हल्ली ग्रामीण भागांतही सुबत्तेची नवनवी बेटं तयार होत आहेत. परिणामी ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ ही गावे आणि शहरांची पूर्वीची मांडणी सुधारून घेण्याची वेळ आज आली आहे. ग्रामीण भारतातही आता एक ‘पोट-इंडिया’ निर्माण झालेला दिसतो. दूरचित्रवाहिन्या, मालिका आणि चित्रपटांतून दिसणारी चत्रंगी संस्कृती हा या पोट-इंडियासमोरचा आदर्श आहे. त्यामुळे इथली संस्कृतीही झपाटय़ाने बदलते आहे. ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांमध्ये याचे लख्ख दर्शन घडते. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील गावागावांतून लग्नसमारंभांमध्ये राजकीय लागेबांधे तसेच सत्ता-संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची जणू अहमहमिकाच दिसून येते. ग्रामीण भागातील लोकांच्या बदललेल्या या मानसिकतेबद्दल..
कांद्याच्या लांब-रुंद चाळीसारखी बांधलेली इमारत. आत एक भलंमोठं स्टेज. त्याच्या दोन्ही बाजूंना वधु-वराच्या जानोसवाडय़ासाठीच्या खोल्या. सिमेंटच्या पत्र्याचं छत. त्याच्याखाली कापडी रंगीबेरंगी कनात आणि त्याला लटकत असलेले पंखे. खाली स्टेजच्या बाजूला दोन्ही कोपऱ्यांत स्पीकरची उंचच उंच काळी खोकी. हा मुख्य हॉल! त्याला खेटूनच प्रशस्त जेवणघर. एका वेळी किमान पाचशे माणूस तरी बसेल एवढं. तिथं लोखंडी टेबल-खुच्र्याच्या रांगाच रांगा. मागच्या बाजूला स्वयंपाकघर. बाहेर दर्शनी भागात किंवा बाजूला काही मोकळी जागा ठेवलेली. त्यात हिरवळ, शोभेची झाडं आणि गाडय़ांचं पार्किंग.
हे मंगल कार्यालय.
गावातल्या कोणा धनदांडग्या बागायतदाराने किंवा व्यापाऱ्याने उभारलेलं. सहसा गावातल्या एसटी स्टँडच्या आसपास. पाहुण्यारावळ्यांना सोयीस्कर असं.
हल्ली महाराष्ट्रातल्या मोठय़ा गावांमध्ये अशा मंगल कार्यालयांची लाटच आली आहे. बागायती शेती आणि त्याच्या जोडीला शेतजमिनी ‘एनए’ करून, त्यांचे प्लॉट्स पाडून विकण्याचा धंदा यांतून ग्रामीण महाराष्ट्रातील विशिष्ट वर्गाला सुबत्तेची सूज आलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पारंपरिक सेवा-व्यवसाय होताच. शिक्षणसंस्था, बँका, पतपेढय़ा, दूध डेअऱ्या, कारखाने, त्यांना जोडून उभे राहिलेले पूरक व्यवसाय, त्यांतल्या नोकऱ्या यांच्या जोडीला अलीकडं सायबर कॅफे, मोबाइलची दुकानं, ब्युटीपार्लर, बीअर बार, ढाबे, पेट्रोल पंप असे विविधांगी व्यवसायही उभे राहिले आहेत. साधं मोबाइलचं उदाहरण घ्या. गावात मोबाइल येतो तेव्हा मोबाइलमध्ये गाणी भरून देणारे, रिचार्ज करणारे, ते दुरूस्त करणारेही येतात. या सेवेसाठी मोबाइल टॉवर लागतोच. त्यासाठी जागा दिली तर तिचं भाडं येतं. टॉवरच्या सुरक्षेचं, देखभालीचं काम येतं. अशा विविध सेवा आणि व्यवसायांतून हल्ली ग्रामीण भागातही सुबत्तेची बेटं तयार झाली आहेत. एकंदरच आता ‘भारत विरुद्ध इंडिया’ ही मांडणी सुधारून घेण्याची वेळ आली आहे. कारण या भूमिहीन, अल्पभूधारक आणि शेतमजुरांच्या, जिरायती अथवा छोटय़ा बागायतदारांच्या ‘भारता’तही आता एक ‘पोट-इंडिया’ निर्माण झालेला आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या ही त्याची संस्कार केंद्रं आहेत आणि मालिका, चित्रपटांतून दिसणारी चत्रंगी संस्कृती हा त्याचा आदर्श आहे. मंगल कार्यालयं ही या पोट-इंडियाची एक गरज आहे.
