वडील सांगत असत, की ताई गाणं शिकवताना ऐकायलाच हवं. मीही ताईंकडे हट्ट धरला, की मला तुम्ही शिकवताना ऐकायचंय. ताईंनी झटक्यात ही मागणी धुडकावून लावली. अपेक्षितच होतं. कधीतरी भेट ठरली होती सकाळी अकराची. ताई वेळेच्या बाबतीत अतिशय चोखंदळ. पहाटेच फोन आला की, साडेदहालाच ये, म्हणून. धडपडत पोहोचलो. दार उघडलं गेलं आणि बसायला सांगितलंय, असा निरोप मिळाला. आतल्या खोलीत ताई गाणं शिकवत होत्या. वडील जे सांगत होते, तो अनुभव मी घेत होतो. अध्र्या तासानं ताई बाहेर आल्या. बराच वेळ गप्पा झाल्या. ताईंनी लवकर का बोलावलं, हे कळलं. पण त्यांनी त्याबद्दल उच्चारही केला नाही.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
kaanchi re kaanchi re
कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video

स्वर आणि ते व्यक्त करणाऱ्या कलावंतांच्या दंतकथा.. एवढाच आसमंत. त्यात किशोरीताईंचं असणं अपरिहार्य. कुमारजींनी त्यांचा सखा असलेल्या बाबूराव रेळे यांना पत्र पाठवायचं राहून गेलं म्हणून फक्त त्यांच्यासाठी कॅसेटमधून गाणं पाठवलं होतं.. भीमसेनजी स्वत: मोटार चालवत भारतभर भ्रमण करतात आणि मोटारीतून थेट स्वरमंचावर जाऊन तीन-चार तासांची मैफल सहजपणेजिंकतात.. मल्लिकार्जुन मन्सूर पहिल्याच स्वरात सगळी मैफील कशी कवेत घेतात, डॉ. वसंतराव देशपांडे हे स्वत: कसे थोर तबलावादक आहेत.. असं सगळं त्या आमच्या आकाशात साठवलं जात होतं. या दंतकथांच्या पलीकडे या सगळ्या कलावंतांना काही एका अंतरावरून ऐकायचं, हीच सर्वोच्च आनंदाची कल्पना. काय गातील आज? कसं होईल गाणं? आपल्या मनाच्या अगदी आतल्या कोपऱ्यात साठवून ठेवलेली स्वरचित्रं पुन्हा उमटतील? किशोरीताईंच्या मैफिलीची पहिली बातमी कळल्यापासून असे नाना प्रश्न घोंघावत राहायचे.

मैफील ठरल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत किशोरीताई कशातच नसायच्या. स्वरांचा अखंड ध्यास. सगळं जमून येईपर्यंतची त्यांची तगमग, अस्वस्थता, त्यातून आलेलं चिडचिडलेपण.. हे सगळं घडणार याचा अंदाज असला तरीही काहीतरी जगावेगळं घडावं, अशी मनोमन इच्छा ठेवून प्रत्येकजण जिवाचे कान करून त्या मैफिलीपर्यंत पोहोचायचे. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात सकाळ, संध्याकाळ आणि रात्र अशा तिन्ही प्रहरांच्या तीन मैफिली झाल्या. ऑगस्टचा महिना. पाऊस निथळत होता. आणि या तिन्ही मैफिलीत समोर बसलेला प्रत्येकजण स्वरचिंब होत होता. मध्यंतरानंतर ताईंना परत यायला वेळ लागला, म्हणून रसिकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ताई आल्या आणि त्यांनी या टाळ्यांचा खरपूस समाचार घेतला. आता काय होणार, अशा चिंतेत सारेजण. पण स्वरमंडल लावलं आणि भर दुपारी प्रत्येकजण स्वरांच्या चांदण्यांवर बसून विहार करू लागला.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यक्रमात ताई गायला बसल्या. सगळी सिद्धता झाली. गाणं सुरू झालं आणि ध्वनिक्षेपक त्रास देऊ लागला. आधीच रागाला शरण जाऊन आपणच राग होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ताईंनी त्रागा करायला सुरुवात केली. दोन मिनिटांनी थेट उठून विंगेत गेल्या. रात्रीची दहाची वेळ. आता ध्वनिक्षेपणाची नवी यंत्रणा कुठे मिळेल? नाही मिळाली, तर? हे प्रश्न संयोजकांच्या बरोबरीनं समोर बसलेल्या प्रत्येकाच्या मनात. बहुधा रद्द होणार असं वाटूनही कुणाचीही जागा सोडण्याची मात्र तयारी नव्हती. अध्र्या-पाऊण तासानं नवी यंत्रणा आली. ‘टेस्टिंग’ झालं. ताई आल्या. कानात प्राण आणणं म्हणजे काय असतं, याचा तो एक अनुभव होता. गाणं सुरू झालं आणि अवघ्या काही क्षणांत सगळेजण अशा एका भावावस्थेत पोहोचले, की काही वेळापूर्वी काय घडलं होतं, केवढी भीती होती, ताईंबद्दल मनातून आलेला थोडासा रागही होता, तोही आठवेनासा झाला. आपण या जगातच नाही आहोत, आपल्याला काहीतरी अतिशय अपूर्व अनुभवायला मिळतंय, अशा उन्मनी अवस्थेत मैफील संपल्याचंही लक्षात आलं नाही.

ताईंनी कधीतरी म्हणे समोर दिसणारं झाड त्रास देत असल्याची तक्रार केली होती आणि संयोजकांनी तीन-चार चादरी एकत्र करून ते अख्खं झाडच लपेटलं होतं.. एका ज्येष्ठ प्रकाशचित्रकाराने किशोरीताईंचं ‘फोटोसेशन’ केलं होतं आणि ते फोटो द्यायला ते ताईंकडे गेले, तेव्हा त्या झोपल्या होत्या, म्हणून त्या प्रकाशचित्रकाराने ते सगळे फोटो फाडून टाकले होते..

किशोरीताईंबद्दलच्या या आख्यायिका त्या काळात मैफल सुरू होईपर्यंत कुजबुजल्या जायच्या. आपलं गाणं कुणीही ध्वनिमुद्रित करता कामा नये असा त्यांचा दंडक होता. आणि त्यासाठी त्यांचे शिष्य मैफिलीत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असायचे, असं सांगितलं जायचं. एकूणच या कलाकाराच्या जवळ जाणं हे किती ‘धोकादायक’ आहे असं वाटत राहायचं. आणि एक दिवस थेट त्यांचाच आवाज फोनवर ऐकायला मिळाला. माझे वडील डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याशी बोलायचं होतं त्यांना. ते बोलणं सुरू असताना मीच मोहरून गेलो होतो. ताईंना रससिद्धांत, सौंदर्यशास्त्र आणि स्वरशास्त्र शिकायचं होतं आणि त्यांना त्यासाठी मदत हवी होती. नंतर बराच काळ ताई रात्री उशिरा फोनवर डॉ. संगोराम यांच्याशी तासन् तास बोलत राहायच्या. त्या संभाषणाची त्यांनी तयार केलेली टिपणं मग काही दिवसांत घरी यायची. ती तपासून पुन्हा ताईंकडे जायची. अशी ही फोन शिकवणी अनेक दिवस सुरू होती. ताईंना काय करायचंय हे सारं शिकून, असा प्रश्न मनात आला तरी तो विचारण्याची हिंमत नव्हती.

नंतरच्या काळात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचून थेट ताईंचा फोन आला आणि माझं कौतुक झालं. आपण पिसासारखे हलके झालो असून वाऱ्याच्या झुळकीबरोबर तरंगतो आहोत असं काहीसं वाटत राहिलं. ‘येऊन जा रे..’ अशी दटावणीही झाली. किशोरीताईंना भेटणं हा एक अनुपम सोहळा असे. त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे स्वत:ला समृद्ध करून घेण्याचा हमखास मार्ग. पुण्यात एकदा ‘घराणी कशाला हवीत?’ असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला आणि नंतर जाऊन त्यांच्याशी भांडण करायची इच्छा झाली. ताईंनी ओळखलं. म्हणाल्या, भांडायचं असेल तर घरी ये. घरी जाऊन तीन-चार तास त्यांच्याशी मोकळेपणी बोलण्याचं धाडस आपण करू शकू असं स्वप्नातही न वाटलेल्या मला ताईंनी इतकं प्रेमानं आणि आपुलकीनं शिकवलं, की भरून पावणं या वाक्प्रयोगाचा अर्थ सहजपणे उलगडला. ताई चिडक्या आहेत, अनपेक्षित आहेत, हे वर्णन करणाऱ्यांपैकी अनेकांना ताईंच्या स्नेहाद्र्र ओलाव्याचा अनुभव आला आहे. त्यांचं दटावणं, रागावणं हे मायेचंच रूप असतं, हे कळल्यावर मग त्यांच्याशी होणारा संवाद सुखाचा होत असे.

ताईंना एकदा पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’तली राजम्मानं सांगितलेली गोष्ट वाचून दाखवली. ‘मोराला पाहून नाचणाऱ्या लच्छीनं मोराला अंगणात बांधून ठेवण्याचा हट्ट केला, तेव्हा मोरच म्हणाला, मी इथंच राहीन जवळपास. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हा लच्छीनं आधी नाचलं पाहिजे. अट साधी होती. लच्छी कबूलही झाली. लच्छी मग आनंदीच राहू लागली. मोर कधी येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला की काय याचंही भान तिला राहत नसे. गोष्टीचं तात्पर्य होतं- मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं, ते ते आपणच व्हायचं..’ ताईंनी हे सारं मन:पूर्वक ऐकलं. म्हणाल्या, जो राग गायचा, तो रागच आपण व्हायला हवं. म्हणजे मग तो कुणी गायला, याला महत्त्वच राहत नाही. उरतो तो फक्त तो राग.

वडील सांगत असत, की ताई गाणं शिकवताना ऐकायलाच हवं. मीही ताईंकडे हट्ट धरला, की मला तुम्ही शिकवताना ऐकायचंय. ताईंनी झटक्यात ही मागणी धुडकावून लावली. अपेक्षितच होतं. कधीतरी भेट ठरली होती सकाळी अकराची. ताई वेळेच्या बाबतीत अतिशय चोखंदळ. पहाटेच फोन आला की, साडेदहालाच ये, म्हणून. धडपडत पोहोचलो. दार उघडलं गेलं आणि बसायला सांगितलंय, असा निरोप मिळाला. आतल्या खोलीत ताई गाणं शिकवत होत्या. वडील जे सांगत होते, तो अनुभव मी घेत होतो. अध्र्या तासानं ताई बाहेर आल्या. बराच वेळ गप्पा झाल्या. ताईंनी लवकर का बोलावलं, हे कळलं. पण त्यांनी त्याबद्दल उच्चारही केला नाही. मनस्वीपणाचा हा अनुभव आपलं आयुष्य भरून टाकणारा.

गेल्याच महिन्यात १९ मार्चला सकाळी अकराची वेळ ठरली. वेळेवर पोहोचलो. ताईंना आधी विचारलं, तर त्या म्हणाल्या, प्रश्न पाठव.

मग म्हणाल्या, जाऊ देत. तू ये. मग बघू. सकाळी अकरा ते दुपारी तीन अशी चार तास ती मैफील रंगली. एरवी कसल्याही रेकॉर्डिगला धाडकन् ‘नाही’ म्हणणाऱ्या ताईंनी त्या दिवशी बिभासला परवानगी दिली होती. खुशीत होत्या. भरभरून बोलत होत्या. आयुष्याचं स्वरसंचित समजावून सांगताना एरवी येणारं अवघडलेपणही नव्हतं त्यावेळी. आपल्या गाण्यात अभिजात भावरम्यता कशी आली, स्वर आणि लयीचा सुप्रमाणित मेळ असलेल्या जयपूर गायकीत हे भावदर्शन कसं आलं, त्यामागचा विचार काय होता, हे सारं घडत असताना आपल्याच कलेकडे तटस्थपणे पाहण्याची एक वृत्ती कशी तयार झाली, आपलीच कला आपणच तपासून पाहायला कशामुळे प्रवृत्त झालो, कलावंत म्हणून मैफिलीत जे काही घडतं, त्यामागे कोणकोणत्या प्रेरणा असू शकतात, त्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कशा असतात, गणिती पद्धतीनं हे संगीत कसं उलगडत नाही, आणि त्यामागे तो रागच कसा तुम्हाला खेचून घेत असतो..  असं बरंच काही.

ताईंच्या अवचित जाण्यानं आता शंका तरी कुणाला विचारायची, असा प्रश्न पडला आहे.

mukund.sangoram@expressindia.com