काही पुस्तके विस्मरणात टाकणे अवघड असते. ‘गावगाडा’ हे त्यातील एक. या ग्रंथाची दिमाखदार, सचित्र शताब्दी आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध झाली. डॉ. द. दि. पुंडे यांनी या ग्रंथाचे नेटके संपादन केले आहे.
भारत हा ७० टक्के खेडय़ांचा शेतीप्रधान देश. आजही या सामाजिक वास्तवात फारसा फरक झालेला नाही. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, त्यामुळे शेतीतून भांडवलनिर्मिती होत नाही. भारतीय शेतकऱ्याचे हे सर्वात मोठे दुखणे. आहे त्या परिस्थितीत ‘काळी’ला धरून राहून येईल तो दिवस रेटणे हेच मग शेतकऱ्याच्या हाती राहते. परिस्थिती अगदीच टोकाला गेली तर काहीजण आत्महत्येचा मार्ग पत्करतात. राजकीय दबाव, खेडय़ातील गुंडगिरी, न बदलणाऱ्या रूढी-परंपरा आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांची दु:स्थिती वाढते, हे आजचे चित्र आहे. ‘गावगाडा’ शताब्दी आवृत्तीमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे.
‘गावगाडा’ हे पुस्तक त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिले आणि स्वत:च प्रकाशित केले. आत्रे स्वत: ‘गावगाडा’शी जोडले गेलेले होते. त्यांचे वंशज मूलत: शेतकरी. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्हय़ातील संगमनेरला झाला. शालेय शिक्षण नगर जिल्हय़ात झाल्यावर ते मुंबईला गेले. तिथून ते बी. ए.- एलएल.बी. झाले. मुंबई प्रांताच्या रेव्हेन्यू खात्यात त्यांनी सुरुवातीला नोकरी केली. पुढे नगर जिल्हय़ात दुष्काळी कामावर खास अंमलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मामलेदार व सब-जज् या पदांवरही त्यांनी काम केले. मुलकी खात्यातर्फे त्या काळात भारतीय समाजाची व जातीपातींची पाहणी केली जायची. आत्रे यांनी एथ्नॉग्राफिकल सव्र्हेशी स्वत:ला जोडून घेतले. इतकेच नव्हे तर मुंबई प्रांताचे सुपरिटेंडंट आर. ई. एन्थोव्हेन यांच्याकडून सर्वेक्षणाची माहिती कशी घ्यायची, हे त्यांनी समजून घेतले. आत्रे यांच्यापाशी खेडय़ांची माहिती घेण्याचे फक्त प्रशिक्षणच होते असे नव्हे, तर खेडेगावातील जीवन व तिथली माणसे यांच्याविषयी त्यांना आंतरिक तळमळही होती. या दोहोंचे एकत्रीकरण झाल्यामुळेच ‘गावगाडा’ हा समाजशास्त्रविषयक उत्कृष्ट ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण झाला.
आत्रे यांनी आपल्या ग्रंथाला दिलेले ‘Notes on Rural Sociology with Special Reference to Agriculture’ हे उपशीर्षक या ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट करणारे आहे. ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यातील घटकांचे परस्परांशी असलेले संबंध आत्रे ‘गावगाडा’मध्ये मांडतात. मात्र, अशी मांडणी करत असताना त्यांचे पाय जमिनीवर असतात. त्यांची विचारपद्धती समाजशास्त्रीय आणि काटेकोर असते. त्यांच्या विचाराचे केंद्र नेहमी शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी हे राहते. लेखनाच्या काही वर्षे आधी आत्रे गावगाडय़ाचे निरीक्षण करत असणार. गावगाडा अस्तंगत होणार याची चिन्हे आत्रे यांनी जाणली होती हे त्यांच्या लेखनात दिसते. तरीही गावगाडा जसा दिसला तसे त्याचे दस्तावेजीकरण त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. हे दस्तावेजीकरण ऐतिहासिक संदर्भात महत्त्वाचे आहे. गावगाडा आज कोसळून पडला आहे. आत्रे यांनी त्याचे यथातथ्य चित्रण केले नसते तर ही व्यवस्था कशी होती हे पुढच्या पिढय़ांना कळलेच नसते.
गावगाडा हा कुणा एका व्यक्ती वा समूहाने तयार केलेला नाही. भारतीय समाजव्यवस्थेत काळाच्या ओघात खेडय़ाच्या गरजेनुसार तो उभा राहिला. ग्रामव्यवस्थेचा शेती हा कणा. त्यामुळे शेतकरी गावाच्या केंद्रस्थानी आला. त्याच्याभोवती बलुतेदार व आलुतेदार तयार झाले. ‘ज्यांच्यावाचून शेतकऱ्यांचे अडायचे ते बलुतेदार आणि ज्यांच्यावाचून अडायचे नाही ते आलुतेदार’ असे नेमके वर्णन आत्रे करतात. सुतार, महार, लोहार, चांभार हे बलुतेदार, तर तेली, तांबोळी, शिंपी, साळी हे आलुतेदार. ‘गावगाडा’मध्ये त्यांना कारू, नारू अशा संज्ञाही वापरलेल्या आहेत. बलुतेदारांच्या महत्त्वाप्रमाणे त्यांची वर्गवारी केलेली दिसते. पहिल्या वर्गातील बलुतेदारांना शेतीतील हिस्सा (निरख) जास्त मिळे. पुढच्या वर्गामध्ये तो कमी होत जाई. सरकार उपयोगी वतनदार (म्हणजे पाटील, कुलकर्णी, महार, धेड) आणि रयत उपयोगी वतनदार (कुंभार, मुलाणा, जोशी) अशी अधिकची माहिती आत्रे बलुतेदारांबद्दल देतात. तर सरकार आणि रयत या दोहोंनाही उपयुक्त नसलेले कारू-नारू म्हणून शेकदार, महाजन, दलाल, भुत्या, गोसावी, गोंधळी आदींची नोंदही करतात.
आलुत्या-बलुत्यातून पुढे जाती निर्माण झाल्या. कामाप्रमाणे वेतन न ठरता वतनपद्धती सुरू झाली. शेतीतला ठरलेला हिस्सा मिळणार याची खात्री झाल्यावर बलुतेदारीत कामाची हेळसांड, आळस आणि अकार्यक्षमता शिरली. वतनपद्धतीने अरेरावी, भिक्षुकी व चोरचाळे शिकवले, असा कोरडा आत्रे यावर ओढतात. पाटील व कुलकर्णी हे गावात सगळ्यात जास्त वतनदार. इकडे पाटीलकीसाठी जितकी उलथापालथ होते तितकी युरोपियनांच्या मुलखात ‘डय़ुक’ होण्यासाठी कोणी करत नाही, अशी मार्मिक टीका ते यासंदर्भात करतात. गावगाडाचे परिपूर्ण अवलोकन ते आपल्या पुस्तकात मांडतात. आत्रे यांच्या काळातच खेडय़ाची स्वायत्तता संपुष्टात आली होती. शहरातले दुकानदार, सावकार, पठाण यांचे पाश गावगाडय़ाभोवती आवळले जात असलेले बघून ते व्यथित होतात. तर दुसरीकडे गावगाडय़ाचे दोषही ते दाखवतात. हिंदूंच्या धर्मभोळेपणावर ते टीका करतात. जातिबंधन आणि व्यवसायबंधन असल्याने देशाची प्रगती होत नाही, ही जाणीव ते व्यक्त करतात. सभ्य, सुसंस्कृत, समृद्ध समाज अस्तित्वात यावा अशी आस बाळगतात.
‘गावगाडा’ची यथामूल आवृत्ती शताब्दी ग्रंथात समाविष्ट केली आहे. डॉ. पुंडे यांची ६२ पानांची प्रस्तावना महत्त्वपूर्ण आहे. आत्रे व ‘गावगाडा’ यांचा विस्तृत परिचय करून देत ग्रंथाला मिळालेली पारितोषिके त्यांनी प्रस्तावनेत नोंदवली आहेत. परंतु अशी पुस्तके महाराष्ट्रासारख्या शेतीप्रधान प्रांतात (इथे शेतकी विद्यापीठे असूनही) फारशी लिहिली गेली नाहीत. ‘गावगाडा शतकानंतर..’ (२०१२) हे अनिल पाटील (सुर्डीकर) यांचे पुस्तक आणि उल्का महाजन यांचे ‘कोसळता गावगाडा’ (२०१५) ही दोन पुस्तके ‘गावगाडा’ शताब्दीच्या सुमारास प्रसिद्ध झाली. त्यांचा परिचय परिशिष्टात करून दिलेला आहे.
