‘बहुविधतेमध्ये एकता’ हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण ठरते. बहुविधता हा भारतीय लोकशाहीच्या स्थर्याचा आणि विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यास युरोपीय देशांमध्ये ‘अनेकसत्तावाद’ संबोधले जाते. त्याचा वेध भारतात पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाद्वारे घेतला होता. अमेरिकन सामाजिक शास्त्रे अनेकसत्तावादाचा सिद्धान्त मांडतात. अशा बहुविधतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेचा आणि मूल्यव्यवस्थेचा शोध व पुनशरेधाचा प्रयत्न जगभर सर्वत्र सातत्याने सुरू आहे. अलीकडे अशा प्रयत्नांचा भाग म्हणजे ‘बहुसंस्कृतिवाद’ हा विचार होय. अशा एका वैश्विक मूल्याच्या पुनशरेधाचा आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात पुनव्र्याख्या करण्याचा प्रयत्न ‘सलोख्याचे प्रदेश- शोध सहिष्णु भारताचा’ या पुस्तकामध्ये केला गेला आहे. प्रसिद्ध पत्रकार सबा नक्वी या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी मिश्र सांस्कृतिक परंपरा अनुभवली आहे. तसेच या परंपरेचा त्यांनी या पुस्तकाद्वारे शोधही घेतला आहे. त्यांच्या या पुस्तकाचा अनुवाद प्रमोद मुजुमदार यांनी केलेला आहे. त्यातील आशय आणि विषय मुजुमदारांनी जसाच्या तसा मराठीमध्ये रूपांतरित केलेला आहे. हे तसे जोखमीचेच काम. परंतु त्यांनी ते सहज सुलभपणे केले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना आणि त्यातला आशय समजून घेताना एक नसíगकता त्यात आढळून येते. जणू अनुवादकच बहुविधतेची ही कथा स्वत: मांडतो आहे असे वाटत राहते. अनुवादक त्यातील आशयामध्ये गुंतत गेला आहे. त्यामुळे हे पुस्तक अनुवादितऐवजी स्वतंत्र साहित्यकृती असल्याची अनुभूती वाचकाला देते.
आरंभीची निवेदने (माझा प्रवास व पुस्तकाविषयी थोडंसं..) वगळता या पुस्तकात ३३ प्रकरणे आहेत. ही ३३ प्रकरणे १५५ पृष्ठांमध्ये विभागलेली आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक असे टप्पे पुस्तकामध्ये केलेले दिसतात. मात्र, त्यांची एकमेकांमध्ये इतकी सरमिसळ झाली आहे, की त्यांना वेगळे म्हणता येत नाही. पुस्तकाचे शीर्षक जसे आकर्षक आहे, तसेच पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचे नावदेखील लक्षवेधी आहे. उदा. ‘आम्ही मुस्लीमही, िहदूही’, ‘देवी, पण मुस्लिमांची’, ‘अयोध्येतील मक्का’ इत्यादी. अशा चित्तवेधक प्रकरणांच्या अंतरंगात भारतीय समाजाचे विविध सामाजिक-धार्मिक ताणेबाणे दिसून येतात. जीवन जगण्याची खरीखुरी पद्धती त्यात दिसते. एकमेकांमध्ये गुंतलेली माणसे आणि त्यांचे संगीत दिसते. देशातील पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा, तमिळनाडू, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, मणिपूर, काश्मीर, महाराष्ट्र अशा तेरा राज्यांमधील ही वस्तुनिष्ठ कथा चितारली गेली आहे. भारतातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य राज्यांमधील ती आहे. त्यामुळे हे पुस्तक सबंध भारताचे प्रतिनिधित्व करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. किंबहुना, ते शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील मानवी जीवनातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गुंता मांडते. भक्त, पुजारी, संगीत, दैवते, वंशज, लोककवी, पीर, संत, हीरो इत्यादी सांस्कृतिक घटकांच्या साहाय्याने व्यक्तीने मुक्त हस्ते केलेली जीवनाची उधळण त्यात सुस्पष्ट दिसते. हे सर्व घटक धर्म, पंथ, भाषा, वंश इत्यादी कृत्रिम िभतींच्या पलीकडे गेलेले दिसतात. उदा. तीनथानी येथील खाली मंदिर व वर दर्गा; मणिपूरमधील एक जमात, दोन धर्म; पोखरण येथील दोन धर्माचं एक दैवत; तामिळनाडू व केरळमधील धर्म दोन, पण जात एकच अशा चित्तवेधक कथा मनाचा बंदिस्तपणा खुला करतात. मानवी मनाला आवळलेल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक साखळदंडांतून या कथा सहजपणे तोडतात. पुस्तक वाचताना स्वातंत्र्याची खरी अनुभूती येते. भारतीय माणसावरील सांस्कृतिक नियंत्रणांची जाणीव होते. भ्रामक जाणिवांमुळे आपण दिशाहीन होत आहोत याचेही आत्मभान येते आणि त्यातून मुक्तीचा मार्ग दिसतो.
