काव्यवाचनाच्या कार्यक्रमांना जाताना पाडगांवकर एका प्लास्टिकच्या ब्रीफकेसमध्ये कवितांच्या पुस्तकाच्या प्रती विकण्यासाठी घेऊन जायचे. त्यावेळी पुस्तकाच्या किमतीही तीन-पाच रुपये एवढय़ाच असायच्या. पण त्या विक्रीवर मिळणारे कमिशन आणि मानधन यांनाही त्यांच्या लेखी महत्त्व होते. आमच्या दृष्टीने पुस्तक ठिकठिकाणी विनासायास पोहोचणे ही विशेष बाब होती. वरवर पाहता फक्त व्यावहारिक दृष्टीने महत्त्वाच्या वाटणाऱ्या या घटनेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या दृष्टीने फार प्रयोजन आहे. चांगली कविता वाचली जाणे, ती प्रसिद्ध होत राहणे, तिचा प्रसार झाल्यामुळे उमेदीच्या प्रतिभावंतांना उत्तेजन मिळणे, ही सामान्य बाब नाही. आजच्या भाषेत बोलायचे तर ‘पोएट्री ही इंडस्ट्री होऊ शकते’ याचा प्रत्यय त्यामुळे यायला लागला.
ग्रांट रोडला जिना हॉल आहे. तिथे तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. एकदा त्या रस्त्याने जाताना तिथे कविसंमेलन असल्याचे कळले. त्या काळात रविकिरण मंडळाचे यशवंत, गिरीश तसेच सोपानदेव चौधरी, संजीवनी यांच्यासारखी इतरही कविमंडळी कविता गाऊन सादर करीत. कवींच्या कार्यक्रमाला काव्यगायन म्हणण्याची प्रथा होती. त्या दिवशीही काही सुरेल गाणारे कवी होते. परंतु फड मारला तो झोकात वाचणाऱ्या दोन तरुण कवींनी. पैकी वसंत बापट यांनी ‘बिजली’ व ‘दख्खन राणी’ आणि मंगेश पाडगांवकर यांनी ‘जिप्सी’ व ‘लारालप्पा’ या कविता म्हटल्या. साऱ्या श्रोत्यांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. एका अर्थी जुन्या गेय कवितेने आता झोकात म्हणण्याच्या गद्यप्राय कवितेला शरणचिठ्ठी दिली होती. अशा कवितांना ‘मंचीय कविता’ म्हणून नाक मुरडणारेही पुढे निघाले. परंतु नवकविता घरोघर पोचवण्यात या नवकवींना प्रचंड यश मिळाले.
काही काळपर्यंत बा. सी. मर्ढेकर आणि त्यानंतरही बराच काळ पु. शि. रेगे, सदानंद रेगे, शरश्चंद्र मुक्तिबोध, इंदिरा संत असे श्रेष्ठ कवी उत्तम कविता लिहीत होते. परंतु ती कविता रसिकांपर्यंत नीट पोचत नव्हती. पाडगांवकर-बापट निरनिराळ्या वळणाची आणि स्तरावरचीदेखील कविता लिहीत होते. रसिक-समीक्षकांना विचार करायला लावणारी कविताही ते लिहीत. तशीच ही श्रोत्यांना खूश करणारी मंचीय कविता!
मराठीच्या काव्यक्षेत्रात हा क्षण एका मोठय़ा बदलाचा निदर्शक होता. कथाक्षेत्र जसे गाडगीळ-गोखले ढवळून काढत होते तसेच हे कवी कवितांचे. मराठी साहित्यक्षेत्रातील हा बहराचा किंवा उत्सवाचा काळ होता तसाच वैयक्तिक पातळीवर माझ्या जडणघडणीचाही. मी कॉलेजात गेल्याच्या दुसऱ्याच वर्षी १९५२ साली मराठी पुस्तकांचे प्रकाशन हातात घेतले होते. सुरुवातीची पुस्तके नवकथाकारांची होती. कवितांच्या पुस्तकांकडे माझे लक्ष सहजी गेले नसते. या कार्यक्रमामुळे मी कवितेने नादावलो. मला कविता पाठ होत नाही, मी शांतपणे कविता वाचत बसत नाही, किंवा रवंथ करत नाही; पण कविता ऐकण्याचा मला नाद लागला. विद्यार्थी या भूमिकेबरोबरच प्रकाशक हीही भूमिका मी स्वीकारली होती. मी मौज प्रेसकडे मुद्रणासाठी आणि मौज प्रकाशनगृहामध्ये साप्ताहिकात अधूनमधून लिहिण्यासाठी वारंवार जाऊ लागलो. तिथे ही सर्व नवीन साहित्यिक मंडळी नेमाने येत. त्यांच्या भेटीगाठी होत. जवळच असलेल्या उपाहारगृहात एकत्र जाणे हेही आकर्षण होतेच. या कार्यक्रमाच्या उन्मादात मी पाडगांवकरांचा कवितासंग्रह प्रसिद्ध करायचे ठरवले. आम्हा दोघांपकी कोणी हा विषय काढला ते या चार तपांनंतर आठवणार नाही; परंतु माझा ज्येष्ठ मित्र आणि कॉलेजविद्यार्थी असतानाच उत्तम समीक्षा लिहिणारा भालचंद्र देसाई, पाडगांवकर आणि मी ‘व्हाइसरॉय ऑफ इंडिया’ या इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा पिता पिता ‘जिप्सी’च्या प्रकाशनाचे ठरले. गाडगीळ-गोखले यांच्या कथासंग्रहांनी पॉप्युलरच्या मराठी विभागाची सुरुवात झाली याचा जसा आमच्या संस्थेच्या पुढील कार्यावर प्रभाव पडला, तसाच पाडगांवकरांच्या ‘जिप्सी’चाही! महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची संस्था फक्त भक्कम पायावर उभी राहिली असे नव्हे, तर एकूणच मराठी ग्रंथव्यवहारात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
पाडगांवकर तेव्हा ऐन तारुण्यात होते. त्यांचा संसार सुरू झाला होता. परंतु त्यांचे शिक्षण अध्र्यावर राहिले होते. ‘साधना’ साप्ताहिक तेव्हा मुंबईतून निघायचे. आर्थर रोड तुरुंगाजवळ साधना प्रेस होता आणि तिथून आमचा पॉप्युलर बुक डेपो मल- दोन मलावरच होता. पाडगांवकरांच्या आíथक दृष्टीने त्यांना येणारी काव्यवाचनाची निमंत्रणे यांना महत्त्व होते. तेव्हा त्यांना जेमतेम कार्यक्रमाचे २५-५० रुपये मिळत; पण ते आजच्या तुलनेने बरेच वाटायचे. कार्यक्रमांना जाताना पाडगांवकर एका प्लास्टिकच्या ब्रीफकेसमध्ये पुस्तकाच्या प्रती विकण्यासाठी घेऊन जायचे. त्यावेळी पुस्तकाच्या किमतीही ३-५ रुपये एवढय़ाच असायच्या. पण त्या विक्रीवर मिळणारे कमिशन आणि मानधन यांनाही त्यांच्या लेखी महत्त्व होते. आमच्या दृष्टीने पुस्तक ठिकठिकाणी विनासायास पोहोचणे ही विशेष बाब होती. वरवर पाहता फक्त व्यावहारिक दृष्टीने महत्त्वाच्या वाटणाऱ्या या घटनेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या दृष्टीने फार प्रयोजन आहे. चांगली कविता वाचली जाणे, ती प्रसिद्ध होत राहणे, तिचा प्रसार झाल्यामुळे उमेदीच्या प्रतिभावंतांना उत्तेजन मिळणे, ही सामान्य बाब नाही. आजच्या भाषेत बोलायचे तर ‘पोएट्री ही इंडस्ट्री होऊ शकते’ याचा प्रत्यय यायला लागला.
पॉप्युलरने आजपर्यंत मराठीत जवळजवळ अडीचशे काव्यग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. म्हणजे वर्षांला सरासरी चार. एका व्यावसायिक संस्थेला हे कसे साध्य झाले, असे जेव्हा आम्हाला विचारतात तेव्हा मी पाडगांवकरांचे ऋण आनंदाने मान्य करतो. १९५४ ते १९६४ या काळात आम्ही पाडगांवकरांची दहा पुस्तके प्रसिद्ध केली. त्यात कवितासंग्रह होते, नाटय़काव्य होते, बालगीते होती, वात्रटिका होत्या. याच दशकात खपाऊ समजल्या जाणाऱ्या कादंबऱ्याही आम्ही तेवढय़ा प्रकाशित केल्या नाहीत.
पाडगांवकरांच्या पुस्तकांच्या यशामुळे पुढे वसंत बापट, विंदा करंदीकर, सदानंद रेगे, पु. शि. रेगे यांचे संग्रहही आमच्याकडे आले. एवढय़ात विंदा करंदीकर मुंबईत आले आणि काही साहित्य संमेलनांत भाग घेणारे बापट- पाडगांवकर- करंदीकर यांच्यात एक प्रकारची दोस्ती निर्माण झाली. त्यांच्यात समान धागा कोणता, हे शोधणे हा संशोधनाचा विषय ठरावा. त्यांची कविता वेगवेगळ्या वळणाची. वृत्तीही काहीशी वेगळी. बापट सेवादलाच्या कामात गुंतलेले. करंदीकर हे अभ्यासू प्राध्यापक. पाडगांवकरांना आधी आपले शिक्षण पूर्ण करून एक स्थायी नोकरी शोधावी लागली. बापट साने गुरुजींच्या प्रभावाखाली मद्य जाऊ द्या, पण चहा-कॉफीसुद्धा न घेणारे. तर पाडगांवकर-करंदीकर वेगळ्या पातळ्यांवर रसज्ञ. त्यांच्यात समान धागे शोधायचेच झाले तर एकूण डावी विचारसरणी आणि त्यांचा जुन्या-नव्या मराठी काव्याचा अभ्यास; शिवाय स्वत:चीच नव्हे, तर सर्वच कविता उत्तम वाचण्याची हातोटी.
या कवी मंडळींना आपली कविता वाचून दाखवायला आवडायचे.. आणि मला ती ऐकायला आणि जमेल तितकी प्रसिद्ध करायला. पाडगांवकरांपाठोपाठ हे दोघेही कवी पॉप्युलरकडे आले. त्यांची कविता म्हणजे फक्त सुंदर शब्दांची मांडणी नव्हती. त्यामागे काही विचार असायचा. त्यांना काही सांगायचे असे. ते कवितेतून तर कळायचे; शिवाय प्रत्यक्ष भेटींतूनही. या सर्व लेखक-कवींनी मला काय काय दिले याची मोजदाद करता येत नाही. प्रकाशनाचे काम हा फक्त माझा व्यवसाय नव्हता, तर कॉलेज-विद्यापीठापेक्षाही महत्त्वाची अशी माझ्या वैयक्तिक शिक्षणाची सोय होती.
मी माझ्या व्यवसायात गुरफटेपर्यंत आणि पाडगांवकर आधी प्रध्यापक म्हणून आणि नंतर रेडियोच्या नोकरीत गुंतेपर्यंत आम्हाला एकत्र बागडण्याला वेळ मिळायचा. त्या काळातल्या अनेक बालिश, गंभीर आठवणी आहेत.. खाण्याच्या, पिण्याच्या आणि भटकण्याच्या.
नंतरच्या काळात पाडगांवकरांनी आपले काव्यसंग्रह मौज प्रकाशन गृहाला द्यायचे ठरवले. मी दुखावलो गेलो. पण मी कधी त्यांना कारण विचारले नाही. आमचे वैयक्तिक संबंध छान होते आणि त्यानंतरही चांगलेच राहिले. मौजेचे श्री. पु. भागवत आणि मंगेश पाडगांवकर हे खूप जवळ आले. पाडगांवकर आणि श्री. पु. भागवत सायनला जवळ राहायचे. श्रीपुंना रोज आपले नवीन लेखन दाखवण्याची सवय पाडगांवकरांना लागली. श्रीपुही आपल्या विशिष्ट पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करायचे. मौज प्रकाशनाला त्यांच्या उत्कृष्ट मुद्रणालयाचा आधार असल्याने पुस्तकांचे मुद्रण सातत्याने चांगलेच होईल याची खात्री होती. आणि ‘सत्यकथा’ या साहित्यिक नियतकालिकाचाही आधार होता.
या बऱ्याच मोठय़ा मधल्या काळात पाडगांवकरांची काव्यप्रतिभा निरनिराळी रूपे घेऊ लागली. ‘सलाम’ने उपहासात्मक आणि समाजचिंतनपर कवितेला वेगळे रूप दिले. कृतक काव्यात्म भाषेऐवजी बोलभाषेत गमतीदार गाणी लिहिण्याचा प्रयोग त्यांनी ‘बोलगाणी’त केला. त्यांनी अनेक भावगीते लिहिली, त्यांना थोर संगीतकारांनी चाली दिल्या आणि एकूण गीतगायनाचा दर्जा वाढत गेला. कवितांतून ते जसे घरोघर पोचले तसेच या गीतांतून कानाकानात आणि मनामनात. गीते तर सगळ्यांच्या ओठी खेळत राहतात. त्यामुळे ती हळूहळू ओठांतून पोटात जाऊन हृदयात घर करून बसली. त्यांनी अनेक तरुण-तरुणींना आपल्या प्रिय व्यक्तीवर आणि स्वत:वरही प्रेम करायला शिकवले. ‘जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हा त्यांचा संदेश जणू महाराष्ट्राचे ब्रीदवाक्य झाले आहे.
कथेच्या क्षेत्रात अरिवद गोखले यांनी जसे अनेक प्रयोग केले तसेच पाडगांवकरांनी कवितेच्या क्षेत्रात. जे सांगायचे ते कवितेच्या रूपात सांगण्याची त्यांची हातोटी होती. त्यांचे पाठांतर उत्तम, काव्यवाचन प्रभावी, त्याला प्रतिसादही अभूतपूर्व; त्यामुळे त्यांचे काव्यलेखन फोफावत गेले म्हणायला हरकत नाही. त्यांनी संतकवींची हिंदीतून भाषांतरे केली. शेक्सपीयरची तीन नाटके सरळ भाषांतराच्या रूपाने मराठीत आणली. शिवाय बायबलमधील नव्या कराराचा अनुवादही. त्यांच्या लेखनाचा हा आवाका थक्क करणारा आहे.
वास्तविक पाडगांवकर गद्यलेखनही उत्तम करत. ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा त्यांचा लघुनिबंधसंग्रह अनेक वर्षांपूर्वी पुण्यातून प्रसिद्ध झाला होता. आम्ही ‘गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी’ या पुस्तकाची तयारी करत होतो. त्यासाठी पाडगांवकरांनी एक अप्रतिम लेख लिहून दिला. मग मला त्यांच्या इतर गद्यलेखनाची आठवण येऊ लागली. माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही त्याचा मागोवा घेऊ लागलो. त्यात ‘साधना’ साप्ताहिकाशी संबंधित संगीता बापट यांचीही मदत घेतली. तेवढय़ात श्री. पु. भागवत गेले. त्यांच्या स्मरणसभेत पाडगांवकर बोलणार होते. मी त्यांच्या जवळ बसलो होतो. त्यांनी काही कागद वाचून खिशात ठेवले. चौकशी केल्यावर कळले की एखादे व्याख्यान आधी ठरले तर ते लिहून काढत, पण वाचत नसत. मग मी त्यांचे असे सगळे अप्रकाशित कागद गोळा केले. म्हणता म्हणता त्यांची पाच गद्य पुस्तके तयार झाली. ‘जिप्सी’च्या दशकानंतर पन्नास वर्षांनी पॉप्युलरने पुन्हा गद्यलेखक पाडगांवकर वाचकांसमोर आणला.
त्यांना वेळोवेळी अनेक मानसन्मान मिळत राहिले. पद्मभूषण (२०१३), महाराष्ट्र भूषण (२००८), दुबई विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१०), साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०) आणि इतर असे अनेक. खरोखरीच अगणित पुरस्कार. या सर्व पुरस्कारांचा मित्र म्हणून मला आनंद आणि अभिमान होताच; परंतु त्यांचे मोठेपण हे त्यांनी स्वत: आपल्या लेखनाने सिद्ध केले होते. मराठीत आधुनिक काळात इतका लोकप्रिय कवी झाला नाही असे नि:संकोच म्हणता येते. त्यांच्या कवितासंग्रहांच्या आवृत्त्या आणि त्यांच्या गीतांना मिळालेली अफाट लोकप्रियता याची साक्ष देतात. गेली काही वष्रे त्यांना आजारांनी ग्रासले होते, तरीही काव्यलेखन, काव्यवाचन आणि लोकसंग्रह अव्याहत चालू होता. त्याला आता खीळ बसणार.
सहा दशके या थोर लेखकाबरोबर काम करायला मिळणे हा एक मोठा भाग्ययोग होता. २०१२ साली पॉप्युलरच्या मराठी विभागाला साठ वष्रे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम झाला तेव्हा साहजिकच मुख्य पाहुणे मंगेश पाडगांवकर हेच होते. पाहुणे कसले! ते तर घरचेच होते. माझ्याहून कर्तृत्वाने तर झालेच; परंतु वयानेही ज्येष्ठ अशा या साहित्यिकांची पिढी आज अस्तंगत झाली आहे. मंगेश पाडगांवकर हे त्यातील शेवटचे शिलेदार.
रामदास भटकळ – ramdasbhatkal@gmail.com