येत्या १४ जून रोजी संगीत रंगभूमीचे एक अध्वर्यु .. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकासही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या चिरतरुण नाटककाराचा आणि त्याच्या तितक्याच चिरंजीवी नाटय़कृतीचा मागोवा घेणारा विशेष लेख..
१४ जून १९१६ हा विख्यात नाटककार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, नाटय़पदरचनाकार, तालीम मास्तर गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन. या वर्षी १४ जून २०१६ रोजी त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांची सांगता होते आहे. त्याबरोबरच त्यांच्या गाजलेल्या नाटकांपैकी ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाच्या शताब्दी वर्षांचीही सांगता होत आहे (२०- १०-२०१६)! नाटककाराचं मृत्युशताब्दी वर्ष आणि त्यांच्या चिरतरुण असलेल्या नाटकाचं शताब्दिपूर्ती वर्ष असा आगळावेगळा योग यावर्षी आलेला आहे.
महाराष्ट्रात संगीत नाटकांचे जनक अण्णासाहेब किलरेस्कर यांच्यानंतर नाटककार म्हणून नाव घेतलं जातं ते देवल मास्तरांचंच. देवलांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ चा. ते ज्या हायस्कुलात शिकत होते तिथे अण्णासाहेब त्यांचे शिक्षक होते. त्यांचा तिथून गुरू-शिष्य संबंध सुरू झाला आणि किलरेस्कर नाटक मंडळी स्थापन झाल्यावर तो अधिकच दृढ झाला. अण्णासाहेब किलरेस्करांची ‘शकुंतला’ सुरुवातीला गद्य होती. भाऊराव ऊर्फ भावडय़ा कोल्हटकरांचं नाटक कंपनीत आगमन झालं आणि ‘शकुंतला’ गाऊ लागली. त्यासाठी अण्णासाहेबांनी स्वत: पदं न लिहिता मोठय़ा विश्वासानं ती आपल्या शिष्याला करायला सांगितली. आणि देवलांनी आपल्या गुरूचा विश्वास सार्थ ठरवला.
देवलांनी एकंदर सात नाटकं लिहिली. ‘दुर्गा’, ‘मृच्छकटिक’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘शापसंभ्रम’, ‘झुंझारराव’, ‘फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा’ आणि ‘शारदा’! यातलं ‘शारदा’ हे त्यांचं एकच स्वतंत्र नाटक. त्यांची इतर सर्व नाटके भाषांतरित वा रूपांतरित आहेत.
‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकाची जन्मकथा मोठी मजेशीर आहे. प्रख्यात फ्रेंच नाटककार मोलियर याच्या ‘Sganarelle’(स्गॅनारेल) या प्रहसनावरून मर्फी या इंग्रज नाटककारानं ‘All in the wrong’ हे त्याचं इंग्रजी रूपांतर केलं. दुसरं ‘Imaginary cuckold’ म्हणजे ‘बायकोचा काल्पनिक जार किंवा प्रियकर’ या नावाने प्रसिद्ध आहे. यापैकी ‘ऑल इन द राँग’ हे नाटक देवलांच्या वाचनात आल्या आल्या त्यांनी त्याचं ‘फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा’(१८९३) या नावाने मराठीत रूपांतर केलं. या नाटकाचे प्रयोग शाहू नगरवासी व इतरही कंपन्या करीत असत. नटसम्राट गणपतराव जोशी हे स्वत: फाल्गुनरावाची भूमिका करीत असत. परंतु हे प्रहसनात्मक विनोदी नाटक त्याकाळी फारसं चाललं नाही. कदाचित विलायती फाल्गुनरावाला मराठी पेहराव फिट बसला नसावा. त्यामुळे हळूहळू ते नाटक बाजूला पडल्यासारखं झालं होतं. गणपतराव जोशींच्या निधनानंतर ते पूर्णपणे बंद पडलं होतं.
