दिलीप चव्हाण
सध्या फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी शक्ती झुंडीने देशभर धुमाकूळ घालत असताना ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने अमिताव घोष यांना भारतीय साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान दिला, याला विशेष महत्त्व आहे. कारण साम्राज्यवादी आणि धर्माध शक्तींना ज्ञान आणि कल्पकता कसे नामोहरम करू शकतात, याचा व्यूह आपल्या सबंध लेखनातून घोष रचत आलेले आहेत. मानवताविरोधी, उन्मादी आणि मग्रूर शक्तींना आपल्या लेखनातून अंगावर घेण्याचे जे धाडस घोष दाखवतात, ते देशी भाषांमधील लेखनात अपवादानेच आपल्याला दिसते.
अमिताव घोष हे इंग्रजीतून लेखन करणारे मोठे कादंबरीकार आहेत. ११ जुलै १९५६ ला कोलकात्यात जन्मलेले अमिताव घोष भारत, बांगलादेश, श्रीलंका अशा वेगवेगळ्या देशांत लहानाचे मोठे झाले. दिल्ली, ऑक्सफर्ड, अलेक्झांड्रिया अशा ठिकाणी प्रतिष्ठित संस्थांमधून त्यांचे शिक्षण झाले. ‘द सर्कल ऑफ रिझन’ (१९८६), ‘द श्ॉडो लाइन्स’ (१९८८), ‘द कलकत्ता क्रोमोसोम’ (१९९५), ‘द ग्लास पॅलेस’ (२०००), ‘द हंग्री टाइड’ (२००४), ‘सी ऑफ पॉपीज’ (२००८), ‘रिव्हर ऑफ स्मोक’ (२०११), ‘फ्लड ऑफ फायर’ (२०१५) अशा बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभलेल्या कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत. यापकी ‘सी ऑफ पॉपीज’ आणि ‘रिव्हर ऑफ स्मोक’ या दोन कादंबऱ्यांचे अनुक्रमे २००८ आणि २०१२ साली ‘मॅन बुकर’ या पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. त्याचबरोबर ‘इन अॅन अॅण्टिक लॅण्ड’ (१९९२), ‘डान्सिंग इन् कम्बोडिया अॅण्ड अॅट लार्ज इन बर्मा’ (१९९८), ‘काऊंटडाऊन’ (१९९९), ‘द इमाम अॅण्ड द इंडियन’ (२००२) आणि अगदी अलीकडे गाजत असलेले ‘द ग्रेट डीरेन्जमेन्ट : क्लायमेट चेंज अॅण्ड द अनथिंकेबल’ (२०१६) अशा ललितेतर ग्रंथांचेही ते लेखक आहेत. या यशस्वी लेखनामागे त्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता, सृजनशीलता, व्यासंग आणि भाषेवरची कमालीची हुकूमत आहेच; पण या सर्व लेखनासाठी, त्यासाठी आवश्यक संशोधनासाठी जे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत, त्याचा नुसता विचार केला तरी बसल्या जागी विश्व कवेत घेणारे आपले लेखक नक्कीच गळपटतील. अर्थात मराठीत गोष्ट सांगण्याच्या नवनव्या पद्धती निरंतर शोधणारे, निवेदन शैलीला कादंबरीच्या एकूण संरचनेत केंद्रस्थानी आणणारे भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या कादंबरीकारांचा यात अपवाद करता येऊ शकतो.
याआधी अमिताव घोष यांच्या ‘द शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. २००७ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविलेले आहे. अर्थात हे सर्व सन्मान त्यांना भारतात लाभले त्यावेळी देश म्हणून आपण बऱ्यापकी सुसंस्कृत होतो. आपले झुंडींच्या देशात रूपांतर व्हायचे होते. तोपर्यंत तरी आपण आपल्या समाजाला फटकारणाऱ्यांच्या अंगावर धावून जात नव्हतो. आपल्या जातीयतेला, धर्माधतेला, संकुचितपणाला किमान रस्त्यांवर मिरवत नव्हतो. तोवर विरोधी किंवा आपल्याहून वेगळा विचार करणाऱ्यांना गलिच्छ शिव्या देत नव्हतो. गोळ्या घालून कुणाला संपवत नव्हतो. कुणाचे म्हणणे पटले नाही तरी ते ऐकून घेण्याचे सौजन्य तेव्हा नक्कीच होते. वादविवाद, खंडनमंडनाची परंपरा अगदी काल-परवापर्यंत तग धरून होती. पण सध्या फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी शक्ती झुंडीने देशभर धुमाकूळ घालत असताना ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने अमिताव घोष यांना भारतीय साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान दिला, याला विशेष महत्त्व आहे. कारण साम्राज्यवादी आणि धर्माध शक्तींना ज्ञान आणि कल्पकता कसे नामोहरम करू शकतात, याचा व्यूह आपल्या सबंध लेखनातून घोष रचत आलेले आहेत. या मानवताविरोधी, उन्मादी आणि मग्रूर शक्तींना आपल्या लेखनातून अंगावर घेण्याचे जे धाडस घोष दाखवतात, ते देशी भाषांमधील लेखनात अपवादानेच आपल्याला दिसते. ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याची आपल्या लेखकांची धडपड पाहिली की अमिताव घोष या लेखकाचे लेखक म्हणून मोठेपण अधिक ठसते. सर्व लोकप्रिय धारणा धारेवर धरणाऱ्या या अस्सल लेखकपणाला ज्ञानपीठाने सन्मानित केले आहे.
यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने केलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे- पहिल्यांदाच इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखकाचा पुरस्कारासाठी विचार केला. इंग्रजीचा भाषा म्हणून भारतीय राज्यघटनेत समावेश असूनही फक्त ज्ञानपीठ पुरस्कार देताना केला जाणारा दुजाभाव या निवड समितीने संपुष्टात आणला. याचे फायदे पुष्कळ आहेत. असेही इंग्रजीच्या संपर्कात आल्यावरच काही बदल आपल्यात होतात. इंग्रजीत लिहिणारे ज्ञानपीठाच्या कक्षेत आल्याने इतर देशी भाषांमधील लेखन साठोत्तरी पिढीच्या अस्तित्ववादाच्या, व्यक्तिवादाच्या, व्यक्ती आणि समष्टीच्या द्वैताद्वैताच्या, सामाजिक वास्तववादाच्या कक्षा ओलांडून सृजनाच्या संपूर्णपणे नव्या शक्यता शोधते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण १९८० नंतर इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांनी अत्यंत धाडसी प्रयोग आपल्या लेखनातून करून दाखवलेले आहेत. आणि त्या प्रयोगांच्या दर्जामुळे जगभरातील जाणकारांना त्यांची दखल घेणे भाग पडले आहे. सलमान रश्दी, अमिताव घोष, उपमन्यू चटर्जी, अमित चौधरी, अरुंधती रॉय, रोहिंग्टन मिस्त्री, अॅलन सिली, शशी थरूर, विक्रम चंद्र, गीता मेहता, चित्रा बॅनर्जी, गीता हरिहरन, मुकुल केशवन, मीना अलेक्झान्डर या लेखकांनी भारतीय लेखकांच्या इंग्रजी लिखाणाला गांभीर्याने घ्यायला भाग पाडले आहे. हे त्यांना शक्य झाले, कारण त्यांनी आधीच्या पिढीने लोकप्रिय केलेल्या सामाजिक वास्तवाच्या सरधोपट चित्रीकरणाच्या मार्गाने प्रवास न करण्याची मोठी जोखीम पत्करली. म्हणजे काय केले?
एक- त्यांनी कादंबरीतील पात्रे असतील किंवा घटना-घडामोडी यांना त्यांच्या पारंपरिक केंद्रस्थानावरून हलवले. पात्रे आणि घटना- घडामोडींना कादंबरीच्या एकूण संरचनेत वापरल्या जाणाऱ्या इतर तंत्रांच्या पातळीवर आणले. दोन- पात्र हेच एक तंत्र म्हणून वापरल्याने मनोविश्लेषण वगरेला आपसूक फाटा दिला गेला. तीन- वास्तवाचे विखंडित रूप समजून घेतले आणि त्याचा एक-एक तुकडा स्वतंत्ररीत्या ठसठशीतपणे मांडण्याला महत्त्व दिले. चार- कादंबरीत काल्पनिक विश्वाची निर्मिती करून आणि निवेदनात उपरोधिक सूर लावून वास्तवाचा अनुभव देण्यावर भर दिला. पाच- गोष्ट सांगण्याची शैली मूलभूत मानली. या कथनतंत्राला कादंबरीचा मूळ विषयसुद्धा ताब्यात घेऊ दिला. सहा- वास्तव हेच एका पातळीवर अतिवास्तव असल्याने त्याचे नेमक्या शब्दांत वर्णन करणे आव्हान आहे, या बाबीचा स्वीकार या लेखकांच्या लिखाणात दिसतो. त्यामुळे १९८०-९० च्या दशकांत भारतीय इंग्रजी कादंबरीचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विशेषत: कादंबरी या वाङ्मयप्रकारात दडलेल्या अनंत शक्यता या लेखकांनी दाखविल्या. ही ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या लेखकांत अमिताव घोष हे नाव फार महत्त्वाचे आहे.
इंग्रजीत लिहिणारे लेखक उच्चभ्रू जाणिवांचे आणि आंग्लाळलेले वगरे असल्याचा समज ज्यांचा आहे, त्यांनी तर अमिताव घोष यांचे लेखन आवर्जून वाचायला हवे. साम्राज्यवादी देशांच्या वासाहतिक शोषणास बळी पडलेले देश, आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळ्या धार्मिक, वांशिक, जातीय अस्मिता धगधगत ठेवणारे वसाहतवादी, या गुलाम राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढय़ांचा उदात्त आशय आणि त्या- त्या देशांतील प्रबळ जातीय-धार्मिक-वांशिक गटांच्या अति सत्तालोलुपतेपायी झालेल्या फाळण्या आणि त्यातून उद्भवलेली हिंसा, वसाहतवादातून मुक्ती मिळाल्यावरही सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करून ठेवणारा आत्मकेंद्रित लबाड राज्यकर्ता वर्ग, धार्मिक उन्मादाच्या आगीवर आपली पोळी भाजणारे देशी नेते आणि त्यात कोणत्याही क्षणी- आजही असहायपणे होरपळून निघणारे गोरगरीब, सर्वसामान्य लोक, वसाहतवादाने नागवलेल्या देशांतील नागरिकांचे सातत्याने होणारे स्थलांतर, न्यूनगंडातून पाश्चात्त्य देशांच्या विकासाची चुकीची प्रारूपे स्वीकारल्याने पर्यावरणाचे होणारे अतोनात नुकसान.. हे सारे लेखक म्हणून घोष यांच्या आस्थेचे विषय आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून वासाहतिक शोषणास बळी पडलेल्या देशांच्या दुखण्यांमध्ये एवढे साम्य दिसते, की त्यांच्यातील भौगोलिक अंतर निर्थक वाटावे. त्यामुळे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, इजिप्त अशा वेगवेगळ्या देशांना सामावून घेणारा व्यापक असा भौगोलिक पट असला तरी सारख्याच दुखण्यांमुळे तो सलग वाटतो.
अर्थात या संपूर्ण इतिहासाला ते वास्तववादी वगरे पद्धतीने भिडत नाहीत. आधीच्या पिढीतल्या चमन नाहल (आझादी) किंवा कमला मार्कन्डेय (‘द गोल्डन हनीकोंब’) यांच्या कादंबऱ्यांत येणाऱ्या ऐतिहासिक घटनांच्या तपशिलांची जंत्री यात नसते. ‘काय घडले’ यापेक्षा ‘त्या घडण्याचा अर्थ काय’ हे समजून घेण्यावर इथे भर असतो. ऐतिहासिक घटना-घडामोडींचे भूतकालीन रूप आणि त्यांचा आजच्या वर्तमानातील ढळढळीत वावर कादंबरीतून मांडण्यासाठी अनोख्या तंत्राचा अवलंब इथे दिसतो. साधारणपणे कादंबरीकार इतिहासाचा कालानुक्रमे वेध घेतात. किंवा मग भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषा पुसट करून कादंबरीत ते जणू दोन्ही मिळून एकच काळ अस्तित्वात असल्याचे रूप देतात. घोष कालचित्रणाच्या बाबतीत इतर कादंबरीकारांच्या तुलनेत आणखी खोलात उतरण्याचे धाडस करतात. ते आपल्या कादंबऱ्यांतून भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे सहअस्तित्व तर दाखवतातच; पण एकाच वेळी दोन्ही काळ वेगळे असल्याचे भानही जागे ठेवतात. घोष इतिहास हा सामूहिक स्मृतीचा भाग मानतात. भूतकाळाकडे वर्तमान समजून घेण्यासाठी संदर्भ म्हणून पाहतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा परस्परसंबंध, त्यांचे एकमेकांपासून असलेले वेगळेपण आणि त्यात असलेल्या शक्यता यावर घोष आपल्या कादंबरीला उभे करून दाखवतात. व्यक्तिगत आणि राष्ट्रीय इतिहास, नानाविध स्तरांतल्या माणसांच्या आठवणी, त्यांचा भूतकाळ, संस्थांचा इतिहास, कौटुंबिक कहाण्या, स्वातंत्र्यलढे, लैंगिक व सामाजिक भेदांचा इतिहास यांची सरमिसळ करीत आणि त्याचबरोबर साम्राज्यवादी शक्तींच्या ज्ञान-संकल्पनांची मोडतोड करत कादंबरीचा पट विणण्यात घोष माहीर आहेत.
‘द सर्कल ऑफ रिझन’ या पहिल्याच कादंबरीतून अमिताव घोष यांची कादंबरीकार म्हणून दिशा लक्षात येते. समकालीन वास्तव आणि इतिहासाला कवेत घेताना विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र, राजकारण, संस्कृती, कला, भाषा या सर्व ज्ञानशाखांतील भेदांचा मुलाहिजा न बाळगता त्यातील अद्ययावत ज्ञानाचा उपयोग करीत, आत्मचरित्र, कादंबरी आणि इतिहास यांचे बेमालूम मिश्रण करीत त्यांनी कादंबरीची संरचना घडवून दाखवली. गोष्ट सांगण्याच्या कौशल्याला या कादंबरीकाराच्या नजरेत किती मोल आहे, हे या कादंबरीतून दिसते. यातील आलू, झिन्दी, हाजी फाल्मी, अबू फहेल ही पात्रे गोष्ट सांगण्यात इतकी वाकबगार आहेत, की अशक्य वाटतील अशा घटनाही ते श्रोत्यांच्या गळी उतरवतात. जगण्यातल्या नीरसतेवर, यांत्रिकतेवर मात करण्याचे ‘गोष्ट’ हे साधन आहे त्यांच्या हातात. अनेक चित्रविचित्र गोष्टी ते सातत्याने निर्माण करतात. यातून घोष हेच सूचित करतात, की जगण्यातल्या यांत्रिकतेवर कल्पकता मात करू शकते. सर्वस्तरीय कल्पकतेच्या अभावाने मानवी जीवन नुसते नीरसच नाही, तर अमानवीयतेकडे ओढ घेऊ लागले आहे. माणसांच्या जगण्यातून कल्पकता वजा झाली तर गोष्टी संपतात. आणि ज्या समाजात गोष्टी संपतात तो समाज झुंडीत रूपांतरित होतो, हे जगभरातील प्रतिभावंत सांगत आले आहेत. घोषही समाजात गोष्टीची गरज अधोरेखित करतात. म्हणजेच मानवी सभ्यतेच्या विकासासाठी कल्पकता अनिवार्य आहे. कल्पकता नसेल तर धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण आणि एकूणच मानवी जीवनाकडे बघण्याचा यांत्रिक दृष्टिकोन तयार होतो. त्यातून केवळ कर्मकांडी झुंडी तयार होतात; ज्या सभ्यतेच्या गळ्याला नख लावू शकतात. त्यानंतर आलेल्या ‘द श्ॉडो लाइन्स’ या कादंबरीत याच भूमिकेचा आणखी विस्तार त्यांनी केलेला आहे. सभ्यतेच्या संवर्धनात कल्पकतेच्या जोडीला ज्ञानालाही त्यांनी अपरिहार्य मानले आहे. या कादंबरीतील पात्र त्रिदीब आपल्या लहानग्या पुतण्याला देशादेशांत असलेल्या भौगोलिक सीमारेषांवर माणूस आपल्या मूलभूत कल्पनाशीलतेने मात करू शकतो असे सांगतो. या त्रिदीबचे वाचन अफाट आहे. याचा अर्थ तो कल्पकता आणि ज्ञान यांचे प्रतीक म्हणूनच कादंबरीत वावरतो. कल्पकता आणि ज्ञान मानवनिर्मित अशा सर्व कृत्रिम सीमारेषा पुसून टाकू शकतात, हे वाचकांच्याही मनावर त्यांना ठसवायचे आहे. हेच सूत्र इतर सर्व कादंबऱ्यांमधून अधिकाधिक विकसित होत जाताना दिसते. एवढेच नाही, तर त्यांच्या ललितेतर साहित्याचाही हाच गाभा आहे.
अमिताव घोष यांचे लेखक म्हणून मोठेपण भूतकाळाच्या, इतिहासाच्या स्मरणाची ‘मेथडॉलॉजी’ शोधून काढण्यात आणि तिचे कादंबरीत थेट उपयोजन करून दाखवण्यात आहे. या मेथडॉलॉजीच्या अभावामुळे यांत्रिकपणे भूतकाळाचे, आपल्या इतिहासाचे आकलन केले जाते. म्हणून मग माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. यातूनच मानवी सभ्यतेला धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्या कादंबरीतील पात्रांच्या मानगुटीवर बसलेले भूतकाळाचे भूत आकलनाची पद्धत माहीत नसल्याने त्या पात्रांना उतरवता येत नाही. म्हणून मेथडॉलॉजीची खरी मातब्बरी! स्मरणाची मेथडॉलॉजी समजून घेतली तर भूतकाळाचे भूत मानगुटीवरून उतरवता येऊ शकते, हे ते दाखवून देतात. त्यासाठी लागणारे बौद्धिक धाडस आणि विलक्षण झेप घेऊ शकेल अशी चपळ कल्पकता त्यांच्याकडे आहे. सभ्यतेच्या जिवावर उठलेल्या असभ्यांना आडवे जाण्यासाठी आणि इतिहास व भूतकाळाच्या अर्धवट आकलनातून उद्ध्वस्त होणाऱ्या निष्पाप माणसांना वाचवण्यासाठी ज्ञान आणि कल्पकतेची नितांत गरज आहे. आपल्या काळातील िहसक झुंडींसमोर अमिताव घोष यांच्यासारखा लेखक निडरपणे सभ्यतेचा, मानवतेचा ध्वज घेऊन उभा आहे, ही गोष्ट त्यांची लेखक म्हणून थोरवी सिद्ध करायला पुरेशी आहे.
dileepchavan1974@gmail.com