गायक कुमार गंधर्व आणि चित्रपटकार सत्यजीत राय यांना जाऊन यंदा २५ वर्षे होत आहेत, तर सर्जनशील वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या तिघांनी एकाच कालखंडात भारताला सुसंस्कृत व आधुनिक करणाऱ्या अभिजात कलाकृती सादर केल्या. आज तंत्रज्ञानाने आपले अवघे आयुष्य कवेत घेऊन त्याचे जे काही भजे केले आहे, त्या पाश्र्वभूमीवर या तिघांचे द्रष्टेपण खचितच उठून दिसते. या त्रिकूटाच्या कालजयीत्वाची मीमांसा करणारा लेख..
सतत उपकरणांच्या सहवासात राहण्यामुळे आपल्या मानसिक व सामाजिक जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. त्यांचा मागोवा अमेरिकेतील समाजमानसशास्त्रज्ञ शेरी टर्केल यांनी घेतला आहे. त्यांनी ‘अलोन टुगेदर- व्हाय वुई एक्स्पेक्ट मोअर फ्रॉम टेक्नॉलॉजी दॅन फ्रॉम इच अदर’ आणि ‘रिक्लेिमग कॉन्व्हस्रेशन- द पॉवर ऑफ टॉक इन डिजिटल एज’ या पुस्तकांतून त्यावर परखड भाष्य केले आहे. ‘‘सामाजिक माध्यम आणि आभासी वास्तव यामुळे आपले सांस्कृतिक आयुष्यच धोक्यात आले आहे. आत्मप्रेम आणि आत्ममग्नता यामुळे शिक्षण, सहजीवन, कौटुंबिक आयुष्य अशा सर्व क्षेत्रांची हानी होत आहे. अमेरिकेत संपर्क-जाळ्यापासून काही काळ मुक्त, प्रत्यक्ष व थेट संवादाच्या पुनस्र्थापनेची चळवळ मूळ धरीत आहे,’’ असे त्या म्हणतात.
अनेक संशोधकांचे संशोधनही याच अंगाने जात आहे. आपली संवेदनांद्रिये हळूहळू अक्षम होत आहेत. प्रकाशाचा लखलखाट वाढल्यामुळे डोळ्यांना आकाशातील तारे पाहण्याची क्षमता कमी झाली आहे. गोंगाट व ध्वनीच्या वाढत्या पातळीमुळे आपल्या कानांना सूक्ष्म आवाज ऐकू येईनासे झाले आहेत. अनेक गंध आपल्याला घेता येत नाहीत. निसर्ग आणि माणूस यांच्यातली फारकत तीव्र होत चालली आहे. त्याचे खोल परिणाम माणसावर होत आहेत. बदललेल्या पर्यावरणामुळे कित्येकांना भयगंड (इकॉलॉजिकल फोबिया) होत आहे. आपल्याच भूमीपासून परके होत जाण्याच्या भावनेतून येणाऱ्या मानसिक तणावाला प्रो. ग्लेन अल्ब्रेख्त यांनी ‘सोलॅस्टॅल्जिया’ (कुठल्याही समाधानापासून वंचित) ही संज्ञा दिली आहे. एकाग्रता, शांतता आणि चिंतन नष्ट करणाऱ्या या काळाला ‘लक्ष विचलित करणारा काळ’ (एज ऑफ डिस्ट्रॅक्शन) असे संबोधन दिले गेले आहे. सभोवतालचा गोंगाट, कर्कशता नष्ट करून मनाला उभारी देणाऱ्या ‘स्पेस’चा शोध आज प्रत्येक जण घेतो आहे. अतीव वेगाने धावणाऱ्या या अशांतपर्वात मनाला शांत करणारा विलंबित स्वर जो-तो शोधतो आहे. आज कुठेही जा- एकांतवास लाभत नाही. आपल्याच घरातली ‘स्पेस’ खटकत राहते. त्यामुळे वारंवार अंतर्गत सजावट बदलून नावीन्य मिळवण्याची पराकाष्ठा केली जाते. तरीही आपल्याच घरात आपण पाहुणे असल्याचा त्रास होत राहतो. स्वतपासून आणि जगापासून तुटल्याची भावना आतून कुरतडत राहते. अशा बिकट काळातही काही शाश्वत गोष्टी माणसाला मन:शांती देऊ करतात. पं. कुमार गंधर्व, लॉरी बेकर आणि सत्यजीत राय यांची सृजनसृष्टी यादृष्टीने आपल्याला समृद्ध करत राहते.
