प्राण्यांच्या बुद्धिमत्तेविषयी आपल्याकडे शास्त्रीय अंगाने फार कमी लिखाण झालेले आहे. प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच एकतर कमालीचा तिरस्काराचा, नाहीतर टोकाचा भूतदयेचा असाच आढळतो. परंतु प्राण्यांच्या वागणुकीमागची कारणमीमांसा शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर घासून पाहणं हा दृष्टिकोन मात्र आपल्यात फारसा रुजलेला आढळत नाही. तथापि, सुबोध जावडेकर यांच्या ‘आपले बुद्धिमान सोयरे’ या पुस्तकाने ही उणीव भरून काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील विविध भागांत अनेक शास्त्रज्ञ प्राण्यांच्या बुद्धिमत्तेचा गेली शंभर-दीडशे र्वष शोध घेत आहेत. या साऱ्यांच्या संशोधनावर आधारित असं हे पुस्तक आहे. या पुस्तकात कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, व्हेल्स व डॉल्फिनसारखे पाण्यातले प्राणी या साऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा लालित्यपूर्ण आणि मिश्कील शैलीत वेध घेतलेला आहे. प्राण्यांमधील उपजत प्रेरणा आणि बुद्धिमत्ता यामधला नेमका फरक लेखकाने विशद केला आहे. मधमाश्या विशिष्ट प्रकारचे नृत्य करून दुसऱ्या मधमाश्यांना कितीतरी दूर असलेल्या फुलांचा पत्ता नेमका सांगतात. कावळे आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाचा चेहरा बरोबर लक्षात ठेवतात. हत्ती कित्येक किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या हत्तीशी बरोबर संवाद साधू शकतात. या गोष्टी ते उपजत प्रेरणेने करतात की बुद्धिमत्तेने, याचा संशोधनावर आधारित असा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.

निर्बुद्ध वाटणारी मगर तोंडात काडी ठेवून पक्ष्याला आकृष्ट करून घेते आणि झटकन् त्याची शिकार करते. प्राध्यापक ब्लादिमिर डिनेटस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ही गोष्ट सर्वप्रथम मद्रास क्रोकोडाइल बँकेत पाहिली. याआधी ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नव्हती. डिनेटस यांनी त्यावर अमेरिकेत विस्तृत संशोधन केलं. त्यांच्या संशोधनाची रोचक कथा ‘सरपटणारे प्राणी’ या प्रकरणात वाचायला मिळते. अरुंद तोंडाच्या काचेच्या भांडय़ात तळाशी असणारा मटणाचा तुकडा काढण्यासाठी कावळा सरळ तार पायाने वाकवतो आणि मग तो तुकडा वर ओढून घेऊन खातो.. हे काही शास्त्रज्ञांनी सप्रयोग सिद्ध केले आहे. हे प्रयोगशाळेतल्या कावळ्याने केलं. परंतु जंगलातले कावळेही नैसर्गिक गोष्टींपासून अवजारं बनवतात, हे शास्त्रज्ञांनी कावळ्यांच्या शरीरावर छोटे कॅमेरे बसवून चित्रित केलं. इसापनीतीतल्या गोष्टीत मडक्याच्या तळाशी असलेलं पाणी कावळा भांडय़ात दगड टाकून वर आणतो, हे आपण वाचलेलं आहे. परंतु आता हे सिद्ध झालं आहे, की ही कपोलकल्पित कथा नसून कावळ्यांची बुद्धिमत्ता सात ते आठ वर्षांच्या मुलाइतकी असते. या सगळ्या प्राण्यांवरच्या संशोधनाच्या रंजक कथा या पुस्तकात उलगडत जातात.

सहजप्रवृत्ती आणि बुद्धिमत्ता यांतला फरक ग्रीन हेरॉन या पक्ष्याच्या बाबतीत लेखकाने नेमका सांगितलेला आहे. काही ग्रीन हेरॉन पक्षी मासे पकडण्यासाठी पाण्यात आमिष म्हणून लहान किडे किंवा अन्नाचे छोटे तुकडे टाकतात. जर हे उपजत प्रेरणेने असेल तर सगळ्याच ग्रीन हेरॉननी तसं करायला हवं. परंतु काहींच्याच बाबतीत असं होतं. म्हणजे ही त्यांची बुद्धिमत्ताच म्हणायला हवी, हे लेखकाने नेमकेपणाने सांगितलं आहे.

आपल्या मालकाशी भावनिक पातळीवर जोडले गेलेले पाळीव प्राणी मालकाच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक ओळखतात. त्याला ते कसा प्रतिसाद देतात, हे हान्स नावाच्या गणिते करणाऱ्या घोडय़ाच्या गोष्टीतून समोर येतं. ‘पाळीव प्राणी’ या प्रकरणात पाळीव प्राण्यांच्या बुद्धिमत्तेचा लेखकाने वेध घेतला आहे. कुत्र्यांना लघवीच्या वासावरून मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान करता येतं, हे एका संशोधनातून पुढे आलं आहे. अशा प्रकारे इतर प्रकारचे कर्करोगही प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याच्या निदानासाठी कुत्र्यांचा उपयोग होऊ शकतो का, यावर सध्या संशोधन चालू आहे. कुत्र्याची शेपटी हा त्याचा भावना व्यक्त करण्यासाठी असलेला खास अवयव आहे. त्याची शेपटी डावीकडे जास्त वळली की उजवीकडे, यावरून कुत्र्याच्या मनातील भावना आपल्याला कळू शकतात. प्राण्यांना भूकंप, त्सुनामी यांचीही अगोदरच चाहूल लागते का, याबाबतच्या संशोधनाचा आढावाही लेखकाने पुस्तकात घेतला आहे.

कोरियन भाषा बोलणारा हत्ती, कळपातला एखादा हत्ती मेल्यावर त्याचा अंत्यविधी करणारे इतर हत्ती, तसेच दु:खी असलेल्या सोबत्याला सहानुभूती दाखवणारे हत्ती अशा प्राण्यांबद्दलच्या भन्नाट संशोधनाची माहिती या पुस्तकातून आपल्याला कळते. आपली नैसर्गिक ऊर्मी गुंडाळून ठेवून प्रसंगी आपल्या पिढीजात शत्रूबरोबर प्राणी समझोता करतात. त्यासाठी लेखकाने इथिओपियातील गेलाडा जातीची माकडं आणि लांडगे यांचं एक विलक्षण उदाहरण दिलं आहे. माकडांचा कळप जमिनीवरच गवत, कंदमुळे आणि त्यात लपलेले किडेमकोडे खात असतात. त्यावेळेला एखादा लांडगा कळपात शिरला तर ती माकडं अजिबात विचलित होत नाहीत. लांडगेही माकडांची पिल्लं सहज आवाक्यात असूनही त्याकडे पाहतही नाहीत. चरणाऱ्या माकडांच्या गोंगाटामुळे उंदीर आणि ससे बिळाच्या बाहेर येतात आणि लांडग्यांच्या तावडीत सहजगत्या सापडतात. दूरगामी फायद्याकरिता माकडांच्या पिल्लांची शिकार करायच्या आपल्या नैसर्गिक ऊर्मीवर लांडगे विजय मिळवतात, तर माकडंही आपल्या भीतीच्या नैसर्गिक भावनेवर विजय मिळवतात. या प्रसंगावर लेखकाने अत्यंत मार्मिक टिप्पणी केली आहे.. ‘सहज प्रवृत्ती म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, तर सहज प्रवृत्तीवर विजय मिळवणे म्हणजे बुद्धिमत्ता.’ लेखकाच्या या एका वाक्यावर आपण थबकून विचार करू लागतो.

हत्ती आणि लांडग्यांनंतर लेखक आपल्याला घेऊन जातो तो समुद्रातल्या विश्वातील बुद्धिमान प्राण्यांकडे! ते म्हणजे व्हेल्स, डॉल्फिन्स आणि सी- लायन्सकडे. डॉल्फिनच्या पिल्लाचा जीव वाचविण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाण्यात उभं राहणं जरुरीचं असतं. तेव्हा स्वत:च्या डोक्याचा प्लॅटफॉर्मसारखा वापर करू देणारा एक डॉल्फिन आपल्याला या पुस्तकात भेटतो. यातलं काहीच त्याला आधी शिकवलेलं नसतं. तर आणीबाणीच्या प्रसंगी अचानक सुचून तो हे करतो.

कर्णबधिरांची भाषा शिकलेली वाशो नावाच्या चिंपॅझीच्या मादीची गोष्ट तर खूपच गमतीदार आहे. ही मादी केवळ शिकलेल्या शब्दांतून नव्हे, तर स्वत: बनवलेल्या नवीन शब्दांतूनही व्यक्त व्हायची. या मादीने एक छोटं चिंपॅझीचं पिल्लू दत्तक घेतलं होतं. ती त्या पिल्लालाही आपली खाणाखुणांची भाषा शिकवू लागली. याच प्रकरणात शिकारीसाठी झाडाचा भाला बनवणारे, संगीताची आवड असणारे चिंपॅझी भेटतात. इतकंच नव्हे तर मरणासन्न अवस्थेतील वृद्ध चिंपॅझीची काळजी घेणारे आणि त्याच्या मृत्यूने कित्येक दिवस उदास राहणारे चिंपॅझीही भेटतात. प्राण्यांच्या बुद्धिमत्तेला असलेली ही भावनिक किनार बघून आपणही कुठेतरी हलून जातो. पुस्तक संपवताना एकच विचार मनात येत राहतो- ‘हे प्राणीजगत आपण समजतो त्यापेक्षा खूप वेगळं आणि खोल आहे, हे नक्की.’

‘आपले बुद्धिमान सोयरे’- सुबोध जावडेकर,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- २४४, मूल्य- २४० रुपये.

विनया जंगले

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book aaple buddhiman soyare by subodh javadekar