‘गावगाडा’ प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्वानांनी त्याची दखल घेतली. या समकालीन समीक्षेचा परामर्श प्रस्तावनेत घेतलेला आहे. ही सर्व समीक्षा दर्जेदार आहे. भास्कर वामन भट इतिहासाचार्य राजवाडय़ांच्या परंपरेतले असल्याने ते ब्रिटिश रियासतीने गावगाडय़ाची कशी हानी केली, हे दाखवण्यावर भर देतात. विष्णू मोरेश्वर महाजनी महाराष्ट्र साहित्यपत्रिकेतील आपल्या परीक्षणात शेती व शेतकरी या महत्त्वाच्या प्रश्नाला ‘गावगाडा’च्या निमित्ताने गवसणी घालतात. विठ्ठल रामजी शिंदे भारतीय अस्पृश्यतेचा शोध घेत ‘गावगाडा’ला भिडतात (‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’). ‘The Village Cart’ या राम देशमुख यांनी ‘गावगाडा’च्या केलेल्या इंग्रजी भाषांतराचा (२०००) डॉ. पुंडे आवर्जून उल्लेख करतात. महाराष्ट्राची परिस्थिती माहिती नसलेल्या अन्यभाषक वाचकांसाठी देशमुख मूळ पुस्तकातील टीपांना स्वत:च्या महत्त्वाच्या टीपांची जोड देतात आणि पुस्तक अधिक उपयुक्त बनवतात, याचा निर्देश ते करतात.
नव्या अभ्यासकांचे तीन लेख शताब्दी आवृत्तीत समाविष्ट केले आहेत. त्यातून ‘गावगाडा’चे आजच्या काळातील महत्त्व लक्षात येते. नीरज हातेकर आणि राजन पडवळ या अर्थतज्ज्ञांचा लेख चिकित्सक व परखड आहे. त्यांना हे ब्रिटिश विचारसरणीचे पुस्तक वाटते. मिलिंद बोकील यांनी ‘गावगाडा’चे केलेले समाजशास्त्रीय विश्लेषण समतोल व विस्तृत आहे. आत्रे वर्ग, जात, लिंगभाव यांत न अडकता पाहणी करतात. ब्राह्मण असूनही ते ब्राह्मणांचे हितसंबंध जपत नाहीत याचा बोकील आवर्जून निर्देश करतात. डॉ. सदानंद मोरे यांना आत्रे यांचा दृष्टिकोन समष्टीवादी (Holistic) वाटतो. त्यामुळे व्यक्तींना गौणस्थान देऊन ते सामाजिक संस्था आणि समूह यांना निर्णायक महत्त्व देतात असे त्यांना वाटते.
माहिती, विश्लेषण आणि भाषा या तिन्ही दृष्टींनी ‘गावगाडा’ हा मराठीतला एक अद्वितीय ग्रंथ आहे. आचार्य अत्रे यांनी मराठीतील ख्यातनाम प्रकाशक ह. वि. मोटे यांना ‘गावगाडा’ची महत्त्वाचे पुस्तक म्हणून आवृत्ती काढायला सांगितली. मोटे यांनी हे पुस्तक १९५९ साली पुन्हा छापले. त्यातील शब्द आणि संज्ञा ग्रामीण व किचकट स्वरूपाच्या होत्या. सर्वसामान्य वाचकाला हे पुस्तक समजावे या हेतूने कृष्णाबाई मोटे यांनी परिश्रमपूर्वक एक सूची तयार करून पुस्तकाला जोडली. शेती व सहकारतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आजही महत्त्वाची आहे. गावगाडय़ाच्या दुरवस्थेमागे ब्रिटिशांची राजनीती आणि अर्थनीती होती, पण आत्रे त्याबद्दल लिहीत नाहीत, असे गाडगीळ स्पष्टपणे म्हणतात. आत्रे ब्रिटिशांची चाकरी करत असल्यामुळे लोकहितवादी किंवा महात्मा फुले यांच्याप्रमाणे ब्रिटिशांवर कठोर टीका करणे त्यांना शक्य नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे.
‘गावगाडा’च्या लेखनात हे व अन्य काही दोष असले तरी आत्रे व्यासंगी, विवेकवादी व परिवर्तनाला अनुकूल होते हे जाणवते. तरीही ‘गावगाडा’चा इतिहास सांगणारे हे पुस्तक अभ्यासकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना निश्चित उपयुक्त आहे.
‘गावगाडा’ : शताब्दी आवृत्ती
संपादन- द. दि. पुंडे
राजहंस प्रकाशन, पुणे.
मूल्य : ५०० रुपये.
डॉ. अंजली सोमण