१९६० सालातील सलीम-अनारकली यांच्या प्रेमकथेवरील के. आसिफ यांचा  ‘मुघल-ए-आझम’ हा सिनेमा आणि त्यातलं ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं आजही रसिकांच्या मनात ताजतवानं आहे. या चित्रपटावर आधारित  ‘मुघल-ए-आझम’ हे फिरोझ अब्बास खान दिग्दर्शित भव्य-दिव्य अन् दिमाखदार नाटक सध्या रसिकांच्या चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरलं आहे. त्याबद्दल..

स्थळ : मुंबईच्या एनसीपीए संकुलातील जमशेद भाभा थिएटर. वेळ : रात्री साडेसात-पावणेआठची. थिएटरच्या प्रांगणात उच्चभ्रू रसिकांची गर्दी झालेली. निमित्त होतं- फिरोझ अब्बास खान दिग्दर्शित ‘मुघल-ए-आझम’ या भव्य-दिव्य, दिमाखदार नाटकाचं! नाटय़गृहात स्थानापन्न होताना सहज चौफेर नजर फिरवली. चाळीशी-पंचेचाळीशीच्या पुढचे उत्सुक चेहरे मोठय़ा प्रमाणावर दिसले. तरुण मंडळी नव्हती असं नाही; पण प्रमाण खूप कमी. याचं कारण? बहुधा ‘मुघल-ए-आझम’चा करिश्मा आजच्या पिढीला माहीत नसावा. किंवा त्यांना त्या गतरम्यतेत रस नसावा. पण मग ‘मुघल-ए-आझम’चे सलग लागलेले सर्व शोज् ‘हाऊसफुल्ल’ कसे? कदाचित या प्रयोगाला तरुणाईची उपस्थिती कमी असेल. असो. पण उपस्थितांना मात्र रंगमंचाचा पडदा कधी एकदा उघडतोय असं झालं होतं.

तिसरी बेल झाली.. आणि लता मंगेशकरांच्या मधुर आवाजातले आशीर्वचनपर बोल कानी पडले. या नाटकाच्या निमित्ताने के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’च्या दिवसांची त्यांची याद ताजी झाली होती. ‘सात वर्षे इतका प्रदीर्घ काळ रखडल्यावर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानं ‘न भूतो न भविष्यति’ असा इतिहास घडवला. मला पितृतुल्य असलेल्या नौशादजींच्या संगीतानं प्रेक्षकांवर जादू केली होती. आज रंगमंचावर ‘मुघल-ए-आझम’ पुन्हा साकारतोय. त्याच ग्रॅन्जरने. त्याकरता फिरोझ अब्बास खान यांना माझ्या शुभेच्छा..’ साक्षात् लतादीदींच्या या आशीर्वादानं उत्सुकता आणखीनच ताणली गेली.

..आणि पडदा दूर सरला. समोरच्या ‘मुघल-ए-आझम’ अकबराच्या भव्य शाही महालाने डोळ्यांचे पारणे फिटले. महालातील खांबांचं मुघलकालीन कोरीवकाम, जाळीदार महिरपी कमानी, नाना रंगांची सौंदर्यपूर्ण मुक्त उधळण, महालाची भव्यता.. भारदस्तता.. या पाश्र्वभूमीवर मुलाच्या प्राप्तीसाठी अल्लाची प्रार्थना करणारा शहेनशाह अकबर.. त्यानं अल्लाला घातलेली ती करुणार्त साद..

