‘सैराट’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी साहित्यात ग्रामीण वास्तव कितपत प्रभावीपणे व्यक्त झालेलं आहे, होतं आहे, याचा परामर्श घेताना लेखक राजन खान यांनी एकूणच मराठी साहित्याची केलेली चिकित्सक चिरफाड..
मराठी खेडी बदलली आहेत.. नित्य बदलताहेत. अर्थात मराठी शहरंसुद्धा बदलली आहेत.. नित्य बदलत आहेत. (भारतात एकूण शहरं फारशी नाहीत. शहरांच्या नावानं जे आहे ती अवाढव्य मोठी खेडीच आहेत.) माझ्याच आजवरच्या आयुष्याचे दोन वेगवेगळे कालखंड मला स्पष्ट जाणवतात. १९९० च्या आधीचा एक कालखंड आणि त्यानंतरचा एक कालखंड. नव्वदच्या आधी वाटतच नव्हतं, की काही बदलेल म्हणून. सगळंच्या सगळं जसं आहे तसंच कायम चालत राहील असं वाटायचं. बहुसंख्यांच्या जगण्यातलं दारिद्य््रा, मध्यमवर्गाची अल्पसंख्या, दुर्मीळ श्रीमंत, भौतिक समस्या, साधनांच्या असुविधा, कामगार आणि शेतकऱ्यांचे हाल, गावगाडा आणि बलुतेदारी, शिक्षणाच्या तीनच शाखा, तसेच त्यावेळची कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय मूल्यव्यवस्था कायम अशीच राहील असंच वाटायचं. पण तोवर हळू, संथ गतीनं बदलत असलेलं मराठी जग नव्वदनंतर वेगानं बदलत निघालं. विशेषत: आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर तर जास्तच. १९९५, २००० आणि २००५ असा टप्प्याटप्प्यानं या बदलांचा झपाटा प्रचंडच वाढला. अन् ही प्रक्रिया आज फारच जोरात चालू आहे. माणसाच्या मनापासून ते समाजाच्या अवस्थेपर्यंत सगळं झटापट बदलतंय. हे बदल मराठी साहित्यात आणि साहित्याच्या अनुषंगाने नाटक-चित्रपटांतही उमटताहेत. पण ते धडक आणि नेमके नाहीत. या बदलांवर मराठी साहित्य राज्य करतंय असं चित्र नाही. साहित्यात बदल येत असतील तर ते अगदीच अपवादात्मक स्थितीत आहेत. दुसरा प्रश्न असा की, हे बदल वास्तव पातळीवर साहित्यात येताहेत का? तर त्याचंही उत्तर ‘सहसा नाही’ असं आहे.
समाजातले भौतिक आणि मानसिक बदल एका रात्रीत होत नाहीत. ती दीर्घ प्रक्रिया असते अन् तिची एकात एक गुंतलेली अगणित कारणंही असतात. भारतीय आणि मराठी मनावर परिणाम करणाऱ्या काही ठोकळ आणि ठळक घटनांचा इथं उल्लेख करतो. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि पाकिस्तानची कायमची डोकेदुखी, चीन आणि पाकिस्तानबरोबरची युद्धं, बहात्तरचा दुष्काळ, १९७५ ची आणीबाणी, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, शाहबानो पोटगी दावा, मंडल आयोग, बाबरी मशिदीचं पतन, जागतिकीकरणाचा करार, विनाअनुदानित शिक्षण आणि शिक्षणाचा व्यापार, फसलेली शेतकरी आंदोलनं आणि सहकार चळवळ, उघड जातीय आणि धार्मिक राजकारण, संपलेल्या कामगार चळवळी, नष्ट आणि भ्रष्ट झालेल्या सामाजिक चळवळी, आजी-माजी पंतप्रधानांचे खून, दहशतवादी हल्ले, दूरचित्रवाणीचा प्रसार, शिक्षणाच्या वाढलेल्या शाखा, संगणकाचा प्रसार, खेडय़ांचं शहरीकरण, पाणी-आरोग्य अशा मूलभूत गरजांवर बसलेली राजकारण्यांची पकड आणि त्यांचं व्यापारीकरण, मोबाइलचं आगमन आणि प्रचंड वेगानं झालेला प्रसार.. या आणि अशा असंख्य घटना-प्रसंगांनी समाजाची मानसिकता बदलत, घडत गेली. त्यांनी राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक साधनव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थांची उलथापालथ केली. या उलथापालथीतलं वास्तव साहित्यात येत राहिलं. पण या बदलांचाच एक साहित्यप्रवाह निर्माण व्हायला पाहिजे होता, किंवा या बदलांबरोबर साहित्य प्रवाहित राहायला पाहिजे होतं; परंतु तसं काही झालं नाही. हे घटना-प्रसंग, बदल आणि मराठी साहित्य एकमेकांपासून दूरच राहिले. अपवादात्मक शिंतोडे उडले काही; पण ते ठळक झाले नाहीत. (भारताला मिळालेलं स्वातंत्र्य तर मराठी ललित साहित्यात गडपच आहे. काही मोजक्या कवितांचा अपवाद!)
याची कारणं मराठी साहित्य लिहिण्याचा जो एक ठरीव साचा झाला आहे, त्यात शोधावी लागतील. पहिलं म्हणजे मराठीत जे काही लिहिलं जातं ते बहुश: आत्मकथनात्मक असतं. त्यातही ते सहसा स्वत:च्या भूतकाळाच्या अनुषंगानंच लिहिलं जातं. आणि बहुतेक मराठी साहित्य- मागच्यांनी जसं लिहिलं तसं- म्हणजे अनुकरणात्मकच असतं. मराठी साहित्य अंतर्मुख आणि आत्मकेंद्री असतं. ते बहिर्मुख होत नाही. स्वत:हून बाहेर जाऊन दुसऱ्याचा वेध घेत नाही. समकाल तर फारच कमी लिहिला जातो मराठीत. आणि भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या साहित्याचा दुष्काळच आहे. त्यात पुन्हा मानवी अस्तित्वाचं वास्तव जसंच्या तसं येईल याची हमी नाही. शक्यतो आत्मगौरव, काल्पनिक अस्मिता आणि आपल्यावर झालेले अन्याय यांचेच दर्शन जास्त. आपल्या हातून घडलेल्या चुका आणि पापं सांगणारं साहित्य मराठीत जवळजवळ नाहीच. त्यात मग सर्व बाजू कवेत घेऊन साहित्यात जे टोकदार वास्तव यायला हवं, त्याला फाटा बसतो.
साहित्यात समकालीन लिहिणं म्हणजे पत्रकारितेतल्याप्रमाणे आताची ताजी घटना लगेचच लिहून काढणं नव्हे. एखाद्या घटना-प्रसंगाचं, उलथापालथीचं साहित्य यायलाही काहीएक अवकाश लागतो. ती घटना लेखकाच्या मेंदूत मुरावी लागते. तिच्या चारही बाजू तपासायला आणि अभ्यास करायला वेळ लागतो. पुरेसा वेळ घेऊन लिहिलेलं आणि सर्व बाजू समान न्यायानं मांडणारं साहित्य म्हणजे समकालीन साहित्य. पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत देशी वातावरणात सर्वच पातळ्यांवर घडलेल्या उलथापालथी पाहिल्या, त्या उलथापालथींच्या परिणामांनी घडलेली मराठी मनं पाहिली, आणि त्या चष्म्यातून मराठी साहित्य जोखलं तर लक्षात येतं की, मराठी साहित्य समकालीन तर नाहीच; पण वास्तवही नाही. (मोघम अपवादांनी हा मुद्दा स्वत:ला लावून घेऊ नये.)
त्यातच मराठी साहित्याची एका चुकीच्या धारणेवर अपार श्रद्धा आहे. जे आपल्या आयुष्यात घडतं, आपल्या अनुभवात येतं तेवढय़ावरच लिहावं. त्याबाहेर लिहिणं हे योग्यही नाही अन् खरंही नाही. त्यासाठी अनुभव आपोआप अंगावर येण्याची वाट बघावी; अनुभव अंगावर घ्यायला जाऊ नये, अशी ती धारणा आहे. (आता लिहिणारे बहुतेक हे आर्थिकदृष्टय़ा मध्यम आणि कनिष्ठ स्तरांतलेच असतात.. त्यांच्या अंगावर काय वेगवेगळे अनुभव चालून येणार? ते साधारणत: एकसारखेच असणार. त्यामुळं त्यांचे साहित्यही एकसारखं, एकसाची आणि एका पुस्तकाचीच पुनरावृत्ती असं होतं. त्यात नावीन्य येत नाही. आणि बहुतेक वाचकही याच आर्थिक गटांतले आणि अनुभवांतले असल्यामुळं ते प्रत्येक पुस्तकात स्वत:चंच आयुष्य किती वेळा वाचणार? त्यामुळं ते नावीन्य देणाऱ्या अनुवादांकडं पळतात.)
या धारणेनं मराठी साहित्याचं पुरेसं नुकसान झालं आहे. विषय आणि आशयाचा एकच एक ढाचा मराठी साहित्यात आहे असं चित्र उभं राहिलं आहे. (तरीही ‘परकायाप्रवेश करून लिहिलं पाहिजे’ हे वाक्यही पुन्हा इथं लोकप्रिय आहे. पण तसं करणाऱ्या साहित्यिकांना मात्र आत्मकथनात्मक लिहिणाऱ्या बहुसंख्य साहित्यिकांच्या मांदियाळीत अल्पसंख्य एवढाही दर्जा नाही.) आपल्याबाहेरच्या दुसऱ्याचं जगणं समजून घ्यावं, त्याचा अभ्यास करावा, दुसरी बाजू नीट उमगून घ्यावी, याची तोशीस आणि कोशीस मराठी साहित्यात दिसत नाही. मी माझंच लिहिणार, माझ्याबद्दलच लिहिणार. त्यात दुसऱ्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा काही संबंध आलाच तर- मला ते दुसरं जितकं दिसतं तितकंच आणि माझ्या मनात उमटणाऱ्या प्रतिक्रियेपुरतंच लिहिणार. त्या दुसऱ्याचा- तो सहज उपलब्ध असतानाही- व्यवस्थित अभ्यास करून मगच त्याला साहित्यात आणणार नाही. पुस्तक माझं आहे, तर ते मी माझ्यापुरतंच आणि माझ्याच नजरेतून लिहिणार! असं आत्ममग्नतेत गुंतलेलं आणि स्वत:बाहेरच्या प्रत्येक बाबीबद्दल फक्त प्रतिक्रियावादी होणारं साहित्य म्हणजे मराठी साहित्य! (अशा प्रकारचं कोणतंही पुस्तक उघडून बघा- त्यातून फक्त एकच बाजू कळण्याची सोय होते. तीही पुन्हा आत्मगौरवात आणि अस्मितेतच अडकल्यानं खरी नसते, वास्तव नसते. असं पुस्तक सम्यक, व्यापक होतच नाही.) पण अशाच साहित्याचा मराठीत जोर आहे. (इथं स्वत:बाहेर जाऊन लिहिणारं एक नाव पटकन् आठवलं म्हणून सांगतो : श्री. दा. पानवलकर)
मराठी साहित्यात आणखी एक क्रांतिकारक गोष्ट झाली- जी जगभरच्या कुठल्याही साहित्यात घडली नाही. १९८० च्या आधी मराठी साहित्यात फक्त ‘साहित्य’ जन्माला यायचं. त्यानंतर मात्र दलित साहित्य, ब्राह्मणी साहित्य, ग्रामीण, नागर, प्रादेशिक, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, आदिवासी अशा साहित्याच्या विभागण्या झाल्या. (‘हिंदू साहित्य’ असा प्रकार मात्र जन्माला आला नाही.) यावर सांगण्यात आलं, की अभ्यासासाठी आणि ब्राह्मणांची साहित्यातली मक्तेदारी मोडून इतरांनाही उन्मेषाची संधी मिळण्यासाठी म्हणून या विभागण्या आवश्यक आहेत. विद्यापीठांनी तसे अभ्यासक्रमही सुरू केले. या विभागण्यांचे निकष जातवादी, धर्मवादी राहिले. मूळ निकष राहिला- लेखकांची आडनावं. लेखकानं कुठल्याही विषयावर लिहिलेलं असो, विषयावरून त्याची दलित, ग्रामीण, ब्राह्मणी इत्यादी विभागणी करायची नाही, तर त्याच्या आडनावावरून आधी त्याची जात किंवा धर्म शोधायचा, मग त्याची रवानगी त्या- त्या विभागणीच्या कप्प्यात करायची. १९८० च्या आधीच्या साहित्यिकांनाही आडनावावरून या कप्प्यांत टाकण्यात आलं. ८० नंतर लिहिणाऱ्यांना जन्मजातच हे कप्पे मिळाले. मराठी साहित्य असं कप्पेबंद झालं. साहित्य नुसतं साहित्य राहिलं नाही, अन् साहित्यिक नुसते साहित्यिकही राहिले नाहीत. त्यांच्या कपाळावर जात-धर्माच्या पट्टय़ा आल्या. मग या पट्टय़ा लेवून त्यांनी काय लिहायचं, याचे र्निबध आले. प्रत्येकानं आपल्याच कप्प्याचं लिहायचं. त्यात आत्मकेंद्रितता आणि जुन्याच साहित्याचं नवं अनुकरण, हा रोग तर पारंपारिकच. तो कप्प्यांमध्येही शिरलाच. आणि कप्पेबंद साहित्याच्याही फक्त पुनरावृत्त्या होऊ लागल्या. प्रत्येकाचं आत्मकथन.. विषय जुनाच, लेखक फक्त नवा. कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट एकासाची. पुन्हा कप्प्याचा आत्मगौरव आणि अस्मिता सोबतीला! पुन्हा आपलाच कप्पा दुखावेल असं काही लिहायचं नाही. टीका नेहमी दुसऱ्या कप्प्यांवर करायची. स्वत:च्या कप्प्यातले टीकेचे विषय टाळायचे. (या कप्प्यांना पुन्हा अपवादही आहेत, हे लक्षात ठेवलंच पाहिजे.) या कप्प्यांना आपल्याच कप्प्यापुरतं लिहायचं असल्यानं त्यांच्याकडनं व्यापक समाजाचं, मानवी व्यापक मूल्यांचं लिहिता येणं अवघडच. आणि मग वातावरणात, समाजात होणारे बदल, मोठय़ा घटना यांची दखल घेणं जमेनासं झालं. अन् घेतली गेली ती दखल; तर तिला स्वत:ची जात, धर्म यांचे चष्मे चढवले जाऊ लागले. या साहित्याला खुलं, वास्तव आणि व्यापक अवकाशच येईना.
या विभागण्यांनी थोडय़ा गमतीही झाल्या साहित्यात. ग्रामीण भागावर लिहितो तो ग्रामीण लेखक, दलितांवर लिहितो तो दलित लेखक, मुस्लिमांवर लिहितो तो मुस्लीम लेखक, शहरांवर लिहितो तो शहरी लेखक.. अशी ढोबळ व्याख्या मानली तर ती चालत नाही. ग्रामीण भागावर लिहिणारे जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, मनोहर तल्हार हे ग्रामीण लेखक ठरेनात. दलितांचं आयुष्य लिहिणारे श्री. म. माटे, आनंद यादव, राजन गवस हे दलित लेखक ठरेनात. कारण यांची आडनावं वेगळी. भालचंद्र नेमाडे शहर आणि खेडी यांवर लिहितात, तर त्यांना कुठं बसवावं, हे ठरेना. दलित, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन लेखकांनी खेडय़ांवर लिहिलं तरी ते ग्रामीण लेखक ठरेनात. ग्रामीण लेखक म्हणजे जो शेतीशी संबंधित आहे तो- आणि विशेषत: मराठा किंवा कुणबी. पण मुसलमान, दलित शेतकऱ्यानं काही लिहिलं तर तो ग्रामीण ठरेना. तो मुसलमानच किंवा दलितच लेखक! मुसलमानांवर लिहिणारा दुसऱ्या जातिधर्माचा लेखक मुस्लीम लेखक ठरेना. (व्यंकटेश माडगूळकर, रंगनाथ पठारे, सानेगुरुजींनी मुस्लीम गोष्टी लिहिल्यात.) अशी सगळी मजा मजा. जात, धर्म, आडनाव महत्त्वाचं; लिहिणं नाही.
या विभागण्यांनी त्या- त्या विभागांचे खूप लेखक लिहिते झाले, ही खरीच गोष्ट. अभिव्यक्ती वाढली. पण अभिव्यक्तीवर विभागण्यांच्या चौकटीची बंधनं आली. उदाहरणार्थ, दलित जातींमधले आपापसातले संघर्ष कधीच साहित्यात आले नाहीत. मुसलमानांमधले आंतरिक संघर्ष साहित्यात आले नाहीत. खेडय़ांपासून शहरांपर्यंत राजकारणात मराठा प्राबल्य राहिलं, त्या अनुषंगानं येणारा अनाचार आणि मराठेच मराठय़ांना नाडतात, हे साहित्यात येईना. शाहू-फुले-आंबेडकरांची फक्त नावं घेतली जातात, पण अंमल शून्य. कामगारांचं संपणं, कारागिरी उद्ध्वस्त होणं, महाराष्ट्राच्या अर्थकारणावरची व्यापाऱ्यांची पकड, मध्यमवर्गाचं वाढणं, शिक्षणाचा जातविशिष्ट आणि जातीय धंदा हे विषय मोघम सोडले तर ठळकपणे साहित्यात येईनात. आणि आले तरी ‘साहित्यिक’ किंवा अलंकारिक भाषा, वास्तव, रोखठोक, नियमित वापरातली भाषा गायब! जाती आणि धर्म प्रत्यक्षात जो द्वेष करतात एकमेकांचा; अन् त्यांच्यात जो समकालीन तीव्र संघर्ष चालतो, तो येणं.. खराखुरा येणं तर सध्या बंदच झालंय. एका कप्प्याच्या लेखकाकडून दुसऱ्या कप्प्याच्या सखोल अभ्यासाची तर तीव्र वानवाच.
आजचा नवा.. चालू काळ त्या अर्थानं साहित्यात येतच नाही. साधनांचा अन् संपर्काचा विकास अचाट झाला. खेडय़ांचं कथित शहरीकरण झालं. परंतु शहरं ही शहरं होण्याऐवजी अव्यवस्थेची अवाढव्य खेडीच झाली. सायकलीला महाग असलेल्या लोकांमध्ये वाहनं तुंबळ वाढली. राजकारण आणि समाजकारण आर्थिक हितसंबंधांचा धंदा झाला. माणसामाणसांतली पारदर्शकता पूर्णच आटली. खेडी, शहरं जातीयवादी, धर्मवादीच होती; पण ती आता टोकदार, क्रूर झाली. साधनं, संपर्क यांच्या विकासानं चंगळवाद वाढला. चंगळवादानं माणसांच्या वृत्ती-प्रवृत्ती बदलल्या. मूल्यव्यवस्था बदलल्या. भ्रष्टाचार, व्यभिचार, अनाचार, बलात्कार वाढले. जातीय, धार्मिक भावना वाढल्या. ‘देश’ ही भावना फक्त पकिस्तानच्या विरोधापुरतीच उरली. कायदा विकत घेण्याचं प्रमाण वाढलं. पैशांचा, सत्तेचा माज वाढला. वशिले वाढले. खून वाढले. विषय चिक्कार आहेत. पण या सगळ्या बदलांचं चित्रण- तेही त्यातल्या खऱ्यासह- वास्तव चित्रण अपवादस्वरूप सोडलं तर मुख्य प्रवाह म्हणून मराठी साहित्यात दिसत नाही. मराठी साहित्याच्या जातीय-धार्मिक अशा अभ्यासपूर्ण विभागण्या अजूनही जुनंच काहीतरी लिहिताहेत. जुन्याच भांडवलाची जुनीच दुकानं चालवताहेत. कित्येक विषय तर टाळताहेतसुद्धा. आताचा समाज जसा आहे तसा साहित्यात येतच नाही. जुन्याच विषयांवर कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट असं चालू आहे. मराठी साहित्य म्हणजे जातीय, धार्मिक, वैचारिक, लैंगिक, प्रादेशिक विभागण्यांसह स्मरणरंजनाचा भूतकालीन खेळ होऊन बसला आहे. त्यात विषयांच्या, आशयाच्या आणि मांडणीच्याही बाजूनं तोच तोचपणा आहे. मांडणीचीही मोडतोड कुणी करत नाही. (मुळात आधुनिक मराठी साहित्य हे इंग्रजांचं अनुकरण आहे.) भाषिक मोडतोडही होत नाही. (मराठीत इंग्रजी शब्द पेरण्याला भाषिक मोडतोड समजलं जातं.) त्यामुळं नव्या काळाची नवी भाषाही जन्माला येत नाही. (अपवाद इथं गृहीत धरलेले नाहीत.)
सभोवती रोज लाखो घटना घडताहेत आणि असंख्य बदल होत आहेत. साधन-सुविधांनी त्या पटापटा लोकांपर्यंत पोहोचताहेत. त्यांनी माणसांच्या आजच्या मानसिकताही बदलल्या आहेत. पण त्यांचा फारसा आढळ मराठी साहित्यात होत नाही. आधुनिक साधन-सुविधांचे उल्लेख साहित्यात निश्चितपणे होतात; पण चांगल्या-वाईट आधुनिक मानसिकता, आधुनिक वास्तव यांचं सखोल दर्शन मराठी साहित्यात होत नाही.
१९८० च्या आधी मराठी साहित्यात फक्त ‘साहित्य’ जन्माला यायचं. त्यानंतर मात्र दलित साहित्य, ब्राह्मणी साहित्य, ग्रामीण, नागर, प्रादेशिक, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, आदिवासी अशा साहित्याच्या विभागण्या झाल्या. या विभागण्यांचे निकष जातवादी, धर्मवादी राहिले. मूळ निकष राहिला- लेखकांची आडनावं. लेखकानं कुठल्याही विषयावर लिहिलेलं असो, विषयावरून त्याची दलित, ग्रामीण, ब्राह्मणी इत्यादी विभागणी करायची नाही, तर त्याच्या आडनावावरून आधी त्याची जात किंवा धर्म शोधायचा, मग त्याची रवानगी त्या- त्या विभागणीच्या कप्प्यात करायची.
जागतिकीकरण येत होतं तेव्हा मी पत्रकारिता करत होतो. तेव्हा वाटलं, या जागतिकीकरणानं देशातली जातव्यवस्था, धर्मव्यवस्था नष्ट होईल. दारिद्र्य संपेल. कुटुंबव्यवस्था समपातळीची होईल. समाज सुसंस्कृत होईल. पण झालं भलतंच! अर्थव्यवहार फोफावला, पण दारिद्र्यही वाढलं. माणसामाणसांत सहानुभूतीच्या ऐवजी जीवघेणी स्पर्धा वाढली. आणि या स्पर्धेसाठी जात, धर्म, लिंग, संप्रदाय, अंधश्रद्धा, प्रदेश या गोष्टी जास्तच वापरल्या जाऊ लागल्या. समाज अधिकच भेदांमध्ये आणि टोळ्यांतून विभागला गेला. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, घरं या मूलभूत सुविधांचा धंदा अनाचाराला पोहोचला. माणसांचं- खेडय़ांतल्या आणि शहरांतल्याही- जगणं अनिश्चित झालं. स्पर्धेमुळे एकमेकांतली आस्था संपली. विश्वास संपला. माणसं शिक्षित झाली; पण ते शिक्षण पैसाकेंद्री असल्यानं माणसांचं ज्ञानी आणि समंजस होणं राहून गेलं. माणसं डोक्यानं आणखीन मागास झाली, अन् त्यातून विकृती वाढल्या. एकमेकांना समजून घेण्यापेक्षा आडवं जाण्याची वृत्ती वाढली. सध्या खोटानाटा इतिहास उकरून भांडणं चालू झाली आहेत. महापुरुषांचा धंदा माजलाय. त्यांचं जातीकरण झालंय. कुटुंबं विस्कळीत झालीत. नातेसंबंध स्वतंत्र तोंडाचे आणि तणावाचे झालेत. पैसा हे नातेसंबंध आणि प्रेम किंवा द्वेषाचं परिमाण झालंय. पैसा न कमावणारांची रद्दी होतेय. गुन्हेगारी वाढलीय. शेती मरतेय. लघुउद्योग मरताहेत. आत्महत्यांची कारणं वाढलीत, आणि आत्महत्याही वाढल्यात. नैतिकता आणि तत्त्वं या गोष्टी फक्त तोंडदेखल्या उरल्यात. कोणत्याही गोष्टींत सवंगपणा अन् उथळपणा वाढलाय. प्रत्येकाला कोणत्याही मार्गानं श्रीमंत आणि कीर्तिवान व्हायचंय. जागतिकीकरणाच्या परिणामांची ही काळी बाजू. असे कितीतरी विषय आहेत. या आणि अशा असंख्य कंगोऱ्यांचे साहित्य मुख्य प्रवाह म्हणून अजून उभंच राहत नाहीए. अर्थात या सगळ्यात आदर्श माणूसपणा आहेच. नाही असं नाही. तोही कुठंतरी कोपऱ्यात आहेच बसलेला. त्याचंही साहित्य होऊ शकेल.
विभागण्यांच्या कंपूबाहेरही खूप लेखक आहेत मराठीत. पण त्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य संकटात आलंय. समाजात भेद प्रचंड वाढलेत. आणि सगळेच भेद आता आक्रस्ताळे आणि आक्रमक झाले आहेत. आधुनिक काळ जसाच्या तसा आणि वास्तव लिहावा अशी इच्छा बाळगणारेही लेखक असणारच. पण आपण खरं काही लिहावं, नाटक-चित्रपटात दाखवावं, तर त्यानं कुणीतरी दुखावेल, कुणीतरी घटक नाराज होईल, कुणीतरी अंगावर धावून येईल याची भीतीही आधुनिक काळात प्रचंड वाढलीय. त्याबाबतीत सुसंस्कृत संरक्षणाची यंत्रणाही समाजात आज फारशी उपलब्ध नाही.
पण यात एक गंभीर मुद्दा आहेच पुन्हा. लेखकांना हे लिहावंसं वाटत नसेल असं अजिबात नाही. विभागण्यांच्या कंपूबाहेरही खूप लेखक आहेत मराठीत. पण त्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य संकटात आलंय. समाजात भेद प्रचंड वाढलेत. आणि सगळेच भेद आता आक्रस्ताळे आणि आक्रमक झाले आहेत. आधुनिक काळ जसाच्या तसा आणि वास्तव लिहावा अशी इच्छा बाळगणारेही लेखक असणारच. पण आपण खरं काही लिहावं, नाटक-चित्रपटात दाखवावं, तर त्यानं कुणीतरी दुखावेल, कुणीतरी घटक नाराज होईल, कुणीतरी अंगावर धावून येईल याची भीतीही आधुनिक काळात प्रचंड वाढलीय. त्याबाबतीत सुसंस्कृत संरक्षणाची यंत्रणाही समाजात आज फारशी उपलब्ध नाही. जातीय, धार्मिक कंपूंत जगणाऱ्या लोकांना त्यांच्या कंपूचं तरी बळ असतं, पण या कंपूबाहेर निव्वळ लेखक म्हणून जगणारे समाजात एकटे असतात. त्यांनी खरं लिहावं, तर जगण्यातले धोके वाढतात. खरं तर लिहायचंय आणि धोके नसलेलं शांतही जगायचंय, अशा पेचात हे लेखक अडकलेले असतात. ते मग खरं लिहायचं टाळतात, किंवा खरं जसंच्या तसं लिहायचं टाळतात आणि सांकेतिक लिहितात. दुधाची तहान ताकावर भागवतात. एखादाच अपवाद असतो- जो समाजाच्या मूर्ख भडकपणाला अंगावर घ्यायला तयार होतो.
समाजातल्या भेदांचा उग्रपणा ही आधुनिक काळाचीच देणगी आहे. या उग्रपणाच्या दडपणाखाली मराठी साहित्य पिचतंय अशी सध्याची स्थिती आहे. साहित्यावर आधारलेली नाटकं आणि चित्रपटही पिचताहेत. परंतु समाज आदर्शाकडं.. चांगल्या माणूसपणाकडं न्यायचा असेल तर लेखकांनी समाजाचा उग्रपणा अंगावर घेण्याची अन् त्यात होरपळण्याची तयारी दाखवल्याशिवाय पर्याय नाही. मी सध्या यावर कादंबरी लिहितोय..
लेखक राजन खान