प्रफुल्ल शिलेदार हे नव्वदोत्तरी कवितेतले एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचा यापूर्वी ‘जगण्याच्या पसाऱ्यात’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. एकूणच नव्वदोत्तर काळात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर जागतिकीकरणाच्या उमटलेल्या खुणांचे, ओरखडय़ांचे अचूक आकलन त्यांच्या कवितांमध्ये दिसते. बदलांच्या या सगळ्या वादळी आवेगात सापडलेले मानवी मन, मूल्ये, संस्कृती, भाषा यांसह मानवी जगण्याला आलेले भरकटलेपण आणि दिशाहीनता त्यांनी कवितेमधून अचूक टिपली आहे.

‘पायी चालणार’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रहदेखील त्यांच्या कवी म्हणून असलेल्या लौकिकात भर घालणारा आहे. कवितेच्या व्यासपीठीय झगमगाटापासून दूर राहून अव्यभिचारी निष्ठेने जी कविता प्रफुल्ल शिलेदार लिहीत आहेत, त्या कवितेत त्यांच्या या निष्ठेचे पुरेपूर प्रतिबिंब उमटले आहे. नव्वदोत्तर काळात ‘खाउजा’ धोरणामुळे आलेली नव्या स्वरूपातली भांडवलशाही, यांत्रिकीकरण, नेट आणि मोबाइल क्रांती, जगभरात उफाळलेली युद्धसदृश्य परिस्थिती, दहशतवाद, मूलतत्त्ववादाची उचल, स्त्री-अत्याचार, पर्यावरणऱ्हास, जीवनमूल्यांचा ऱ्हास आणि या सगळ्याबद्दल लिहू, बोलू पाहणाऱ्या साहित्यिक विचारवंतांची होणारी मुस्कटदाबी असे सगळे भीषण वास्तव माणसाच्या उंबरठय़ाआत येऊन पोहोचले आहे. आणि जणू संपूर्ण मानवी अस्तित्व व संस्कृतीच विनाशाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. प्रफुल्ल शिलेदारांची कविता या सगळ्या विदारक वास्तवाच्या दर्शनाने व्यथित होते आणि या पाश्र्वभूमीवर मूल्यशोध घेण्यासाठी प्रेरित होते.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

प्रफुल्ल शिलेदारांनी ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहात भोवतालातील बिघडलेल्या पर्यावरणाचा वेध घेतला आहे. ‘पायी चालणार’ हे संग्रहाचे शीर्षकही त्यादृष्टीने अन्वर्थक आहे. परंतु त्यांचा रोख केवळ जैविक पर्यावरणाकडे आहे असे नाही, तर एकूणच समकालीन मानवी जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाचा वेध त्यामागे आहे असे जाणवते. ‘जमिनीशी नातं जपणारा प्रत्येकजण पृथ्वीचा खेळखंडोबा करण्याविरुद्ध पायी चालत असतो’ ही त्यांची अर्पणपत्रिका खूपच बोलकी आहे. पृथ्वीचा खेळखंडोबा करणाऱ्या अनेक घटकांविरुद्ध तिला बोलायचे आहे, हे एकदा लक्षात घेतले की वरवर सोपी वाटणारी त्यांची कविता शब्दार्थामागे असणारा मोठा अवकाश उलगडू लागते. पृथ्वीचा खेळखंडोबा होताना मानवतावादी मूल्ये, संवेदना यांचाही खेळखंडोबा करण्यास माणूस अधीर झाला आहे, याविषयीची खंत या सर्व कवितांच्या गाभ्याशी आहे.

उदा. ‘राहू देतो कित्येकांना सोबत’ या कवितेत सृष्टीत किडेमकोडे, साप, पाली, कुत्री-मांजरी, झाडेझुडपे यांना अधिवास करण्याचा मानवाइतकाच अधिकार आहे, हे सांगण्यासाठी कवितागत ‘माणूस’ म्हणतो..

‘पालीला पिकासोच्या चित्रामागे दडू देतो

खिडकीपर्यंत मजल मारणाऱ्या सरडय़ाला

घर मनसोक्त न्याहाळू देतो..’

वस्तुत: ही सर्व सृष्टी सजीवांच्या आश्रयाची, निवासाची हक्काची जागा आहे. परंतु दिवसेंदिवस मानव अधिकाधिक हिंस्र, क्रूर होत निसर्गातील इतर जीवांचे अस्तित्व नाकारतो आहे. त्यांना नामशेष करण्याच्या मागे लागला आहे. एवढेच नाही, तर इतर धर्मीय/ जातीय/ वांशिक मानवी समूहांच्या जिवावरही तो उठला आहे.. हाच आशयबंध ही कविता सूचित करते. ‘उंचावरच्या खिडकीत’सारख्या कवितेतही खिडकीत घरटे बांधण्याची पक्ष्याची कृती हे जणू आपल्या मालकी हक्कावरील अतिक्रमण आहे असे गृहीत धरून कवितागत ‘मी’ त्याला हुसकून लावण्याचा प्रयत्न करतो. आणि या स्वामित्वभावनेचा लवलेशही नसलेली त्याची मुलगी बापाच्या हुकूमशाही, वर्चस्ववादी, असहिष्णु कृतीकडे आश्चर्याने पाहते. सध्याच्या माणसांच्या स्वार्थी मनोवृत्तीवरील हे भाष्य ठरते.

