‘नभ भरून आले केव्हाचे’ हा कवी सुहास तांबे यांचा कवितासंग्रह पुण्याच्या उत्कर्ष प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. लेखाच्या शीर्षकाप्रमाणेच तांबे यांच्या अबोध मनात भरून राहिलेल्या कवितेला गेल्या चार-पाच वर्षांपासून उद्गार मिळालेला आहे. चार्टर्ड अकाऊंटंट नि गेली तीनेक दशके अमेरिकेत असणाऱ्या या कवीच्या मनात कविता होतीच. पण स्वीकारलेल्या जीवनप्रवासात नि आखून घेतलेल्या अग्रक्रमांच्या भाऊगर्दीत ती त्यांनी कागदावर नेटाने उतरवली नव्हती. व्यक्त होण्यालाही विशिष्ट काळ यावा लागतो, हेच खरे. सुहास तांबे हा एक नाटकवेडा माणूस. ‘पुरुषोत्तम करंडक’पासून सुरू झालेला नाटय़प्रवास पुढे थिएटर अॅकॅडमी, ड्रॉपर्स ते थेट शिकागोतील बेसमेंट थिएटरमध्ये मुशाफिरी केलेल्या या व्यक्तीने चार नाटके, बारा एकांकिका, काही लघुकथा नि हिंदी टी.व्ही. मालिकेसाठी लेखन असे विविध प्रकारचे लेखन केलेले आहे. योग-सूत्रांवरही त्यांचा एक ग्रंथ आहे. या सगळ्या पसाऱ्यात एकाएकी कविता त्यांना सापडली आणि हा संग्रह साकार झाला.
‘सुखाने मनाची धुनी जागवावी,
वृथा काळजीने मने खंतवावी,
मना कच्छपि काय लाचार व्हावे,
मनाने मनाशीच परके रहावे’
मनाचा मनाशी संवाद साधतानाच कवीला मौनात सखी कविता भेटली नि पहिलटकरणीच्या हुरहुरीने त्यांनी स्वत:मधून नवजात सर्जनाला शब्दरूप दिले.
कवीच्या अभिव्यक्तीतील भाषिक संस्कार, कवितेशी जडलेले नाते, शब्दांची लय नि लळा यांचे जे प्रतिबिंब-कवडसे पडले आहेत, ते त्यांच्या बालपणातील भाषिक व शालेय संस्कारांत दडलेले असावेत. ओंजळीतून निसटणाऱ्या या श्रेयसाबद्दल ते लिहितात-
‘उपरे जीवन विपरित माझे
काही हसले बाकी फसले,
जगण्याचेही नाटक सहजी
टाळ्यांमधुनी खपून गेले,
इथे पाहुणा तिथे अनामिक
उसने मीपण जमून गेले,
रहस्य माझे स्वत:चपाशी
हरवुन कैसे परके झाले..’
कवितेचा ‘कान’ सतत सजग ठेवल्याने लय-तालाचे अंगभूत भान या कवितेत उतरून येते. प्रेमाचे नानाविध रंग त्यांच्या कवितेत आहेत. ‘प्रेमात पडल्याशिवाय काहीच होत नाही, कवितासुद्धा..’ हा त्यांना झालेला साक्षात्कार आहे. ही कविता भावपूर्णही आणि परखड, थेटही आहे. म्हणूनच ‘थोडा थोडा मरतो मी रोज जगता जगता..’ हे विदारक सत्य तो पचवतो.
शब्दलालित्य, कलात्मक शब्दजुळणीचा कवीला मोह पडतो. ‘धनसुंदर या, विहंगनयनी’ असे काही शब्द कवीने ‘कॉइन’ केलेत. तर अनुप्रास, श्लेष, उपमा यांची तो पखरण करतो. कवितांना शीर्षके नाहीत. शिवाय बऱ्याच ठिकाणी विरामचिन्हे नाहीत. त्यामुळे वाचताना थबकायला होते. काही रचनांतून पूर्वसुरींचे श्रुतयोजन जाणवते, तर काही चक्क विडंबनं!
‘हे मुलांनो, गुंड व्हा, मातीचा उन्माद घ्या
अन् पावसाने चिंब व्हा..ठेच खा उघडून डोळे,
वेदना विसरू नका, तोच तो उपदेश घ्या
पण अनुभवाने सिद्ध व्हा..’
कुसुमाग्रजांची ‘हे सुरांनो, चंद्र व्हा..’ ही रचना इथे खचितच स्मरते. तसेच ‘दिसलीस तू भुलले ऋतू..’, ‘मन मनास मानत नाही..’ यांतून सुधीर मोघे दिसू लागतात. ‘खुळ्या खुळ्या मंडळीत माझा, अजूनही वेळ जातोच आहे..’ यात सुरेश भट जाणवतात. कवी वास्तवाला सहज सामोरे जातो. ‘आहे हे असे आहे’ असे म्हणत आल्या दिवसाला भिडतो. त्यांच्या कवितेत पाडगावकरी, मर्ढेकरी नि विंदा करंदीकरी आणि सुधीर मोघेंची झाक जाणवते.
‘पायांना रस्ते भेटले, तेव्हा तोल भांबावला,
भान भुरटे झाले, जीव गुलाम झाला’
सुहास तांबे यांच्या विचारांचा ओघ अंतिमत: तत्त्वचिंतनाकडे जातो. ‘कोऽहम्’च्या शोधातूनच अस्तित्वाचा मागोवा ते घेतात. दूरदेशी वास्तव्यास असल्याने स्वदेशाच्या नि स्वदेशींच्या आठवणींनी कवी व्याकूळ होतो..
‘श्वास निघाले दूर देशीच्या परक्या हुंगत वेशी,
मन जखडले उगा जिव्हारी नाती ऐशीतैशी,
स्पर्शही बहिरा आस आंधळी घेऊन लाज उशाशी,
पछाडलेल्या गात्रांची मग उठवळ भूक उपाशी..’
बाहेर कितीही कोलाहल असला तरी शांत, समंजस राहण्यातले शहाणपण कवीकडे आहे. त्यामुळेच त्याची प्रतिभा मौनाची, शब्दांची, फुलांची, विरहाची, पाप-पुण्याची, मदिरेचीसुद्धा कविता लिहिते. कवी रमण रणदिवे यांची प्रस्तावना कवितांचे सार्थ मूल्यमापन करते. सातासमुद्रापलीकडे राहणारा हाच कवी मायमराठीची गोडी वर्णन करतो-
‘ईश्वरी ज्ञानेश्वरी, गाथा तुक्याची अंतरी,
दासबोधे धीट केली ही मराठी वैखरी,
मायबोलीची बीजे विश्वात आता पेरूया..’
मायमराठीला विश्वव्यापक करू इच्छिणाऱ्या या कवीचे ‘नभ भरून आले केव्हाचे’ असेच म्हणावे लागेल.
‘नभ भरून आले केव्हाचे’- सुहास तांबे,
उत्कर्ष प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ६२, मूल्य- १२० रुपये.
आश्लेषा महाजन ashleshamahajan@rediffmail.com
काव्यसंचिताचा सहजोद्गार
चार्टर्ड अकाऊंटंट नि गेली तीनेक दशके अमेरिकेत असणाऱ्या या कवीच्या मनात कविता होतीच.
Written by आश्लेषा महाजन
आणखी वाचा
First published on: 14-08-2016 at 01:49 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nabha bharaun ale kevhache book reviews