साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीनं मराठी साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले. साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी १९९० साली या कादंबरीचं नामांकन झालं होतं, हे फार थोडय़ांना माहीत असेल.यंदा ‘मृत्युंजय’च्या प्रकाशनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.आज (१८ सप्टेंबर) रोजी शिवाजीरावांच्या स्मृतिदिनी हे औचित्य साधून विविध उपक्रमांचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख-
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी आजऱ्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. कष्टकऱ्याच्या घरचं वातावरण कसं असणार तसंच त्यांच्या घरी होतं. सणवार, देव-धर्म यानिमित्तानं आईच्या तोंडून लहानपणापासून त्यांना पुराणकथा ऐकायला मिळत. या गोष्टींमुळे महाभारतातील घटना, त्यातल्या व्यक्तींविषयीचं त्यांचं कुतूहल वाढीस लागलं. गावातले सण-समारंभ, कथा-कीर्तनं, प्रवचनं, भजनं, नाटकं यांत लहानगा शिवाजी रमत होता. त्याला ते आवडत होतं. रुचत होतं. मनात अन् कानात साठत होतं. आपल्याला आयुष्यात पुढं काय व्हायचंय, हे त्या लहानशा वयातही त्याला पक्कं ठाऊक होतं. आठवीत असताना ‘माझं ध्येय’ या विषयावरील निबंधात ‘मला लेखक व्हायचंय’ हे त्यानं स्पष्टपणे लिहिलं होतं.
याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक शाळकरी घटना घडली. त्याने त्यांच्यातला लेखक.. ‘मृत्युंजय’कार जागा झाला. हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात शिवाजी आणि त्यांच्या मित्रांनी शि. म. परांजपे लिखित ‘अंगराज कर्ण’ ही एकांकिका सादर करायची ठरवली. या एकांकिकेतील आपल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेचं सगळ्यांकडून कौतुक झालं तरी शिवाजी मनातून अस्वस्थ झाला होता. परांजपेंनी लिहिलेले कर्णाचे संवाद त्याला मुख्य भूमिका असलेल्या श्रीकृष्णाच्या संवादांपेक्षाही बेचन करीत होते. कारण कर्णाचे ते संवाद बिनतोड आणि तर्कशुद्ध होते. लहानग्या शिवाजीच्या काळजात ते घट्ट रुतून बसले. ‘मृत्युंजय’ या त्यांच्या साहित्यकृतीचं बीज त्यांच्याही नकळत अशा प्रकारे त्या शाळकरी वयात रुजू लागलं होतं.
१९५८ साली शिवाजीनं मॅट्रिकची परीक्षा दिली व प्रथम वर्गात तो उत्तीर्ण झाला. कोल्हापुरातून १९६० साली टंकलेखन व शॉर्टहॅण्डचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. त्यामुळे त्यांना लगेचच कोल्हापूरच्या वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी मिळाली.
पण शिवाजीरावांचं मन काही कोर्टात रमेना. त्यांना महाभारताविषयीच्या अनेक ग्रंथांचं वाचन करायचं होतं. त्यांना कृष्ण आणि कर्ण खुणावत होता. आपण शिक्षक म्हणून नोकरीस लागलो तर सतत ग्रंथसंपर्क येईल व आपल्या आवडीच्या विषयाबद्दल संबंधितांशी चर्चा करता येईल, मार्गदर्शन घेता येईल असं त्यांना वाटलं. सुदैवानं त्यांना १९६२ साली राजाराम हायस्कूलमध्ये टंकलेखन व लघुलेखन शिकवणाऱ्या शिक्षकाची नोकरी मिळाली. हायस्कूलसमोरच्या करवीर नगर वाचन मंदिरचे ग्रंथालय आणि तिथून काही अंतरावरील गोखले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात त्यांची वहिवाट सुरू झाली. कर्ण व महाभारताविषयी अनेक ग्रंथांचं या काळात त्यांनी वाचन केलं. संशोधकाच्या भूमिकेतून त्याची टिपणं काढली. संदर्भग्रंथ तपासले. अधिकारी व्यक्तींशी चर्चा केल्या. त्यांचा जणू महाभारतानं ताबाच घेतला होता. १९६० ते १९६३ अशी तीन वष्रे त्यांनी अफाट वाचन केलं. चिंतन केलं. याच दरम्यान त्यांनी हिंदी विषयाची पुणे विद्यापीठाची एफ. वाय. बी. ए.ची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. या अभ्यासातच त्यांच्या हाती हिंदीतील प्रख्यात कवी ‘प्रभात’ ऊर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं ‘कर्ण’ हे खंडकाव्य पडलं. आजऱ्याला स्नेहसंमेलनातील एकांकिकेत श्रीकृष्णाची भूमिका करताना कर्णकथेचं जे बीज त्यांच्या मनात रुजू लागलं होतं त्याला या खंडकाव्यानं अंकुर फुटू लागले. या खंडकाव्याची त्यांनी अनेक पारायणं केली. कर्णानं त्यांना अक्षरश: झपाटून टाकलं.
१९६३ मध्ये शिवाजीरावांनी प्रदीर्घ चिंतन, मनन, वाचन केल्यानंतर ‘मृत्युंजय’ ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. त्यावेळी ते कोल्हापुरात पोलीस क्वार्टर्समध्ये थोरले बंधू विश्वासराव यांच्यासोबत बठय़ा चाळीत राहत होते. ते काय लिहीत होते हे त्यांच्या भावाखेरीज कुणालाच माहीत नव्हतं.
एके दिवशी शाळा सुटल्यानंतर त्यांचे सहशिक्षक, पण वयानं ज्येष्ठ स्नेही आर. के. कुलकर्णी यांच्याबरोबर ते फिरायला बाहेर पडले. जाता जाता मनातलं गूज ते आपल्या या मित्राला-‘आक्र्या’ना सांगू लागले-
‘बरेच दिवस एक विषय मनात घर करून बसलाय. एक लिखाण मनात घोळतंय. थोडंफार लिहून झालंय.’
‘ कुठला विषय?’
‘ महाभारतातला आहे.. कर्णाचा.’
‘ कर्ण! फार महत्त्वाचा नायक आहे तो. काय लिहिताय? काव्य की नाटक?’
‘ नाही. कादंबरी. आपण जरा निवांत बसू या. जे बांधून झालंय ते वाचून दाखवावं म्हणतो.’
आक्र्याना आपल्या मित्राची ही एक वेगळीच साहित्यिक भट्टी जमून येत असल्याचं जाणवलं. दोघंही खोलीवर आले आणि शिवाजीरावांनी लिखाणाची फाइल हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. त्यांनी एखादा परिच्छेद वाचला असेल तोच आर. के. आश्चर्यानं म्हणाले, ‘पुन: पुन्हा तो परिच्छेद वाचा बरं. दुर्योधनाचा अस्सल राजपीळ तुम्ही छान पकडलाय- राजे..’ अशी दाद देत त्या दिवसापासून आर. के. शिवाजीरावांना ‘राजे’ म्हणू लागले. मग शिवाजीरावांना सगळं गणगोतच आदरानं ‘राजे’ म्हणून संबोधू लागलं. त्यानंतर कोल्हापुरातील भाऊसिंगजी रस्त्यावरच्या टाऊन हॉल बागेत आर. के. आणि शिवाजीरावांची वाचनाची बठक अधूनमधून आकार घेऊ लागली. त्या दिवसांबद्दल शिवाजीराव एका लेखात लिहितात, ‘‘मृत्युंजय’ची शाई सुकण्याअगोदरचा शब्द न् शब्द आर. के.नी ऐकला आहे. मला तेच केवढय़ातरी अमाप विश्वासानं ठासून म्हणायचे, ‘राजे, हे पुस्तक धरणार. आपली पज!’ एका वेगळ्याच भावतंद्रीत आम्ही मग पंचगंगा पुलाचा परिसर जवळ करायचो. सूर्य डुबायला झालेला असायचा. त्याच्या भगव्या-केशरी किरणांसह झगझगत्या गोलाकाराचं प्रतििबब पंचगंगेच्या पात्रात उतरलेलं असायचं. ते पाहताना माझ्या तोंडून अस्फुट शब्द निघायचे- ‘ॐ भुर्भुव स्व तत्सवितुर्वरेण्यं..’ आर्के कुतूहलानं विचारायचे ‘राजे, कसला विचार करताय?’
‘ताडून बघतोय. हे इथं एवढं अप्रूप दिसतंय.. मग साक्षात् गंगेकाठी हस्तिनापुरात कसा दिसत असेल सूर्योदय आणि सूर्यप्रयाण? पंत, एकदा तो सगळाच परिसर डोळ्याने बघायला पाहिजे. मग पुढचं लिखाण आणि लिहून झालेल्यावर हात फिरवायला पाहिजे. पण..’
शिवाजीरावांच्या या ‘पण’मध्ये अनेक प्रश्नचिन्हं सामावली होती. मित्रवर्य आर. कें.नी ती ताडली. एवढय़ा लांब काही दिवस जायचे म्हणजे प्रवासाचा, राहण्या-जेवणाचा खर्च येणार. तुटपुंजा पगार आणि त्यामानानं करावा लागणारा खर्च बराच मोठा होता. हे एवढे पसे कसे उभे करायचे? हा एक प्रश्न. पण त्याहीपेक्षा मोठी समस्या म्हणजे नव्यानंच नोकरी लागलेली असताना एवढी रजा कशी मिळणार?
आर. के. वयानं व अनुभवानं शिवाजीरावांपेक्षा मुरलेले अन् थोरले शिक्षक होते. रजा आणि पसा दोन्हीची जोडणी करण्याचं या दोघा मित्रांनी ठरवलं. रजेचा प्रश्न प्रशासकीय चातुर्याशिवाय सुटणार नव्हता. दोघं डॉ. पाथरकरांच्या बंगल्यावर पोहोचले. साहित्य-संगीताचे रसिक असलेल्या डॉ. पाथरकरांना दोघांनी ही ‘ऑपरेशन कुरुक्षेत्र’ मोहीम समजावून सांगितली. डॉ. पाथरकरांनी या साहित्यिक कारणासाठी शिवाजीरावांना आजारी पाडलं. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं.
रजा मंजूर झाली. पण खिशात फक्त ५० रु. एवढय़ाच गिन्न्या होत्या.(पशाला शिवाजीराव नेहमी ‘गिन्न्या’ म्हणत.) कुरुक्षेत्रासह उत्तर भारताचा टापू फिरायचा म्हणजे बऱ्याच गिन्न्या लागणार. मग आर. के. आणि शिवाजीरावांमध्ये गिन्न्या जमवण्याच्या मोहिमेची आखणी सुरू झाली.
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांना भेटून मोहिमेचा मनसुबा त्यांच्या कानी घालण्याचं ठरलं. त्यांचा आशीर्वाद आणि मिळाली तर मदत घेऊन मग बाकीच्यांना भेटण्याचं ठरलं. अपेक्षेप्रमाणं बाबांनी १२५ रुपयांचा धनादेश देऊन या मोहिमेची भवानी केली आणि अवघ्या आठ दिवसांत १८०० रुपयांचा निधी जमला. त्यावेळी तो या खर्चासाठी पुरेसा होता. दोन महिन्यांची रजा मंजूर झाली होती. आवश्यक त्या सामानासह शिवाजीरावांनी बॅग भरली. जोडीला एक छोटेखानी कॅमेरा घेतला. प्रवासाला निघण्यासाठी ते एस. टी. स्टँडवर आले तर फुलांचा हार घेऊन आर. के. तिथं हजर. भरगर्दीत त्यांनी आपल्या मित्राच्या गळ्यात हार घालून त्याला शुभेच्छा दिल्या. ‘मृत्युंजय’ प्रकाशित होण्यापूर्वीच हा अनोखा सत्कार!
कोल्हापूरहून ते मुंबईला पोहोचले. ‘प्रबोधन’कार ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मधुकरराव चौधरी यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. दिल्लीतील वास्तव्यासाठी आणि मुलाखतींसाठी आवश्यक ती पत्रं मिळाली. मूळचे पुणेकर असलेल्या बंडोपंत सरपोतदार यांच्या दिल्लीतील पूना गेस्ट हाऊसमध्ये शिवाजीराव पोचले. ‘रश्मिरथी’ हे कर्णावर प्रसिद्ध खंडकाव्य लिहिणाऱ्या महाकवी दिनकरजींची दिल्लीत भेट झाली. प्राचीन ग्रंथांचे अभ्यासक दशरथ ओझा, भवानीशंकर द्विवेदी, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूमंडनमिश्र, भारतीय पुराणवस्तू संशोधन खात्याचे एन. एन. देशपांडे, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, दिल्लीचे महापौर लाला हंसराज गुप्ता यांच्या झालेल्या भेटी आणि लेखनविषयाबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चा शिवाजीरावांना खूप उपयोगी पडल्या. ‘िहदुस्थान समाचार’चे संपादक बापूराव लेले यांनी याकामी त्यांना पुढाकार घेऊन मदत केली.
गोळवलकर गुरुजींच्या सांगण्यावरून दिल्लीच्या महापौरांनी कुरुक्षेत्रावरील गीता हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वनाथबाबू भल्ला यांना एक पत्र दिलं होतं. त्यानुसार त्यांनी शिवाजीरावांना महिनाभर आपल्या घरीच प्रेमानं ठेवून घेतलं. कुरुक्षेत्रावरील महिन्याभराच्या या मुक्कामात त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. बुजुर्गाच्या मुलाखती घेतल्या. शंकानिरसन करून घेतलं. उपलब्ध संदर्भ तपासून पाहिले. महाभारताबाबत त्या परिसरातील लोककथांची माहिती घेतली.
परत येताना गोकुळ, वृंदावन, मथुरेला जाऊन त्यांनी आवश्यक ती छायाचित्रं काढली. दोन महिन्यांचा हा प्रवास आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर राहून केलेला अभ्यास, त्याअगोदर वर्षांनुवष्रे केलेलं वाचन आणि चिंतन, जाणत्या लोकांशी घडलेल्या चर्चा हे सगळं संचित बरोबर घेऊन कोल्हापुरात परतलेले शिवाजीराव कर्णकथेनं अक्षरश: ओथंबलेले होते. विचारांचा अन् ते कागदावर उतरवण्याचा आवेग त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिवाजीरावांची रात्रंदिवस ‘कर्णसमाधी’ लागली होती. या मंतरलेल्या वातावरणात ‘मृत्युंजय’चं दीड हजार पानांचं भरगच्च हस्तलिखित साकारलं होतं.
ज्या वयात स्वत:चं परिचयपत्रही बहुसंख्य तरुण-तरुणींना लिहिता येत नाही अशा वयात- अवघ्या २३ व्या वर्षी शिवाजीरावांनी ‘मृत्युंजय’ लिहिली. हा मराठी अर्वाचीन साहित्यातील चमत्कारच म्हणावा लागेल. झपाटलेल्या शिवाजीरावांच्या या कर्णकथेनं मित्रांचा गोतावळाही झपाटून गेला. ‘मृत्युंजय’च्या बांधणीचे ते दिवस अक्षरश: मंतरलेले होते.
सुमारे दीड हजार पानांचं ते हस्तलिखित घेऊन शिवाजीराव आर. के. कुलकर्णी यांच्याबरोबर पुण्याला गेले. आर. के. आणि ग. दि. माडगूळकर यांचा दाट स्नेह होता. दोघं गदिमांच्या घरी गेले. कादंबरीचा काही भाग वाचून गदिमांनी कॉन्टिनेंटलचे साक्षेपी प्रकाशक अनंतराव कुलकर्णी यांना एक पत्र दिलं. त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित करायचं ठरवलं. १९६७ च्या गणेशोत्सवात प्रकाशित झालेल्या ‘मृत्युंजय’ कादंबरीनं मराठी साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडीत काढले. अवघ्या साडेतीन महिन्यांत तीन हजारांची पहिली आवृत्ती संपली. आचार्य अत्र्यांनी या कादंबरीवर भरजरी अग्रलेख लिहिला. पुढं अनेक भाषांची शिखरं आणि मानसन्मान ‘मृत्युंजय’नं पादाक्रांत केले. त्यातून ‘मृत्युंजय’कार ही शिवाजीरावांची ओळख अजरामर झाली.
डॉ. सागर देशपांडे – jadanghadan@gmail.com