काही नाटककारांना एखाद्या असामान्य कलाकृतीच्या सान्निध्यात मुक्तपणे वावरू द्यायचं आणि त्या प्रेरणेतून नव्या, वेगळ्या कलाकृतीची शक्यता आजमावायची, ही कल्पनाच मोठी वेधक आणि अप्रुपाची आहे. नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी चार युवा नाटककारांना घेऊन त्यांना अजिंठय़ाच्या लेण्यांची भेट घडवून आणली आणि या कल्पनेला मूर्त स्वरूप आणलं. या प्रयत्नातून त्यांना चार बरी नाटकं प्राप्त झाली आणि या कल्पनेचे प्रवर्तक असलेल्या बोधी नाटय़ परिषदेचे नवे नाटककार निर्माण करण्याचे उद्दिष्ट काही अंशी सफल झाले. बोधी नाटय़ परिषद एवढय़ावरच थांबली नाही, तर त्यांनी या चार नाटकांचे एक पुस्तक ‘अजिंठा नाटय़लेणी’ या नावाने प्रसिद्ध केले आणि या चार नाटकांचा एक महोत्सव रंगमंचावर सादर करून एक कलावर्तुळही पूर्ण केलं.
या चार नाटकांच्या संग्रहात अशोक हंडोरे लिखित ‘नागपद्म’ हे पहिले नाटक. अजिंठा लेण्याच्या परिसरात अभ्यास दौऱ्यासाठी आलेली तरुणी स्नेहा, इतिहासाचे प्राध्यापक महेंद्र आणि चित्रपट दिग्दर्शक अथर्व यांची भेट होते. लेखनातील कौशल्यामुळे आणि संशोधक वृत्तीमुळे स्नेहावर ‘अजिंठा’ या विषयाच्या पाश्र्वभूमीवरील चित्रपट लेखनाचीही जबाबदारी पडली आहे. व्यावसायिक चित्रपट आणि कलात्मक चित्रपट याच्या जोडीला इतिहासाचे भान या विषयावरील या नाटकातली चर्चा पृष्ठपातळीवरची आहे. अजिंठय़ाची लेणी हा या नाटय़वस्तूचा अविभाज्य घटक न वाटता चिकटवलेला वाटतो. व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट यांच्या कात्रीत सापडलेली स्नेहा दिसली असती तर या नाटकात काही नाटय़ निर्माण झालं असतं. आताचे या नाटकाचे स्वरूप ‘एपिसोडिक’ झालं आहे. ‘ठीक आहे’ एवढंच या नाटकाबद्दल म्हणता येईल.
‘..आणि धम्म’ या दुसऱ्या नाटकाचे लेखक आहेत स्वप्नील गांगुर्डे. बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि त्याचे फलितस्वरूप यांच्या शेजारीकरणातून प्रत्यक्ष अनुभव देण्याचा या नाटकाचा प्रयत्न भावणारा आहे. अजिंठा महोत्सवात सादर करण्यासाठी दिग्दर्शिका नाटक बसवते आहे तेच मुळी खुनी गुन्हेगार कैद्यांना घेऊन. या कैद्यांत साहित्यिकाच्या खुनाचा आरोप असलेला एक हिंदुत्ववादीही आहे. बुद्धचरित्रातील व्यक्तिरेखा तालमीत अभिनयांकित करता करता गुन्हेगारांना आपल्या जीवनातील प्रसंग आठवून त्यांचं हृदयपरिवर्तन होतं, हा भाग नाटय़पूर्ण झाला आहे. (इथे ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण येते.) महोत्सव उधळून लावणे, साहित्यिकाचा खून, इ. उल्लेखाने नाटक समकालाशी संबंध जोडते. अवघ्या सात छोटय़ा दृश्यांचं नाटक असूनही हे नाटक खिळवून ठेवतं. त्याचं कारण त्याची मांडणी आणि नेमकी संवादभाषा. गतिमान घटना हेही या नाटकाचं आणखी एक वैशिष्टय़ आहे.
