतात रमलं. काही दिवसांनी चांगलं स्थळ बघून
त्याचं लग्न लावून देण्यात आलं. पुढं तो चांगला संसारी झाला.
तीन वर्षांपासून आपल्याकडंही पाऊस रुसून गायब झालाय. रुसण्याची कारणं काहीही असोत; या मोसमात रुसलेला पाऊस परतणार आहे. कुठल्या दुर्गम प्रवासातून त्याचे अधीर निरोप येतायत. पाऊस आल्याबरोबर त्याच्यावर विरोधी पक्षासारखे आरोप करीत सुटायचं नाही. आणि सत्ताधारी पक्ष होऊन पावसाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्नही करायचा नाही. परतलेल्या पावसाच्या वाढलेल्या जटा कापू. सुगंधी तेल लावून न्हावू घालू. कितीही मन बेभान झालं तरी या वेळी आठवणीने डोकं पुसायला त्याला टॉवेल देऊ. गरमागरम वाफाळलेला चहाचा कप पुढं करू. याचं असं झालं आणि त्याचं तसं झालं.. म्हणून भूतकाळ कुणी उगाळायचा नाही. झालं ते झालं. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सृष्टीचे विभ्रम फुलणार आहेत. तृषार्त मातीच्या डोळ्यांत तहान भागल्यावरचं समाधान दिसेल. जादूई मातीत नव्यानं काही उगवून येईल. कृपया कुठलंही प्रलोभन त्याला दाखवू नका. कुठल्याच प्रलोभनाच्या मखमली जोडय़ात त्याचा भक्कम पाया मावणारच नाहीए.
मैतरा, तुझा रियाज संपला असेल तर तुझा तो जीवदायी दीर्घ आलाप घे. एका आरोह- अवरोहातच आमची मैफल जिवंत होईल.
दासू वैद्य-dasoovaidya@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा