१९९० नंतरच्या जागतिक दृश्य-कलाकृतींचा मराठी मनानं घेतलेल्या अनुभवांबद्दलचे पाक्षिक सदर!
कविवर्य कुसुमाग्रज यांची एक छान चुटकेवजा कविता आहे.. ‘टकटक झाली दारावरती.. दार उघडले, तेथे होता सुहास्य वदनाचा विक्रेता’ अशी या कवितेची सुरुवात आहे. यावरून, आता कवी आणि विक्रेता यांचा संवाद वाचायला मिळणार, अशी खूणगाठ आपण बांधत नाही तोच कुसुमाग्रजांनी त्यांच्या प्रतिभेच्या तारांगणात आपल्याला नेलेलं असतं. तो विक्रेता साधा नसतोच.. एक निळसर, मोहक पेटी असते त्याच्याकडे; पण ती साफ रिकामी असते. तरीही विक्रेता याच पेटीतून ‘लंकेमधल्या नीलमण्यांचा पेला’, ‘शिंपांचा पंखा’ किंवा ‘मलायातली साय-शिळा (!)’ असा केवळ कल्पनेतच शक्य असलेला खजिना कवीला दाखवू लागतो. कवी खमका. तो म्हणतो, ‘हे सर्वच ठेवा.. मोल अशांचे काय करावे? चेक सहीचा हा घ्या कोरा; पैसे आपण त्यात भरावे!’
मग येतो कवितेचा शेवट..
‘चिजा जशा त्या, चेक तसा तो
हात रिकामा केला पुढती
‘बहुत शुक्रिया’ म्हणून त्याने
हवा घेतली जपून हाती!
मान झुकविली, घेऊन पेटी
सौदागर तो निघून गेला
देणेघेणे काही नसता
असा हवेचा सौदा झाला..’
कविता कुसुमाग्रजांची आहे. ती ‘छान चुटकेवजा’ असली तरी तो फक्त चुटका नाही.. तिच्यात आणखी मोठा अर्थ आहेच, हे ती वाचणाऱ्या अनेकांना लक्षात आलं. तो मोठा अर्थ साधारणपणे असा आहे, की कोणतीही कला ही अनुभवायची असते. ती मूर्त की अमूर्त, उपयोगी की निरुपयोगी, कौशल्ययुक्त (नीलमण्यांच्या पेल्यासारखी) की ओबडधोबड (सायशिळेसारखी).. याच्या चिंतेत न पडता सगळ्याच कलेचे अनुभव घ्यायचे असतात. ‘काही नाही हो, फक्त हवा!’ असं बुद्धीला पटतही असेल; पण म्हणून समोरचा एवढा छान अनुभव नाकारायचा- असं थोडंच आहे?
या कवितेच्या अर्थाचं एक प्रात्यक्षिक नुकतंच दृश्यकलेत अनुभवायला मिळालं होतं.
ते मात्र भल्याभल्यांची परीक्षा घेणारं आहे. म्हणजे असं की, ही कलाकृती ‘पाहता’ येतच नव्हती.. तरीही दृश्यकलेच्या महत्त्वाच्या प्रदर्शनात ती होती. ‘पाहताच येत नाही, मग याला कलाकृती कसं काय म्हणायचं?’ असा प्रश्न कोणाच्याही मनात येणारच होता!
असं का? काय होती ती कलाकृती?
एका शब्दातलं उत्तर : ‘हवा’ किंवा ‘वारा’!
होय! जर्मनीतल्या कासेल नामक गाववजा शहरात ‘फ्रीडरिश्ॉनम’ या संग्रहालयाच्या पहिल्याच मोठ्ठय़ा दालनात ही ‘हवेची कलाकृती’ विराजमान झाली होती. त्या कलाकृतीच्या अनुभवात कसलाही अडथळा नको म्हणून हे अख्खं दालन मोकळं ठेवण्यात आलं होतं. एरवी जर्मन लोक त्यांच्या कुठल्याशा गावात काय करताहेत याच्याशी जगाला काही कर्तव्य नसतं. पण कासेल हे गाव असं, की इथं दर पाच वर्षांनी आज/कालच्या कलाकृती दाखवणारं जे ‘डॉक्युमेंटा’ नावाचं प्रदर्शन भरतं, ते पाहायला जगभरातून लोक येतात. अनेक देशांतल्या चित्रकार, शिल्पकार, दृश्य-कलावंतांचा सहभाग त्यात असतो. गेल्या वेळच्या (२०१२ सालच्या) ‘डॉक्युमेंटा’ला ९,०४,९९२ प्रेक्षकांनी भेट दिली होती!
‘हवेच्या झोताला ‘कलाकृती’ कसं म्हणायचं?’ हा प्रश्न या नऊ लाखांपैकी किमान दोन लाख प्रेक्षकांना तरी पडला असेलच की नाही?
‘किमान’ हं.. किमान दोन लाख प्रेक्षकांना. ‘कमाल’ तुम्ही ठरवाल तेवढे.. कदाचित ९,०४,९९१ सुद्धा. एक प्रेक्षक मुद्दामच कमी केलाय, कारण त्यानं कुसुमाग्रजांची कविता वाचलेली होती.
एवढंच नव्हे, त्याला ती कविता तिथं- त्या हवेच्या अधूनमधून येणाऱ्या झोतामध्ये फिरताना आठवतसुद्धा होती. हवा दाखवताना तो विक्रेता ‘अतुल शिल्प हे, देवहि येतिल यासाठी धरणीच्या दारी’ असं कवितेत म्हणतो, ही ओळदेखील आठवत होती.
आज तीन वर्षांनी आठवतंय ते असं की, हा झोत थोडासा नागमोडी होता. तो तस्साच असायला हवा, यादृष्टीनं त्या ‘कलाकृती’ची रचना करण्यात आली होती. आणि त्यासाठीचं साधन म्हणून छतालगतच्या पाइपांमधून पंखे वापरण्यात आले होते. ते कसे, कुठे लावायचे, याचा अगदी अभ्यासपूर्वक विचार करण्यात आला होता. म्हणजे या पंख्यांची रचना ठरवण्याच्या अगोदर त्या दालनात एरवी हवेची झुळूक कुठून येते, कशी फिरते, याचा संगणकाच्या मदतीनं अभ्यास करण्यात आला होता. मग, आता झुळूक जिथून, जशी येणं निव्वळ अशक्य आहे तिथूनच ती कृत्रिमरीत्या यावी, अशी योजना आखूनच छतालगतच्या पाइपांतल्या त्या अ-दृश्य पंख्यांची रचना झाली होती. या रचनेचं एक रेखाचित्र त्या मोठ्ठय़ा दालनाच्या एका कोपऱ्यात लावलेलं होतं. तिथंच प्रथेनुसार कलाकाराचं आणि कलाकृतीचं नाव वगैरे असलेली पाटी होती. रायान गँडर हे त्या कलावंताचं नाव आणि कलाकृतीचं नाव- ‘आय नीड सम मीनिंग आय कॅन मेमराइज (द इन्व्हिजिबल पुल)’ असं होतं. त्या नावाचं मराठी भाषांतर- ‘स्मरणात राहण्याजोगा अर्थ मला हवाय (अदृश्य ओढ)’ असं होऊ शकेल.
ही छोटेखानी लेबलवजा पाटी नि ते रेखाचित्र- एवढाच ‘पाहता येणारा’ भाग. बाकी कलाकृती अनुभवायची. हवेचा झोत कसा येतोय, हे शोधायचं.. मग ती नागमोडी झुळकेची वाट माहीत झाल्यावर पुन्हा त्यावर चालायचं, वगैरे.
पण मग या कलाकृतीचं नाव असंच का होतं? ‘स्मरणात राहण्याजोगा अर्थ मला हवाय (अदृश्य ओढ)’.. म्हणजे इथं काय असू शकेल?
त्या कलाकृतीला अर्थ नाहीच.. अज्जिबात नाही, असं गृहीत धरू या.
पण कलाकृती तर तीन वर्षांनीही अनुभवासकट आठवतेय..
पण आपण ज्या कलाकृतींना ‘स्मरणीय’ म्हणतो, त्यांना ‘अर्थ’ असायलाच हवा की नाही? कुसुमाग्रजांची ती कवितासुद्धा चुटक्यापेक्षा मोठा अर्थ आहे म्हणूनच स्मरणीय ठरते की नाही?
या प्रश्नावरच थांबू या.
थोडंथोडकं नव्हे, वर्षभर थांबू या.
असं थांबलं की मग कधीतरी ‘अर्थ’ कळतो.. उदाहरणार्थ, ‘अर्थ की अनुभव?’ या झगडय़ात ‘अनुभव’ हा कलेचा प्राण आहे अशा ‘अदृश्य ओढी’नं रायान गँडर या ब्रिटिश चित्रकारानं ती कलाकृती रचली होती, असा एक अर्थ.
कलाकृतीच्या अर्थाची शोधाशोध कलाकृतीमध्ये काय ‘दाखवलंय’ याच्यात करायची नाही.. अर्थाचा शोध हा कलाकृतीच्या अनुभवातून घ्यायचा, हा दुसरा अर्थ.
समजा, कुणाला कुसुमाग्रजांची एकही कविता माहीत नाही आणि ती चुटकेवजा कविताच
फक्त वाचायला मिळालीय, तर अशा वाचकाला तो फक्त चुटकाच वाटेल. ‘कुसुमाग्रजांच्या कवितेत मोठा अर्थसुद्धा असू शकतो’ हे मराठी माणसाला माहीत असतं. कारण आपल्याला कुसुमाग्रजांचं
कार्य माहीत असतं. म्हणजे एक प्रकारे इतिहास माहीत असतो.
तशी इतिहास माहीत करून घेण्याची अट दृश्य-कलेच्या क्षेत्रात इतकी लादली गेलीय, की यंव!
आपण मात्र भलतीकडून सुरुवात करतोय. उदाहरणार्थ, ‘हवा हा यापूर्वीही दृश्यकलेचा विषय ठरला होता. कलाजगताकडे टीकात्म दृष्टीने पाहणाऱ्या ‘दादाइस्ट’ कला-चळवळीतील मार्सेल द्युशाँ या कलावंताने १९१९ साली ‘पॅरिसची ५० सीसी हवा’ ही कलाकृती (अनघड आकाराच्या, पण मुळात शास्त्रीय प्रयोगशाळांतल्या) बाटलीत हवा भरून ती कलादालनात मांडली होती’ वगैरे काही समजा कुणाला आठवलं, तरी एकदा अनुभव महत्त्वाचा मानल्यावर खरंच या इतिहासवजा माहितीचा आपल्या आत्ताच्या अनुभवाशी संबंध उरतो का?
वादाचा मुद्दा ठरू शकेल हा. पण ‘आमचं काही कलेबिलेशी देणंघेणं नाही’ म्हणत आज अनेकजण बाजूला राहिलेत, याचं कारण अनुभवापेक्षा बाकीच्या गोष्टींनाच दिलं गेलेलं महत्त्व. आजकालच्या कलेशी हे देणंघेणं वाढवायचं असेल तर कलेचा अनुभव आपण दर पंधरवडय़ाला घेत राहू..
अभिजीत ताम्हणे- abhicrit@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा