जाहिराती, मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या कलावंताचे सभोवतालच्या व्यक्ती, घटना आणि घडामोडींवर खुसखुशीत मल्लिनाथी करणारे पाक्षिक सदर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईतल्या मध्यवर्ती भागात- म्हणजे दादरच्या आसपासच्या भागात एका सुंदरशा चाळीत माझ्या एका मित्राच्या मामाचं दोन खोल्यांचं छानसं घर होतं. माझा मित्र तिथे एकटाच राहत असे. माझ्या त्या मित्राला आपण नुसतं मित्र नको म्हणू या. त्याच्या नावाने त्याला संबोधू या. (अर्थातच काल्पनिक नावाने. कारण त्याच्याबद्दल मी जे लिहिणार आहे ते वाचून तो बहिसाटणार आहे.) आपण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं नाव ठेवू या. ‘हऱ्या’ हे नाव बऱ्यापैकी उडाणटप्पू आहे. हे नाव वाचून वाचकांच्या डोळ्यासमोर जे कॅरेक्टर येईल तसाच हा हऱ्या होता. त्याचं आयुष्यात काहीच ठरलं नव्हतं. स्वत:साठी त्याने ते एकदम सोप्पं करून टाकलं होतं. भूतकाळाची पर्वा नव्हती, वर्तमानकाळाची भ्रांत नव्हती. आणि भविष्यकाळाची चिंता नव्हती. पैशावर फारसं प्रेम नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीची फारशी हाव नव्हती. आयुष्यात काहीच गमवायची भीती नसल्यामुळे काही मिळवायची सक्ती नव्हती. लग्न झालं नसल्यामुळे कुणाला काही उत्तरं द्यावी लागतील अशी धास्तीही नव्हती. ‘आजचा दिवस माझा’ असं साधारणत: रोजच्या जगण्याचं ठोस स्वरूप त्याने ठरवलं होतं. आणखीन एक खासियत म्हणजे हऱ्याच्या स्वभावाचा एक विशेष पैलू. तो म्हणजे- पूर्णपणे काळा, नाहीतर पूर्णपणे पांढरा एवढय़ा दोनच रंगांच्या छटा स्पष्टपणे त्याच्या स्वभावात दिसत असत. प्रेम तर एकदम प्रेम. नाहीतर तिरस्कार तर एकदम तिरस्कार. आनंद तर एकदम टोकाचा आनंद. नाहीतर दु:ख तर एकदम दु:खाचा तळ गाठणार. व्यसनं तर सर्व प्रकारची व्यसनं. नाहीतर एकदम पूर्णपणे निव्र्यसनी. बाकी सर्व रंग बहुधा त्याच्या आयुष्यातून फेड झाले होते. त्यामुळे समोरच्या माणसाचा गोंधळ होत असे. कुठल्या गोष्टीसाठी हा हऱ्या कुठलं टोक गाठेल सांगता येत नसे. उदाहरणार्थ, हऱ्याकडे खूप किमती आणि परदेशी बनावटीचे शूज होते. हऱ्याही फारसे ते वापरत नसे. एक दिवस अचानक हऱ्याने बूट-चपला वापरणं सोडून दिलं आणि सगळीकडे अनवाणी फिरायला लागला. त्यामुळे जे शूज वापरणं माझं स्वप्न होतं, ते अगदी सहजच मला वापरायला मिळाले. अचानक! नुसते शूजच नाही, तर हऱ्याच्या मामाने पाठवलेले परदेशी बनावटीचे नवेकोरे पायमोजेसुद्धा माझे झाले. शिवाय उत्तम डिझाइन असलेल्या कोल्हापुरी चपला बोनस म्हणून मिळाल्या. हऱ्याच्या असल्या स्वभाव-गुणविशेषावरून काहींना हऱ्या हा एक महाबिनडोक, आततायी आणि मूर्ख माणूस वाटू शकतो. पण हऱ्या बऱ्यापैकी हुशार माणूस होता. नाटक-सिनेमा धंद्यात लेखक म्हणून काम करत होता. अभिनेताही उत्तम असण्याची शक्यता होती. फक्त त्याच्या वागण्याला इस्त्री नव्हती. चुरगळलेलं, असंख्य चुण्या पडलेलं त्याचं वागणं-बोलणं असायचं.