खरे तर समाजातील काही सजग घटक माणसाला भविष्यातील विध्वंसाचे, विनाशाचे इशारे देत आहेत. परंतु त्या इशाऱ्यांना तो किडामुंगीइतकीही किंमत देत नाही. मात्र, काळाच्या एका टप्प्यावर त्याला जाणवते, की ‘मुंगी’ जे सांगत होती ते खरे ठरते आहे. ‘मुंगी’ या कवितेतील हा आशय ‘नर्मदा बचाव’ आणि तत्सम इतर आंदोलनांची आठवण करून देतो.

‘डोंगर पोखरून

मुरूम काढला

नदी उपसून

रेती..’

यासारख्या कवितेत विनाशीकरणाच्या अजस्र पावलांची चाहूल आहे.

‘उसावाणी माणसं

टाकली चरकात’

या ओळींतून केवळ निसर्गाचा नव्हे, तर एकूणच मानवी अस्तित्वाचा विनाशाकडे सुरू असलेला प्रवास अधोरेखित झालेला आहे. त्याचप्रमाणे विविध स्वरूपाच्या विषमतेतून आज जगभर उसळलेला हिंसाचार, विद्वेष यांवरही या कवितांमधून टोकदार भाष्य केले गेले आहे.

‘दुर्मिळ असलेल्या गोळ्यांचा

आजकाल पाऊस पडू लागला आहे’

किंवा-

‘एक माणूस आम्ही

आज नेम धरून मारला’

अशा शब्दांत ही भयकारी हिंसाचारी वृत्ती आणि हरवत चाललेल्या मानवी संवेदना व्यक्त होते. माणूसपणाच्या सीमा ओलांडून माणसं सतत डोक्यात कडूजहर द्वेष का बाळगून राहतात, हा कवीला पडलेला प्रश्न आहे.

भोवतालच्या अशा सगळ्या पाश्र्वभूमीवर प्रफुल्ल शिलेदार कवी, कवीची भूमिका आणि सद्य:कालीन कवितासृष्टी यांचा जो लेखाजोखा आपल्या कवितांमधून घेतात, तोही अत्यंत संबद्ध ठरतो. भोवतालातील सगळ्या विपरीताचा परिणाम म्हणून कवीची नियत आणि फितरतही बदलली आहे का, याचा शोध कविताविषयक कवितांमधून येतो.

‘जगण्या-मरण्याच्या सीमेवर उभा कवी

माणूस आणि पशू यांच्या

संधिकाळात जगतो आहे

कविता लिहिण्यासारखी

मातकट कृती करतो आहे

त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नाही’

या शब्दांत कवीची निराशा, हताशा व्यक्त होते. एकूणच समकालीन जीवनात तसेच कवितेच्या जगातही संवेदनशील व्यक्तीची.. कवीची होणारी घुसमट शिलेदार यांनी नेमकेपणाने व्यक्त केली आहे. ‘कवीला पडलेलं पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’ या कवितेत साहित्य-संस्कृतीची झालेली केविलवाणी स्थिती त्यांनी नेमकी टिपली आहे.

‘लेखकाच्या आत्मचरित्रातील पुस्तकविषयक नोंदी’ ही या संग्रहातली एक महत्त्वाची मालिका-कविता म्हणता येईल अशी कविता..

‘पुस्तकांचं

जनात ठाम उभं राहणं

मनात रुजणं

सत्तेला सरळ शह देणं

ज्यांना सलतं

ते पुस्तकं नष्ट करू पाहतात..’

अशी असहिष्णुता पुस्तकांच्या, बोलू-लिहू पाहणाऱ्या विचारवंतांच्या, साहित्यिकांच्या वाटय़ाला येते. या विपरीत वास्तवावर ते उपरोधिक शैलीत प्रकाश टाकतात. त्याचप्रमाणे मुळात कवी तरी जगण्याविषयी संवेदनशील राहिले आहेत का? की तेही व्यवस्थाशरण, झुंडशरण, द्वेषशरण झाले आहेत? या प्रश्नांतून सभोवती दिसणारे साहित्यिक पर्यावरण ते अचूकपणे चिमटीत पकडून दाखवतात. ‘घाई’, ‘हसत हसत’ यांसारख्या कवितांमधून एकूणच आजच्या कवींच्या वृत्तीवर ते उपहासात्मक भाष्य करतात.

प्रफुल्ल शिलेदारांची शैली आशयाला सरळ, थेटपणे भिडणारी आहे. ती वरवरच्या आशयाच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. त्यांनी केलेल्या सद्य:कालीन सामाजिक, सांस्कृतिक निर्भीड भाष्याला ती अनुरूप अशीच आहे. एक गंभीर कवितासंग्रह वाचल्याचा आनंद या कविता निश्चितपणे देतात.

  • पायी चालणार’- प्रफुल्ल शिलेदार, पॉप्युलर प्रकाशन,
  • पृष्ठे- ११७,
  • मूल्य- १७५ रुपये.

– अंजली कुलकर्णी

 

Story img Loader