‘मिशन २९’ हे नाटक म्हणजे एक थरारनाटय़च आहे. अरुण मिरजकर त्याचे लेखक आहेत. जपानमध्ये कृत्रिम बुद्धशिल्पं उभारली जाणार आहेत. ती एकमेवाद्वितीय व्हावीत म्हणून अजिंठय़ाची लेणी उडवायचा कट रचला गेला आहे. जपानी दहशतवादी ‘सू’ अजिंठय़ाच्या लेण्यांत आली आहे. गाईड राहुल तिचा मार्गदर्शक आहे. ती बुद्धिस्ट आहे. अजिंठय़ाच्या लेण्यांचा तिचा अभ्यास आहे. पैशासाठी राहुल तिला मदत करायला तयार होतो. पण जेव्हा तिचा अंतस्थ हेतू त्याला कळून चुकतो तेव्हा तो गडबडतो. त्याचे कला आणि भारतीय संस्कृतीच्या महान वारशाचं भान जागे होते. अजिंठय़ाच्या लेण्यांमधील पेंटिंग्ज आणि शिल्पं सजीव होतात. जातककथेतले प्रसंग अनुभवताना तिच्यातही परिवर्तन होते अन् राहुललाही आपली चूक कळते. तो शिताफीने लेणी वाचवतो. ‘सू’ला सायनाइडच्या गोळीशिवाय पर्यायच नसतो. दोन प्रमुख पात्रांबरोबरच लेखकाने कोरसचाही वापर केला आहे. हा कोरस जसा भाष्यकार आहे तसाच तो सूचनाकारही आहे. जातककथेतले प्रसंग नृत्यस्वरूपातले आहेत. त्यामुळे या नाटकाने दुहेरी रूप प्राप्त करून रंजकता व प्रबोधन यांचा सुंदर मेळ साधला आहे.
या संग्रहातलं चौथं ‘द बुद्धा’ हे नाटक प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेलं आहे. मुक्तछंदातलं हे एक बुद्धचरित्रच आहे. त्याला छान लय आणि ताल आहे. ते एक संकीर्तनच आहे. या काव्य-नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे ते वर्तमानाशी संबंध जोडते. यातला बुद्ध वस्तुनिष्ठ आणि आधुनिक आहे. त्याला देव ही कल्पना मान्य नाही. ‘मला बोधी प्राप्त झाली म्हणजे मी कुणी वेगळा नाही. मी साधा माणूसच आहे,’ अशी त्याची धारणा आहे. ‘जर मी ज्ञानी बुद्ध, तर का शिकलो मी गुरूठायी?’ हा त्याचा सवाल आहे. अन्याय सहन करणं, गप्प राहणं चूकच आहे. ‘आय द बुद्धा’ अशी इंग्रजीत घोषणा त्याच्या मुखी घालून बुद्धाचे वैश्विक माहात्म्य कवीने नोंदवले आहे. उत्तम संगीत व गायकांची जोड मिळाल्यास ही कविता ‘संगीत बुद्धायन’ म्हणून लोकप्रिय होऊ शकेल.
या चारही नाटककारांचे लक्ष्य ‘अजिंठा’ असल्यामुळे सर्व नाटकांतून जातककथेतले तेच तेच प्रसंग येणे अपरिहार्यच होते. मुद्दा पुनरावृत्तीचा नसून त्याच शिल्पदृश्यांचा कुणी काही वेगळा विचार केला आहे का, हा आहे. पण तसा तो कुणी केलेला दिसत नाही. या जातककथांचे अर्थनिर्णयन करण्याच्या फंदात कुणी पडलेले दिसत नाही. काव्य-नाटककाराला तर चरित्रालाच भिडायचं होतं; पण इतरांचं काय? अन्वयार्थ वा अर्थनिर्णयनाच्या अभावामुळे जातककथा मूळ नाटकाला पूरक ठरण्याऐवजी मूळ नाटकच जातककथेला पूरक होताना दिसते. प्रेमानंद गज्वी वगळता अन्य नाटककार उदयोन्मुख आहेत. ते तंत्रकुशलही आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी नाटय़लेखनातील वैशिष्टय़े, प्रसंग फुलवण्याची किमया आदी गोष्टींवर हुकुमत मिळवायला हवी. कारण नाटय़परिणाम प्रेक्षकांच्या मनावर दृढ करायला याच गोष्टी कारणीभूत ठरतात.
युवा नाटककारांचा हा प्रारंभीचा प्रयत्न स्वागतार्ह आहे यात शंका नाही. कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामथ्र्य या सर्व नाटकांतून दिसून येते. पण तेवढे चांगल्या नाटकाला पुरेसे पडत नाही. ‘राशोमान’ या चित्रपटात एकाच घटनेकडे पाहण्याचे चार वेगवेगळे दृष्टिकोन प्रकट केले आहेत. तसे काही ‘अजिंठा नाटय़लेणी’मधल्या नाटकांच्या संदर्भात झाले असते तर या कलाकृतींना एक वेगळी उंची प्राप्त झाली असती. पुढल्या प्रयत्नात या त्रुटी भरून काढल्या जातील आणि हेच नाटककार तंत्रकुशल, तितक्याच आशयसंपन्न कलाकृतीही देऊ शकतील, अशी आशा या नाटय़लेखनाने निर्माण केली आहे. अखेरीस विषय कोणताही असो; ‘नाटय़म् शरणं गच्छामि’, हेच खरे. या नव्या उपक्रमाबद्दल बोधी नाटय़ परिषदेचे मन:पूर्वक अभिनंदन!
‘अजिंठा नाटय़लेणी’, बोधी प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- २३१, किंमत- ३०० रुपये.
कमलाकर नाडकर्णी Kamalakarn74@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा