गेल्या सत्तर वर्षांत उच्चशिक्षणाचा पसारा खूप वाढला असं आकडेवारीने सिद्ध करता येईलच; म्हणजे आज आपल्याकडे हजाराच्या आसपास विद्यापीठे आणि साधारण पंचेचाळीस हजारांच्या संख्येत महाविद्यालये आहेत. पण प्रत्यक्षात सामाजिक बदल घडण्याच्या दृष्टीने या संस्थांचं आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं काही योगदान आहे का, त्या संदर्भात शिक्षण खरोखरच प्रभावी ठरलं आहे का, आपल्या उच्चशिक्षणाचं उपयुक्तता मूल्य कितपत वाढलं आहे, या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आली आहे.
‘आहे त्या स्थितीत बदल घडून येणं’ ही एक सार्वत्रिक आणि सार्वकालिक घटना आहे. समाजाच्या आणि व्यक्तीच्याही जीवनात अनेकदा अनेक परींनी बदल घडून येत असतात. घडून येणारे सगळेच बदल योग्य असतात, मूल्यांच्या पायावर आधारलेले असतात असं नाही. एखाद्या समाजात सामाजिक बदल घडून येणं ही फार मोठी गोष्ट आहे. असे बदल हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. त्यांचा प्रभाव आणि त्यांची प्रभावक्षेत्रं ही भारतासारख्या देशात परस्परांहून सर्वस्वी वेगळी असू शकतात. ‘सामाजिक बदल’ घडला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला बदललेल्या सामाजिक संबंधांचा, सामाजिक वर्तनाचा, सामाजिक संस्थांच्या बदललेल्या व्यवहारांचा, समाजाच्या भाव आणि विचारांच्या प्रतिसादात झालेल्या बदलांचा उल्लेख करायचा असतो, त्याबद्दल काही म्हणायचं असतं, असं लक्षात येईल. सामाजिक बदलांचा काहीसा संबंध समाजाच्या प्रगती, विकास यांच्याशी, एका प्रकारच्या सामाजिक उत्क्रांतीशी किंवा समाजाच्या एका वैचारिक दिशेने होणाऱ्या हालचालीशी असतो असंही म्हणता- मानता येईल. तत्त्वज्ञानात्मक पद्धतीने बोलायचं तर, ‘समाज हा उत्क्रांतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो,’ असं म्हणावं लागेल. कधी कधी सामाजिक बदल हे विलक्षण झंझावाती आणि आरपार बदलाचे किंवा एकदम विरुद्ध दिशा घेणारेही असू शकतात. एखादा समाज एकदम (म्हणजे निश्चित गती राखून) आमूलाग्र बदलत जातो, त्याची सामाजिक-आर्थिक बैठक बदलू लागते, वैचारिक भूमी बदलते. म्हणजे एखादा समाज पारंपरिक भक्कम, जडशीळ जमीनदारीकडून भांडवलदारी रचनेकडे जोमाने चालू लागतो. हाच तर्क पुढे न्यायचा तर ‘सामाजिक बदल’ हा शब्दसमुच्चय एका सामाजिक क्रांतीचा (भांडवलदारी रचनेकडून समाजवादी रचनेकडे झालेली वाटचाल), स्त्रियांच्या मताधिकार चळवळीचा, स्त्री-पुरुषांच्या समानाधिकारांचा, स्त्रीमुक्तीचा, नागरी हक्क चळवळीचा निर्देश करणारा असेल. समाजात उघडपणे वा सुप्तपणे घडून येणाऱ्या सामाजिक बदलांमागे सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विकासाशी निगडित शक्तिशाली प्रवाह असू शकतात. गतेतिहासाकडे आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की एकोणिसाव्या शतकापासूनच्या ‘सामाजिक बदला’शी संबंधित विचारात ‘उत्क्रांती’च्या विचाराला अंगभूत प्राधान्य मिळालेलं आहे.
‘सामाजिक बदला’मागे किंवा सामाजिक बदल घडवून आणण्यात जे प्रभावी घटक सामील असतात, त्यात ‘शिक्षण’ हा अतिशय मोलाचा, कळीचा घटक आहे आणि त्याचं योगदान खूप निर्णायक स्वरूपाचं आहे. शिक्षण ही अपेक्षित सामाजिक बदल घडवून आणणारी फार मोठी शक्ती आहे, हे सत्य आजच्या काळात सार्वत्रिक पातळीवर स्वीकारलं गेलं आहे, किमान तसं म्हटलं तरी जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आव्हानांचा, स्थितीगतींचा सामना जेव्हा समाजाला करावा लागत होता, तेव्हा तसा सामना करताना प्रतिक्रियारूप सामाजिक बदलांचा आधार घेतला जायचा. आज ती स्थिती उरलेली नाही. आता सामाजिक बदल प्रतिक्रिया म्हणून नाही, तर जाणीवपूर्वक घडवले जात आहेत. अशा घडवून आणण्याच्या बदलांच्या मागे आता ‘शिक्षण’ ही स्वयंप्रेरित शक्ती उभी राहताना दिसते आहे. पण ही शक्ती आपल्याकडची शिक्षणव्यवस्था फक्त कागदावरच शक्तिशाली आणि प्रभावी परिणाम घडवणारी दिसते आहे का? गेल्या सत्तर वर्षांत उच्चशिक्षणाचा पसारा खूप वाढला असं आकडेवारीने सिद्ध करता येईलच; म्हणजे आज आपल्याकडे हजाराच्या आसपास विद्यापीठे आणि साधारण पंचेचाळीस हजारांच्या संख्येत महाविद्यालये आहेत असं म्हणता येईल. पण प्रत्यक्षात सामाजिक बदल घडण्याच्या दृष्टीने या संस्थांचं आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं काही योगदान आहे का, त्या संदर्भात शिक्षण खरोखरच प्रभावी ठरलं आहे का, उच्चशिक्षणाचं उपयुक्तता मूल्य कितपत वाढलं आहे, या प्रश्नांचा विचार निर्ममपणे करून पाहता येईल.
आज व्यक्ती आणि समाज यांच्या विविध धारणा, त्यांच्या मनोभूमिका, त्यांचे दृष्टिकोन सामाजिक बदलांना अनुकूल करून घेण्यात शिक्षणाने निर्णायक भूमिका बजावावी हे अभिप्रेत आहे. या संदर्भाने विचार केला तर पूर्वीच्या तुलनेत आज शिक्षण अधिक सर्वदूर पोहोचलेलं आहे. सामाजिक बदल घडवून आणणारं ‘शक्तिशाली साधन’ म्हणून ते विकसित झाल्यानं आज शिक्षण हे ‘कर्त्यां’च्या भूमिकेत उभं राहिलं आहे असं मानलं जातं. ज्ञानप्रसार आणि ज्ञानाची अर्थपूर्ण रुजवणूक यांना आता अधिक महत्त्व आलं आहे. शिक्षणाच्या संदर्भात एक बदल आज विशेष करून जाणवतो. पूर्वी शिक्षणाचा संबंध धर्मव्यवस्थेशी जेवढा होता, तेवढा तो आज उरलेला नाही. आज शिक्षणाचं निधर्मीकरण झालं आहे. एकेकाळी फार मोठय़ा प्रमाणावर धर्माशी असलेलं शिक्षणाचं नातं विरळ झालं असून, ती एक ‘स्वायत्त व्यवस्था’ म्हणून उदयाला आली आहे. वरवर पाहता तशी ती स्वीकारली गेली आहे असंही दिसतं (अर्थात, या व्यवस्थेचं हे स्वायत्तपण नाकारून शिक्षणाला पुन्हा एकदा धर्माच्या गोठय़ात बांधण्याची महत्त्वाकांक्षी नीती पुन: पुन्हा डोकी वर काढतच असते.) या निधर्मीवादी स्वायत्त शिक्षण व्यवस्थेचा मुख्य उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या प्रगती आणि विकासासाठी विविध वाटा आणि महामार्ग निर्माण करण्याचा आहे. आज आपण आपल्याच जीवनाकडे पाहिलं तर जीवनाच्या अनेक स्तरांवर शिक्षणानं घडवून आणलेले अतिशय व्यापक आणि प्रभावशाली बदल आपल्या अनुभवाला येतात. समाजाची प्रगती साधण्यासाठी समाजाची मानसिकता घडवावी लागते, समाजाचं वर्तन बदलाला अनुकूल करून घ्यावं लागतं. हाच प्रयत्न आताचं प्रगत, आधुनिक शिक्षण करतं आहे, असं मानलं जातं. ते कितपत खरं आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यात, त्याचं नेतृत्व करण्यात शिक्षणाने पुढाकार घेणं हेच आजचं अपेक्षित वास्तव आहे.
सामाजिक बदल आणि शिक्षण यांचा परस्परसंबंध कसा असतो, आज तो कसा अपेक्षित आहे आणि ‘शिक्षण’ ही तथाकथित स्वायत्त व्यवस्था आज काय करते आहे, याचा अधिक वेध घेण्याची गरज आहे. वैज्ञानिक ज्ञानाचे अधिष्ठान असलेले, समाजातील सर्व स्तर आणि घटक यांच्या विकासाचा ध्यास घेणारे, पूर्णत: सकारात्मक असणारे सामाजिक बदल घडून येण्याची आज युद्धपातळीवरची आवश्यकता आहे. मात्र तसे ते घडताहेत असं दिसत नाही, किंबहुना तसे ते घडत असल्यास त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. उलट एक विपरीत स्थिती आज जास्त तीव्रतेने भोवताली जाणवते.
जितक्या जोमाने ज्ञान विस्तारत आहे, त्याला तोडीस तोड कालविपरीत प्राचीन रूढी, परंपरा, जर्जर विश्वास यांना उन्माद चढताना दिसतो आहे. जातपंचायतींचे फतवे, जातीच्या बंदिस्त व्यवस्थेत चिणले जाणारे व्यक्तिस्वातंत्र्य आणि मतस्वातंत्र्य, स्त्री-कौमार्याच्या आचरट आणि हास्यास्पद कल्पना, उपभोग्य वस्तू म्हणून स्त्रियांचा विचार करणं या गोष्टी अधिक वाढीला लागलेल्या दिसत आहेत. वैद्यक, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, नॅनो तंत्रज्ञान, समुद्रीशास्त्र, जैवविज्ञान या आणि अशा अत्याधुनिक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना लग्नाच्या बाजारात आपला जोडीदार शक्यतो आपल्याच धर्माचा, जातीचा, जातीतही आपल्याच पातीचा असावा असं केवळ वाटत नाही, तर तसा त्यांचा एक पीळदार हट्टही असतो. अलीकडेच विवाहोत्सुकांचे चार-पाच मेळावे अभ्यासासाठी अनुभवले तेव्हा सोज्ज्वळ, मलईदार शब्दांआडून हेच मागणं लक्षात आलं. अशा मेळाव्यात सामील झालेल्या तरुणांचा इतर धर्मीयांबद्दलचा आणि त्यातही मुस्लिमांबद्दलचा आकस लक्षात घेण्यासारखा आहे. (मुस्लीम, जैन, ख्रिश्चन तरुण वर्गाचाही आग्रह तसाच असणार यात शंका नाही.) मग प्रश्न पडतो की, आपल्या शिक्षणाने नेमके केले तरी काय? कोणती विचारांची व्यापकता शिक्षणाने रुजवली आणि कोणता सामाजिक बदल घडून आला? आपण वर्षांनुर्वष धार्मिक-जातीय सलोखा आणि समानतेबद्दल शिक्षणातून प्रबोधन करतोय, पण हे प्रबोधन फक्त परिणामशून्य कर्मकांड झालं आहे.
आपल्या समाजाच्या संदर्भात ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ‘समाज’ म्हणून असलेली आपली दुभंगावस्था. आपण एका बाजूने शिक्षणाचे गोडवे गातो आणि त्याच सुरात संपूर्णपणे अतार्किक, अवैज्ञानिक, अंधविश्वासाने भरलेल्या विवेकविरोधी गोष्टींचाही उदोउदो करतो. आपले राजकारणधुरंधर नेते, सामाजिक नेतृत्व, विद्वान म्हणून मानले गेलेले आदर्श, शास्त्रज्ञ अशा सर्वच वर्गाच्या जाहीर वर्तनातून पारंपरिकता, वेडगळपणा, बुरसटलेल्या कल्पनांचा जो उच्चार आणि आग्रह धरला जातो तो कोणत्या शिक्षणाचा परिपाक म्हणायचा? की अशा विरोधाभासी भूमिका बनचुकेपणाने घेणे आणि कसलेल्या नटालाही लाजवेल अशा कौशल्याने ती भूमिका पार पाडणे हीच आपल्या उच्चशिक्षणाचीच देणगी आहे?
सकारात्मक सामाजिक बदल घडून येण्याच्या आड येणारी मुख्य अडचण आहे ती चाकोरी न मोडण्याच्या मानसिकतेची. कोणताही बदल नको असणाऱ्या आणि त्याला विरोध करण्याचीच मानसिकता असणाऱ्या मनोभूमिकेची. एक प्रकारची रोगट मानसिकता, भयगंड, तथाकथित संतुलन ढळण्याची भीती यांच्या बरोबरीने वैचारिक अंधत्व आलेले लोक फाजील आत्ममग्नतेत मश्गूल असतात आणि ते उच्चशिक्षित असले तरी त्यांना फक्त लाभाचा वाटणाराच सामाजिक बदल हवा असतो. हे उच्चशिक्षित पदवीधर शिक्षणाचा समग्र पराभव करणारेच निपजतात. आज आपल्याकडे अशांचीच संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात भरणारे जातवार मेळावे, संमेलनं, मोर्चे आणि त्यांना उत्तर देणारे तेवढेच आततायी लोक पाहिले की आपण नेमके कोणत्या पायरीवर उभे आहोत हे लक्षात येतं. आपण राजकीय लोकशाही तर पराभूत केलीच आहे, पण सामाजिक लोकशाहीचे आपले आपणच मारेकरी ठरलो आहोत. अशा वर्तनात काही गैर आहे, आपण एका ताज्य आणि गैरलागू तर्काची पालखी वाहणारे भोई ठरतो आहोत याची किमान जाणीवही नव्या आक्रमक पदवीधर वर्गाला नाही.
सामाजिक बदलांचं राजकारण कसं करायचं; आपापल्या जातीचं आणि पर्यायाने मतपेढीचं रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा स्मार्ट उपयोग कसा करायचा; फुले- शाहू- आंबेडकर-सावरकर यांचा वैचारिक पराभव करत त्यांचा मतलबी वापर कसा करायचा, याचा भारतासाठी वस्तुपाठ घालून देणाऱ्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची महाराष्ट्रात तिळमात्रही कमतरता नाही. सकारात्मक सामाजिक बदलाचा आणि त्याच्या व्याप्तीचा सोयीसोयीने अर्थ लावणारे सर्वपक्षीय राजकारणी हेच खरे शिक्षण आणि विकास यांचे मारेकरी आहेत हे पुन:पुन्हा कसोटीला उतरलेलं सत्य आहे. विविध संदर्भात समाज जितका विभाजित राहील तेवढे हे समाजशत्रू खुशाल राहतात, हे गेल्या अनेक वर्षांतील आणि त्यातही गेल्या तीन वर्षांतील विविध दंगली, आंदोलनं, भयानक बेताल वक्तव्यांचा सपाटा आणि मोर्चे यांची साक्ष काढून पाहता येईल. गाईच्या नावाने झालेल्या हत्या आणि जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली दहशत पाहिली, की पुन्हा प्रश्न पडतो तो- या विघातक सामाजिक बदलांचं काय करायचं? हे लांच्छनास्पद वास्तव कोणत्या शिक्षणाचा परिपाक आहे? आपण खरंच का काही निर्विवाद सामाजिक बदल घडवले? धर्म, जात, वंशनिरपेक्षता यांचा ध्यास (?) घेणारा भारतीय माणूस नेमका त्याविरुद्ध दिशेने जाऊन धर्म आणि जात यातच स्वत:ची ‘आयडेंटिटी’ कशी आणि का शोधू लागतो? उच्चशिक्षणाने त्याला इतकं भंपक केलं आहे? शिक्षणातून होणारा संस्कार इतका टरफलासारखा निर्थक का ठरावा? त्या तथाकथित संस्कारातच काही सत्त्व उरलेलं नाही का?
इथंच आणखी एक मुद्दा लक्षात घेता येईल. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, संगणकक्रांती, माहिती तंत्रज्ञान या सर्वाचा एक खोलवरचा आणि व्यापक असा परिणाम ज्या काळात आपल्या समाजावर घडत होता, झिरपत होता त्याच काळात संपूर्ण देश धार्मिक आणि जातीय अहंकार, अभिमान आणि द्वेष यांच्या वादळावर स्वार झाला होता. घराघरांत जेव्हा संगणकाची प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हाच गल्लीबोळांमधून विटांचं केलेलं ‘कलेक्शन’ एका ‘कन्व्हिक्शन’ने अयोध्येला रवाना होत होतं. संगणकाने आणि इंटरनेटने आपले सर्व आयाम बदलले आणि नंतर आलेल्या मोबाइलने तर खासगी आणि सार्वजनिक हा भेदच गाडून टाकला. तंत्रज्ञानाने सगळ्या जगण्याचीच पुनर्माडणी झाली. हा एक मोठाच सामाजिक बदल घडून आला. हा बदल फिका पडावा असा मध्ययुगीन उन्माद आपला देश, आपला महाराष्ट्र गेल्या दोन-अडीच दशकांत पाहात आला आहे. धर्म, जात, भाषा, पंथ, आर्थिक वर्ग या हत्यारांचा वापर करत त्या त्या समाजांना आणि वर्गाना पुन:पुन्हा चिथावणी देऊन संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचे आणि समाजात भयगंड निर्माण करण्याचे राजकीय गारुडय़ांचे कसब वादातीत आहे. या गारुडय़ांच्या एका हाकेसह उभे राहणारे पदवीधर, द्विपदवीधर जथ्थे पाहिले, की पुन्हा एकदा शिक्षणाबद्दल, त्याच्या सामर्थ्यांबद्दल संशय निर्माण होतो. शिक्षण एका दिशेला आणि जगण्याची गुंतागुंत दुसऱ्या दिशेला असा प्रकार अनुभवाला येतो आहे. जगण्याच्या गुंतागुंतीपुढे आणि या गुंत्याने निर्माण केलेल्या आव्हानांपुढे शिक्षणाची शक्ती पराभूत होतानाच दिसते आहे.
सकारात्मक सामाजिक बदलाच्या आड येणारी एक मोठी शक्ती म्हणजे धनशक्ती. जिथे अफाट पैसा आहे आणि तो ज्यांच्या हाती आहे ते सर्व कायदे आणि नियम यांच्यापेक्षा अधिक बलवान ठरताना दिसतात. असे लोक कायद्याची गौरवगीतं गाणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रधान आणि प्रभावशाली सेवकांना सहज मॅनेज करतात असं रोजच्या रोज दिसतं आहे. देशात लुटारूंच्या असलेल्या तुडुंब संपत्तीत भर घालण्यासाठी बँका आनंदाने पुढे येतात आणि याच बँका गरिबांना देशोधडीला लावायला कायदे आणि नियम दाखवत हिरिरीने पुढे सरसावतात. या देशातल्या हजारो वित्तीय संस्था, त्यांचे सल्लागार हे सारे उच्चशिक्षित आहेत आणि त्यांचं वर्तन मात्र सहेतुक भेदाभेदावर पोसलेलं आहे. या मंडळींना शिक्षण का बदलू शकलं नाही? आपलं शिक्षण खरंच इतकं प्रभावहीन, परिणामशून्य आहे का?
आपलं उच्चशिक्षण सर्वस्वी पराभूत झालं आहे की काय, असा प्रश्न पुन:पुन्हा पडतो तो एकूण समाजाचा लिंगसमभावाला असणारा अत्यंत छुपा व तीव्र असा विरोध पाहिल्यावर. आपल्याकडे धर्म आणि जात यांच्या आधारावर असलेले खुनशी भेदाभेद तर आहेतच, पण त्याहून अधिक हिंस्र भेदाभेद लिंगावर आधारलेले आहेत. धर्म आणि जात, पंथ कोणतेही असोत, त्यांच्यातील एक समान सूत्र आहे ते स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात. स्त्रियांच्या शिक्षणात, त्यांच्या नोकरी-व्यवसायातील पदार्पणात, सामाजिक वावरात, त्यांच्या वाढलेल्या निर्णयाधिकारात, त्यांच्या कार्यक्षमतेत झालेली वाढ समस्त पुरुष वर्गाला जिव्हारी लागलेली जाणवते. या संदर्भात कोणताही धर्म आणि जात अपवाद नाहीत. संसदीय व्यवस्थेत, अवाढव्य कॉर्पोरेट विश्वात, न्यायव्यवस्थेत, पोलीस आणि सैन्यदलात, अत्युच्च संशोधन संस्थांमध्ये, शिक्षण व्यवस्थेत आणि इतर नागरी सेवांमध्ये अत्युच्च पदाला गेलेल्या मूठभर स्त्रियांचे वारंवार दाखले दिले जातात. पण संपूर्ण देशाच्या लोकसंख्येत हे प्रमाण अगदीच अपवादात्मक आहे. त्या आकडेवारीचा आधार घेऊन भारतातील स्त्रियांच्या एकूण प्रगती आणि विकासाविषयी भाष्य करणं हे जाणीवपूर्वक फसवणूक करणारं आहे. स्त्रियांच्या संदर्भात गेल्या दशकातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचं अफाट प्रमाण लक्षात घेतलं, त्यातही बलात्काराची भयावहता, त्यातील पाशवीपणा लक्षात घेतला तर पन्नास टक्के ‘पुरुषी भारत’ हा पन्नास टक्के ‘स्त्री-भारता’चा मारेकरी आहे असं म्हणता येईल. स्त्रियांच्या संदर्भातले जे गुन्हे आहेत, ते करणाऱ्या गुन्हेगारांची शैक्षणिक पाश्र्वभूमी लक्षात घेण्यासारखी आहे. यात पेशाने शिक्षक, प्राध्यापक, वरिष्ठ पदांवरील अधिकारी, धोरणकर्ते, व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, पोलीस किती आहेत आणि त्यातले पदवीधारक- द्विपदवीधारक किती आहेत, हे एकदा समजून घ्यायला पाहिजे. अशांची संख्या केवळ भयकंपित करणारीच नाही, तर आयुष्यभराची शरम वाटावी अशी आहे. गेल्या सत्तर वर्षांत शिक्षणाचे, लिंगनिरपेक्ष आणि लिंगसमानतेचे, समान शिक्षण आणि समान संधीचे, स्त्री-पुरुष समानाधिकारांचे कानठळ्या बसावेत इतके ढोल आपण वाजवत आलो. मात्र यातील एकाही गोष्टीत किमान समाधान मानावं इतकंही यश आपण मिळवू शकलेलो नाही. असं का व्हावं? देशातील प्रत्येक व्यवस्था अधुरी, खुजी, विकलांगच का निपजावी?
या अपयशाचा संबंध पोकळ आणि उपयोगशून्य शिक्षणात, राष्ट्रीय आरंभशूरतेत, जोशिल्या वक्तृत्वनिपुण राजकीय नेतृत्वात, राजपत्रित अधिकारी वर्गाच्या कुटिलतेत आणि एकूण समाजाच्या विषारी स्वमग्नतेत आहे असं मानता येईल का? आपल्या उच्चशिक्षणाचाच हा पराभव नाही का? उदात्त ध्येय आणि आकांक्षा यांची सत्तर र्वष बडबड करणारी आपली शिक्षण व्यवस्था कठोर वास्तवाच्या खडकावर आपटून पुन: पुन्हा पराभूत झालेलीच का दिसत राहावी? शिक्षणाच्या स्पर्शाने माणूस सुसंस्कृत, सुशील, समजूतदार, सहिष्णू होतो ही आजवरची समजूत तर आता रद्दीच ठरली आहे. आता उच्चविद्याविभूषित माणूस नेमकंउलट वागताना आणि स्वत:च्या वर्तनाचं निर्लज्ज समर्थन करताना दिसतो. समाजमाध्यमांवर अशा वर्तनाचं प्रमाण किती आहे हे सहज तपासता येईल. तिथं व्यक्त होणारं समाजमन म्हणजे विकृती, पाशवीपणा आणि हिडीसपणाचा दाखलाच आहे. देशात असहिष्णुता कशी वाढलेली नाही हे सांगणाऱ्या हजारोंना सहिष्णुतेचा स्पर्शही झालेला नसावा?
आज भारतीय समाजात जे सामाजिक बदल घडून आले आहेत त्याचं बहुतांश श्रेय हे जागतिक पातळीवर उदयाला आलेल्या विज्ञान- तंत्रज्ञानातील क्रांतीला द्यावं लागेल. जागतिकीकरण, उदारीकरण, बहुराष्ट्रीय संस्कृतीचा इथला शिरकाव, मुक्त अर्थव्यवस्था, बाजारपेठकेंद्री जीवनशैलीचा अंगीकार यांना ते श्रेय द्यावं लागेल. भारतीयांचं दैनंदिन जीवन बदलण्यात परदेशी उद्योग अग्रभागी आहेत. या नव्या सत्तेबरोबर नवी मूल्यव्यवस्था आपलं बस्तान इथं बसवते आहे. ही मूल्यं अर्थातच बाजारकेंद्री आहेत. शिक्षण, संप्रेषण, संवाद यांची नवी मांडणी अस्तित्वात आली आहे. शिक्षणाला खपाचं, बाजारातल्या मागणीचं परिमाण प्राप्त झालं आहे. पोकळ, निर्थक आदर्शवादापेक्षा हे केव्हाही चांगलंच आहे. मात्र त्या प्रकारच्या शिक्षणाचा लाभ फक्त मूठभर धनिकांच्या बाळांनाच होतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
रूढ विद्यापीठं, संपत्ती संचयाचाच ध्यास घेतलेली अभिमत विद्यापीठं, कौशल्यहीन पदवीधरांचा लोंढा समाजात लोटणारी महाविद्यालयं आणि लाखोंच्या संख्येतले पदवीधारक, द्विपदवीधारक बेकार (जे महिना २००० ते ८००० कमावण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसायला तयार आहेतच, पण अशा नोकऱ्या मिळवण्यासाठी ते आपापल्या आर्थिक शक्तीनुसार सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारात निपुण असलेल्या दलालांना खूश करण्याचं कौशल्य आत्मसात करून घेताहेत.) हे आजचं आपलं शैक्षणिक वास्तव आहे. या वास्तवाचं बोट धरूनच वाटचाल करण्याची आपल्या तरुणांवर आपत्ती ओढवली, तर भारत हा जगातला सगळ्यात मोठा ‘तरुण बेकारांचा देश’ होईल यात शंका नाही. आपलं शिक्षण इतकं पोकळ आणि निर्थक आहे की ते तरुणांना हुरूप, आत्मविश्वास आणि उमेद देऊ शकत नाही. भारतीय समाजात अपेक्षित सामाजिक बदल घडवण्यात शिक्षण नापास झालं आहे, हे त्रिवार सत्य आहे. याचा मोठा दाखला म्हणजे इथं डार्विनला खोटं ठरवणारा मंत्री उजळ माथ्याने फिरू शकतो हाच आहे. असं असूनही आपण आपल्या उपयोगशून्य शिक्षणाचीच भलामण करणार आहोत का?
vijaytapas@gmail.com