यंदा कुमार गंधर्वाचा (१२ जानेवारी), सत्यजीत राय यांचा (२३ एप्रिल) २५ वा स्मृतिदिन आणि लॉरी बेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष (२ मार्च) आहे. लॉरी बेकर (१९१७-२००७), सत्यजीत राय (१९२१-१९९२), कुमार गंधर्व (१९२४-१९९२) या तिघांनीही एकाच कालखंडात भारताला सुसंस्कृत व आधुनिक करणाऱ्या अभिजात कलाकृती सादर केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले असताना या तिघांच्या कलाविष्काराचा बहर सुरू झाला. १९४८ च्या सुमारास लॉरी बेकर यांनी उत्तर प्रदेशात कुष्ठरोग्यांकरिता वसाहती व रुग्णालये उभारण्याचे कार्य हाती घेतले. याच काळात क्षयाची बाधा झाल्याने कुमारांनी मुंबईहून देवास येथे आपले वास्तव्य हलवले. त्यांना गायनास डॉक्टरांनी बंदी केली होती. त्यांच्या कानावर माळव्यातले लोकसंगीत आणि नाथपंथीयांची भजने पडत होती. या काळातील त्यांच्या संगीतविषयक चिंतनातून ‘धून उगम राग’, ‘निर्गुणी भजन’, ‘ऋतु संगीत’, ‘माळवा की लोकधूने’ या निर्मितींची बीजे पडली. याच सुमारास व्हिट्टोरिया डी’सिका यांचा ‘द बायसिकल थिव्हज्’ हा चित्रपट पाहून सत्यजीत राय यांच्या मनात ‘पाथेर पांचाली’चा अंकुर फुटला. या तिघांची सर्जनशील यात्रा आयुष्याच्या अखेरीपर्यंत अखंड सुरू राहिली. तिघांच्या वेगवेगळ्या कलांमधील सौंदर्याने आपल्या आयुष्याला चौथी मिती प्राप्त झाली. बेकर यांनी आपल्या सभोवतालच्या निर्गुण, निराकार अवकाशाला अर्थ प्राप्त करून दिला. राय यांनी शब्दाविना संवाद साधत चित्रपटाला संगीत व काव्याच्या पातळीवर नेलं. कुमारांनी चतन्यमयी स्वरसृष्टीतून विश्वरूपदर्शन घडवलं. बेकर यांनी अर्वाचीन काळात आपल्याला शांत ‘अवकाश’ देऊ केला. तर राय यांनी चित्रपटांतून आणि कुमारांनी गायनातून आपल्याला अंतर्मुख केले. या तिघांच्या कलाकृती आजही जगण्यासाठी आधार देतात असं मानणारे असंख्य लोक जगभर पसरले असून त्यात वरचेवर भर पडत आहे.
प्राचीन काळापासून पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट अशी अनेक द्वंद्वे चालत आली आहेत. ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर, गांधी व नेहरू यांना साधली. अमर्त्य सेन, पं. रविशंकर, कुमार गंधर्व, सत्यजीत राय व लॉरी बेकर यासारख्यांनी त्यांचा वारसा आणखीन प्रगल्भ करून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवण्याचे कार्य केले. विविध क्षेत्रांतील अनेक पिढय़ांमध्ये आजही या तिघांचा प्रभाव जाणवतो.