तर अशा विक्षिप्त देहाला एक दिवस मी त्याच्या घरात त्याच्याबरोबर राहायला येण्याविषयी विचारलं. ‘हो, ये की!’ कोणतेही आढेवेढे न घेता अगदी सहजपणे त्याने होकार दिला. एवढंच नाही तर ज्या महिन्यात जमेल त्या महिन्यात जागेचं भाडं दे, असंही तो म्हणाला. मी जरासा गडबडलोच. खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्याची कल्पना केलेली असताना प्रत्यक्षात मात्र एकदम सपाट व गुळगुळीत रस्ता अनुभवायला मिळाल्यावर जशी गडबड होईल, तसं काहीसं माझं झालं. माझा हा विचार आमच्या अजून एका जवळच्या मित्राला- म्हणजेच रघ्याला ऐकवला. रघ्या पण असंच एक शिड गमावलेलं गलबत होतं. भारत-पाकिस्तान बॉर्डरवर गस्त द्यायला निघालेल्या सैनिकाला त्याचा बाप ज्या कळकळीने सांगेल, त्याच कळकळीने रघ्याने मला सांगितलं, ‘सांभाळ स्वत:ला. हऱ्याबरोबर राहायला जाण्याचा निर्णय घेऊन तू शेणात दगड मारलाच आहेस, तर सांभाळ स्वत:ला.’ मी म्हणालो, ‘अरे रघ्या, दिवसभर मी कामात बिझी असणार. झोपायला तेवढा घरी जाणार. आणि एवढी कसली हऱ्याची धास्ती? कितीही झालं तरी हऱ्या माणूस आहे, जनावर नव्हे.’ खरं तर माझ्याही मनात जरा धाकधूक होतीच. पण मी असं म्हणालो कारण मला जागेची अत्यंत निकड होती. शेणात दगडच काय, मी स्वत:सुद्धा उडी मारायला तयार होतो.
आणि एक दिवस मी त्या दोन खोल्यांच्या बिऱ्हाडात हऱ्याबरोबर राहायला गेलो. तिसऱ्या मजल्यावरच्या त्या दोन खोल्या एकदम हवेशीर आणि मस्त होत्या. चाळीच्या मागेच रेल्वेस्टेशन होतं. ते इतकं जवळ होतं, की हाक मारूनसुद्धा मी लोकल थांबवू शकलो असतो. व्हरांडय़ात उभं राहिल्यावर चाळीचा नव्वद टक्के भाग दिसत असे. त्यामुळे दिवसभर करमणुकीला काही तोटा नव्हता. चाळीत राहायला आल्याच्या दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावरच्या एका मावशीचा संध्याकाळसाठी जेवणाचा डबा सांगून टाकला. खरं तर समोरच्या इमारतीतल्या मावशींची मुलगी दिसायला एकदम खवा होती म्हणून त्यांचा डबा आपण घेऊ या, असा पर्याय मी सुचवला होता. पण हऱ्याने लगेच टोकाची भूमिका घेत ‘ती मुलगी काय लग्न करणार आहे का आपल्याशी? आपलं काही नुसतं तिच्याकडे बघून पोट भरणार नाही,’ असं म्हणून तो पर्याय उधळून लावला.
काहीही म्हणा, पण त्या चाळीत एक जिवंतपणा होता. तिथे राहायला आल्यापासून बाहेर जावंसं वाटतच नसे मरायला. मी बऱ्यापैकी निवांत झालो होतो. आजूबाजूला साऊथ इंडियन लोकांच्या खाणावळी होत्या. मी, हऱ्या आणि बऱ्याचदा रघ्या तिथे तुडुंब जेवायचो आणि चाळीत येऊन कामासाठी स्ट्रगल करणं वगैरे फाटय़ावर मारून बिनधास्त पंखा फूल करून जी ताणून द्यायचो ते दिवस मावळल्यावरच उठायचो. चाळीत राहायला आल्यापासून आमचा हा दिनक्रम जवळजवळ रोजचाच झाला होता. संध्याकाळी झोप झाल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी आपण आपला दिवस जेवणात आणि दिवसभर झोपण्यात वाया घालवला याबद्दल भयानक शरम वाटायची. मग व्हरांडय़ात उभं राहून हऱ्याचं माझ्या खिन्न मनाला दिलासा देणारं छोटं व्याख्यान व्हायचं. ‘शरीराला थोडं मोकळं सोडणं आणि मनाला आनंदी ठेवणं हासुद्धा एक स्ट्रगलचा महत्त्वाचा भाग आहे. माणसाने पैशासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी पैसा कमावला पाहिजे. नुसता पैसा पैसा काय करता लेको? पैसा तर काय एखादी वेश्यापण कमावते.’ त्यावर मी कुजकटपणे म्हणायचो, ‘अरे हऱ्या, वेश्यापण कमावते, तर आपण का नको कमवायला?’ इथून पुढे मग आमची करमणूकप्रधान संवादफेक सुरू व्हायची. ही संवादफेक म्हणजे अक्षरश: एकमेकांवर संवाद फेकून मारल्यासारखेच असत. रघ्याची तर हसून हसून पुरती वाट लागायची. उद्यापासून मात्र त्वेषाने कामाला लागायचंच हं! असा निश्चय करून आम्ही झोपी जायचो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी दिवसभराच्या कामाचा आराखडा तयार करायचो. क्रमश: कसं कसं, काय काय काम करायचं याचा पूर्ण विचार करून ठेवायचो. साडेदहाला रघ्या यायचा आणि माझ्या विचारमंथनाला सुरुवात व्हायची. थोडी उन्हं डोक्यावर यायला लागली की विचारपरिवर्तन व्हायला लागायचं. आणि जेवणाच्या वेळेपर्यंत माझ्या ठरवलेल्या विचारांनी माझ्याकडे पूर्ण पाठ फिरवलेली असायची. पुन्हा एकदा यथेच्छ जेवण, पंखा आणि विश्रांती. ये रे माझ्या मागल्या! त्या काळात मी अविश्रांत विश्रांती घेत होतो. दिवसभर काही ना काहीतरी आचरट आणि खुळचट कुरापतींना आमच्या दोघांच्याही सृजनशीलतेची जोड देऊन आम्ही जी बहार आणायचो त्याला जवाब नसे. रात्रंदिवस हसत-खिदळत आम्ही दमून जायचो. आम्ही त्याकाळी एक विचित्र पैज लावली होती. चाळीत कॉमन टॉयलेट्स होती. एकही सुंदर मुलगी कोणत्याही वेळी कधीच त्या दिशेने जाताना आम्ही बघितली नव्हती. आमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा अशी मुलगी बघेल तो ती पैज जिंकणार होता. आणि दुसऱ्याने पैज हरल्याबद्दल पार्टी द्यायची होती. पण अशी वेळ कधीच कुणावर आली नाही. सगळ्यात मौज यायची ते चाळीत ज्या प्रकारे उत्सव किंवा सण साजरे व्हायचे त्यावेळी. दिवाळीत तर स्वर्गाचं वर्णन म्हणून जरी आमच्या चाळीचं वर्णन केलं असतं तरी अतिशयोक्ती वाटली नसती. अशा त्या दोन खोल्यांच्या बिऱ्हाडामध्ये माझा आणि हऱ्याचा संसार बहरला होता. प्रत्येक दिवशी काहीतरी आश्चर्यकारक घटना घडत असे. त्या दिवशीही असंच झालं. पहिल्यांदीच आश्चर्यानं माझं डोकं फिरलं.
हऱ्या म्हणाला, ‘उद्यापासून इथे स्वामी येणार आहेत.’ पहिल्यांदा माझा समज असा झाला की, कुणी स्वामी इथे येऊन दर्शन देऊन जाणार आहेत. मी जरा खोलात जाऊन विचारणा केली तर कळलं, की त्यांना कुठलीतरी सिद्धी प्राप्त झाली आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत ते इथे थांबणार आहेत. भावी संकटाची चाहूल मला यायला लागली. चाहूल कसली? संकट असं दाणदाण पावलं टाकत दाराशी येऊन ठेपलं होतं. दिवसभर म्हणजे दुपारचं जेवण, संध्याकाळची चहा-कॉफी अणि रात्रीच्या डब्यात अजून एक खायचं तोंड वाढणार. रात्रीच्या डब्यातलं जेवण एवढं सुरेख आणि इतकं चविष्ट असायचं, की त्यात वाटेकरी येणार म्हणून मी अतिशय दु:खीकष्टी झालो होतो. धार्मिक वातावरणात माझी सिगरेटही बंद करावी लागणार होती. त्या जागेत आम्ही दोघंच कसेतरी निभावून नेऊ शकत होतो, पण आता ते जे कुणी होते ते स्वामी जरी असले, तरी तिसरं माणूस वाढणार म्हटल्यावर सगळी बोंबच होणार होती. ते थोडाच चमत्कार करून पंचपक्वान्नं पैदा करणार होते? खर्च करायला लागणार होता. (मलाही!) त्या जागेतला सदस्य म्हटल्यावर थोडीफार जबाबदारी मलाही उचलावी लागणारच ना! आता काय या स्वामींची वस्त्रं धुवायला लागतायत का कमंडलू धुऊन द्यायला लागतंय, कुणास ठाऊक. बरं, स्वामी येणार म्हणजे भक्तगणही येणार. होमहवन, मंत्रपठण, जपतप, अंगारेधुपारे, पूजाअर्चा. घराचं म्हणजे तीर्थक्षेत्र करून टाकणार आहे हा हऱ्या. अशा प्रकारे घराचं पावित्र्य वाढवायची आयडिया एकदमच थिल्लर. या हऱ्याला ना अज्जिबात म्हणजे अज्जिबात अक्कल नाहीये. उगाच कुणावर तरी विश्वास ठेवणार म्हणजे- तो पण एकदम टोकाचा. नागडय़ाशेजारी बसला उघडा अशी एकतर आमची स्थिती होती, आणि आता त्यात हे नवीनच लफडं उपटणार आहे उद्यापासून. हऱ्याच्या उपकारांच्या बोज्याखाली दबलेल्या माझी हऱ्याला थोडाही विरोध करण्यासाठी जीभ रेटेना. हा हऱ्या हे जे काही देवाधर्माच्या कामाला लागला होता ते म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली कहें मैं तो हज को चली’ असंच होतं. हऱ्या एकेकाळी पूर्ण व्यसनाधीन झाला होता. चरस म्हणून नका, गांजा म्हणू नका. दारू, मावा सर्व प्रकारची व्यसनं तो मनमुराद करत असे. आता त्याला देव-देव करण्याचं व्यसन लागलं होतं. त्याचं अनवाणी फिरणं हाही त्यातलाच प्रकार होता. शेवटी कशाचाही अतिरेक हा वाईटच. पण हऱ्याला शहाणपण शिकवायला जाणं म्हणजे स्वत:च्या छातीवर वार झेलण्यासाठी हऱ्याच्या तलवारीला धार काढून देण्यासारखं होतं. त्यापेक्षा आपण स्वत:मध्येच जमतील तसे बदल करू असं मी ठरवलं. प्राप्त परिस्थितीत तेच जरा सोप्पं आणि माझ्यासाठी सोयीस्कर होतं. अर्थात इतक्या दिवसांच्या धमालधुल्यामुळे अत्यंत जड अंत:करणाने ती परिस्थिती मला स्वीकारावी लागली होती.
