गेली अनेक वर्षे कवी हेमकिरण पत्की एका शांत, संयत, व्रतस्थ वृत्तीने आपल्या आतल्या कवितेची कोवळीक जपत आलेले आहेत. वस्तुत: १९९० नंतरच्या बहुतांश कवितेला राजकीय, सामाजिक जाणिवांचा व्यापक संदर्भ आहे. समकालीन कवितेचा अवकाश वेगाने बदलत चाललेल्या भोवतालाचा, भौतिक जीवनाचा वेध घेताना दिसत आहे. ते अपरिहार्य आणि स्वागतार्ह आहे, यात दुमत असायचे कारण नाही; परंतु या सगळ्या झमेल्यात आपल्या आंतरिक विश्वात डोकावून पाहण्याची सवय कवितेने सोडून दिलीय की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे, हे निश्चित! प्रेमानुभूतीच्या विविध छटा, प्रेमभंगाने विदीर्ण झालेल्या हृदयाचा ईसीजी काढण्याकडे कवींचे दुर्लक्ष होते आहे. किंबहुना प्रेमकविता लिहिणे म्हणजे समकालीन प्रवाहाशी गद्दारी केल्याचा अपराधभाव कवी बाळगत असावेत. प्रीतिभावना अगर इतर वैयक्तिक अनुभवाची कविता लिहिणाऱ्याची, कवितेच्या क्षेत्रात कशी संभावना केली जाते हेही आपण पाहतो. या पाश्र्वभूमीवर आपल्या कवितेच्या पिंडाची अव्यभिचारी निष्ठा बाळगत आपला अंत:स्वर जपणाऱ्या हेमकिरण पत्कींसारख्या कवीचे अप्रूप वाटते.

हेमकिरण पत्कींच्या ‘शाई आकाशाची’ या संग्रहातील कविता केवळ भौतिक भोवतालात रमत नाही, तर तिला ‘आकाशाच्या शाई’ची ओढ आहे. आभाळाइतक्या अथांग, विशाल अनुभूतीला कवितेतून सूक्ष्म स्पर्श करण्यात ही कविता धन्यता मानते. आभाळ म्हटले तर खूप व्यापक असते, परंतु प्रत्येकाच्या संवेदनांचे आभाळ ज्याच्या-त्याच्यापुरते अगदी खासगी असते. अशा व्यापक, तरीही खूप खासगी आशयाचे आभाळ त्यातल्या निळ्याभोर शाईद्वारे पत्की यांच्या कवितेतून झिरपत राहते.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

मुख्यत: ही कविता स्वगतासारखी स्वत:शी हितगूज करता करता सर्वसंवादी होते. मानवी जीवनातील सर्वव्यापी दु:खानुभव, एकाकीपण, स्त्री-पुरुष संबंधातील आणि एकूणच दुरावलेपण व्यक्त करताना ही कविता खोल, चिंतनशील होते. मात्र दु:खानुभवातही ती आपली जीवनसन्मुखता त्यागत नाही. एकटेपणातही निसर्गाची साथ तिला सकारात्मक बनवते.

‘फुलांचा सुवास, आसपास दाटे

कुणी आहे वाटे, काळजाशी’

अशा शब्दांत ती दुकटेपणाचा दिलासादायक अनुभव व्यक्त करते.

स्त्री-पुरुष नात्यांतील सूक्ष्म पदर ही कविता फार अलवारपणे उलगडते. तिच्यातील संयमितपणा दृष्टिआड करता येत नाही.

‘आणि हेही जाणवतंय,

की जवळ असूनही

आपल्या दरम्यान अंतर आहे

पण मी अधीर नाही

ते कापण्यासाठी

किंवा बधीर नाही

डोळ्यांआड करण्याएवढा’

अशी ती समंजस, विवेकशील आहे. ही कविता नातेसंबंधात कुठलाही आग्रह, हट्ट धरत नाही. पुरुषी वर्चस्ववादाचा तिच्यात लवलेशही नाही. उलट उर्दू काव्यात आढळणारी- प्रेमाच्या व्यक्तीविषयी वाटणारी खोल आदरभावना, अदब आणि प्रगाढ आस्था शब्दाशब्दांतून जाणवते. एरवी प्रेमात आकंठ बुडालेले असताना वारेमाप स्तुती आणि प्रेमभंग होताच दूषणांचा वर्षांव, असा हा टिपिकल कवितागत प्रेमिक नाही. मनातील उत्कट इच्छेला शब्द देतानाही हा कवितागत प्रेमी म्हणतो-

‘ही माझी आकांक्षा नाही

एक निवळ शंख प्रार्थना आहे’

प्रेमसंबंधात एकरूप होतानाही स्त्री-पुरुषांची स्वत:ची अशी स्वतंत्र प्रतिमा अबाधितपणे अस्तित्वात असतेच आणि कदाचित ती या एकरूपत्वाला छेदही देत असते. या संदर्भात पत्की यांच्या कवितेच्या ओळी फार प्रत्ययकारी आहेत. ते लिहितात-

‘तेव्हा कुणी कुणाच्या आरशात

स्वत:ला न्याहाळायचं

या एकाच प्रश्नानं

विद्रुप होऊन जातं

आपल्यातलं आकाश’

निसर्गतत्त्व हे या कवितांचे आशयकेंद्र आहे. या संग्रहातील जवळजवळ प्रत्येक कवितेतून निसर्गरूपांविषयी कवीला वाटणारी अनावर ओढ, जवळीक व्यक्त होते. परंतु हा सिलसिला तेवढय़ावर थांबत नाही. खरेतर या कवितांतील निसर्ग केवळ कवीला प्रतिमा, प्रतीकं पुरवण्याची भूमिका वठवत नाही, तर विविध निसर्गरूपांचे या कवितांमध्ये ‘निसर्गतत्त्व’ म्हणून स्वतंत्र स्थान आहे. म्हणजे ‘एकटा’ या कवितेत-

‘एकट झाडाखाली मी एकलकोंडा झेलीत झड

वरती आकाशालाही अनावर असा निळा कढ’

असं पत्की लिहितात तेव्हा त्यांना स्वत:तलं एकाकीपण आणि झाडाचं, आकाशाचं एकटेपण यातला अन्वय अधोरेखित करायचा असतो. केवळ आपल्या भावभावनांचं आरोपण ते निसर्गरूपांवर करीत नाहीत. ही कविता निसर्गाच्या प्रतिमांतून कवितागत ‘मी’ची अलवार, व्याकूळ भावावस्था तर प्रकट करतेच, पण त्याचबरोबर ती निसर्ग आणि माणूस यातला घट्ट, सहज, आंतरिक भावबंध प्रकट करते.

‘समुद्राच्या खोल डोळय़ांत असते

माणसांच्या काळजातली गाज’

अशा शब्दांत समुद्राच्या आणि माणसाच्या मनात व्यापून असलेली विलक्षण सुंदर अशांतता व्यक्त होते. मानवी जीवनातील र्सवकष, सर्वव्यापी दु:खं, जाणीव या संग्रहातील कवितांमधून समर्थपणे साकार होते.

हेमकिरण पत्की यांच्या कवितेची शैली आणि शब्दकळेविषयी आवर्जून लिहायला हवं, इतकी ती स्वत:ची, स्वतंत्र आणि वेगळी आहे. या कवितेमधील शब्द मनाच्या नि:शब्द अवस्थेला मुखर करतात. मनाच्याही आतल्या मनाला स्पर्शणाऱ्या संवेदनांचा प्रत्यय देणारी ही पत्की यांच्या कवितेची भाषा आहे. ही कविता वर्णनं करण्यात रमत नाही, तर ती सूक्ष्मातिसूक्ष्म संवेदनांचा थेट प्रत्यय वाचकाला देते. त्यात भावशीलता आहे, पण गळेकाढू हळवेपणा नाही. मनाला झालेली खोल जखम आहे, पण दूषणं, आरोप, तक्रार नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता संवेदनेच्या थेट गाभ्यातून येणारी प्रतिमासृष्टी आणि भाषा यामुळे या कवितेची अर्थवत्ता वर्धिष्णू होऊन तिला एक झळाळ प्राप्त होतो.

पाऊस, झाडं, आकाश या म्हटले तर नेहमीच्याच प्रतिमा पत्की यांच्या कवितेत आशयाचं वेगळंच अथांग निळं आकाश घेऊन अवतरतात.

‘जिवाच्या आकांतानं

आभाळ निवळायची

वाट पाहतात इंद्रियं

नंतर निमूट होतात

पावसातल्या झाडांसारखी..’

इतक्या तरल शब्दांत त्यांची कविता आपल्या हृदयाशी संवादी होते.

अंतर्मुखता हा या कवितांचा मोठा विशेष आहे. संग्रहाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, आजच्या मोठय़ा आवाजातील कवितेच्या अवकाशात हेमकिरण पत्की यांच्या कवितेचा संयत, सूक्ष्म आवाज नक्कीच लक्षवेधक आहे.

या संग्रहात कविवर्य ग्रेस, आरती प्रभू, प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे या पूर्वसूरींच्या संदर्भातील कविताही मनाला स्पर्शून जातात.

शेवटी, कुठलाही कवितासंग्रह म्हणजे कवीच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाच्या छटा दर्शवणाऱ्या फोटोंचा एकत्रित आल्बम असतो. ‘शाई आकाशाची’ हा संग्रहदेखील हेमकिरण पत्की या कधी न देखलेल्या कवीच्या संयत, खोल, चिंतनशील व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवतो.

‘शाई आकाशाची’- हेमकिरण पत्की

मौज प्रकाशन गृह, मुंबई,

पृष्ठे- ९१, मूल्य- १२५ रुपये.

 

– अंजली कुलकर्णी

Story img Loader