कुठेतरी लांबच्या देशांमध्ये चित्रं, शिल्पं आदी कलांचं आणि त्यापलीकडे जाऊ  पाहणाऱ्या कलाकृतींचं महाप्रदर्शन भरलेलं आहे.. त्या देशांमधल्या त्या तीन शहरांत ही महाप्रदर्शनं ठरावीक वर्षांनी भरत असतात. कुठे दोन वर्षांचा उपक्रम, कुठे पाच, तर कुठे दहा र्वष.. ही तीन अत्यंत नावाजलेल्या उपक्रमांतली प्रदर्शनं सध्या भरली आहेत. त्या प्रदर्शनांच्या अनुभवावर आधारित लेखांच्या लघुमालिकेचा हा पहिला भाग..

जर्मनीतलं कासेल नावाचं एक गाव एरवी कुणाला माहीत असेल-नसेल; पण परवाच्या आठ-नऊ  जूनपासून जगभरच्या कलारसिकांनी हे गाव गजबजून जाणारच होतं. तसंच झालं. इटलीमधलं व्हेनिस हे पर्यटकप्रियतेच्या मोजपट्टीवर कासेलपेक्षा कितीतरी पटींनी पुढे असणारं शहर आहे. पण या व्हेनिसलासुद्धा गेला सुमारे महिनाभर- म्हणजे १३ मेपासून पर्यटकांपेक्षाही अधिक संख्येनं येताहेत ते दृश्यकला क्षेत्राशी संबंधित लोक. अनेकजण व्हेनिस आणि कासेल दोन्हीकडे जाणार आहेत. सांगितल्यास खरं नाही वाटणार, पण या लोकांना व्हेनिसला येण्याची जितकी ओढ होती, त्यापेक्षा जास्त कासेल शहराकडे जाण्याची आहे! असं का झालं, याला उत्तर आहे : व्हेनिसमध्ये चित्र-शिल्प-मांडणशिल्प आदी दृश्यकलांच्या सर्वात जुन्या ‘बिएनाले’ या (दर दोन वर्षांनी भरणाऱ्या) प्रदर्शनाची ५७ वी खेप सध्या सुरू आहे. आणि कासेल या गावामध्ये १९५५ पासून दर पाच वर्षांनी ‘डॉक्युमेंटा’ हे अवाढव्य कलाप्रदर्शन भरतं; त्याची १४ वी खेप दहा जूनपासून सर्वासाठी खुली झाली आहे. कासेलसोबतच यंदा ग्रीसमध्ये भर अथेन्स शहरातही ४० ठिकाणी ‘डॉक्युमेंटा’नं पडाव टाकला आहे. एकंदर १६० कलावंतांची विविध कामं यंदा अथेन्समध्ये पाहायला मिळताहेत. त्याखेरीज जर्मनीतल्याच म्यून्स्टर या गावात दर दहा वर्षांनी विविध देशांतल्या शिल्पकारांना खास निमंत्रण देऊन ‘शिल्प-प्रकल्प’ भरवला जातो. त्यापैकी काही शिल्पं पुढेही कायम राहातात. तेही प्रदर्शन १० जूनच्या शनिवारी सुरू झालेलं आहे.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Big opportunity for India in international project Square Kilometer Array Observatory Regional Vida Center will be established
आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

याला इथं आपण ‘कलायात्रा’ म्हणतो आहोत. का म्हणायचं असं? ‘यात्रा’ कशाला म्हणायचं?

व्हेनिस बिएनाले आणि डॉक्युमेंटा या दोन्ही प्रदर्शनांचा गवगवा फार मोठा. अनेक मराठी कलारसिकांना तो नव्यानं सांगण्याची गरज नाही. तरीही काही उद्बोधक आकडे पाहिल्यास तो पटकन् कुणालाही समजू शकेल. पाच वर्षांपूर्वी ‘डॉक्युमेंटा’ची १३ वी खेप पार पडली तेव्हा या प्रदर्शनाला १०० दिवसांत ८,६०,००० प्रेक्षकांनी भेट दिली होती! प्रदर्शनाचं अवघ्या एका दिवसाचं तिकीट पाच वर्षांपूर्वी २० युरो होतं.. म्हणजे त्यावेळच्या दरांनुसार सुमारे १४४० रुपये. यंदा दिवसभरासाठी २२ युरो मोजावे लागत आहेत. व्हेनिस बिएनालेच्या गेल्या (५६ व्या) खेपेची प्रेक्षकसंख्या ५,०१,००० होती आणि त्यावेळचं तिकीट होतं २५ युरो- म्हणजे एका दिवसासाठी किमान दीड हजार रुपये. ‘यंदा आणखी प्रेक्षक येणार’ हा विश्वास दोन्हीकडल्या आयोजकांना आहेच.

अथेन्सचं प्रदर्शन आठ एप्रिलपासनंच सुरू झालं आहे. आणि तिथं ‘आपल्या गरीब देशात हे प्रदर्शन हवंच कशाला?’ असं आधी म्हणणाऱ्या विरोधकांतलेही काहीजण कलाकृती पाहून/ ऐकून किंवा अनुभवून ‘डॉक्युमेंटा’च्या बाजूचे होत आहेत, म्हणे. म्यून्स्टर त्यामानानं छोटं. पण याच गावात पाब्लो पिकासोनं कधीकाळी मुद्राचित्रणाचा स्टुडिओ थाटला होता. त्याचं ‘पिकासो म्युझियम’मध्ये आता रूपांतर झालं आहे. पण त्याहीपेक्षा गावभर आदल्या दहा / वीस / तीस वर्षांपूर्वीच्या ‘स्कुल्प्तुर प्रोजेक्टे’मधली  शिल्पं आहेत.. हे रिचर्ड सेराचं, ते क्लॉस ओल्डेनबर्गचं, ते हेन्री मूरचं..(‘स्कुल्प्तुर प्रोजेक्टे’ हे ‘शिल्प-प्रकल्प’ उपक्रमाचं जर्मनभाषी नाव!) थोडक्यात, कलाप्रेमींना जर केवळ कलाप्रेमासाठीच पर्यटन करायचं असेल, तर तो आनंद भरपूर देणारं हे गाव आहे.

एखाद्या पत्रकाराला (तो स्वत:ला ‘कलासमीक्षक’ वगैरे समजत असल्यानं) २००७ साली वाटतं, की डॉक्युमेंटा पाहायला जावं. तो जातो. त्याच वर्षी म्यून्स्टरलाही शिल्प-प्रकल्प असतो आणि व्हेनिसची बिएनालेही सुरू असते. हे सारं पाहिल्यावर तो इतका प्रभावित होतो, की गेल्या दहा वर्षांत चारदा व्हेनिसला, पुन्हा एकदा डॉक्युमेंटासाठी कासेल गावात तो जातो. आणि हीच कलाप्रदर्शनं २०१७ मध्ये एकत्र आहेत म्हटल्यावर पुन्हा प्रवासाला निघतो. थोडय़ाफार फरकानं हे असंच अनेक देशांतल्या निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचं होत असेल.. व्हेनिस आणि डॉक्युमेंटा ही दोन प्रदर्शनं लागोपाठ पाहण्याची संधी अनेकजण सोडत नसणार.. इथं एकदा आल्यावर जो अनुभव येतो, तो पुन्हा घ्यावासा वाटतो- या अर्थानं ही ‘यात्रा’!

एवढं काय असतं त्या अनुभवात? चित्रंच तर पाहायची! तेवढी अख्ख्या वर्षांत एकटय़ा ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त पाहायला मिळतील की!

..पण नाही. फार तर ‘कोची बिएनाले’शी या अनुभवाची तुलना करता येईल. केरळमधलं हे प्रदर्शन ‘लोकसत्ता’च्या अनेक वाचकांनीही पाहिलं आहे. त्यापैकी अनेकांनी ‘पुन्हा दोन वर्षांनी कोचीनला जायचं’ असं ठरवून टाकलेलं असेल.. (याला म्हणतात ‘यात्रा’!) पण मग कोचीमध्ये तरी काय असतं असं? सर्व कलाकार एकाच वेळी पाहायचे, असंच ना?  नाही. तसंच आणि तेवढंच नाही फक्त. कोची बिएनाले, पुणे बिएनाले, क्युबातली हवाना बिएनाले, दक्षिण कोरियातली ग्वांग्जू बिएनाले किंवा ब्रिटनमधली लिव्हरपूल बायएनिअल.. अशा जगभरात दोनेकशे ठिकाणी दर दोन वर्षांनी भरणाऱ्या ‘बिएनाले’ (ब्रिटिश उच्चार ‘बायएनिअल’) आहेतच. पण व्हेनिस शहरातली बिएनाल पहिली! सन  १८९५ मध्ये वसाहतवादी दाखवादाखवीचा भाग म्हणून सुरू झालेली व्हेनिसची ही द्वैवार्षिकी पुढे काळाबरोबर बदलत गेली आणि लोकशाहीवादी झाली, हे महत्त्वाचंच;  पण जगभरची कला एकत्र दिसावी, या एकाच हेतूनं भरवलं गेलेलं पहिलं महाप्रदर्शन व्हेनिसचंच, हेही महत्त्वाचं.

डॉक्युमेंटाकडेसुद्धा असाच पहिलेपणाचा मान द्यायला हरकत नाही. कारण- कला सर्व दबावांपासून मुक्त असावी, चित्रकारांना त्यांचे-त्यांचे राजकीय, सामाजिक, लैंगिक, कलावादी, जीवनवादी  विचार जर कलाकृतींतून मांडायचे असतील तर त्या सगळ्या कलाकृतींतून आजच्या जगण्याचं तत्त्वज्ञानच पुढे जाणार आहे  हे आपण मान्य केलं पाहिजे, असा विचार डॉक्युमेंटानं १९५५ पासून आजतागायत जपला आणि वाढवला आहे.

म्हणजे जरा कठीण शब्दांत सांगायचं तर- दृश्यकलेच्या सुसंघटित दर्शन-प्रदर्शनाची आणि त्यातून ‘जागतिक कलाविचारा’ची सुरुवात या दोन ठिकाणी झाली. आजही थोडय़ाफार फरकानं जागतिक कलाविचाराचं नेतृत्व डॉक्युमेंटाकडे आणि त्याखालोखाल व्हेनिस बिएनालेकडे आहे.

आता साहजिकच ‘त्या युरोपीय, पाश्चात्त्य, पैसेवाल्या देशांमधल्या प्रदर्शनांचं काय एवढं कवतिक?’ असा एक नेहमीचा आक्षेप येईलच. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संस्कृती ज्यांची नव्हती, त्या देशांतल्या प्रदर्शनांतून जर ‘विश्वाचे आर्त’ प्रेक्षकाच्या मनी प्रकाशत असेल तर कौतुकच

नको का करायला, असं नेहमीचं उत्तर या आक्षेपांवर देता येईल.

पण आपण त्यापेक्षा अधिक वास्तववादी, अधिक जमिनीवरच्या मुद्दय़ाकडे येऊ. या महाप्रदर्शनांवर युरो-अमेरिकी चित्रकारांचाच पगडा दिसत नाही का? त्यांचाच भरणा इथे जास्त असतो की नाही? उत्तर : हो. पण कोणत्याही विचारनियोजित- म्हणजे क्युरेटेड प्रदर्शनात नियोजकाच्या त्या- त्या वेळच्या प्राधान्यक्रमांनुसार चित्रकारांची निवड होत असते. व्हेनिस बिएनालेचं मध्यवर्ती प्रदर्शन किंवा अख्खा डॉक्युमेंटा ही प्रदर्शनंसुद्धा याला अपवाद नाहीत. पण या प्रदर्शनांमध्ये पाश्चात्त्य चित्रकारांपेक्षा निराळे कोण कोण आहेत, आणि पाश्चात्त्यांपैकीसुद्धा ठरावीक युरोपीय शैलींपेक्षा निराळं काम करणारे कितीजण आहेत, याचीच चर्चा गेल्या अनेक खेपांच्या वेळी अधिक होत राहिली आहे. म्हणजे थोडक्यात, पाश्चात्त्यकेंद्री कलेतिहासाची इमारत मोडून काढून ती नव्याने बांधण्याचं काम कुठवर आलंय, हेच या प्रदर्शनांतून दिसावं अशी अपेक्षा जोर धरते आहे. त्या अपेक्षेला लांबी मिळत आहे. यंदा व्हेनिसचं मध्यवर्ती प्रदर्शन पाश्चात्त्यकेंद्री, पुरुषकेंद्री, गौरवर्णीयकेंद्री असल्याची आकडेवारीच ‘आर्ट्सी’ या वेब-नियतकालिकानं प्रसृत केली. पण हे जे गोरे, युरो-अमेरिकी पुरुष कलावंत यंदा व्हेनिसमध्ये संख्येनं अधिक आहेत, त्यांच्यात तरुण आणि प्रथमच इतक्या मोठय़ा प्रदर्शनात संधी मिळालेल्यांचं प्रमाण लक्षात घेण्याजोगं आहे. म्हणजे केवळ संख्येचं विश्लेषण करून भागणार नाही, तर आशय काय- हेही, असं उत्तरही या खटाटोपाला मिळालं. यंदाचा डॉक्युमेंटा तर आफ्रिकी, दक्षिण अमेरिकी, अरब देशांतल्या दृश्यकलावंतांमुळे गाजतो आहे. हे गाजणं, ही चर्चा तात्कालिक खरी; पण यातून आशयाची चर्चा पुढेही टिकते.. ती कलेच्या इतिहासात नवीन भर घालणारी असू शकते. उदाहरणार्थ, गेल्या तीन-चार वर्षांत- आयलान कुर्दी या लहानग्याचा मृतावस्थेतला फोटो व्हायरल  होण्याच्या अगोदरच व्हेनिसच्या बिएनालेत सीरियन निर्वासितांच्या प्रश्नाचे पडसाद उमटले होते. यंदा डॉक्युमेंटात सीरियन कलावंतांच्याच ‘अबू नदारा’ या समूहाचा सहभाग आहे. त्यांच्या कामांमधून पाश्चात्त्यविरोधी आशय कसा अलगद पोहोचतो, याचं उदाहरण म्हणजे फ्रेंच वसाहतवादी लष्करी जनरल क्लेबर याची हत्या केल्याबद्दल ज्याला हाल हाल करून ठार मारण्यात आलं, त्या सुलेमान अल हबीबी याच्या जुन्या चित्रावर आजच्या सीरियन गनिमांचं टोपडं चढवणारी डिजिटल प्रतिमा! ही प्रतिमा अनेक परींच्या चर्चेला चालना देणारी आहे.

हा इतिहास घडत असतानाच त्याचे आपण साक्षीदार असावं, यासाठी या  कलायात्रेचा अनुभव महत्त्वाचा. पण शहाणीव जागी होण्यासाठी फक्त यात्रा करावी लागते असंही नाही. कुठूनतरी काही ऐकलं, वाचलं, आपणच अभ्यास केला.. अशी माणसंही यात्रेकरूंच्या कितीतरी पुढे जाऊ  शकतात. चित्र / शिल्प आदी दृश्यकलांबाबतसुद्धा इंटरनेटमुळे हे असं.. प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्याच्याही अभ्यासानं पुढे जाणं.. शक्य आहे. तसं पुढे जाण्याचं निमंत्रण ‘लोकसत्ता-लोकरंग’च्या वाचकांना देण्यासाठीच ‘कलायात्रा’ या लघुमालिकेतला हा पहिला लेख.

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com