क्षणार्धात नाटकानं प्रेक्षकांची पकड घेतली.. आणि पुढचे सुमारे तीन तास ‘मुघल-ए-आझम’चं हे संमोहन चढत्या रंगतीनं प्रेक्षकांच्या तना-मनात भिनत गेलं. सिनेमा आणि नाटकाचं हे अप्रतिम फ्युजन ‘लार्जर दॅन लाइफ’ नसतं तरच नवल. दिग्दर्शक फिरोझ खान हे नखशिखान्त रंगकर्मी. त्यामुळे त्यांनी सिनेमाचं नाटकात रूपांतर करताना ‘थिएट्रिकल डिव्हाइसेस’चा केलेला तरल, चपखल वापर त्यांच्या हुकमतीची प्रचीती देणारा होता. सिनेमाचं नाटकात रूपांतर करताना त्यांनी रंगमंचीय गरजेनुरुप त्यात काही नवे प्रसंग घातले. अकबर आणि सलीम यांच्यातल्या युद्धात सिनेमॅटिक प्रोजेक्शन व मिनिएचर पेिंटग्जच्या संमिश्रणातून त्यांनी अत्यंत प्रत्ययकारी थिएट्रिकल एक्सपीरिअन्स दिला. ‘बेकस पे करम कीजिए’, ‘मोहे पनघट पे नंदलाल’, ‘तेरी मेहफिल में..’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘मोहब्बत की झूठी कहानी पे रोए’, ‘ऐ मोहब्बत जिंदाबाद’ या एकाहून एक सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. नकळत अनेकांच्या पायांनी ठेकाही धरला. प्रियांका बर्वे आणि अशिमा महाजन यांच्या ‘लाइव्ह’ गाण्यांनी आणि त्यावरील विलोभनीय नृत्यांनी रसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले. क्षणात बदलणारी नितांतसुंदर नेपथ्यरचना, वातावरणनिर्मितीसाठी झिरझिरीत पडद्याचा केलेला उचित वापर, किल्ल्याची भव्यता तसंच दिवसाच्या विविध प्रहरांचं मोहवणारं रूप, उदात्ततेची उत्कट भावना निर्माण करणारं प्रकाशआरेखन, काळाचा अस्सल पट उभी करणारी वेशभूषा, घटना-प्रसंगांतलं भावप्रक्षोभी नाटय़ धारदार करणारे पल्लेदार उर्दू संवाद, त्यांतली भाषिक खुमारी, लहेजा आणि सौंदर्य, कलावंतांचा शैलीदार अभिनय यांनी ‘मुघल-ए-आझम’चं गारुड चढत्या रंगतीनं निर्माण होत गेलं ते थेट शेवटापर्यंत. प्रयोग संपला आणि आपण एका प्रदीर्घ, कधीही संपू नये असं वाटणाऱ्या स्वप्नील विश्वातून जागे झाल्यासारखं वाटलं..

‘मुघल-ए-आझम’चं हे भव्य स्वप्न साकारताना घेतलेली प्रचंड मेहनत पाहून, वैविध्यपूर्ण प्रतिभांचा साधलेला एकमेळ तसंच प्रयोगातील तरल सौंदर्यदृष्टी यांनी प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले होते. प्रयोगाचे कर्तेकरविते फिरोझ अब्बास खान यांच्या भेटीत हे तपशील जाणून घेताना पुनश्च ही ‘प्रयोग’प्रक्रिया डोळ्यांसमोर उभी राहिली.

‘‘२००४ साली आमचा ‘तुम्हारी अमृता’चा प्रयोग हैदराबादला होता. त्याचवेळी तिथे रंगीत ‘मुघल-ए-आझम’ रिलीज झाला होता. मी, शबाना आझमी आणि फारुख शेख तो पाहायला गेलो होतो. सिनेमा पाहताना जाणवलं, की संपूर्ण सिनेमा थिएट्रिकल स्ट्रक्चरचा आहे. आणि तिथंच माझ्या मनात प्रथम ‘मुघल-ए-आझम’वर नाटक करायचं बीज पडलं. बरेच दिवस मी त्यावर विचार करत होतो. परंतु त्याच्या भव्य-दिव्यतेचा, प्रचंड खर्चीक निर्मितीचा विचार करता शेवटी ‘मुघल-ए-आझम’ थिएटरमध्ये सादर करणं अशक्य आहे, या मताशी मी आलो आणि मी हा अध्याय बंद केला. पण मनाच्या सांदीकोपऱ्यात पडलेलं हे बीज मला अधूनमधून टोकत होतंच. तशात एकदा एनसीपीएच्या दीपा गहलोत यांच्याशी गप्पा मारताना ‘मुघल-ए-आझम’वर मला नाटक करायचंय असं मी सहजच बोलून गेलो. त्यांनी ही कल्पना लागलीच उचलून धरली आणि एनसीपीएतर्फेच हा प्रोजेक्ट करायची इच्छा प्रकट केली. एनसीपीएच्या कार्यकारी समितीपुढे त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आणि त्यांचीही संमती मिळवली.

‘‘आता प्रश्न आला- ‘मुघल-ए-आझम’चे राइट्स मिळवण्याचा! शापूरजी पालनजी यांच्याकडे सिनेमाचे राइट्स होते. १९६० साली त्यांनीच ‘मुघल-ए-आझम’ची निर्मिती केली होती. त्यांना जाऊन आम्ही भेटलो. रॉयल्टीचा विषय निघाला. आम्ही त्यांना रॉयल्टीचा जो आकडा सांगितला तो त्यांच्या दृष्टीने फारच क्षुल्लक होता. त्यावर त्यांनी ‘त्यापेक्षा आम्हीच निर्मितीत तुम्हाला सहयोग करू; पण ‘मुघल-ए-आझम’ नाटक चित्रपटाच्या तोडीचं व्हायला हवं,’ अशी अट घातली. शापूरजी पालनजी या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाल्यावर पुढच्या गोष्टी खूप सोप्या झाल्या..’’ दिग्दर्शक फिरोझ खान सांगत होते.

सध्या ‘टॉक ऑफ द टाऊन’ झालेल्या ‘मुघल-ए-आझम’ नाटकाच्या जन्माची कथा त्यांच्या तोंडून ऐकताना दिलीपकुमार- मधुबाला- पृथ्वीराज कपूरच्या ‘मुघल-ए-आझम’च्या दंतकथा मनात ताज्या झाल्या. दंतकथा कसल्या? हकिकतच!

‘मुघल-ए-आझम’चा प्रवास मोठा रोचक आहे. फिरोझ खान सांगत होते.. ‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’

‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. ‘प्यार किया तो डरना क्या’ या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येईतो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ने निर्माण केले.’’

‘मुघल-ए-आझम’वर नाटक करायचं ठरल्यावर फिरोझ खान यांनी आधी संपूर्ण पेपरवर्क तयार केलं. नेपथ्यरचनेपासून लाइट्स, कॉस्च्युम वगैरेंचे आराखडे तयार केले. नाटकाशी संबंधित प्रत्येक बारीकसारीक तपशिलांच्या नोंदी केल्या. प्रयोग सादरीकरणासह दृश्यआरेखन, त्यातलं सौंदर्यमूल्यं, प्रसंगांचं मंचन, त्यासाठी वेगवेगळी स्थळं दर्शविणारं लवचीक नेपथ्य, आणि हे सारं जमवून आणण्याकरता योग्य अशा प्रतिभासंपन्न तंत्रज्ञांचा शोध आदी गोष्टी निश्चित करून ते कामाला लागले.

‘‘नृत्यआरेखन (कोरिओग्राफी) वगळता बाकी सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात अगदी पक्क्य़ा होत्या. काळाचे संदर्भ जिवंत करण्यासाठी कॅलिग्राफी आणि मिनिएचर पेंटिंग्जचा वापर करायचं ठरवलं. माझा मित्र नील पटल न्यूयॉर्कला ब्रॉडवेवर काम करतो. त्याच्याकडे सीन डिझाइनची कामगिरी सोपवली. त्याने डेव्हिड लॅंडर (लाइटिंग डिझाइन) व रिचर्ड नॉवेल (साऊंड डिझाइन) यांच्या साथीनं माझं बरंचसं काम सोपं केलं. मला प्रयोगात जी भव्यता आणि खोली अभिप्रेत होती, जी सौंदर्यात्मकता अपेक्षित होती, ती या मंडळींनी पुरी केली. कोरिओग्राफीची धुरा मयूरी उपाध्याय यांनी खांद्यावर घेतली. मनिष मल्होत्रांनी वेशभूषेची जबाबदारी स्वीकारल्याने मी आश्वस्त झालो. यात मुख्य अडचण होती अनारकलीची निवड करण्याची. मला ‘लाइव्ह’ गाणारी आणि अभिनयाची समज असलेली मुलगी याकरता हवी होती. माझ्या एका मित्राच्या शिफारशीनं आलेल्या प्रियांका बर्वे या मुलीने माझा अनारकलीचा शोध थांबवला. या मुलीला उर्दू संवादोच्चार कसे जमतील ही भीती प्रारंभी मला वाटत होती. परंतु तिने आम्हाला खोटं पाडत ते सहज आत्मगत केले. मला तालमींसाठी सलग अडीच महिने पूर्ण वेळ देणारे कलाकार हवे होते. त्यामुळे एखाद् दोघांचा अपवाद वगळता मी नव्या कलाकारांनाच या प्रोजेक्टसाठी निवडलं. आणि पहिली गोष्ट कोणती केली असेल, तर ती ‘मुघल-ए-आझम’ सिनेमाचा त्यांच्यावरील प्रभाव पुसून टाकण्याची. मला त्यांनी नव्या दृष्टीनं या नाटकाकडे पाहावं असं वाटत होतं. त्यासाठी संवादोच्चारांपासून अभिनयापर्यंत मी मला हवे तसे बदल त्यांच्याकडून करवून घेतले. सिनेमात प्रत्येक पात्राचे संवाद वेगवेगळ्या लेखकांकडून लिहून घेतलेत. पण सिनेमात तसं कुठंच जाणवत नाही. माझ्या कलावंतांचे उर्दू संवाद परफेक्ट असावेत यासाठी कमाल अहमद यांची नियुक्ती केली. त्यांनी त्यांना रीतसर उर्दूचं प्रशिक्षण दिलं. त्यांनीच नाटकातले नवे प्रवेश लिहिलेत. प्रयोग बसत आला, पण तरी मी मात्र अस्वस्थ होतो. शून्य प्रयोगाआधी तर दोन-तीन दिवस मी पार डिप्रेशनमध्येच गेलो होतो. इट विल बी टोटल डिझास्टर.. असं मला वाटू लागलं होतं. मात्र, एके दिवशी मी उठलो, नाटकात काही चेंजेस केले आणि जे व्हायचं असेल ते होईल म्हणत पुढय़ात येईल त्याला सामोरा जायला सज्ज झालो. मोजक्या निमंत्रितांसमोर शून्य प्रयोग झाला. सर्वानाच प्रयोग खूप आवडला. मुक्तकंठाने साऱ्यांनी प्रयोगाची प्रशंसा केली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर शुभारंभापासून जाणकारांसह प्रेक्षकांनीही नाटक डोक्यावर घेतलं. पण अजूनही मला प्रयोगात नव्या नव्या जागा सुचत असतात. त्यानुसार तसे बदलही मी करत असतो. ही प्रोसेस अद्याप सुरूच आहे..’’ नाटकाची प्रक्रिया सांगताना फिरोझ खान त्यात बुडून गेले होते.

‘या नाटकाला निर्मितीखर्च किती आला? प्रत्येक प्रयोगाचा खर्च किती?’ या प्रश्नांची उत्तरं देण्याचं त्यांनी टाळलं. ‘निर्मात्यांच्या दृष्टीनं ते सांगणं उचित नाही,’ असं ते म्हणाले. परंतु तरी हा खर्च काही कोटींत झाला असणार यात शंका नाही. दोनेकशे जणांच्या टीमचे हे नाटक आहे. नाटकाची तिकिटे साडेसात हजारांपासून पाचशे रुपयांपर्यंतची आहेत. भाभा थिएटरची ११०० आसनसंख्येची क्षमता लक्षात घेता किमान तीसेक लाख रुपये तरी प्रयोगाचं उत्पन्न होत असावं. हाही रंगभूमीच्या दृष्टीने विक्रमच ठरावा. या नाटकाचा निर्मितीखर्च वसून व्हायला वर्ष लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. एनसीपीएमध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पंचवीसेक सलग प्रयोग सादर झाले आहेत. तेही हाऊसफुल्ल! यापुढे दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगलोर, कोलकाता येथे ‘मुघल-ए-आझम’चे प्रयोग होणार आहेत. परदेशातूनही त्याला मागणी आहे.

भारतीय रंगभूमीवर असे भव्य, दिमाखदार प्रयोग फार क्वचित झाले आहेत. ‘मुघल-ए-आझम’चं हे नजरबंदी करणारं स्वप्न पाहणाऱ्या फिरोझ अब्बास खान यांना मात्र आपलं हे नाटक ‘माइलस्टोन’ आहे असं वाटत नाही. ‘ते मोठय़ा स्केलचं म्युझिकल नाटक आहे, इतकंच!’ असं ते नम्रपणे सांगतात.

रवींद्र पाथरे ravindra.pathare@expressindia.com

Story img Loader