१५ ते १७ जानेवारीदरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात- म्हणजेच बी. ए. आर. सी.मध्ये संपन्न होत आहे. त्याविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशात अनेक बदल झाले. काही भले, काही बुरे! काही बदलांचे परिणाम लगेच जाणवले, तर काही बदलांचे परिणाम दूरगामी होते. हे बदल जीवनाशी संबंधित जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये झाले. असे म्हटले जाते की, ‘बदल होणे’ ही एकच न बदलणारी आणि सातत्याने घडणारी घटना आहे. १९९६ साली बडोदा इथे मराठी विज्ञान परिषदेचे ३१ वे विज्ञान संमेलन झाले तेव्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. वसंतराव गोवारीकर आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले होते की, ‘‘संमेलनाच्या संख्येवरून संस्थेचे वय कळते. मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाल्यापासून दरवर्षी न चुकता परिषदेचे वार्षिक विज्ञान संमेलन आयोजित करण्यात येते. अशा तऱ्हेने मराठी विज्ञान परिषदेच्या या ३१ वर्षांच्या कारकीर्दीत एक गतिमान स्थैर्य आहे.’’
डॉ. गोवारीकरांनी म्हटल्याप्रमाणे परिषदेने हे गतिमान स्थैर्य पन्नास वर्षे सातत्याने टिकवले आहे. २०१५-१६ हे मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष! आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता ५० व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाने होते आहे.
स्वतंत्र भारताच्या आजवरच्या ६८ वर्षांच्या कालखंडापैकी गेली ५० वर्षे मराठी विज्ञान परिषद कार्यरत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपला देश पौगंडावस्थेत असताना मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली. आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सज्ज होत होता, तेव्हा या विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या शब्दांत आणि मातृभाषेत पोहोचावी या उद्देशाने १९६६ साली मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली. गेली पन्नास वर्षे सातत्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच विज्ञानशिक्षण या क्षेत्रांत होणारे बदल मराठी विज्ञान परिषद विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत परिषदेचे ७० विभाग आज कार्यरत आहेत. महाराष्ट्राबाहेर बेळगाव, निपाणी, गोवा आणि बडोदा इथेही परिषदेचे विभाग आहेत.
कालानुरूप सगळ्याच क्षेत्रांत जसे बदल घडत असतात, तसे परिषदेच्या वार्षिक संमेलनातसुद्धा घडत आले आहेत. अगदी नावापासूनच सुरुवात केली तर आता परिषदेच्या वार्षिक विज्ञान संमेलनाला ‘वार्षिक अधिवेशन’ असे संबोधले जाते. या अधिवेशनाच्या वेगवेगळ्या सत्रांमधून विज्ञान संशोधक आणि विज्ञान प्रसारकांबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग गेल्या सुमारे दोन दशकांपासून नोंदवला जायला लागला. विज्ञान प्रश्नमंजूषा, विज्ञान प्रकल्प सादरीकरण, विज्ञान प्रदर्शने अशा वेगवेगळ्या माध्यमांतून विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी होतात. मराठी विज्ञान परिषदेशी संबंधित असलेल्या आणि जिव्हाळ्याने अधिवेशनात सहभागी होणारे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि विज्ञानलेखकांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या अधिवेशनातून विद्यार्थ्यांना आणि लोकांना मिळत असते. दोन वर्षांपूर्वी लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात पाऊणशेपेक्षा जास्त शेतकरी एका सत्रात सहभागी झाले होते. या सत्रामध्ये शेतकरी आणि शेतीक्षेत्रात कार्यरत असणारे संशोधक, धोरणकर्ते, कारखानदार यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात आला होता. ज्या ठिकाणी अधिवेशन आयोजित केले जाते, त्या परिसरातल्या समस्या किंवा स्थानिक वैशिष्टय़ांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा या अधिवेशनांतून घडू लागल्या आहेत.
मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे अधिवेशनाचे अध्यक्ष हे अधिवेशन संपेपर्यंत उपस्थित असतात. किंबहुना, अध्यक्षांच्या उपस्थितीतच संपूर्ण अधिवेशन व्हावे असा आग्रह असतो. यामुळे अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या त्या महनीय व्यक्तीसोबत दोन दिवस संवाद साधण्याची संधी उपस्थित प्रतिनिधींना मिळते.
यंदाच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्षपद आय. आय. टी., मुंबईचे निवृत्त संचालक प्रा. सुहास सुखात्मे हे भूषवणार आहेत, तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या संशोधनकार्याचा ठसा उमटविणाऱ्या मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात (बी. ए. आर. सी.मध्ये) १५ ते १७ जानेवारी या कालावधीत मराठी विज्ञान परिषदेचे हे सुवर्णमहोत्सवी अ. भा. मराठी विज्ञान अधिवेशन संपन्न होणार आहे. ‘विज्ञानवेध २०२५’ ही या अधिवेशनाची प्रमुख संकल्पना आहे.
या अधिवेशनात आखण्यात आलेले परिसंवाद विज्ञानप्रेमींसाठी जणू मेजवानीच ठरणार आहेत. भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांचे योगदान आणि आव्हाने, विज्ञानप्रसार आणि आम्ही, विज्ञान- अर्थकारण आणि संस्कृती, चित्रपट आणि विज्ञान असे परिसंवादाचे वैविध्यपूर्ण विषय आहेत. या विविध परिसंवादांमध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. मनमोहन शर्मा, डॉ. जयंत नारळीकर, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. जेष्ठराज जोशी, डॉ. आनंद कर्वे, डॉ. बी. एन. जगताप, डॉ. अनिरुद्ध पंडित, डॉ. विवेक रानडे, प्रा. मिलिंद सोहोनी, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, प्रा. द. ना. धनागरे, जयंत एरंडे, अ. पां. देशपांडे, डॉ. मानसी राजाध्यक्ष, उज्ज्वल निरगुडकर आदींचा सहभाग असणार आहे. या परिसंवादांशिवाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्राचे सहसंचालक माधव ढेकणे, डॉ. आल्हाद आपटे यांची भाषणेही होणार आहेत. तीन दिवसीय सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाच्या सांगता समारंभाला राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने परिषदेने विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतल्या पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण या अधिवेशनात होणार आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण करतील.
या भरगच्च कार्यक्रमांनंतर चौथ्या दिवशी भाभा अणुसंशोधन केंद्राची विज्ञान-सहल आयोजित करण्यात आली आहे.
मराठी विज्ञान परिषद ही विज्ञानप्रेमींच्या आश्रयाने चालणारी स्वयंसेवी संस्था आहे. गेली पन्नास वर्षे परिषदेला उत्तम लोकाश्रय लाभला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे परिषदेच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा! या टप्प्यावर जास्तीत जास्त लोकांना विज्ञानप्रसाराच्या कार्यात सहभागी करून घेण्याचे परिषदेचे धोरण आहे. त्यामुळे या अधिवेशनाला विज्ञानप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
हेमंत लागवणकर- hemantlagvankar@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden jubilee of marathi marathi vidnyan parishad