जे. कृष्णमूर्ती यांचा ‘कसलाही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक क्षण नव्याने जगा’ असा आग्रह होता. सतत नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या कुमार, बेकर व राय या तिघांनीही ‘तेच ते’ला अजिबात थारा दिला नाही. बेकर ‘एका साच्याची घरे म्हणजे न-कला!’ असे म्हणत. तर कुमार ‘कालसारखाच राग आज म्हणणे हे गायकाचे लक्षण नाही’ असे मानत. मुख्य प्रवाहातील वास्तुविशारद हे लॉरी बेकर यांना ‘कारागीर’ म्हणून हिणवत, तर अनेक गायक ‘कुमार गंधर्वाची गायकी अगम्य आहे’ अशी टिप्पणी करीत. सध्याचे घरबांधकाम व इमारती पाहून वास्तुकलेच्या प्रवासाबद्दल काय वाटते, असा प्रश्न विचारला असता बेकर म्हणाले, ‘‘व्यावसायिक वास्तुविशारदाला कलावंत म्हणता येईल का, असेही आपल्याला विचारता येईल. ‘कला म्हणजे सौंदर्याची निर्मिती’ अशी व्याख्या शब्दकोशात आहे. सौंदर्य म्हणजे काय, असा पुन्हा प्रश्न येईल. बघितल्यावर नजरेला बरी वाटावी अशी निर्मिती म्हणजे सौंदर्य असे मी मानतो. सध्याचे बांधकाम व इमारती या कलेचा आविष्कार आहेत असे म्हणता येईल का, (अपवाद- एखादे सतीश गुजराल!) असा प्रश्न मला पडतो.’’ कुमार गंधर्वही ‘‘स्वरांचा आघात आधी (स्वतच्या) आतमध्ये झाला पाहिजे. स्वर असो वा व्यंजन; त्यांची अनुभूती आत झाली तर गळ्यातून ते समर्पकपणे बाहेर येते. विचार न करता स्वरांची व लयींची कसरत करणाऱ्यांना गायक का म्हणायचे?’’ असा सवाल विचारत. ‘‘ख्यालगायन म्हणजे विचारमांडणी असते,’’ असे ते म्हणत. समग्रता हा त्यांच्या विचारांचा आत्मा होता. त्यांनी कधीच शब्द, स्वर, लय, भाव व राग यांचा सुटा विचार केला नाही. ते रागांचा क्रम, बंदिशींची निवड व मफलीचा अभिकल्प विचारपूर्वक करीत. मफल म्हणजे त्यांचे विधान असे. सत्यजीत राय यांच्या चित्रपटांतील एकही फ्रेम अनावश्यक वाटत नाही. बेकर यांच्या वास्तूमध्ये उपयोगिता व सौंदर्य यांचा अप्रतिम संगम साधला जातो. तिथे मखरी सजावटीला अजिबात स्थान नाही. त्याचप्रमाणे कुमारजींच्या गायनात एकही जागा विनाकारण येत नसे. राय यांचे चित्रपट, बेकर यांच्या वास्तू आणि कुमारांचे गायन एकदा अनुभवून आपले समाधान होत नाही. त्यांना वारंवार भेटी दिल्या तरी दरवेळी नवीन काहीतरी हाताला लागतेच. अनुभव व क्षमतेप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पदरात काही ना काही वा बरेच काही घेत असतो.
राय हे प्रत्येक दृश्याचा बारकाव्यांनिशी, तपशिलांसह विचार करून चित्रीकरण करत असत. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्यात सुधारणा करण्याबाबत ते काटेकोर असत. ‘देअर इज ऑलवेज सम रूम फॉर इम्प्रोव्हायझेशन..’ असं ते म्हणत. अभिकल्पात ऐनवेळी स्थळ व गरज यांना अनुरूप बदल करणे हे बेकर यांचेही वैशिष्टय़ होते. त्यांनी झाडाला धक्का न लावता त्याभोवती जिना देऊन इमारतच गोल करून टाकली. ‘संगीतापासून मिळणारा आनंद हा उच्च कोटीचा तृप्ती देणारा आनंद आहे,’ असे कुमार म्हणत. परंतु ते स्वत: मात्र कधीच तृप्त झाले नाहीत. ‘तुम्ही लवकर तृप्त होता!’ ही उलट श्रोत्यांबद्दल त्यांची तक्रार असे.