१९११ साली काकासाहेब खाडिलकरांचं ‘सं. मानापमान’ आलं आणि संगीत नाटकांत आमूलाग्र क्रांती झाली. सुरुवातीला किलरेस्कर आणि नंतर गंधर्व नाटक मंडळीला या नाटकाने अमाप पैसा, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानंतर १९१३ साली ‘विद्याहरण’ हे कच-देवयानीच्या कथेवर बेतलेलं नाटक आलं. परंतु त्याला ‘मानापमान’ची लोकप्रियता लाभली नाही. देवलांच्या ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. शारदा’, ‘झुंझारराव’ (गद्य) नाटकांचे प्रयोग सुरू होतेच. शारदेतील नायकाची भूमिका साकारणारे भाऊराव कोल्हटकर यांच्या निधनानंतर देवलांनी नवं नाटक लिहिलं नव्हतं. तेव्हा गंधर्व नाटक मंडळीसाठी नवीन नाटक लिहिण्याची गळ जेव्हा देवलांना घातली गेली तेव्हा देवलांनी मूळच्या गद्य फाल्गुनरावाला संगीताचा साज चढवून त्याचं संगीत नाटक करावं असं ठरवलं. नाटक संगीत करताना मूळच्या नाटकात देवलांनी काही महत्त्वाचे फेरफार केले आणि प्रसंगाला शोभतील अशी पदेही करावयास सुरुवात केली. साहजिकच आपल्याला हव्या असलेल्या चालींवर देवलांनी पदे रचावीत अशा गायक नटांकडून सूचना येऊ लागताच देवल संतापले. ‘गायक नटांच्या लहरीप्रमाणे पदे करणारा मी नव्हे. वेडय़ावाकडय़ा चालींवर मी पदे करू शकणार नाही असे नाही; पण या पदांकडे लोक माझी पदे म्हणून पाहणार आहेत हे लक्षात ठेवा..’ अशा शब्दांत देवलांनी या गायक नटांना ठणकावले. खरंच, आपण जर ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. शारदा’ आणि ‘सं. संशयकल्लोळ’ची पदे अभ्यासली तर त्यांचा हा संताप अनाठायी नाही हे सहज लक्षात येतं.
नाटकातली पदे तयार झाली आणि १४ जून १९१६ या दिवशी देवलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे शिष्य गणपतराव बोडस यांनी गंधर्व नाटक मंडळीतील नटांच्या तालमी घेऊन या नाटकाचा पहिला प्रयोग २० ऑक्टोबर १९१६ रोजी हुबळी येथे केला आणि त्याला जी लोकप्रियता लाभली, ती आजतागायत कायम आहे. नटसम्राट गणपतराव जोशींना जे भाग्य लाभलं नाही ते गणपतराव बोडस यांना लाभलं. ते पाहायला त्यांचे गुरू मात्र हयात नव्हते.
नाटक बसत होतं. पदांच्या तालमीही सुरू होत्या. या नाटकात फाल्गुनरावासाठी देवलांनी पदांची योजना केली होती. नाटकाच्या शेवटी साधू येतो आणि ‘हृदयि धरा हा बोध खरा’ म्हणतो आणि नाटक संपतं. आता प्रथेप्रमाणे नाटकाला भरतवाक्य पाहिजे. ते कोण लिहिणार, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी देवलांच्याच ‘सं. विक्रमोर्वशीय’ या नाटकातलं ‘चिन्मया सकलहृदया’ हेच भरतवाक्य ‘संगीत संशयकल्लोळ’ला वापरावं असं ठरलं. ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ या रेवतीच्या पदाची चाल मास्तर कृष्णरावांनी दिली ती देवलांच्या सांगण्यावरून!
‘सं. संशयकल्लोळ’च्या पहिल्या प्रयोगात फाल्गुनराव- गणपतराव बोडस, कृत्तिका- सदुभाऊ रानडे, अश्विनशेट- दत्तोबा पेटकर आणि रेवती- बालगंधर्व असा संच होता. कंपनीतील प्रमुख नट मा. कृष्णराव यांना कामच नव्हतं. त्यामुळे सत्यनारायणाच्या प्रवेशात जलशाची योजना करण्यात आली. त्यात मास्टर कृष्णराव छोटेखानी मैफल करत असत. त्यामुळे नाटकाच्या लोकप्रियतेत भरच पडली. ही प्रथा नंतरच्या लोकांनी पाळली आणि ‘रेवतीच्या महाली बडे गुलाम अली’ किंवा ‘जलशात फुलराणी राणी वर्मा’ अशाही जाहिराती केल्या गेल्या. काळाचा महिमा!
शकुंतला, सुभद्रा, भामिनी, शारदा अशा खानदानी भूमिका करणाऱ्या बालगंधर्वानी ‘सं. मृच्छकटिक’ आणि ‘सं. संशयकल्लोळ’मध्ये गणिकेची भूमिका केली; परंतु त्यांनी आपली केशभूषा आणि वेशभूषा मात्र कायम ठेवली. नऊवारी लुगडे, केसांचा अंबाडा, त्यावरची वेणी हे सगळं कायम होतं. रसिकांसमोर असलेली त्यांची सोज्ज्वळ प्रतिमा जपण्यासाठी कदाचित त्यांनी हे केलं असावं.
त्यात बदल केला तो रघुवीर सावकार यांनी. सावकार मूळचे गोव्याचे. त्यामुळे गोव्यातल्या कलावंतीणीची साडी नेसण्याची पद्धत, केशभूषा, चालण्या-बोलण्यातला नखरा त्यांनी उचलला आणि आपली रेवती सिद्ध केली. जलशाच्या प्रवेशात ते स्वत: अदा करून ‘ऐसी ना मारो पिचकारी’ ही ठुमरी नवरसात गाऊन दाखवत असत. (याचं प्रात्यक्षिक त्यांचे चिरंजीव प्रसाद सावकार हे आमच्या दौऱ्याच्या वेळी करून दाखवत असत.) नाटकाच्या शेवटी रेवतीची आई मघा नायकीण येते त्यावेळी रेवतीशी गोव्याच्या कोकणी भाषेत बोलण्याचा पायंडा त्यांच्या ‘रंगबोधेच्छु नाटय़समाज’मध्येच पडला. त्यांच्याबरोबर फाल्गुनरावाची भूमिका वसंतराव सावकार, तर भादव्याची भूमिका गोपीनाथराव सावकार हे करीत असत. रघुवीर सावकार दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्यासारखी नखरेल रेवती दुसरी झाली नाही असं अनेक जाणकारांचं मत आहे.
बालगंधर्वाच्या निधनानंतर त्यांचे ऑर्गनवादक अनंतराव लिमये हे १५ जुलैला दरवर्षी संगीत नाटकाचा प्रयोग साहित्य संघात करीत असत. पहिल्या वर्षी (१९६८) ‘सं. मृच्छकटिक’ आणि दुसऱ्या वर्षी ‘सं. संशयकल्लोळ’ हे प्रयोग पाहण्याचा योग आला होता. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे मा. अनंत दामले यांनी वसंतसेना आणि रेवती या भूमिका त्यात साकारल्या होत्या. अश्विनशेठने दिलेली तसबीर त्यांनी घेतली, पण लगेच पद सुरू न करता त्यांनी त्या तसबिरीचं चुंबन घेतलं, ती हृदयाशी घट्ट धरली. या अॅक्शनमुळे अश्विनशेठच्या पुढच्या ‘हं, माझ्यापेक्षा त्या तसबिरीचंच नशीब मोठं!’ या वाक्यातला गर्भितार्थ चटकन् प्रेक्षकांच्या लक्षात आला.
मुळातल्या फ्रेंच, नंतर इंग्रजी आणि त्यावरून मराठीत आलेल्या फाल्गुनरावाने मराठी संगीत रंगभूमीवर जो कल्लोळ गेली शंभर वर्षे माजवला आहे त्याला तोड नाही. देवलांच्या गद्य भागाला दाद द्यावी की संगीताला, की त्यांनी पात्रांच्या नावांची निवड करताना जे कौशल्य दाखवलंय त्याला द्यावी, हेच समजत नाही. या सगळ्याचं एक अजब रसायन अनेक वर्षे रसिकांच्या मनाला भुरळ घालते आहे यात मात्र ‘संशय’ नाही.
या नाटकात तशा छोटय़ा छोटय़ा त्रुटी आहेत. पण प्रयोगाचा झपाटा इतका विलक्षण आहे, की त्यात त्या सगळ्या कुठल्या कुठे हरवतात. फाल्गुनरावांचा संशय वाजवी; कारण तो बिजवर. कृत्तिकेचा संशय वाजवी; कारण ती फाल्गुनराव आणि रेवती यांना खिडकीतून पाहते. रेवतीला तसा संशय नसतो, पण फाल्गुनराव तिचा गैरसमज करून देतो. फक्त अश्विनशेठला जो संशय येतो- की रेवतीला दिलेली तसबीर तिनं फाल्गुनरावाला दिली, त्याला मात्र काही आधार नाही. कारण एका पुरुषाची तसबीर दुसऱ्या पुरुषालाच नजर करण्यात काहीच रोमान्स नाही. याचा खुलासा एवढाच, की फाल्गुनराव म्हणतो त्याप्रमाणे ‘एकदा संशयाच्या डगरीवरून घसरत चाललं की चाललं घसरत खाली खाली..’ एवढी एक गोष्ट सोडली तर इतकं अप्रतिम नाटक रंगभूमीला दिल्याबद्दल देवलांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच.
वाईट एवढंच वाटतं की, या नाटकाचं यश पाहायला देवल नव्हते. त्यांची अण्णासाहेबांवरची गुरूभक्ती त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसते. ‘चिंतुनिया मनि बलवंताला’, ‘मग नत बलवंतपदि’, ‘बलवत्पदनत गोविंदाने’ या गुरूस्मरणातून ती प्रत्ययाला येते. किलरेस्करी संगीतपद्धती देवलांनी अनुसरली, वाढवली आणि वैभवाला पोहोचवली. देवलांनंतर ती प्रथा संपली. कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी यांच्यापासून वेगळी प्रथा सुरू झाली. तीही रुजली, फोफावली, लोकप्रिय झाली. या वर्षी जूनमध्ये ‘सं. पुण्यप्रभाव’ नाटकाच्याही शताब्दी वर्षांची सांगता आहे. या नाटकाचं वैशिष्टय़ असं की, हे नाटक मूळ संगीत म्हणूनच लिहिलं गेलं आणि त्यातल्या नांदीपासून (प्रभुपदास नमित दास) ते भरतवाक्यापर्यंत सर्व पदरचना गडकरी यांचीच आहे. या नाटकाचे संगीत प्रयोग किलरेस्कर नाटक मंडळी, तर गद्य प्रयोग महाराष्ट्र नाटक मंडळी करीत असत. आणि दोन्हीही तितकेच लोकप्रिय होते.
१९१६ मध्ये देवलमास्तर गेले. त्यानंतर तीनच वर्षांनी १९१९ ला राम गणेश गडकरी गेले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या ‘सं. एकच प्याला’ आणि ‘सं. भावबंधन’ या दोन्ही नाटकांनी बालगंधर्व आणि मा. दीनानाथ हे कीर्तीच्या शिखरावर चढले. परंतु ते पाहायला गडकरीही हयात नव्हते.
या मास्तरद्वयांना शतश: वंदन!
अरविंद पिळगावकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा