डॉ. वृषाली किन्हाळकर
एखाद्या माणसाचं अचानक जाणं किती जिव्हारी लागू शकतं? आणि तेदेखील किती लोकांना? याची विस्मयजनक गोष्ट म्हणजे प्रा. मधुकर राहेगावकर संपादित ‘ते होते जीवित’ हे पुस्तक. लोकविलक्षण प्रतिभा लाभलेला एक माणूस.. ज्याच्या जिभेवर साक्षात सरस्वती वावरत असायची. हा माणूस पराकोटीच्या कनवाळू हृदयानं भेटेल त्याला ज्ञानदान करीत असायचा आणि त्याचबरोबर गरजूला अर्थसाहाय्यदेखील! हे वर्णन आजच्या जगात कुणालाही अतिशयोक्तीपूर्ण वाटावं असंच. परंतु ‘नरहर कुरुंदकर’ या नवाक्षरी चमत्काराचा हा सत्य इतिहास आहे. असा माणूस पुन्हा होणे नाही असंच हे पुस्तक वाचून आपल्याला वाटत राहतं.
कुरुंदकर गुरुजींना जाऊन थोडीथोडकी नाही तर ३६ वर्षे झाली. पण त्यांच्या जाण्याच्या चटक्याची धग मुळीच कमी झालेली नाही, हे त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना भेटल्यावर जाणवतं. प्रा. मधुकरराव राहेगावकर हे कुरुंदकरांचे विद्यार्थी. त्यांच्या मर्मबंधातली ठेव म्हणजे या पुस्तकातल्या आठवणी. हे पुस्तक वाचताना पानापानावर वाचक अचंबित होत राहतो. गुरुजींनी ज्यांना शिकवलं ती माणसं आज सत्तरी-पंचाहत्तरीत आहेत. ज्या डोळ्यांनी गुरुजींना पाहिलं, ज्या कानांनी गुरुजींना ऐकलं, ते डोळे, ते कान आणि ती माणसं वर्षांगणिक कमी होत चालली आहेत. अशा काळात त्यांच्या एका विद्यार्थ्यांनं गुरुजींच्या धक्कादायक मृत्यूनंतरचे अग्रलेख, सर्व वृत्तपत्रीय कात्रणं, आठवणी संकलित करून समग्र गुरुजी या पुस्तकाद्वारे साक्षात् करण्याचा प्रयत्न केला आहे.
गुगल सर्चला खरवडून काढत पुस्तकांवर पुस्तकं लिहिण्याचा सपाटा लावणारी स्वयंघोषित प्रतिभावंतांची मांदियाळी सध्या अवतीभोवती दिसते. ज्ञान आणि माहिती यांतला फरकच न समजणारं सध्याचं जग आहे. परंतु १९५० च्या दशकात मराठवाडय़ात एक वीस वर्षांचा मुलगा भरताचे नाटय़शास्त्र, इन्स्क्रिप्शनम् इंडिकेरम, मेगॅस्थेनिसचा जॉन मॅक्क्रिंडलने जपून ठेवलेला वृत्तान्त, विष्णुपुराण, मर्ढेकरांची कविता, भारताचा प्रागतिहास, घटकंचुकी व शाक्तमठ, शंकर, रामानुज व मध्व यांची आत्मा-ब्रह्म-माया-अविद्या, दोस्तोयव्हस्की, कामू, रसेल, सात्र्, मूर.. इतक्या विविध विषयांवर चर्चा करत असे, ही गोष्ट चमत्कारच वाटू शकते!
कुरुंदकर केवळ ५० वर्षांचं आयुष्य जगले. परंतु त्या ५० वर्षांत त्यांनी काय नाही केलं! अवघ्या चौथ्या इयत्तेत शिकत असताना पुराणकथांवरून त्यांनी काढलेले निष्कर्ष थोरामोठय़ांना तोंडात बोट घालायला लावत. त्यांच्या स्पष्ट आणि निर्भीड मांडणीवर औद्धत्त्याचा शेरा बसायचा; पण मनोमन त्यांची तर्कशुद्ध विचारसरणी प्रत्येक मोठय़ा व्यक्तीला पटून जात असे. वयाच्या दहाव्या वर्षी कुरुंदकरांनी प्रेमकविता लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्या प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्यासारखे आहेत असे लिहिले होते. पुढे सुमारे अकरा र्वष ते काही ना काही लिहून नामवंत मासिकांना पाठवीत राहिले, पण काहीच छापून आले नाही. या अकरा वर्षांच्या तपश्चय्रेनंतर मात्र कुरुंदकर प्रतिदिनी चमकत राहिले! वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच त्यांचे मुंबई मराठी साहित्य संघात व्याख्यान झाले. ‘सत्यकथा’त लेख छापून आले. पुण्याला व्याख्यान झाले. मुख्य म्हणजे हे सर्व घडत असताना ते पदवीधरदेखील नव्हते! अनेक संमेलनांतील परिसंवादात ते प्रमुख आकर्षण असायचे. ‘नवभारत’, ‘मौज’ ही साप्ताहिके त्यांचे लेख छापू लागली तेव्हा कुरुंदकर केवळ २३ वर्षांचे होते!
प्रा. राहेगावकरांना १९५५ सालचा इयत्ता आठवीचा मराठीचा तास स्पष्टपणे आठवणीत आहे. कुरुंदकरांनी घेतलेला तो पहिला मराठी कवितेचा तास. त्यांच्या शिकवण्याच्या अगदी वेगळ्या पद्धतीमुळं त्यांचा तास आणि एकुणातच शाळा कशी प्रिय वाटत असे, हे सांगताना प्रा. राहेगावकर त्या जुन्या कालखंडात भान हरपून जातात. सलग तीन र्वष गुरुजींचे अध्यापन त्यांच्या भाग्यात होते. गुरुजींचा सहवास त्यांना अखंडपणे आठ र्वष लाभला. या कालखंडास ते ‘सुवर्णस्पर्शी कालखंड’ म्हणतात.
कुरुंदकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले अग्रलेख, आठवणी आणि त्यांच्यावरील लेख असा सारा ऐवज राहेगावकरांनी अत्यंत श्रद्धेने गेली ३५ र्वष सांभाळला. कुसुमाग्रजांच्या ‘ते होते जीवित अन् हा जीवित भास’ या काव्यपंक्ती राहेगावकरांच्या हृदयातून आपसूक ओठावर आल्या आणि पुस्तकाचं शीर्षक बनलं- ‘ते होते जीवित’! गुरुजींचं गारूड केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हतं, तर त्यांच्या सभांना गर्दी करणाऱ्या प्रत्येक श्रोत्यावर होत असे. मराठवाडय़ाबाहेर त्यांना विचारवंत, तर्कशुद्ध समीक्षक आणि अद्भुत जादुगारी करणारा फर्डा वक्ता म्हणून मानमान्यता होती. परंतु या गुणविशेषांसोबतच प्रत्येकाच्या सुख-दु:खांत भिजणारा एक परमदयाळू माणूसही त्यांच्यात होता.
खरं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा दर्जा घसरण्याचा धोका असतो. हा निसर्गनियम आहे. परंतु कुरुंदकर याला सन्माननीय अपवाद होते. इतक्या अल्प आयुष्यात त्यांनी इतक्या विविध विषयांना हात घातला. बोलण्याची उदंड हौस असणारा हा माणूस.. पण कधी कंटाळवाणं झालं नाही त्यांचं बोलणं. सुमार वा साधारण असं त्यांनी कधी काही केलंच नाही. जे केलं ते अत्यंत अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध, अचूक आणि निर्भीड! दत्ता भगत हे कुरुंदकरांचे विद्यार्थी. या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या भिजल्या काळजातले आठवणींचे मोती सादर केलेत.
एक जन्मजात बुद्धिवंत मुलगा कुरुंदा-वसमत-हैदराबाद-नांदेड अशी मजल-दरमजल करीत प्रतिभा निकेतन शाळेत शिक्षक म्हणून येतो. निकेतनची खरीखुरी प्रतिभा म्हणून सर्वमान्य होऊ लागतो. खिडकीतून येणाऱ्या चार उजेडाच्या तिरिपी म्हणजेच सूर्य अशी भाबडी समजूत असलेल्या शाळकरी जिज्ञासूंना खरा सूर्य आणि त्याचं डोळे दिपवणारं तेज दाखवू लागतो. पोरं अवाक् होऊन पाहत राहतात आणि त्याच्या मागं चालू लागतात. प्रसंगी तिरकस बोलून पोरांची उनाड वयातली नशा उतरवत त्यांना अस्सल बावनकशी कला, साहित्य, विज्ञान, सौंदर्यशास्त्र, संगीत यांची कवाडं खुली करत जातो. पोरं टीपकागद होऊ लागतात. व्यावहारिक जगण्याच्या खाचखळग्यांत कधी पोरं ठेचकाळली, की हाच त्यांना आधाराचा हात देऊ लागतो. त्याला पोरांची ज्ञानाची भूक जितकी नेमकी समजायची, तितक्याच अचूकपणे पोटाची भूकदेखील उमजायची. पोरं कायमच भारावून जायची त्याच्या अस्तित्वानं. सभा, संमेलनं, परिसंवादांच्या आतषबाजीत त्याची वाणी झगमगत आसमंत उजळून टाकत होती अन् त्याच्या भोवतालची तरुणाई दिवसागणिक तृप्त होत होती.. समृद्ध होत होती.
शिक्षकाचा प्राध्यापक अन् प्राध्यापकाचा प्राचार्य होत असतानाच त्यांचा लौकिक सर्वदूर पसरत गेला. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेला अचाट व्यासंगाची जरतारी किनार तर होतीच; त्याचबरोबर हृदयातली निभ्रेळ माणुसकी सर्वात देखणी होती. जिथं जाईल तिथल्या माणसांची हृदयं काबीज करत पुढं निघालेला हा तलबुद्धीचा पहाड अचानकच कोसळला अन् त्याच्याभोवतीची ही पोरं कावरीबावरी झाली, निराधार झाली. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथं हमखास मिळायची ते केंद्रच क्षणात दिसेनासं झालं. सर्वाच्या काळजाचं पाणी पाणी झालं.
१९८२ पासून आजपर्यंत त्या तरुणांच्या काळजात एक थांबलेपण साचलं आहे. अंगावर काटा आणणारी एक निश्चल स्तब्धता आहे. आणि त्याच स्तब्धतेचं शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकात सर्वात लक्षवेधी आहे ती बाबा आमटे यांची कविता. कुरुंदकरांचं आणि त्यांचं लोभस मत्र आणि काळजाला घरं पाडणारा कुरुंदकरांचा अकस्मात मृत्यू याचं कवितेतलं वर्णन आजही डोळ्यांत पाणी आणतं. राम शेवाळकरांचा लेखही असाच हृदयस्पर्शी आहे. कुरुंदकरांच्या विविध सामाजिक प्रश्नांवरच्या मतांवर आणि विचारांवर अनेक मान्यवरांचे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि कुरुंदकर यावर म. य. दळवी आणि यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेले लेख आहेत. दलित साहित्य आणि कुरुंदकर यावर भालचंद्र फडके आणि गंगाधर पानतावणे यांचे लेख आहेत. हे सगळे लेख महत्त्वाचे आणि वाचनीयही आहेत. ‘रंगली मेंदी अशी की..’ हे प्रकरण तर फारच मजेशीर आणि कुरुंदकरांचा चाणाक्ष खटय़ाळपणा अधोरेखित करणारं आहे. हे केवळ पुस्तक नाहीये, हा तर ओल्या जखमांचा कण्हणारा गाव आहे. या गावाला प्रत्येकानं जायलाच हवं एकदा!
‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’
संपादन- प्रा. मधुकर राहेगावकर,
अभंग प्रकाशन, नांदेड,
पृष्ठे- १६७, मूल्य- २३० रुपये.