बेकर यांनी सदैव पर्यावरणाशी तादात्म्य पावणाऱ्या रचना निर्माण केल्या. लोकगीत किंवा ओवी जशी साधी असते तशा बेकर यांच्या वास्तू कमालीच्या साध्या व अनाग्रही आहेत. ‘पंचक्रोशीतील सामग्रीतून आपल्या गरजा भागवल्या पाहिजेत,’ हा गांधीजींचा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. ‘‘देशाची पुनर्रचना कशी व्हावी याविषयी सातत्यानं मांडणी करणारे गांधीजी हे एकमेव नेते होते. पाश्चात्त्य विचार आणि वास्तुकलेचे संस्कार असल्यामुळे वयाच्या तिशीत मला त्यांचा सल्ला पचत नव्हता. परंतु वय आणि अनुभव वाढत गेले तसे गांधीजींचे द्रष्टेपण उमजत गेले,’’ असं बेकर प्रांजळपणे म्हणत. स्थानिक सामग्रीचा सर्जनशील वापर हे त्यांचं वैशिष्टय़ झालं. ‘‘आधी भाषा तयार झाली, व्याकरण मागाहून आले. धून हेच रागांचं उगमस्थान आहे,’’ असं ठणकावून सांगत कुमारजींनी लोकसंगीताची महती पुढे ठेवली. ‘(राग)बंधनातील स्वातंत्र्य’ घेत कुमारांनी स्वरसृष्टी घडवली.
कुमार म्हणत, ‘‘राग हे अरूप व अमूर्त असतात. राग म्हणजे आत्मा, तर बंदिश हे शरीर! वेगवेगळी शरीरे धारण केली की एकाच रागाची असंख्य रूपे दिसायला लागतात.’’ बेकर यांनी साध्या व नेहमीच्या आकारांना अर्थ दिला. तऱ्हेतऱ्हेच्या आकारांशी खेळणे हा बेकर यांचा खास छंद होता. दोन स्वर नकळत एक होऊन जातात, तसे हे आकार एकमेकांत सहज मिसळून जायचे. त्यांनी केलेली त्रिमिती सघन आणि सेंद्रिय होऊन जाते. प्रकाश आणि हवा यांच्या संगमातून त्यांनी निर्माण केलेली स्पेस आल्हाददायी व सचेत होते. त्यांच्या वास्तूंमधून प्रकाशाला मोहकता आणि स्पेसला शांतपण प्राप्त होते. त्या वास्तूंमधील रंगछटा आणि गंध मनाला मोहवून टाकतात. जोहान गटे यांच्या ‘वास्तुकला म्हणजे गोठवलेले संगीत’ या प्रतिपादनाची त्यातून प्रचीती येते. ही अनुभूती घेताना कुमार गंधर्वाची मालवबिहाग रागातील अवर्णनीय बंदिश मनात घुमत राहते. कुमारांना चित्र, शिल्प व वास्तुकलेत खास रुची होती. ‘गायन म्हणजे स्वरांनी केलेले चित्र वा शिल्प’ असं ते मानत. कुमार मोठय़ा आवडीने प्राचीन व समकालीन वास्तू पाहत असत. वास्तुशिल्पी शिरीष पटेल यांनी कुमारांना चंडिगड दाखवून त्या नवनिर्माणाची महती सांगितली. ल कार्बुझ्ये यांची ती संकल्पना पाहून थक्क झालेल्या कुमारांनी स्वतच्या अवस्थेबद्दल म्हटलंय-
‘ये सब खेल ज्ञानी महा धीर के
रूप बुलायो, छिपाग्यो, डरायो, मोहायो
सोचही-सोच सुधर सब बन्यो है
अंग निहारू, बहारू भीतरू देखायो’
बेकर यांची कुठलीही निर्मिती पाहताना आपली अवस्था अगदी अशीच होते.
