जनमानसातील आपली ‘अम्मा’ ही प्रतिमा जयललिता यांनी स्वत:च रचलेला स्त्रीवादाचा एक आभासी खेळ होता. त्यांच्या राजकारणासाठी तो अपरिहार्य होता. आणि त्याचा त्यांनी व्यवस्थित वापरही करून घेतला. पण तरीही त्यातील स्त्रीवादाचा क्षीण धागा नाकारता येत नाही. त्याचं पुसटसं, ओझरतं का होईना, अस्तित्व मान्य करावंच लागतं. कारण याच मुद्दय़ावर त्या भारतीय राजकीय व्यवस्थेमधील इतर स्त्री-नेत्यांच्या तुलनेत वेगळ्या ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘अम्मा’, ‘माँ’, ‘माता’, ‘आई’ या शब्दांनी भारतीय समाजमन कसं लोण्यासारखं विरघळतं याचा अनुभव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याइतका इतर कोणत्याच भारतीय राजकीय नेत्याला नसणार. ‘आई ते मातृदेवता’ (मदर गॉडेस) हा आपल्या समूहमनाचा प्रवास इतका पटकन् होतो, की तिथे विश्लेषणाच्या सगळ्या शक्यताच संपून जातात. तशाही समूहमनाच्या बाबतीत त्या फारशा नसतातच. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा, तत्कालीन राजकीय अवकाशातून मिळालेली संधी आणि आईच्या भूमिकेत शिरू पाहणाऱ्या व्यक्तीला पूजायला तयार असलेलं हे समूहमन यांची अचूक सांगड घालत जयललिता यांनी गेल्या ३० वर्षांमध्ये आपली राजकीय पकड घट्ट करत नेली होती. हे करत असताना भारतीय राजकीय व्यवस्थेतल्या इतर नेत्यांशी त्यांची नेहमीच तुलना होत राहिली. आणि या तुलनेत त्यांचं राजकारण नेहमीच वेगळं राहिलेलं आहे. हे वेगळेपण म्हणजे जयललिता यांच्या विश्लेषकांना त्यांच्या राजकारणात स्त्रीवादाचा एक पुसटसा धागा दिसत राहिला आहे. तो खरोखरच तसा होता, की ती जयललिता यांची राजकीय गरज होती?
१९८९ मध्ये विरोधी पक्षनेत्या असताना भर विधानसभेत जयललिता यांच्यावर सत्ताधारी द्रमुकच्या सदस्यांनी हल्ला केला. त्यांची साडी फाडली, केस ओढले, त्यांना फरफटवलं. राज्याची कायदा-सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून व जिथे कायदा-सुव्यवस्थेबद्दल खल चालतो अशा ठिकाणी असं घडणं हा स्त्रीत्वाचा आत्यंतिक अपमान. स्त्री म्हणून झालेल्या या अपमानाचा, मानहानीचा, आपल्याला संपवण्याच्या प्रयत्नांचा स्त्री म्हणूनच बदला घ्यायचा, या विचारांतून जयललिता यांचा पुढचा सगळा प्रवास झालेला दिसतो. या प्रसंगातून बाहेर येताना त्यांनी आपला पेहराव बदलला, राहणं बदललं आणि त्या ‘अम्मा’च्या रूपात जनतेसमोर आल्या. अम्मा म्हणजे आई ही सगळ्यांची काळजी घेणारी, सर्वासाठी खस्ता खाणारी, मुलांच्या सुखाशिवाय स्वत:ला काहीच नको असलेली ही स्वत:ची प्रतिमा त्यांनी जाणीवपूर्वक तयार करत नेली असं त्यांच्या कारकीर्दीवरून दिसतं. विधानसभेत त्यांच्याबाबतीत जे घडलं ते आपल्याला आवडलं नाही, हे तमीळ मतदारांनी पुढच्या निवडणुकीत मतपेटीतून दाखवून दिलंच; पण तोपर्यंत जयललिता ‘अम्मा’ बनून गेल्या होत्या. म्हणजे आता तर त्यांच्या केसालाही धक्का लावलेला लोकांना चालला नसता. हा भावनिक खेळ त्यांनी खूप जाणीवपूर्वक उभा केला. तो यशस्वी होण्यात त्यांना तिथल्या अतिसामान्य महिलांचा जो प्रतिसाद मिळाला त्याचा फार मोठा वाटा आहे.
अम्मा किचन, अम्मा इडली, रेशनवर वीस किलो तांदूळ, मिक्सर ग्राईंडर फुकट, स्त्रीभ्रूणहत्येविरोधात
कडक पावलं, मुलीच्या लग्नासाठी पंचवीस हजार रुपये व चार ग्रॅम सोनं, शिकणाऱ्या मुलींसाठी सायकली, लॅपटॉप अशा लोकप्रिय योजनांभोवती जयललितांचं सारं राजकारण फिरत राहिलं. तशात प्रशासनावर त्यांची उत्तम पकड असल्यामुळे या सर्व योजनांची अंमलबजावणीही हवी तशी होत गेली. रोजच्या धबडग्यात पिचणाऱ्या अतिसामान्य स्त्रीसाठी, तिच्या कुटुंबासाठी साहजिकच हे सगळं ‘छप्पर फाडके’ होतं. जयललिता यांच्या वैयक्तिक पातळीवरच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथांची चर्चा होत असली तरी अतिसामान्य मतदार- त्यातही महिलांना त्यांच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. त्यांच्यासाठी त्यांचं रोजचं आयुष्य सुकर करणाऱ्या जयललिता आईच्याही वरच्या स्थानी.. देवीच्या स्थानी जाऊन पोहोचल्या होत्या.
दुसरीकडे रोजच्या जगण्यात पुरुषप्रधान व्यवस्थेपुढे हतबल होणाऱ्या, या व्यवस्थेच्या प्रभुत्वाला बळी पडणाऱ्या या अतिसामान्य स्त्रियांसाठी- आपल्यासारखीच एक बाई राज्याची मुख्यमंत्री म्हणून राज्य करते, तिच्यासमोर सत्तेतले सगळे पुरुष नतमस्तक होतात, हे त्यांना भावणारं चित्र होतं. इंदिरा गांधींच्या बाबतीत देशाच्या पातळीवर जे झालं, तेच जयललितांच्या बाबतीत राज्यपातळीवर झालं असं म्हणता येईल. जयललितांच्या नेतृत्वाला महिलांचा मोठय़ा प्रमाणात जनाधार मिळण्यामागे असलेल्या कारणांपैकी हेही एक कारण आहे.
स्त्रियांसाठीच्या विविध योजना, स्त्रियांचा जनाधार हे सगळं बघितलं तर जयललितांच्या राजकारणात स्त्रीवादाचा पुसटसा धागा दिसतो, ही गोष्ट या अर्थाने बरोबर आहे. पण ते पूर्ण वास्तव नाही. ‘अम्मा’ झाल्यानंतरच्या त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाकडे पाहताना लक्षात येतं की, निवडणुकीच्या राजकारणात, विधानसभेत, मंत्रिमंडळात स्त्रियांची संख्या वाढेल, त्यांचं निर्णयप्रक्रियेतलं सक्षमीकरण होईल, या पद्धतीचे कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांच्या राजकारणात दिसत नाहीत. त्यांनी स्त्रियांसाठी राजकारण करतानाही ‘मी देणारी आणि अगदी तळाच्या स्तरातल्या त्या घेणाऱ्या’ या पद्धतीचंच राजकारण केलं. त्यामुळे घेणाऱ्या या त्यांना कायम देवीसमान मानत राहिल्या. आणि त्यांनी कोणत्याही पातळीवर त्यांच्या आसपासही फिरकण्याचा तर प्रश्नच नव्हता.
टॉपची अभिनेत्री ते राज्याची मुख्यमंत्री या प्रवासात त्यांनी जे जे काही अनुभवलं असेल त्यावरची प्रतिक्रिया म्हणून असेल, पण पुरुष आपल्यासमोर नतमस्तक होत आहेत, हे पाहणं त्यांना मनोमन सुखावत असे असंही त्यांच्याबाबत म्हटलं गेलं. या सगळ्यातून जयललिता यांचं व्यक्तिकेंद्रित तसंच अधिकारवादी रूपच पुढे येतं. आपलं राजकारण उभं करताना त्यांनी स्वत:ला ‘अम्मा’च्या रूपात लोकांपुढे पेश केलं आणि त्या रूपात आपल्याला स्वीकारलं जावं यासाठी जे करणं आवश्यक होतं, ते सारं काही केलं. स्त्रियांना आवश्यक त्या वस्तू वाटणं, आपण त्यांची कशी काळजी घेतो आहोत हे दाखवणं हा अशा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा भाग होता. म्हणून स्वत:ला ‘अम्मा’ म्हणवून घेत त्यांनी आपल्या राजकारणाला स्त्रीवादाचा मुलामा द्यायचा जो प्रयत्न केला, तो सगळा त्यांनीच रचलेला स्त्रीवादाचा आभासी खेळ होता. त्यांच्या राजकारणासाठी तो अपरिहार्य होता. आणि त्याचा त्यांनी व्यवस्थित वापरही करून घेतला. पण तरीही तो धागा नाकारता येत नाही. त्याचं पुसट, ओझरतं का होईना, अस्तित्व मान्य करावं लागतं. कारण याच मुद्दय़ावर त्या भारतीय राजकीय व्यवस्थेमधल्या इतर स्त्री-नेत्यांच्या तुलनेत वेगळ्या ठरतात.
सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, सुषमा स्वराज, मेहबूबा मुफ्ती, वसुंधराराजे सिंदिया या आजघडीला देशातल्या महत्त्वाच्या राजकीय नेत्या आहेत. त्यांच्याच बरोबरीने जयललिता यांचंही नाव घेतलं जात होतं. जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती, मेहबूबा मुफ्ती, वसुंधराराजे सिंदिया या राज्यपातळीवरच्या नेत्या असल्या तरी त्यांनी आपापल्या वैशिष्टय़पूर्ण राजकीय शैलीमुळे देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. पण जयललिता वगळता उर्वरित स्त्री-नेत्यांचं राजकारण हे पुरुषी मानलं जातं. साहजिकच जयललिता यांनी निर्माण केलेला स्त्रीवादी राजकारणाचा आभास त्यांना या इतरजणींपेक्षा वेगळं ठरवतो.
जो आभास जयललिता यांना निर्माण करता आला, तो इतर जणींना का करता आला नाही, याचं उत्तरही जयललिता यांच्या राजकीय प्रवासातच सापडतं. एकतर जयललिता यांची सगळी कारकीर्द पुरुषांशी संघर्ष करतच उभी राहिली आहे. सिनेमाच्या क्षेत्रात त्या, त्या काळातल्या टॉपच्या हीरॉइन असल्या तरी ते पुरुषप्रधानच क्षेत्र. ज्या एमजीआर यांना जयललितांनी आपले फ्रेण्ड, फिलॉसॉफर आणि गाइड मानलं, त्यांच्याशीही त्यांना एका टप्प्यानंतर संघर्षच करावा लागला. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपवून न ठेवता त्यांनी योग्यवेळी एमजीआर यांचं धरलेलं बोटही सोडून दिलं आणि एक स्त्री- नेत्या म्हणून त्या स्वत:च्या बळावर उभ्या राहिल्या. तिथून बहुजन समाजाच्या ‘अम्मा’ बनेपर्यंतचा सगळा बरा-वाईट प्रवास हा त्यांनी स्वत:च्या बळावर, स्वत:ला घडवत केला आहे. खरं तर अय्यंगार म्हणजे उच्च मध्यमवर्गीय तमीळ ब्राह्मण समाजातली मुलगी ते बहुजन समाजाच्या अत्यंत लोकप्रिय नेत्या हा त्यांचा प्रवास अत्यंत विस्मयकारक, विलक्षण असाच आहे. एका बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी स्त्रीनं राजकारणाच्या माध्यमातून स्वत:भोवती गूढतेचं, देवत्वाचं वलय निर्माण करत पुरुषप्रधान व्यवस्थेशी कसा संघर्ष केला, हे त्या प्रवासातून दिसतं.
पण या संघर्षांत जयललिता यांना मिळालेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्या राजकारणात आल्या तेव्हा त्यांनी कोणासाठी राजकारण करायचं, हे ठरून गेलं होतं. तिथली राजकीय परिस्थितीच अशी होती, की द्रमुक किंवा अण्णाद्रमुक या दोन्ही प्रादेशिक पक्षांना बहुजन राजकारणाच्या चौकटीतच आपापले गड राखायचे होते. त्या अर्थाने राजकीय विचारसरणीचा झगडा जयललितांना करावाच लागला नाही. हे बहुजनवादी राजकारण पुढे व्यक्तिवादाच्या अंगाने आR मक होत गेलं. साहजिकच जयललितांचं राजकारणही अधिकाधिक व्यक्तीकेंद्री होत गेलं. आणि स्वत:ला टिकवण्याचा अपरिहार्य भाग म्हणून ते महिलांसाठी कल्याणकारी लोकप्रिय योजनांचं रूप घेऊन आलं.
सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज, वसुंधराराजे, मेहबूबा मुफ्ती यांच्याबाबतीत अशी परिस्थिती नव्हती आणि नाही. मायावतींचं राजकारण हे दलित विचारसरणीच्या पायावर उभं आहे आणि ती विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची अपरिहार्यता त्यांच्यापुढे आहे. ममता बॅनर्जीसाठी डाव्यांना वेसण घालणं जास्त महत्त्वाचं ठरलं. सुषमा स्वराज, वसुंधराराजे यासुद्धा त्यांच्या पक्षाची विचारसरणी आणि ती पुढे घेऊन जाणं या अपरिहार्यतेत अडकल्या. काँग्रेसच्या सबगोलंकारी कडबोळ्यातून आणि पक्षाच्या एकूण ऱ्हासपर्वातून बाहेर पडणं सोनिया गांधींसाठी अशक्य होतं. मेहबूबा मुफ्तींपुढची आव्हानं आणखीनच वेगळी होती. त्यामुळे आपापल्या पक्षांतर्गत विचारसरणीशी बांधील राहून संघर्ष करताना त्यांचं स्त्रीवादी राजकीय नेत्याचं रूप पुढे येऊ शकलं नाही. त्यांच्या तुलनेत जयललिता यांचा सगळा संघर्ष खऱ्या अर्थाने एका स्त्रीचा राजकीय संघर्ष होता. व्यक्तिकेंद्रिततेमुळे त्यांचं राजकारण व्यापक स्त्रीवादी राजकारणाकडे गेलं नाही. त्यामुळं आता उरला आहे तो त्यांचा केवळ आभासी ‘अम्मा’वाद!
वैशाली चिटणीस – vaishali.chitnis@expressindia.com