पण ती अनावश्यक आहे काय?
पूर्वी लग्नकरय होत ती आपल्या दारासमोर वा शेतात मंडप टाकून. कार्य बडय़ा घरचं असेल तर गावातली शाळा वा मंदिराचं आवार वा मैदान असे. आता त्याची जागा मंगल कार्यालयांनी घेतली असेल तर त्याबद्दल एवढी नाकं मुरडायचं कारण काय? उलट, या कार्यालयांनी वधू वा वरपित्याची सोयच केली आहे. कार्यात मोठय़ा जेवणावळी घालायच्या तर त्यासाठी सग्यासोयऱ्यांची कोण मनधरणी करावी लागे. नाहीतर मग एवढं मनुष्यबळ कोठून आणणार? मंगल कार्यालयांनी अलगद त्याची सोय लावली. आता फक्त पैसे फेकायचे, बाकी सगळं कार्य पार पाडण्यास कार्यालयातले श्री समर्थ असतातच!
मग याला नाव ठेवायचं कारण काय? याचं कारण- हा केवळ सोयीचा मामला नाही. ती पोट-इंडियातल्या सांस्कृतिक दुष्काळाची झगझगीत प्रतीकं आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात अशा मंगल कार्यालयांचं वाढलेलं प्रस्थ आणि लग्नकार्याचं बदललेलं स्वरूप हे एकाच वेळी घडलेलं आहे, हा काही योगायोग नाही. लाख- लाख रुपये दिवसाचं भाडं असलेल्या या मंगल कार्यालयांत होणाऱ्या विवाह समारंभांचा लसावि काढला, तर तो पैशांची वारेमाप उधळण आणि अभिरुचीहीन दिखाऊपणा असाच असेल. तो पाहायचा असेल तर त्यासाठी अशा एखाद्या लग्नाला सकाळपासून आवर्जून उपस्थित राहावं.
पूर्वी लग्नसमारंभ चार-चार दिवस चालत. ते प्रकरण मधल्या काळात एका दिवसावर आलं. सकाळी दहा वाजता साखरपुडा, दुपारी बारानंतर जेवण, त्यातच अहेराचा कार्यक्रम, अडीच-तीनला वराची मिरवणूक आणि चार वाजता शुभमंगल सावधान! मंडळी घरी जाण्यास मोकळी. हल्ली समारंभ सुरू होतो दहा-साडेदहाला. मात्र, विवाहाचा गोरज मुहूर्त असतो थेट सायंकाळी साडेसहाचा! कारण काय, तर स्टेजवर केलेली ‘लायटिंग’ वऱ्हाडाला दिसली पाहिजे. शिवाय वराच्या मिरवणुकीसाठी खास डीजे आणलेला असतो. त्याचा रसास्वाद संपूर्ण गावाला घेता आला पाहिजे. मग या मधल्या पाच-सहा तासांत वऱ्हाडी मंडळींचं ताटकळणं सुसह्य़ कसं करायचं? तर त्यासाठी खास व्यवस्था असते – ऑर्केस्ट्राची. चक्क मंगल कार्यालयात शुभमंगल सावधान होण्याआधी ही हिंदी-मराठी गाण्यांची दंगल भरते. ती न ऐकण्याचीही सोय नसते. स्टेजखाली रचलेल्या ध्वनिवर्धकांच्या भिंती तुमच्या काळजातच दणके देत असतात. विवाहानिमित्ताने कुठून कुठून पाहुणेरावळे येतात, एकमेकांना भेटतात, ख्यालीखुशालीच्या गप्पा मारतात. पण त्यांचं बोलणं एकमेकांना ऐकूच जाऊ नये अशी ही तमाम व्यवस्था असते. ध्वनिवर्धकाचा आवाज कानफाडू नसेल तर कार्यमालकास आपली इभ्रत कमी झाल्यासारखं वाटतं की काय कोण जाणे! हल्ली नारायणगाव, खेड, मंचर अशा ‘गुंठामंत्र्यां’चा सुळसुळाट असलेल्या भागांतील मंगल कार्यालयांत एक नवीन पद्धत दिसून येते. ती बहुधा ‘जाणता राजा’ वा तत्सम ऐतिहासिक नाटक, मालिकांतून वा गिरगाव-डोंबिवलीतील पाडव्याच्या शोभायात्रांतून उचललेली असावी. या कार्यालयांतून भालदार, चोपदार, अब्दागिऱ्या, तलवारी हे सगळं भाडय़ाने मिळतं. वर आणि वधू मंडपात येताना त्यांची कार्यालयातल्या कार्यालयात एक छोटीशी मिरवणूकच काढली जाते. शेरवाणीतला वर म्हणजे जणू छत्रपती. त्याच्या आजूबाजूला हे भालदार-चोपदार. मागे घागरा-चोलीतल्या हायहिलवाल्या करवल्यांचा थवा. पुढे वाजंत्री आणि त्यांच्याही पुढे चक्क तुतारीवाले. फक्त ‘होशियार, बा अदब, बा मुलाहिजा’च्या घोषणाच तेवढय़ा नसतात. अशीच मिरवणूक वधूचीही. या कार्यक्रमासाठी वधूला हल्ली आवर्जून नऊवारी नेसविली जाते. हे तेवढय़ावरच थांबत नाही, तर तिच्या डोक्याला फेटाही बांधतात आणि हातात चक्क तलवार देतात. डोळ्यांना रेबनचा गॉगल नसतो. अन्यथा थेट पाडवा शोभायात्राच! हे फेटे बांधण्याचं फॅड एवढं बोकाळलं आहे, की कार्यालयांत जिकडं तिकडं झाशीच्या राण्याच दिसतात – अगदी वरमाईसकट!
ही केवळ शोभायात्रेसारखे परंपरावादी कार्यक्रम वा मालिकांतील भडभुंजा संस्कृतीची अक्कलशून्य नक्कल नाही, तर हे ग्रामीण महाराष्ट्रातील नवश्रीमंत, धनदांडग्या वर्गाचं ‘पोलिटिकल स्टेटमेन्ट’- राजकीय विधान आहे.
हे समजून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या, खासकरून पुण्यासारख्या प्रागतिक जिल्ह्यतून प्रचलित झालेल्या सामूहिक विवाह चळवळीकडे पाहावं लागेल. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गावोगावी मोठय़ा प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळे होत असत. संपूर्ण महाराष्ट्रात जुन्नर तालुक्यातून मनसेला विधानसभेची एक जागा मिळाली. ती या सोहळ्यांचीच पुण्याई! आमदार शरद सोनवणे यांनी स्वखर्चाने असे शेकडो विवाह लावून दिले. त्याचं फळ त्यांना मिळालं. या चळवळीत केवळ गरीबांचेच विवाह लागत असं नाही. श्रीमंतही त्यात सहभागी होत असत. त्यांच्यासाठी तर ती अभिमानाची गोष्ट असे. ऐपत असूनही सामूहिक विवाह सोहळ्यात मुला-मुलीचं लग्न लावणे हे प्रागतिक विचारसरणीचं लक्षण मानलं जाई. पैशांची उधळपट्टी नाही, मानपानासारखे अनेकदा आनंदभंग करणारे प्रसंग नाहीत, वधू वा वरपक्षाची मनुष्यबळाअभावी होणारी तारांबळ नाही, अशी ही विवाहसोहळ्यांतील समतावादी चळवळ! आजही काही देवस्थानांतून, काही गावांतून असे – खास ग्रामीण भाषेत सांगायचं, तर – ‘ग्रुप’ विवाह होतात. पण गावोगावी मंगल कार्यालयं आली आणि या चळवळीचं ऱ्हासपर्व सुरू झालं. दुष्काळामुळे मराठवाडय़ात असे ग्रुप विवाह होताना दिसतात. पण त्याला चळवळ म्हणता येणार नाही.
ही चळवळ खरं तर याही आधी धापा टाकू लागली होती. ग्रुपमध्ये लग्न केलं की डामडौल करता येत नाही, ही काही लोकांची खंत असेच. अशा लोकांनी मग त्यातून एक मार्ग काढला होता. म्हणजे लग्न दहा-बारा हजार रुपये भरून सामूहिक सोहळ्यातच करायचे; परंतु त्याआधी ‘एंगेजमेन्ट’चा कार्यक्रम असा काही दणक्यात साजरा करायचा, की गावाने तोंडात बोटं घातली पाहिजेत! हाच वर्ग पुढे मंगल कार्यालयं उभी राहताच तिथं तारखा घ्यायला धावू लागला. लग्नकार्य असो की दशक्रिया विधी; यातून आपलं राजकीय-सामाजिक बळ समाजाला दिसलं पाहिजे, अशी एक विकृत आस या ‘पोट-इंडिया’च्या मनात लागलेली दिसत आहे.
ही आस लग्नसोहळ्यासाठी सिनेमासारखे सेट उभारणं, किंवा वरातीला ‘लायटिंग’वाला वातानुकूलित रथ आणणं, अथवा महिला मंडळींना फेटे घालणं यातूनच दिसते असं नाही; ती लग्नपत्रिकांतूनही दिसून येते. त्या देखण्या आणि महागडय़ा असणं हा भाग तर झालाच, पण त्याहून महत्त्वाची असते ती पत्रिकांतली नामावली. पूर्वी त्याला एक कौटुंबिकपण असे. त्यात भाऊबंदांची, चार-दोन गावकारभाऱ्यांची, एखाद्या मंडळाचं आणि घरातल्या तमाम कच्च्याबच्च्यांची नावं असत. हल्ली त्यांत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षापासून आमदारापर्यंत नेत्यांच्या खंडीभर नावांची भर पडलेली आहे. अजून एखाद्याच्या पत्रिकेत कार्यवाहक म्हणून पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांचं नाव दिसलेलं नाही, इतकंच. आपलं राजकीय ‘कनेक्शन’ मिरवून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा पत्रिका हा एक महामार्ग झालेला आहे. ही नेतमंडळीही अशा विवाहांना आवर्जून हजेरी लावतात. तिथं भाषणंही ठोकतात.
सामूहिक विवाह चळवळीचा हाच एक दुष्परिणाम म्हणावा लागेल. या चळवळीने नेतेमंडळींना भाषणासाठी बोहल्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आता ही भाषणं मंगल कार्यालयांतून होताना दिसतात. त्यात मुहूर्ताचे बारा वाजले तरी बेहत्तर; पण आपल्या कार्यात तालुक्यातले बडे नेते आशीर्वाद देऊन गेलेच पाहिजेत, हा कार्यमालकाचा अट्टहास असतो. ‘साहेब, पाच मिन्टांसाठी याच!’ असा यजमानांचा आग्रह असतो. अर्थातच तो नेतेमंडळींच्याही पथ्यावर पडतो. अखेर त्यांनाही मतदारसंघ बांधायचा असतो! आता ही मंडळी विवाहासारख्या कौटुंबीक सोहळ्यांत काय बोलणार, अशी शंका कोणासही येईल. पण त्यांची ठरलेली भाषणं असतात. प्रथम कार्यमालकावर ‘सामाजिक कार्यकर्ते’ वा तत्सम काही कौतुकशब्द उधळायचे आणि मग छत्रपती शिवराय, जिजाऊ, राम-कृष्ण अशा विभूतींचे आदर्श सांगत वधुवरांवर आशीर्वादाच्या अक्षता टाकायच्या, की ‘वधू आणि वराने यापुढील आयुष्यात देव, देश आणि धर्मासाठी कार्य करावे!’ उद्यापासून तो नवरदेव बीअर बारच्या गल्लय़ावर बसणार आहे आणि त्याने देव-देश-धर्मासाठी कार्य करावे! परंतु हे असं सरसकट सुरू असतं. कारण अनेकांसाठी लग्नकार्य हेच मुळी राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचं आणि मिरवण्याचं साधन झालेलं आहे.
ज्यांची ऐपत आहे, ज्यांना परवडतं त्यांनी मंगल कार्यालयांतून असे स्वतंत्र विवाह सोहळे साजरे केले, त्यातून आपल्या प्रतिष्ठेवर समाजमान्यतेचं शिक्कामोर्तब करून घेतलं तर त्यात बिघडलं काय, असा सवाल येथे येऊ शकतो. उलट, यातून संपत्तीचं चलनवलन होत राहतं, असंही कोणी म्हणू शकतं. शहरांतून सरसकट असे सोहळे होतात त्यावर कोणी टीका करीत नाही, असा विरोधही कोणी करू शकतो. परंतु हा इतका वरवरचा प्रश्न नाही. ती ग्रामीण महाराष्ट्रातली एका प्रागतिक चळवळीच्या मुळांना नख लावणारी गोष्ट आहे. समाजातील वरचा वर्ग जसा वागतो त्यानुसार खालच्या वर्गाची सामाजिक वर्तणूक होत असते. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात आज सामूहिक विवाह सोहळे पार पाडणारे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भास्कर जाधव यांच्यासारखे पुढारी जेव्हा आपल्या घरातील विवाह सोहळे आपण छत्रपतीच असल्याच्या थाटात साजरे करतात, वडगाव मावळ आणि वाल्हेकरवाडीतील कोणी धनदांडगे जावयांना ऑडी आणि बारा बुलेट मोटारसायकली अशी ओवाळणी देत आपल्या संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करतात, तेव्हा त्याचा सामाजिक परिणाम होतच असतो. एकीकडं अशा विवाह सोहळ्यांवर टीका होत असतानाच समाजातील एक वर्ग त्याकडं आदर्श म्हणूनही पाहतो. कारण त्याच्या नजरेसमोर असते ती त्या सोहळ्यांतील चमकदमक आणि लोकांत होत असलेली चर्चा. हाच परिणाम मग छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात ग्रामीण महाराष्ट्रातही झिरपत गेलेला दिसतो. गावातील प्रतिष्ठितांचा कित्ता आपणही गिरवावा, लोकांनी आपणासही ‘काय दणक्यात लग्न लावलं भाऊ पोराचं!’ असं म्हणावं, ही भावना चुकीची; पण तरीही स्वाभाविक. मात्र, अशा फालतू आदर्शापायी आज मध्यमवर्गाच्याही आवाक्याबाहेर हे विवाह सोहळे जाऊ लागले आहेत, तिथं गरीबांची काय कथा? यातून एक विचित्र प्रकारची सामाजिक-सांस्कृतिक विषमता जन्मास येत आहे. मराठवाडय़ातील एका गावातील काही मुलींचे विवाह केवळ पैशाअभावी होऊ शकले नाहीत, अशी बातमी मध्यंतरी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली होती. तो केवळ दुष्काळाचाच परिणाम मानता येणार नाही. ग्रामीण भारतातील ‘पोट-इंडिया’च्या अमंगल सांस्कृतिकतेचा तो आडपरिणाम आहे.
रवि आमले – ravi.amale@expressindia.com