तोवर समाजसुधारणांबाबत अग्रेसर असलेल्या मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता हळूहळू नष्ट होत चालल्याची जाणीव राय आणि बेकर यांना १९८० च्या दशकातच झाली होती. आत्ममग्न व स्वकेंद्री मध्यमवर्गीयांचा हा मूल्यऱ्हास राय यांच्या ‘गणशत्रु’, ‘शाखा-प्रशाखा’ आणि ‘आगंतुक’ या चित्रपटांतून स्पष्टपणे जाणवतो. याच सुमारास एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे बीजभाषण करताना लॉरी बेकर म्हणाले होते, ‘‘गरीबांच्या दारिद्रय़ाला आपणच पूर्णपणे जबाबदार आहोत. आपली जीवनशैली व मागणी यामुळे बाजारपेठ घडते आणि आदिवासी विस्थापित होऊन भिकेला लागतात.’’ निसर्गाचा विनाश करून संपत्तीची निर्मिती करण्यात सक्रिय सहभागी असणारे मध्यमवर्गीय हे नव-गुन्हेगार आहेत, हे राय आणि बेकर यांनी आपापल्या माध्यमांतून दाखवून दिले. (महेश एलकुंचवार यांची ‘युगान्त’ ही नाटय़त्रयी याच काळातील असून त्यातही हे ऱ्हासपर्व अधोरेखित होते.) आपल्याकडून होणारा निसर्गाचा अव्हेर, उदारता आणि मानवता जपणाऱ्या मूल्यांपासून ढळणे या असंस्कृतपणाच्या यातना कुमार, बेकर आणि राय यांना होत होत्या, हे त्यांच्या कलाकृतींतून जाणवत राहते.
सत्यजीत राय यांनी आपल्या चित्रपटांतून समकालीन सामाजिक व सांस्कृतिक जीवनावरील मर्मभेदक भाष्य करीत दिशादर्शनही केले. त्यांच्याप्रमाणेच बेकर यांनीही कधी कुठले तत्त्वज्ञान सांगितले नाही. दोघेही त्यांच्या कलाकृतींमधून समर्थपणे व्यक्त होत राहिले. आणि दोघेही सुस्पष्ट भूमिका घेताना कचरले नाहीत. कित्येकदा सखोल विचारातून आलेली भूमिका ही भावनांच्या आहारी जाणाऱ्या सामान्यांच्या लक्षात येत नाही. प्रस्थापित वर्गाच्या हातात असंख्य साधने असतात. त्यांचा वापर करून स्वतच्या बाजूने मत घडविण्यात प्रस्थापित वाकबगार असतात. ‘अल्पखर्ची म्हणजे फालतू’, ‘दगड-विटांची घरं ही गरीबांची’ असे समज त्यातून रूढ व दृढ होत गेले. बेकर यांनी उर्मट, बेसूर व भेसूर बांधकामांची खिल्ली उडवली आणि श्रीमंतीचा दर्प असलेल्या वास्तूंना मूकपणे चपराक हाणली. सत्ताधारी, नोकरशहा व कंत्राटदार हे एकवटून ‘बेकर यांची ही भूमिका जनतेच्या विरोधातील आहे’ असा भास निर्माण करीत. बेकर त्यामुळे ‘एकला चलो’ मार्गाने जात राहिले. राय यांनी हे राजकारण ‘गणशत्रु’ चित्रपटात उलगडून दाखवलं आहे.
बेकर, राय आणि कुमार या तिघांची कधी भेट झाल्याचा उल्लेख सापडत नाही. बेकर यांच्या वास्तूंमध्ये कुमारांचे गायन झाले असते आणि ते राय यांच्या नजरेने टिपून दाखवले असते तर या त्रिकुटाच्या संमेलनातून अभिजातपर्वाची स्वाक्षरी असलेली कलाकृती खचितच निर्माण झाली असती.
