१८ जुलै २०१७. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एका मुलाने.. मन्मथने आपल्या जीवनाचा शेवट करून घेतला.. अगदी अकल्पितरीत्या. कोणत्याही माता-पित्याला या धक्क्य़ातून बाहेर पडणं अशक्यप्रायच. परंतु तरीही प्रचंड धीराने या दुखाला सामोरे जात त्यांनी मन्मथच्या सहवासातील उत्कट, रसरशीत क्षण जागवीत त्याला लिहिलेलं हे अनावृत पत्र.. ‘पोरक्या’ झालेल्या पालकांच्या अंत:करणातील वेदनेचा सल व्यक्त करणारं..!

प्रिय चि. मन्मथ,

..असा मायना सुरू करून पत्र लिहायला शाळेत आम्हाला शिकवायचे. तुला असं पत्र कधी लिहावं लागलं नाही, कारण तू सततच आमच्या सोबत होतास.. आपल्या घरी राहिलास. पत्र लिहायची वेळ आलीच नाही. तू तो टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हजारो जण भेटायला आले. तुझ्या आयुष्यात तुला भेटलेला जवळपास प्रत्येकजण भेटायला आला. हळहळला. धाय मोकलून रडला. आमचे हजारो स्नेही कुठून कुठून भेटायला आले. अनेकांनी फोन केले. मेसेजेस केले. सर्वत्र भयंकर पाऊस असताना लांब लांबहून आले. तुझ्याबद्दल, आपल्याबद्दल इतकं प्रेम आहे, इतक्या सदिच्छा आहेत, हे जर तुला आधी कळलं असतं तर थांबवला असतास का रे तुझा निर्णय? पण तू वेगळ्याच पिंडाचा होतास. या संकटात ज्या सगळ्यांनी आधार दिला, अगदी मनापासूनच्या सच्च्या भावना व्यक्त केल्या त्यांचे आभार मानायला शब्दच नाहीत. आपण किती माणसं जोडली याचा पुरावा मिळायला असा दिवस उजाडावा? लोकप्रियतेचं किती क्रूर कौतुक!

मीडिया, सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. सगळं काही- यश, सुबत्ता हाती असणाऱ्या जोडप्याच्या बुद्धिमान, सुसंस्कृत मुलाने हे का करावं? काहीजण म्हणाले, तुम्ही त्याला खूप शिस्त लावली. तितकेच इतर काहीजण म्हणाले, तुम्ही त्याला स्वातंत्र्य जरा जास्तच दिलं. काही म्हणाले, अपेक्षांचं ओझं त्याला पेलता नसेल आलं का? (पोराच्या पाठीवर थाप टाकून ‘‘बाळा, अभ्यास नीट कर, कष्ट कर, मोठा हो..’’ असं म्हणणं म्हणजे अपेक्षांचं ओझं टाकणं का? आणि ते ओझं असेल तर उद्यापासून आपण सगळे पालक मुलांना म्हणू या का- ‘‘बेटय़ाहो, जे बरं वाटतं ते करा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. जस्ट चिल!’’) काहीजण म्हणाले, हे दोघं कायम इतके व्यग्र, की त्याला वेळ देत नसणार. कुणीतरी महाराष्ट्राला सुनावलं, ‘‘मुलांकडे नीट लक्ष द्या, नाहीतर त्यांचा ‘मन्मथ’ होईल!’’

तू किती शहाणं बाळ होतास हे कसं सांगू या सगळ्यांना? तू, मी आणि मम्मू हेच फक्त आपलं जग होतं याचा आता कसा पुरावा देऊ?

तुझं आयुष्य तू मजेत जगलास. शेवटच्या क्षणी झाली असेल ती वेदना सोडली तर उभ्या आयुष्यात कसलीही व्याधी, वेदना, आजार, अभाव यांचा स्पर्श तुला झाला नाही. खूप आनंद लुटलास. भल्यामोठय़ा बंगल्यांमध्ये राहिलास. पुरं गाव लोटावं असे तुझे वाढदिवस साजरे होत. खाणंपिणं, कपडालत्ता काही कमी पडलं नाही. उत्तमोत्तम हॉटेलांत राहिलास. चित्रपट पाहिलेस. पुस्तकं वाचलीस. तुझ्या आवडत्या क्रिकेट-फुटबॉलच्या मॅचेस शाही बॉक्सेसमध्ये बसून पाहिल्यास. मम्मी-बाबाचा तर जीव की प्राण होतासच; आजी-आजोबा, काका-मामा सगळे तुला जीव लावायचे. असंख्य जणांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, तुझं कौतुक केलं. आणि तुझ्या लाजऱ्या नम्रतेनं ते तू स्वीकारायचास. आयुष्यात मिळणारं सुख, वैभव, प्रेम भागिले दु:ख, वेदना, चणचण यांचं गुणोत्तर (तुझ्या भाषेत ‘स्ट्राइक रेट’) काढलं तर तुझा स्ट्राइक रेट तुझ्या आवडत्या विराटपेक्षाही, कोणत्याही माणसापेक्षाही जास्त येईल. ‘मातृमुखी सदा सुखी’ हे वाक्य कित्तीदा तरी म्हणाले असतील सगळे तुझ्याकडे बघून!

मम्मीला किंचितही त्रास न देता तू जन्मलास. आम्ही म्हणायचो, ‘‘देवबाप्पाने स्पीड पोस्टने पार्सल पाठवलं आमचं. बंडल ऑफ जॉय.’’ तुझ्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांच्याही ऑफिसची मंडळी आली होती आणि त्यांच्यात वादावादी सुरू झाली. मम्मीच्या ऑफिसचे लोक म्हणाले की, हुबेहूब मॅडमसारखा दिसतोय. बाबाच्या ऑफिसचे लोक म्हणाले की, थेट आमच्या साहेबांसारखा दिसतोय! अगदी तेव्हापास्नं तू सर्वाना आनंदच वाटत गेलास.

तुला गोष्टी ऐकायला खूप म्हणजे खूप भयंकर आवडायच्या. आणि त्या खुलवून खुलवून तुला हव्या असायच्या. तुझ्या जन्मानंतर नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत ऊन दाखवायला मी तुला मांडीवर घेऊन बसायचो. आणि तू तुझ्या ‘चुळ्ळ’ शूमुळे माझी पँट ओली करायचास. नंतर अनेक वर्ष ही स्टोरी तुला खूप आवडायची. ‘बाबा, चुळ्ळ स्टोरी सांग,’ असं तू हजारदा तरी म्हणाला असशील. आणि पँट ओली झाली, गरम गरम काही तरी वाटलं- असा दचकल्याचा अभिनय मी केला की तू प्रत्येक वेळी तितकाच खदाखदा हसायचास. त्यातल्याच एके दिवशी सटवाईने तू माझ्या मांडीवर असताना तुझं प्राक्तन लिहिलं असेल का तुझ्या कपाळावर?

..पण तुला हे सटवाई, नियती, देव कधीच पटले नाहीत. तू झपाटय़ाने मोठा होत गेलास. मी तुला ओ. हेन्रीची ‘रोडस् टू डेस्टिनी’, मॉमची ‘अपॉइंटमेंट इन् समरा’ ही गोष्ट तुला आवडायचं त्या पद्धतीने सांगितली तेव्हा तू खूप विचारमग्नतेत ती ऐकलीस आणि म्हणालास, ‘‘बाबा, मला हे काही पटत नाही.’’ हॅरी पॉटरच्या जादूई विश्वानं तुला मोहून टाकलं. हॅरी पॉटरबद्दल कोणतंही क्विझ तू जिंकायचास. मम्मीला त्या क्विझमध्ये हरवायला तुला खास मजा यायची. इंग्लंडमध्ये आपण हॅरी पॉटर वर्ल्डला गेलो तेव्हा तू देहभान हरपून तिथे होतास. अनंत तास. तेव्हा आम्हाला कळायला हवं होतं कदाचित, की ते जादूचं मायावी जग हेच तुझं विश्व आहे. हॅरी पॉटरचे आई-बाबा त्याच्या लहानपणीच गेले होते, आणि आमचा हॅरी पॉटर त्याच्या लहानपणी गेला!

अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींत तुला मम्मीचा सल्ला लागायचा. एकदा तुझा दुधाचा दात पडला आणि तू बावरून गेलास. मम्मी बाहेरगावी मीटिंगमध्ये होती. तुला कोणी मित्रानं सांगितलं होतं, की तो छपरावर टाकावा लागतो किंवा कुंडीत पुरावा लागतो. मग फोनवर त्याविषयी अर्धा तास चर्चा झाली. अशा असंख्य गोष्टींवर रोज चर्चा व्हायच्या.. आणि मम्मीच्या समोर ऑफिसमध्ये बसलेल्यांची चांगलीच करमणूक व्हायची. इतकी बिझी बाई इतका वेळ तुझ्याशी सतत बोलत राहते, हे खूप जणांना आश्चर्याचं, कुतूहलाचं वाटायचं. पण आता मात्र महत्त्वाकांक्षी, कर्तृत्ववान स्त्रीच्या ‘आई’ म्हणूनच्या लायकीवरच सवाल उभा केला जातोय! तू, मम्मू आणि बाब्सीचं तिघांचं- फॅमिली ऑफ थ्री- काय विश्व होतं हे कसं कळू शकेल कोणाला? अगदी पहिल्या परीकथेपासून ते आपल्या दोघांनाही आवडणाऱ्या एनिड ब्लायटन ते हॅरी पॉटपर्यंतचा रोमांचकारी प्रवास आपण एकत्र केला. दर रात्री किमान एक-दोन तास आपले एकत्र वाचन आपल्याला आनंदून टाकायचे. मम्मीच्या दिवसातला तर तो सगळ्यात आनंदाचा वेळ असायचा.

दहावीला सगळे तुझे मित्र टय़ुशनला जात असत. पण तू मात्र, ‘अभ्यास मम्मी-बाबा तुम्हीच घ्यायचा,’ असं निक्षून सांगितलंस आणि मग आम्ही विषय वाटून घेतले. आणि खूप आनंदात आपण अभ्यास करायचो. जरा मोठा झाल्यावर मात्र तू म्हणायला लागलास, ‘‘बरं आहे रे बाबा, मम्मी हाऊसवाइफ नाही आहे ते. नाहीतर फार पीडत राहिली असती आपल्याला.’’ जंगलातलं झाड बागेतल्या झाडापेक्षा जास्त जोमाने आणि बेदरकारपणे वाढतं कदाचित.

मामाबरोबर दिवसभर मॉलमध्ये हुंदडायला तुला आवडायचं. माझ्याशी अनेक खेळ तुला खेळायचे असायचे. आपण एका टीममध्ये जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा मी तुला नॉन स्ट्राइकर एंडनी म्हणायचो, ‘‘मनु, जरा वेगात खेळ. वीसच ओव्हरची मॅच आहे.’’ तू म्हणायचास, ‘‘हो रे बाबा, डोन्ट वरी.’’ आता असं सांगून गेला आहेस का, की ‘‘डोन्ट वरी बाबा, ही खेळी अठराच वर्षांची होती. ती खेळून मी चाललो.’’ माझं आय. आय. टी.त असणं, ब्रिज खेळणं, सुडोकू, शब्दकोडी, ब्रेन-टीझर्स सोडवण्याच्या माझ्या आवडीवर तू माझी टिंगलटवाळी करायचास, ‘‘बाबा, काय ते कोडं घेऊन बसला आहेस? त्यापेक्षा माझी स्टोरी ऐक!’’ पण जाताना मात्र आयुष्यभर पुरेल असं एक कोडं घालून गेलास!

तू खूप वेगळा होतास. आणि तुझ्या डोक्यातले विचार काळ्यागर्द आकाशात अचंबित करणारी फटाक्यांची आतषबाजी व्हावी तसे होते. अफाट वाचलंस. लिहिलंस. जवळपास प्रत्येक उत्तम इंग्रजी चित्रपट तू पाहिलास. आपली मध्यमवर्गीय मुळं, तुझ्या आजूबाजूचं दक्षिण मुंबईचं भपकेबाज जीवन, त्यातला विरोधाभास, कट्टर धर्मसंस्कृती, भ्रष्टाचार, राजकारण, नोकरशाही, गुन्हेगारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सत्प्रवृत्ती, ज्यूंचा नरसंहार, इ. इ. असे अनंत विषय तुला नको तितक्या झपाटय़ाने माहीत होत गेले. त्यावर तुझी परखड, स्वतंत्र मतं बनत गेली. जेव्हा मागच्या महिन्यात आपण तुझी हस्तलिखितं घेऊन दिल्लीला प्रकाशकांकडे गेलो तेव्हा ते अवाक्  झाले. हे इतकं जगणं तू कधी, कुठे पाहिलंस हे त्यांना कळेना. सतरा वर्षांच्या या पोरात ही वयाहून कितीतरी पट अधिक जाण कुठून आली, हे त्या दीर्घ अनुभवी प्रकाशकालाही समजेना. तुझं लिखाण आपण नक्की प्रसिद्ध करू. ते वाचून कोणाला तरी कदाचित कळेल, की तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं? तुझी अफाट प्रतिभा तेव्हा सर्वासमोर येईल. कांचनगंगा शिखराकडे आपण एकत्र पाहत होतो.. लॉर्डस्, चेल्सी, वानखेडेवर तुला आवडणाऱ्या मॅचेस पाहत होतो.. तसल्या रसरशीत क्षणीही तू स्वत:च्याच विचारविश्वात गुंग होतास का रे?

तुला अपयश कधी पाहावं लागलं नाही. व्हायचं तर लेखकच! पण करिअर म्हणून मम्मीप्रमाणे कायद्याचं प्रशिक्षण घ्यायचं, हे तू खूप आधी पक्कं केलंस. तू एकदा एखादी गोष्ट मनाशी पक्की केलीस की त्यात बदल होणं अशक्यप्रायच. (थोडा कमी निग्रही असतास तर किती बरं झालं असतं रे!) मग उत्तम मार्क मिळून तुला हव्या असलेल्या सिम्बॉयोसिसमध्ये तुला प्रवेश मिळाला. आपण सगळे हरखून गेलो. आदल्याच संध्याकाळी आपण तुझ्या आवडीच्या हॉटेलात जेवायला गेलो. पण तुझ्या आनंदून जाण्यातही एक दूरस्थता असायची. जणू काही तुझ्या आजूबाजूचं प्रत्यक्ष जग आणि तुझ्या भावविश्वातलं तुझं स्वत:चं जग हे एकमेकांपासून हजारो योजनं दूर असलेले स्वतंत्र ग्रह असावेत.

मम्मी आणि मला समुद्र, जंगलं, पर्वत असा निसर्ग फार आवडतो. आपली अशी प्रत्येक सुट्टी तुला हट्टाने हवी असायची. पण तुझा पिंड खरंच खूप वेगळा होता. स्टीफन किंग, फाईट क्लब, जिलियन फ्लिनचं ‘गॉन गर्ल’ असं आभासी, काळं-करडं प्रतिमाविश्व तुला भावायचं. त्यांच्या धर्तीवरचा एक मोठा लेखक होणं हे तुझं स्वप्न होतं. तुझ्या ‘हेवन स्टोरी’मध्ये तू स्वर्गाचं खूप बारकाईनं वर्णन केलं होतंस. त्यात कोण कोण लोक जातील, तिथले नियम काय काय असतील, यावर तुझा सतत विचार चालायचा. आपल्या आजूबाजूच्या, इतिहासातल्या प्रसिद्ध व्यक्तींविषयी तू आमच्याशी तासन् तास बोलायचास.. त्यांनी किती चांगलं केलं, किती वाईट केलं.. आणि मग विचारपूर्वक सांगायचास, की याला स्वर्गात पाठवलं पाहिजे, त्याला नरकात पाठवलं पाहिजे. मग त्या कारणमीमांसेवर आपली चर्चा व्हायची. प्रसंगी खडाजंगी व्हायची. मग त्यात पुन्हा श्रेणी विभाजन. कुणाला कडक, कायम नरक, कुणाला हलकासा नरक. कुणाला जेमतेम स्वर्ग. आणि कुणाला बावनकशी स्वर्ग! तू ज्या कोणत्या स्वर्गात गेला आहेस त्या स्वर्गात तू खूप सुखी राहा बाळा!

आम्हा दोघांबद्दलही तुझी खूप स्वप्नं होती. आमचा तुला खूप अभिमान होता. मम्मी-बाबा काहीही करू शकतात, हा लहान मुलाचा आत्मविश्वास तुला होता. तुला आवडणारी अशी एखादी वस्तू अचानक आणून देऊन तुला सरप्राइज द्यायला आम्हाला खूप आवडायचं. ते पाहून तुझे डोळे चमकायचे आणि उत्स्फूर्तपणे तू म्हणायचास, ‘‘थँक्यू, मम्मी-बाबा.’’ मग मी खोटं खोटं रागावून डोळे वटारून तुला म्हणायचो, ‘‘मनु, मम्मी-बाबाला थँक्यू, सॉरी म्हणतात का?’’ मग जाताना का इतकं मोठ्ठं सॉरी म्हणून गेलास रे? मम्मी-बाबाच्या प्रॉमिसवर तुझा फार भरवसा असायचा. आम्ही ठामपणे काही प्रॉमिस दिलं की तू लगेच निश्चिंत व्हायचास. आमच्या चेहऱ्यावर जराही चिंता, विवंचना दिसली की तू कावराबावरा व्हायचास. पण आता आम्ही तुला प्रॉमिस देतो, की या मोठय़ा धक्क्यातून आम्ही पुन्हा उभे राहू आणि तुला जसे नेहमी हवे असायचे तसे शांत, निश्चिंत मम्मी-बाबा दिसू.

हे असं का झालं? या प्रश्नाला काहीच उत्तर नाही. देव अपार दु:ख देतो, तसं ते सहन करण्याची ताकदही देतो. जितकं ओरबाडून नेतो, तितकंच भरूनही देतो.

‘क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा।

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।।’

हेच शेवटी खरं!

कायम तुझेच..

मम्मी, बाबा