हऱ्या आणि कुणी स्वामी मिळून माझा कुठल्यातरी देवीपुढे बळी द्यायची तयारी करताहेत आणि मी तिथून पळण्याचा निष्फळ प्रयत्न करतोय असं स्वप्नही मला त्या रात्री पडलं. दुसऱ्या दिवशी मी लवकर आंघोळ वगैरे आटपून शुचिर्भूत होऊन स्वामींच्या स्वागतासाठी तयार झालो. हऱ्याने उठल्यापासूनच भजनाची कॅसेट लावून ठेवली होती. वातावरणनिर्मितीचा अगदी उच्छाद मांडला होता. मी आणि हऱ्या व्हरांडय़ात उभे राहून त्यांची वाट बघायला लागलो. दुरूनच कुठून शंखनाद किंवा तुतारीचे आवाज वगैरे ऐकू येतायत का, हे मी कान देऊन ऐकायला लागलो. दुरून फक्त लोकलचा हॉर्न ऐकू आला. लोकलने येतायत की काय स्वामी? मनात एक विचार येऊन गेला. स्वामींविषयी तर्कवितर्क करण्यात मी रमलेलो असतानाच अचानक हऱ्या ओरडला, ‘स्वामी आले!’ मी बघायला लागलो तर माझा विश्वासच बसेना. मला वाटलं होतं की, घोडे, रथ, ढोलताशांच्या गजरात स्वामींचं आगमन होईल. काही नाही तरी गेला बाजार एखादी पालखी तरी असेलच. पण मी हे काय बघत होतो! एका उग्र दिसणाऱ्या हीरो होंडावरून ते उतरले. हीरो होंडाचं सीटकव्हर चित्त्याच्या कातडय़ासारखं दिसणारं होतं. मला एकदम वाघावर बसून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला आलेल्या चांगदेवाचीच आठवण झाली. स्वामींचं रूपडं बघून तर मला तिसऱ्या मजल्यावरून उडीच मारावीशी वाटत होती. पिंगट रंगवलेले केस. रंगीबेरंगी गॉगल. कपाळावर केशरी टिळा. जाळीजाळीचा लाल कलरचा बनियन. तो उठून दिसावा असा रंगीबेरंगी शर्ट. त्याची वरची तीन बटणं उघडी ठेवलेली. स्टोनवॉश का काय म्हणतात तसली पँट (मांजर ओकल्यासारखा रंग असतो पँटचा!). हातात रंगीत कलरचा पट्टा असलेलं घडय़ाळ व दुसऱ्या मनगटात रुद्राक्षाची माळ. आणि एवढय़ा सगळ्या रंगांना बॅलन्स करणारे फ्लोरोसन्ट कलरचे शूज. हाफ मर्डरच्या गुन्हय़ाकरता तडीपार केलेल्या एखाद्या कॉपरेरेटचा राइट हँड (किंवा लेफ्ट हँड) असे दिसत असावेत. सगुना किंवा सपना नावाच्या मवाली मुली जर त्यांच्या मनात एखाद्या हीरोचं चित्र रंगवतील, तर ते जसं असेल तशा सडकछाप रंगीला रतन रोमियोसारखा अवतार होता या स्वामींचा. तोंडात पान नव्हतं एवढीच काय ती कमी होती. या धक्क्यातून मी सावरतच होतो तेवढय़ात हऱ्याने दुसरा धक्का दिला. व्हरांडय़ातच त्याने तसल्या स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं. एखाद्याने देऊळ समजून डान्सबारसमोरच लोटांगण घालावं तसं दृश्य होतं ते. हे तथाकथित स्वामी घरात आले, स्थिरस्थावर झाले आणि स्वामींनी तिसरा सणसणीत टोला लगावला. ते म्हणजे पाकिटातून सिगरेट काढून त्यांनी ओढायलाच सुरुवात केली. अरे वा! स्वामीच सिगरेट ओढत असतील तर आपणही सिगरेट ओढू शकतो असं वाटून मनात मी जरा खूश झालो. स्वामींची रीतसर ओळख झाली. रोज ठाण्याहून ते हऱ्याचा उद्धार करण्यासाठी येणार असल्याचं कळलं. खाऊनपिऊन झाल्यावर स्वामी निद्रादेवीची आराधना करण्यासाठी बेडवर जरा आडवे झाले. मी घडय़ाळात बघितलं तर अकरा वाजले होते. त्या समाधीग्रस्त अवस्थेतून त्यांना बऱ्याच वेळाने जाग आली. बरोब्बर चार वाजून तीस मिनिटांनी ते परत अवतरले. परत एकदा खाण्यापिण्याचा प्रोग्रॅम झाला. दरम्यान, स्वत:विषयी अजून थोडी माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली. त्या कथनात असं आढळलं की, सदरहू स्वामी पूर्वायुष्यात मटका खेळत असत आणि त्यांचे अंदाज कधीच चुकत नसत. पण चुकून कधीतरी अंदाज चुकला आणि मटक्याच्या धंद्यात त्यांना नुकसान झालं आणि कर्ज झालं. कर्ज एवढं होतं, की ते चुकवण्याची त्यांची पात्रता नव्हती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एकच मार्ग दिसत होता; आणि तो म्हणजे परमपिता परमेश्वर! (पूर्वार्ध)
निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com