‘सैराट’ने प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. काय आहे याचं कारण?.. एक शोध..!
‘सैराट’ सिनेमा जरा उशिराच पाहिला. सहज तिकिटं मिळत नव्हती, हे एक कारण; आणि सिनेमा खूप मोठा आहे, ही एक भीती. आता तास-दीड तासापेक्षा जास्त काही बघण्याची, ऐकण्याची सवय मोडली आहे. तासाभरातच शरीर चुळबुळू लागतं. मन खिशातल्या बंद मोबाइलच्या दिशेनं धावू लागतं. कानात आपल्या मोबाइलची रिंग वाजल्याचा आवाज घुमू लागतो. खिशात मोबाइल थरथरतो आहे असे भास होऊ लागतात. कशातच मन रमेनासं होतं. मी मल्टिप्लेक्समध्ये (सहसा मल्टिप्लेक्समध्ये न दिसणाऱ्या) गर्दीसोबत ‘सैराट’ पाहिला. सिनेमा बघताना लांबीचा त्रास झाला नाही. या सिनेमानं मला गुंतवून ठेवलं. ‘सैराट’ बघण्यापूर्वी त्याविषयी काही वाचलं, ऐकलं होतं, त्यापेक्षा हा सिनेमा मला वेगळा वाटला.
आमच्या तरुणपणी राज कपूरच्या ‘बॉबी’ सिनेमाने आम्हाला झपाटलं होतं. आमच्या पिढीला रोमँटिक आधार आणि प्रेमासाठी लागणारं बळ त्यानं दिलं होतं. ‘हम-तुम एक कमरे में बंद हो.. और चाबी खो जाए..’ या फँटसीवर आमची पिढी वाढली, मोठी झाली. प्रत्येक पिढीला ‘बॉबी’सारख्या लव्हस्टोरीची गरज भासते.
वेगवेगळ्या काळात त्या- त्या पिढीची मानसिकता व्यक्त करणारी प्रेमकहाणी जन्म घेते. आज ‘सैराट’ या सिनेमाला छोटय़ा गावांपासून मोठय़ा शहरांपर्यंत सर्वत्र गर्दी होत आहे. त्यातही विशिष्ट तरुण प्रेक्षक मोठय़ा संख्येने आणि दुप्पट उत्साहाने पुन:पुन्हा हा सिनेमा बघताना दिसतो आहे. ‘सैराट’ हा आजच्या बहुजनांचा ‘बॉबी’ आहे. ज्यांचे आवाज आजवर दडपले गेले होते, त्यांची ही प्रेमकहाणी अहे. अर्थात ‘सैराट’
फक्त रोमँटिक भूक भागवून थांबत नाही; तो आजच्या काळातलं जातवास्तवही मांडू पाहत आहे.
महाराष्ट्रात पराक्रमी महानायकांची कमतरता नाही. महाराष्ट्राला पराक्रमाचा उज्ज्वल इतिहास आहे. रणांगणावर जिवाची बाजी लावणारे नायक ही प्रत्येक समाजाची गरज असते, हे खरं असलं तरी तेवढय़ानं भागत नाही. रसरसून प्रेम करणारे आणि त्यांच्या मीलनात अडथळा आणू पाहणाऱ्या व्यवस्थेशी, समाजाशी लढणारे नायक आणि नायिकाही असाव्या लागतात. ते प्रेमासाठी लढतात. आणि अनेकदा मृत्यूलाही सामोरे जातात. हे मरण फक्त स्वत:साठी नसतं. ते जगण्यावर प्रेम करू पाहणाऱ्या सर्वासाठी असतं. आपल्याकडेही हीर-रांझा, शिरीन-फरहाद, लैला-मजनू झालेले असतील; पण त्यांच्या विराट कहाण्या रचल्या गेल्या नाहीत. मराठी समाजानं बाजीराव-मस्तानी किंवा गौहर-बालगंधर्वाच्या प्रेमकहाण्या निव्वळ त्यातल्या नायिका मुसलमान असल्यामुळे नाकारल्या. प्रेम करणं, प्रेमात पडणं ही बिनमहत्त्वाची, हास्यास्पद, थिल्लर अॅक्टिव्हिटी आहे असं समजून आपण खऱ्या-खोटय़ा, काल्पनिक प्रेमकहाण्या निर्माण केल्या नाहीत. हिशेबी प्रेम करणाऱ्यांच्या ‘मी अधीर, तू बधीर’ छाप किरटय़ा कहाण्या रचल्या. त्या गोष्टी टाइमपास करत असतील, पण निरोगी समाज घडवायला त्याचा काहीही उपयोग होत नाही.
महाराष्ट्राला स्वत:चा नाच नाही. त्यामुळे आमच्या शरीराला नाचता येत नाही. लय शरीरात भिनवून घुमता येत नाही. निसर्गाशी एकरूप होता येत नाही. प्रेम करताना अवघडलेल्या शरीराची अडचण होत राहते. अलीकडे गणेश-विसर्जनाच्या मिरवणुकींच्या निमित्ताने रस्त्यावर काहीजण ढोलताशे बडवत गदागदा शरीर हलवतात. त्यामुळे जर शरीराचं आणि मनाचं अवघडलेपण दूर होत असेल तर त्याला नृत्य म्हणून आपण मान्यता द्यायला हवी. असो!
आवाज दडपलेले, नाकारलेले, झिडकारलेले लोक आता बोलू लागले आहेत. ‘सैराट’ ही दडपलेल्या आवाजांची गोष्ट आहे. या सिनेमातली आर्ची ही तरुणी आता बोलू लागली आहे. तिला हवं ते मागून ती थांबत नाही, तर ती ते हिसकावून घेते आहे. म्हणूनच या समाजाने नाकारलेले लोक आर्चीशी, तिच्या स्वप्नांशी, सुख-दु:खांशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या बिनधास्त, रोखठोक स्वभावाशी एकरूप होताना दिसत आहेत. यातल्या नायकाच्या मित्रांमध्ये एक दुबळा मुसलमान तरुणही आहे. समाजातील उच्च-नीच भेदभाव गळून पडावेत, विषमता संपावी, जातीपातीचं मीलन व्हावं म्हणून तो धडपडतो आहे. मित्राला मदत करतो आहे. आणि त्याची शिक्षाही भोगतो आहे. हे मराठी मुसलमान तरुणाचं वास्तव चित्रण. आजवरच्या मराठी सिनेमा, नाटक आणि साहित्यात न दिसणारं आहे.
कोणतीही कर्कश्श भाषणबाजी न करता आजचं ग्रामीण वास्तव पडद्यावर मांडण्याचं काम ‘सैराट’ने केलं आहे. ‘सैराट’ खरा वाटतो. पूर्वीचे सिनेमे थोडे नाटकी, खोटे वाटत. पूर्वी माणसांना प्रत्यक्ष जगताना चटके बसायचे. त्यांना फार बऱ्या नसलेल्या जगण्यातून निसटण्यासाठी स्वप्नांची गरज भासायची. सिनेमावाले रंगीबेरंगी स्वप्नं पुरवण्याचं काम करायचे. त्यामुळे त्या काळात खोटी स्वप्नं हवीशी वाटायची. ती त्या काळातल्या प्रेक्षकांची मानसिक गरज होती.
आता तंत्रज्ञानामुळे आपण सतत एका आभासी जगात वावरत असतो. घरातल्या घरात आपण फोनवर बोलतो. मीडियाने आपलं जगणं घेरून टाकलं आहे. आपल्याला यातून निसटावंसं वाटतं; पण सुटका नाही. आता आपल्याला खऱ्या, ऑथेंटिक गोष्टींची गरज वाटू लागली आहे.
आता प्रेक्षकांना टी. व्ही.वरच्या मालिकांमधल्या काल्पनिक पात्रांच्या कुचाळक्यांपेक्षा ‘बिग बॉस’मधली खरी वाटणारी पात्रं जास्त आवडू लागली आहेत. खऱ्या गोष्टींवरचे सिनेमे चालू लागले आहेत. कादंबऱ्यांपेक्षा आत्मचरित्रांचा खप वाढला आहे. अस्सलची भूक वाढत चालली आहे. पडद्यावर अस्सलचा आभास निर्माण करण्यात ‘सैराट’ यशस्वी झाला आहे.
काल-परवापर्यंत शहरातला बहुजन समाज खिशात पैसे असतानाही मॉल, बरिश्ता, मल्टिप्लेक्सला बुजत होता. आता त्यांनी हा गंड धुडकावून लावत आधुनिक ब्रँडेड जगण्याशी जमवून घेतलं आहे. ते ‘सैराट’च्या निमित्ताने सिनेमा बघताना फोनवर बोलत, शेजारी बसलेल्या मित्रांशी हास्यविनोद करत, गाण्याच्या ठेक्यावर नाचत ग्लोबल स्टाईलने दु:ख सेलिब्रेट करताना दिसत आहेत. असो!
शेवटी ग्लोबल होताना अस्सल देशीचा मोह सुटत नाही, ही आनंदाची बाब आहे.
शफाअत खान -shafaat21@gmail.com