सामान्यजन, कलावंत आणि शास्त्रज्ञ यांचे आयुष्य साधारणपणे सारखेच असते. परंतु कलावंत आणि शास्त्रज्ञांचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म असते. त्यांची संवेदनशीलता तरल असते. त्यामुळे ते खूप खोलवर बुडी मारून आपल्या हाती अनमोल रत्ने देतात. १९६१ साली कुमारांना देवासमधील वसंत ऋतू खुपत होता. त्या वर्षी आंब्याला मोहोरच आला नाही. त्यावर भुंगे गुणगुणले नाहीत. फुलांचा रंग खुलला नाही. ही भावना व्यक्त करताना कुमारजींनी बहार रागात बंदिश रचली..
‘ऐसो कैसो आयो रीता रे,
अंबुवा पे मोर ना आयो,
कऱ्यो ना गुंजारे भंवरा रे
पीर बढय़ोरे कोयल की
रंग ना खिल्यो हे फुलवारे’
अगदी त्याच काळात अमेरिकेत कार्सनबाईदेखील तिथल्या वसंत ऋतूमुळे हैराण होऊन ‘सायलेंट स्प्रिंग’च्या पहिल्या परिच्छेदात लिहितात, ‘‘निसर्गाने सर्व काही मुक्तहस्ते बहाल केले आहे असे नयनमनोहर गाव होते. अचानक एका विचित्र आजाराने त्याला घेरले. एकाएकी अनेक पक्षी मरून पडू लागले. कित्येक पक्ष्यांना उडताच येईना. पक्ष्यांचे कूजन थांबले. सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट नष्ट झाला. सगळीकडे भयाण स्मशानशांतता पसरली. वाणी हरवलेल्या केविलवाण्या पक्ष्यांच्या सान्निध्यातला तो जीवघेणा मूक वसंत होता.’’
हजारो मलांच्या अंतरावरील कार्सनबाई आणि कुमारजी दोघांचीही अवस्था सारखीच होती. दोघांनीही निसर्गातील अतिशय सूक्ष्म बदल टिपले होते. ते त्यांना भयसूचक वाटत होते. घटना एकच असली तरी त्यात खोलवर बुडी मारून कलावंत व शास्त्रज्ञ हे त्यांच्या संवेदनांद्रियांद्वारे आपल्याला नवी दृष्टी देत असतात. दोघे दोन दिशांनी प्रवास करत एकाच निष्कर्षांला येतात. ‘आता आपल्या कानांना श्रुती ऐकू येत नाहीत..’ हे निदान कुमार गंधर्व यांनी १९८० च्या सुमारास केले होते. आपल्यावर तंत्रज्ञानाने स्वार होणे या तिघांना कधीच पटले नाही.
काळाची कसोटी कठोर असते. भले भले काळाच्या ओघात गडप होतात. सतत नवता देऊ शकणारे अतिशय विरळा असतात. नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम कसा घडवावा? हे कायमच आव्हान असते. िवदा करंदीकरांनी नेमक्या शब्दांत म्हटलंय, ‘प्रतिभावंताला परंपरेत एकाच वेळी आधार आणि आव्हान दोन्ही दिसत असतात. परंपरेला सामोरे जाताना तो जो नजराणा पुढे करतो, त्याचेच नाव नवता!’ राज्यशास्त्राचे संशोधक पद्मभूषण लॉइड रूडॉल्फ यांनी ‘परंपरेला आधुनिक रूप देऊन सामाजिक सुधारणा घडवणारे क्रांतिकारक’ असे गांधीजींच्या चळवळींचे विश्लेषण केले आहे. हीच मीमांसा बेकर, राय आणि कुमार यांच्या कलांना लागू करता येते. परंपरा आणि नवतेचा अपूर्व संगम घडवणारे बेकर, राय आणि कुमार यांच्या कलाकृती म्हणूनच कालजयी ठरतात. त्यामुळेच आपल्याला पुनपुन्हा त्यांच्याकडे यावे लागते.
अतुल देऊळगावकर atul.deulgaonkar@gmail.com