महात्मा गांधींचे पहिले राजकीय लेखन १४ ऑगस्ट १८९६ रोजी प्रसिद्ध झाले. ‘द ग्रिव्हन्सेस ऑफ दी ब्रिटिश इंडियन्स इन साऊथ आफ्रिका : अ‍ॅन अपील टू द इंडियन पब्लिक’ या नावाची ही पुस्तिका ‘ग्रीन पॅम्प्लेट’ (हरित पत्रिका) म्हणून सर्वत्र ओळखली जाते. त्यातून गांधीजींचे राजकीय तत्त्वज्ञान प्रथमच जगासमोर आले. भारतीय स्वातंत्र्यदिनी या पुस्तिकेला १२० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने..
१२० वर्षांपूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट १८९६ रोजी बॅरिस्टर एम. के. गांधी यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. गांधी तेव्हा २७ वर्षांचे होते. मोहनदास करमचंद गांधी यांच्या ‘महात्मा गांधीं’कडे होणाऱ्या प्रवासाची ती अधिकृत नांदी होती.
‘द ग्रीव्हन्सेस ऑफ ब्रिटिश इंडियन्स इन् साऊथ आफ्रिका-अ‍ॅन अपील टू इंडियन पब्लिक’ या लांबलचक शीर्षकाची ही पुस्तिका ‘ग्रीन पॅम्फ्लेट’ म्हणून जागतिक राजकीय इतिहासात मान्यता पावली. या पुस्तिकेचे कव्हर हिरवे असल्याने तिचे ‘हरित पत्रिका’ हे नाव जगन्मान्य झाले.
ही पुस्तिका लिहिणे, छापणे, प्रसिद्ध करणे व वितरित करणे ही सर्व कामे गांधींनी जुलै- ऑगस्ट या महिन्यात राजकोट मुक्कामी केली. ही पुस्तिका वीस पानी असून त्याच्या चार हजार प्रती तयार करण्यात आल्या होत्या.
या पुस्तिकेपूर्वी गांधींनी काही लिखाण केले होते का? होय. दक्षिण आफ्रिकेत असताना १८९४ च्या सुरुवातीला ‘गाइड टू लंडन’ ही छोटेखानी पुस्तिका त्यांनी लिहिली होती. भारतातून शिक्षणासाठी लंडनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर अशी ही पुस्तिका होती. पण ती त्यांनी प्रकाशित केली नसावी. त्याशिवाय लंडनहून त्या काळात प्रसिद्ध होणाऱ्या ‘व्हेजिटेरियन’ या नियतकालिकात त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत.
‘हरित पत्रिका’ लिहिण्यासाठी गांधी का प्रवृत्त झाले, हे थोडक्यात व स्पष्टपणे जाणण्यासाठी आपल्याला एप्रिल १८९३ पर्यंत मागे जायला हवे.
१८९१ ला गांधी बॅरिस्टर होऊन लंडनहून भारतात परतले. त्यानंतरच्या दोन वर्षांत आपल्या वकिली व्यवसायाचा जम बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. पत्नी व दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. आफ्रिकेत त्या काळी जहाज वाहतुकीचा धंदा करणारी दादा अब्दुल्ला अ‍ॅण्ड कंपनी अस्तित्वात होती. या कंपनीचे एक भागीदार अब्दुल करीम जव्हेरी त्यावेळी पोरबंदरला होते. गांधींसारख्या तरण्या बॅरिस्टरची आफ्रिकेतील कज्जा सोडविण्यास मदत होईल, या हेतूने त्यांनी गांधींसमोर दक्षिण आफ्रिकेत येण्याचा प्रस्ताव ठेवला. गांधींनी तो मान्य केला.
१८९३ च्या मेमध्ये गांधी दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे पोहोचले. त्यानंतर लगेचच त्यांचे तिथल्या परिस्थितीचे निरीक्षण सुरू झाले. आफ्रिकेतील सुखवस्तू मुस्लीम व्यापारी व पारशी कारकून यांची सामाजिक परिस्थिती शोचनीय होती. हिंदू मजूर, हमाल, सफाई कामगार, फेरीवाले हे सर्व ‘कुली’ म्हणून ओळखले जात. आता हा पहिलावहिला हिंदू बॅरिस्टरही ‘कुली’ बॅरिस्टर ठरला होता.
दरबान ते प्रिटोरिया रेल्वे प्रवासात ७ जून १८९३ रोजी पीटरमॅरित्झबर्ग स्थानकात गांधींना अवमानास्पद वागणूक देण्यात आली. ‘हरित पत्रिके’त केलेल्या वास्तववादी सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या वर्णनाचे बीज इथेच रोवले गेले असावे. प्रिटोरियात दादा अब्दुलांच्या दाव्यात वकिली करणे हे जरी गांधींचे प्रमुख काम असले तरी त्यासोबत ते इतरही कामांत गुंतले होते. तेथील भारतीयांना त्यांच्या हक्कांची जणीव करून देणे, तसेच आपल्या गाऱ्हाण्यांना वाट करून देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा त्यांचा उद्देश होता.
दादा अब्दुलांबरोबरचा करार संपल्यावर गांधी १८९४ च्या मेमध्ये दरबानला परतले. दरबानला स्थायिक होऊन वकिली करायची आणि त्या उत्पन्नाच्या आधारे स्वयंसेवक म्हणून हिंदी रहिवाशांच्या राजकीय हक्कांसाठी लढायचे असे त्यांनी ठरविले.
त्याच सुमारास ‘नाताळ मक्र्युरी’ या स्थानिक वृत्तपत्रातील ‘इंडियन फ्रॅन्चाइज’ या मथळ्यातील बातमी त्यांच्या वाचनात आली. नाताळ विधानसभेमध्ये तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासंबंधीचे विधेयक दाखल करण्यात आले होते. गांधींनी त्याबाबत स्थानिक भारतीयांचे जनमत जागृत केले. त्यासाठी मे १८९४ मध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर मताधिकार मोहिमेची सुरुवात झाली. नाताळमधील हिंदी लोकवस्ती संख्येने जेमतेम लाखभरसुद्धा नसेल, परंतु सर्व धर्माचे, जातींचे, वर्गातले लोक या संस्थेत गुंतू लागले. अडीचशे मतदारांचा मतदानाचा हक्क एवढय़ाच स्वरूपात जरी या कामाची सुरुवात झाली असली; तरी लवकरच हिंदी लोकांना मानाने जगता येणे, आपली नागरिकत्वाची कर्तव्ये पार पाडता येणे आणि मगच आपले हक्क मागणे- असे स्वरूप या लढय़ाला प्राप्त झाले.
आफ्रिकेच्या वास्तव्यातील १८९४ हे वर्ष गांधींच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या पायाभरणीसाठी आणखी एका दृष्टीने महत्त्वाचे आहे. याच वर्षी लंडनमधील एडवर्ड मेटलंड यांनी गांधींना लिओ टॉलस्टॉयचे ‘दी किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ हे पुस्तक भेट म्हणून पाठवले. ‘टॉलस्टॉयच्या वाचनामुळे आपल्यातील संशयात्मा शांत झाला आणि आपला हिंसेवरील विश्वास उडून आपण अहिंसेचे महत्त्व समजून घेतले,’ अशी नोंद गांधींनी केली आहे.
गांधी वकील म्हणून दक्षिण अफ्रिकेत वर्षभर राहिले. त्यांच्या लक्षात आले की, हातात घेतेलेले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला बराच काळ दरबानला राहावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन येणे आवश्यक आहे. जून १८९६ पासून आपण सहा महिने रजेवर जाणार आहोत, असे गांधींनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी त्यांचे सहकारी व इतर सन्माननीय नागरिकांनी गांधींना विनंती केली की, तुम्ही भारतात इथल्या परिस्थितीविषयी आवाज उठवा.
भारतातल्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात तेथील जनमत आफ्रिकेतील भारतीयांबद्दल तयार करण्यासाठीच ‘ग्रीन पॅम्फ्लेट’ या तपशिलावर दस्तावेजाची (डॉक्युमेंट) तजवीज गांधींनी चिकाटीने व आस्थेने केली.
५ जूनला गांधी दरबानहून निघाले. ४ जुलै १८९६ रोजी ते कलकत्त्याला पोहोचले. एक महिन्याच्या जहाजप्रवासात त्यांनी या संभाव्य पुस्तिकेचा आराखडा तयार केला असावा. गांधींचे बरेचसे लेखन प्रवासात पार पडले. ते दोन्ही हातांनी लेखन करत असत.
९ जुलैला ते राजकोटला पोहोचले. ते आल्यानंतर राजकोटच्या घराचे रूपांतर कार्यालयात झाले. लिखाणाला त्यांनी अग्रक्रम दिला. ‘द ग्रीव्हन्सेस ऑफ ब्रिटिश इंडियन्स इन साऊथ आफ्रिका’ ही पुस्तिका त्यांनी महिनाभरात लिहून काढली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवर तेथील वंशवादी धोरणाचा कसा प्रतिकूल परिणाम होत आहे, हे अतिशयोक्ती न करता अत्यंत तपशीलवारपणे या पुस्तिकेत त्यांनी मांडले आहे. या लेखनाला गांधींचे सखोल निरीक्षण, अभ्यास व जिज्ञासेची पाश्र्वभूमी आहे. लेखनातील भाषा साधी व सोपी आहे. गांधींच्या पुढील सर्व लेखनात त्यांचे हे गुण प्रकर्षांने दिसून येतात.
गांधींनी या पुस्तिकेच्या ४००० प्रती काढल्या. भारतातील मान्यवर राजकारणी आणि समाजकारणी मंडळींना त्यांनी त्या स्वखर्चाने पाठवल्या. नुसते लेखन, प्रकाशन, विपणन एवढय़ावर गांधींचे समाधान होणे शक्य नव्हते. या पुस्तिकेच्या आधारे जनमत तयार करण्यासाठी त्यांना भारतभर फिरून चर्चा, व्याख्याने देण्याची गरज वाटत होती. त्यासाठी त्यांनी मुख्यत्वेकरून मुंबई, पुणे, मद्रास, कलकत्ता येथील भारतीय राजकाण्यांशी संपर्क साधला. भारतीय भाषिक व इंग्रजी वृत्तपत्रांशी संपर्क साधून त्यांत बातम्या दिल्या, लेख लिहिले.
तोपर्यंत गांधी व त्यांचे दक्षिण आफ्रिकेतील योगदान याबद्दल भारतीय जनता अनभिज्ञ होती. गांधींच्या या उपक्रमामुळे तोवर दुर्लक्षित असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या स्थितीकडे भारतीय जनतेचे प्रथमच लक्ष वेधले गेले.
२६ सप्टेंबर १८९६ ला मुंबईच्या फ्रामजी कावसजी सभागृहात, सर फिरोजशहा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा झाली. गांधींनी पुस्तिकेच्या आधारे दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीबद्दल सविस्तर विवेचन केले. विशेष म्हणजे २७ सप्टेंबरच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने त्याचा सविस्तर वृत्तांत छापला. पुण्यात रानडे, टिळक, गोखले, भांडारकर यांच्यासमवेत सभा झाली. त्यानंतरची महत्त्वाची सार्वजनिक सभा मद्रास येथे पच्चय्याप्पा हॉलमध्ये २८ ऑक्टोबर रोजी झाली. विशेष म्हणजे या सुमारास ‘हरित पत्रिके’ची पहिली आवृत्ती संपली होती. त्यामुळे गांधींनी आपल्या व्याख्यानाच्या प्रती मद्रासच्या दी प्रिन्स करन्ट प्रेसमधून छापून घेऊन भाषणापूर्वी श्रोत्यांना वाटल्या. याच प्रेसमधून ‘हरित पत्रिके’ची दुसरी आवृत्तीही छापण्यात आली. (आंतर्जालावर आपण ही आवृत्ती वाचू शकतो.) मद्रासमध्ये असताना ‘द हिंदू’ या अग्रगण्य वृत्तपत्राच्या संपादकांना (जी. सुब्रह्मण्यम अय्यर) आभाराचे पत्र पाठवण्यास ते विसरले नाहीत.
३१ ऑक्टोबरला ते कलकत्त्यास पोहोचले. तिथे त्यांनी याच विषयासंदर्भात सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ज्योतिंद्रमोहन ठाकूर या नेत्यांची भेट घेतली. तसेच तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्र ‘दी इंग्लिशमन’ (आताचे ‘दी स्टेट्समन’) चे संपादक साँडर्स यांच्याशी चर्चा केली.
१४ ऑगस्ट १८९६ ते ३१ ऑक्टोबर १८९६ या अडीच महिन्यांत गांधीजींच्या या पहिल्या पुस्तिकेने भारत, इंग्लंड व दक्षिण अफ्रिकेत राजकीय वादळ निर्माण केले. त्याचीच प्रतिक्रिया व परिणाम म्हणून १२ नोव्हेंबरला कलकत्तामुक्कामी गांधींना दक्षिण आफ्रिकेतून दादा अब्दुल्लांची तार आली की, ‘इथली परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे. तुम्ही लगेचच इथे परतावे.’
गांधी लगेचच मुंबईत आले. तिथून एक दिवसासाठी पुण्यात येऊन त्यांनी पुण्यातील सामाजिक संस्था ‘सार्वजनिक सभे’साठी एक सभा घेतली. मुंबईला परतल्यावर ३० नोव्हेंबरला त्यांनी कलकत्त्याला व्हाईसरॉयला तार केली. ट्रान्सवाल सरकारने स्थानिक भारतीयांवर सुरू केलेल्या धाकदपटशाबद्दलचा उल्लेख त्यात होता. त्याच दिवशी ते पत्नी कस्तुरबा व दोन मुले ‘एस. एस. कुरलँड’ या बोटीने नाताळला (दरबान) जाण्यासाठी निघाले.
१८ डिसेंबर १८९६ ला बोट दरबानला पोहोचली. पण त्यानंतर १३ जानेवारी १८९७ पर्यंत बोटीत आणि नंतर काही महिने दरबानमध्ये ज्या भीषण राजकीय नाटय़ाला गांधींना तोंड द्यावे लागले त्याचे वर्णन विस्तारभयास्तव इथे करीत नाही. या राजकीय नाटय़ाचे एकमेव कारण म्हणजे गांधींची ‘हरित पत्रिका’!
या हरित पत्रिकेचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिल्या भागाला ‘दी क्रेडेन्शियल्स’ असे नाव आहे. हा भाग २५ मे १८९६ ला पूर्ण केलेला आहे. मधला व मुख्य भाग १४ ऑगस्ट १८९६ ला लिहून संपवला आहे. शेवटचा तिसरा भाग ‘नोट्स’ हा नंतर- म्हणजे २२ सप्टेंबर १८९६ ला जोडलेला आहे.
या हरित पत्रिकेमुळे भारतीय जनमानसामध्ये वादळ उठले, हे नक्कीच. भारत, इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेमधील इंग्रजी वसाहतवादी राजकारणात प्रथमच खळबळ उडाली. यामागे तत्कालीन पत्रकारिताही कार्यरत होती, हे आवर्जून नमूद करायला हवे. गांधी दक्षिण आफ्रिकेहून मायदेशी आले. ते प्रथम कलकत्त्यात उतरले, हे आपण पाहिले. नंतर लगेचच ते अलाहाबादला गेले. (६ जुलै १८९६) तिथे दी पायोनियर’ या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक मि. चेस्ने यांनी गांधींची विस्तृत मुलाखत घेतली. गांधींनीच लिहून ठेवलंय की, ‘ही मुलाखत माझ्या नाताळमधील भयानक राजकीय सूडनाटय़ाचा पाया होय.’ त्यानंतर भारतीय भाषिक व इंग्रजी वृत्तपत्रांमधून त्यांच्या सभांच्या बातम्या आल्या. गांधींनी स्वत: अनेक संपादकांना लेख पाठवले. काही संपादकांनी त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. हे इथवरच थांबले नाही. १४ सप्टेंबर १८९६ ला लंडनहून ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने ‘ग्रीन पॅम्प्लेट’बद्दलचा विपर्यस्त व कलुषित वृत्तांत दक्षिण आफ्रिकेतील वृत्तपत्रांना पाठवला. नाताळमधील वृत्तपत्रांनी हा मजकूर प्रसिद्ध केल्यावर सर्वत्र एकच खळबळ माजली. दरबानमधील युरोपियन लोकांनी एकत्र येऊन लगेचच- म्हणजे १६ सप्टेंबर १८९६ ला युरोपियन प्रोटेक्शन असोसिएशनची स्थापना केली.
एम. के. गांधी हे लेखक असलेल्या या पुस्तिकेला १४ ऑगस्ट २०१६ रोजी १२० वर्षे पूर्ण होतील. वयाच्या २७ व्या वर्षी एम. के. गांधी या तरुणाने आपले भावी राजकीय तत्त्वज्ञान प्रथमच जगासमोर मांडले.
जया नातू  natujaya@gmail.com