या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना ही संमिश्र संस्कृती अथवा संयुक्त सांस्कृतिक परंपरा अशीच आहे. या संकल्पनेचा अर्थ अशुद्ध परंपरा किंवा तिचे उदात्तीकरण असा होत नाही, हे लेखिका स्पष्ट करते. या संकल्पनेचा अर्थ सारासार विवेक या पद्धतीने यात मांडलेला आहे. संयुक्त सांस्कृतिक परंपरांच्या संदर्भात मुस्लीम ओळख त्यातून स्पष्ट झाली आहे. उदा. राजस्थानच्या पश्चिम सीमेवरील लंगा समाज व पश्चिम बंगालच्या पूर्व भागातील पटचित्र चित्रकार समाज इत्यादी. मुस्लीम समाज मागास आहे. त्याचा संबंध मागास जातींशी जोडलेला आहे. चित्रकार समाज अस्पृश्य असल्याची नोंद यात आलेली आहे. िहदू व मुस्लीम अशा दोन अस्मिता एकाच वेळी त्यांच्या जीवनात आढळतात. नाव मुस्लीम (दुखोराम, ओस्मान, ओमर, रेहिमा), परंतु दुसरे नाव िहदू (चित्रकार, रूपा) अशी वस्तुस्थिती अनेकांच्या बाबतीत दिसून येते. यांचे संबंध पितृसत्ताक असल्याचे दिसून येते (जमीनदार व सरकार). िहदूप्रमाणे सुंदरबन येथील दैवतीकरणही या पुस्तकात नोंदवले गेले आहे. (बोनबीबीदेवी, वाघदेव, गाझीमियाँ)
जागतिकीकरण, शहरीकरण आणि व्यापारीकरणाच्या रेटय़ामध्ये धार्मिक असहिष्णुता वाढली.. सहअस्तित्वाचा लोप झाला. असे चित्र असूनही िहदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा धर्मामध्ये देवाणघेवाण झाली. त्या देवाणघेवाणीतून सांस्कृतिक परंपरा सकस झाल्याचे पुस्तकामध्ये दिसते. संगीत हे विविध भेदांच्या पुढे गेले. त्यांचा दैनंदिन व्यवहार सुरू आहे. अशा प्रकारचा व्यवहार आपल्या अवतीभोवती सहजगत्या सुरू आहे. तो ओळखण्याची दृष्टी या पुस्तकातून मिळत जाते. इथल्या लोकशाहीचा व्यवहार हा त्या दृष्टीच्या अंगणात घडतो. मात्र, नव्वदीनंतरच्या जागतिकीकरणात हा आशय हरवला आहे. या हरवलेल्या आशयाचा पुनशरेध लेखक, अनुवादक व प्रकाशक घेत आहेत. समूहभावना यातल्या प्रत्येक कथेत आढळते. ती सार्वत्रिक व्हावी, हा उद्देश पुस्तकामध्ये टॅगलाइनसारखा आला आहे. उदा. चर्चचे िहदू भाविक, जगन्नाथाचा मुस्लीम भक्त, देवीचे मुस्लीम शाहीर, इत्यादी. त्यामुळे लेखिकेने ‘सहिष्णु भारताचा शोध’ असे केलेले वर्णन समर्पक ठरते. विशेष म्हणजे मिश्र धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या अदृश्य इतिहासाची ही तोंडओळख आहे. पुस्तकातील आशय चित्तवेधक असूनही त्याचे सुलभीकरण झालेले नाही. मात्र, आशयाबद्दल अचूकपणा आणि ठाम भूमिका दिसते. विविध विरोधाभास असूनही पुस्तकामध्ये संदिग्धता आढळत नाही. सूफी व भक्ती चळवळींनी देवाणघेवाण केल्याची विविध उदाहरणे पुस्तकामध्ये आली आहेत. ईश्वरभक्तीसाठी संगीताचा वापर केल्याची उदाहरणे दिसतात. पुस्तकामध्ये मिश्र संस्कृती संगमाखेरीज आध्यात्मिक मुक्तीचा मुद्दा आढळतो. अर्थातच ही आध्यात्मिक मुक्ती धर्म-संकल्पनेशी जोडलेली दिसते (बाऊल गायक किंवा बाऊलपंथीय). ही आध्यात्मिकता गांधींच्या वळणाची आहे. त्यामुळे ती कुठल्याही वर्चस्वापासून दूर आहे. ती सर्वसमावेशक स्वरूपाची आहे. श्रद्धेची परिभाषा कट्टरपंथी नव्हे, तर सहृदयी व भक्तिपर आहे. त्यामुळे वारकरी परंपरेतील आशय यात अभिव्यक्त झाला आहे. हा आशय परंपरेमध्ये आधुनिकतेचा शोध घेणारा आहे. कारण संगीत, काव्य, गीत अशा आधुनिक गोष्टींवर त्यांची श्रद्धा परंपरेपेक्षा जास्त आहे. त्यात बंधमुक्तीचा प्रयत्न आढळतो.
पुस्तकांची मांडणी सुसंगतपणे केली आहे. भाषा सोपी व वाचनीय आहे. मुखपृष्ठावर पुस्तकातील आशय प्रतििबबित झालेला आहे. पुस्तकाच्या अंतरंगातील चित्रेही बोलकी व समर्पक आहेत. ती पुस्तकांचा आशय समजून घेण्यास मदत करतात. हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक, पत्रकारांनी वाचावे असे आहेच; शिवाय ते आधुनिक व लोकशाही दृष्टिकोन घडविण्यास मदत करणारे आहे. हे पुस्तक म्हणजे सहिष्णु भारताची सहलच ठरेल.
‘सलोख्याचे प्रदेश- शोध सहिष्णू भारताचा’
मूळ लेखक- सबा नक्वी,
अनुवाद- प्रमोद मुजुमदार,
समकालीन प्रकाशन,
पृष्ठे- १८४, मूल्य- २०० रुपये.
प्रकाश पवार