यंदा पावसाने पाठ फिरवल्याने महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण संकटात सापडला आहे. रोजचा दिवस मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांनी उजाडतो आहे. सरकारचे शब्दांचे खेळ शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे ठरत आहेत. तर विरोधी पक्षही या प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेत आहेत. अशावेळी आपदग्रस्त शेतकऱ्यांना वाली कोण? नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत या पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम आरंभिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आता व्यवसायामुळे मुंबईकर झालो असलो तरी मी मूळचा मराठवाडय़ाचा. बीड जिल्ह्य़ातला. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. पुढे पदवी शिक्षण मी औरंगाबादमधून पूर्ण केले. त्यानंतर मुंबईत आलो. नाटक, सिनेमा आणि टी. व्ही. क्षेत्रात स्वत:चा जम बसवण्यासाठी धडपडू लागलो. गावाकडच्या आणि मुंबईच्या जीवनमानातील तफावत त्याचक्षणी माझ्या लक्षात आली. आयुष्यातला महत्त्वाचा कालखंड गावात गेल्यामुळे तेथील समाजजीवनाची मला चांगलीच कल्पना होती. माझे मित्र, नातेवाईक आणि अनेक परिचितांकडून गावातील हकिकती समजत होत्या. आमच्या भागात पावसाची कायम अवकृपा असते. पावसाने दगा दिल्यावर अल्पभूधारक शेतकऱ्याची काय अवस्था होते, हे शब्दात मांडणे कठीण आहे. शेतात काहीही न पिकणे याचा थेट संबंध त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी निगडित असतो. आता वर्षभर काय खायचे, हा प्रश्न त्या कुटुंबप्रमुखासमोर आ वासून उभा असतो. आधीच घेतलेले पीककर्ज न फिटल्यामुळे पुन्हा कर्ज मिळण्याची सुतराम शक्यता नसते. उलट, दुष्काळाशी तोंड देत असलेल्या त्या शेतकऱ्यावर सावकाराचे कर्ज फेडण्याचेही दडपण असते. त्यातून मग आपल्या या अशा हतबल आयुष्याविषयी वाटणारी आत्यंतिक घृणा आणि कमालीच्या निराशेपायी शेतकरी आत्महत्या करतात. पोट भरलेले असेल तर कुणी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या की मन अस्वस्थ होत होते. त्यावेळी मीसुद्धा मुंबईत स्वत:चे बस्तान बसविण्यासाठी धडपडत होतो. स्ट्रगलर होतो. त्यामुळे खूप इच्छा असूनही या शेतकऱ्यांसाठी काही करता येत नव्हते..
२००२ मध्ये ‘टिकल ते पोलिटिकल’ या प्रचलित राजकीय आणि सामाजिक घटनांवर उपहासगर्भ टीकाटिप्पणी करणाऱ्या टी. व्ही. मालिकेत श्याम पेटकरने विदर्भातील शेतकऱ्यांची (ज्यांना तिथे ‘कास्तकार’ म्हणतात!) व्यथा मांडणारा एक प्रवेश लिहिला होता. तो सादर करता करता मला एकाएकी रडू फुटले. माझी प्रचंड घुसमट झाली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी तो प्रसंग तसाच चित्रित केला. एडिट केला नाही. ते रडणे हे आतून आले होते. शेतकऱ्यांची विपरित अवस्था माहिती असूनही आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, हा मनात कुठेतरी खोलवर सलही डाचत होता.
पुढे मकरंद अनासपुरे म्हणून बऱ्यापैकी नाव झाल्यावर मी ही समस्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. खूप जणांकडून लिहून घेतले. मात्र, मनासारखे काही जमत नव्हते. अखेर मी, सयाजी शिंदे आणि काही मित्रांनी सिनेमाची जुळवाजुळव केली. माझा मित्र श्रीकांत सराफ याने शीर्षक सुचवले- ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’! या चित्रपटातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण २००९ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, नेमक्या त्याचवेळी स्वाईन फ्ल्यूमुळे तीन दिवस सिनेमागृहे बंद होती. त्यामुळे दुर्दैवाने चित्रपट फारसा चालला नाही. चालला नाही यापेक्षा त्यातून दिलेला संदेश लोकांपर्यंत नीट पोचला नाही याचेच जास्त वाईट वाटले. मात्र, त्याचदरम्यान प्रदर्शित झालेला ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा सिनेमा मात्र चांगलाच हिट् झाला.
या पाश्र्वभूमीवर तीन-चार महिन्यांपूर्वी पहिल्यांदा नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचा मनोदय माझ्याकडे व्यक्त केला. त्यांच्यावतीने कोणताही गाजावाजा न करता मी ही मदत पोहोचवावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यावर मी म्हणालो, ‘मी पण मदत देणार. मात्र तुम्हालाही सोबत यावे लागेल.’
आमच्या कलावंतांचा ‘चव्हाटा’ नावाचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. त्यावर गायिका रंजना जोगळेकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी एक पोस्ट टाकली होती. त्यावर मी माझी काही निरीक्षणे नोंदवली. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यथेविषयी केवळ कोरडी सहानुभूती व हळहळ व्यक्त करण्याऐवजी त्यांना त्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, हा विचार त्यातून पुढे आला. या उपक्रमासंबंधात चव्हाटा ग्रुपवरील कलावंत मंडळींची मुंबईत रवींद्र नाटय़गृहात एक मीटिंग झाली. त्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एखादा कार्यक्रम करता येईल का, असा विचार काहींनी मांडला. परंतु हा सगळा प्रकार फारच वेळ खाणारा असल्याने त्यापेक्षा आपणच आपल्या खिशातून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारूया असे मी सुचवले. नाना पाटेकर अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये अनेक वर्षे कार्यरत आहेत. आपणही जर त्यात सहभागी झालो तर मोठे कार्य उभे राहू शकेल असे मत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केले. निधीउभारणीच्या आवाहनास प्रतिसाद देत सयाजी शिंदे, नितीन नेरूरकर, पुरुषोत्तम बेर्डे, दिलीप प्रभावळकर, रेणुका शहाणे, जितेंद्र जोशी, गिरिजा ओक, रोहित हळदीपूरकर आदी कलावंतांनी लगेचच मदतीचे हात पुढे केले.
पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाडय़ातील या वर्षी आत्महत्या केलेल्या ६० शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या याद्या मागवल्या. मराठवाडय़ातच तब्बल ११२ जणांची यादी होती. त्यातील ६० कसे निवडणार? ते योग्य दिसले नसते. नाना पाटेकर म्हणाले, ‘पैशांची काळजी करू नका. मी पाहतो.’ मात्र माझे म्हणणे पडले, ‘आपण १५ हजाराऐवजी प्रत्येक आपदग्रस्त शेतकऱ्याच्या वारसाला १२ हजार रुपये मदत देऊ. उर्वरित रक्कम लोकवर्गणीतून गोळा करून देऊ या.’
कोणताही गाजावाजा न करता बीडमधील एका मंगल कार्यालयात हा समारंभ झाला. सभागृह जेमतेम अर्धेच भरले होते. मात्र, या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी गौतम खतोड यांनी एक लाख १२ हजार रुपये या उपक्रमासाठी दिले. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या वारसाना १३ हजार २०० रुपये देता आले. १३ हजार रुपये मदत आणि २०० रुपये त्यांचा प्रवासखर्च!
दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये असाच मदतवाटप कार्यक्रम झाला. तिथे ६२ जणांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात आले. या उपक्रमात पडल्यानंतर हा प्रश्न किती भीषण आहे याची प्रकर्षांने जाणीव होऊ लागली. बीडच्या कार्यक्रमात दोन महिन्यापूर्वीच पतीचे निधन झालेल्या ज्योती मोराळेताईंनी नाना पाटेकर यांच्या ‘क्रांतिवीर’ सिनेमातील एका प्रसंगाची आठवण उपस्थितांना करून दिली. त्या प्रसंगात आपल्या आईची गुंडांच्या तावडीतून सुटका करावी या अपेक्षेने आलेल्या मुलास सिनेमातील क्रांतिवीर नाना ‘आज मी वाचवेन; पण उद्या काय?’ असा प्रतिसवाल करतो. परतीच्या प्रवासात नाना पाटेकरांसह आम्ही सर्वच जण अंतर्मुख झालो होतो. आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करीत असलेली मदत ही तात्पुरती मलमपट्टी आहे याची आम्हाला जाणीव होतीच; ती या प्रसंगानंतर अधिकच टोकदार झाली. मुंबईत परतल्यावर आणखीही बऱ्याच मित्रांनी मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे बीडप्रमाणेच मराठवाडय़ातील इतरही सर्व जिल्ह्य़ांमधील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार जालना, औरंगाबाद, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्य़ांतील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांचा शोध आम्ही घेतला. त्या- त्या जिल्हा प्रशासनाने त्यासाठी साहाय्य केले. लातूर, नांदेड आणि औरंगाबादला जाहीर कार्यक्रमात मदतीच्या धनादेशांचे वाटप केले गेले. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. राजाभाऊ शेळके, भागवत चाळक, अरविंद जगताप, विलास चामे, चंद्रकांत मोरे, प्रा. अरगडे, शिवाजी घोणसे-पाटील आदींचा त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आम्ही शेतकऱ्यांच्या याद्या मुंबईत मागवून घेतल्या. त्यांच्या वारसांचा शोध घेतला.
काही ठिकाणी यादीमध्ये चुकीची नावे होती. उदा. खरे नाव ‘कमळाबाई’ असताना यादीत तिचे नाव ‘कोमलबाई’ असे होते. अशावेळी काहींना थेट रोख रक्कम दिली. लातूरमधील समारंभात ११२ जणांना प्रत्येकी १५ हजार २०० रुपये दिले, तर नांदेडमध्ये २०३ जणांना प्रत्येकी १५ हजार ३०० रुपयांची मदत दिली. नांदेड मोठा जिल्हा आहे. खूप लांबवरून लोक आले होते. त्यामुळे प्रवासखर्च म्हणून त्यांना शंभर रुपये जास्तीचे दिले.
अर्थात या साऱ्या उपक्रमाचा हिशेबाचे काम अजून सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आमची कामे सांभाळून हे करतो आहोत. अशा प्रकारच्या कामाचा आम्हाला कसलाही पूर्वानुभव नाही. फक्त उत्स्फूर्त अंत:प्रेरणेतून आम्ही हे काम करतो आहोत.
मलमपट्टीनंतर आता ठोस उपाय
वरवरच्या मलमपट्टीपुरता हे काम मर्यादित ठेवायचे नाही, हे आम्ही आधीच ठरवले होते. त्यानुसार आता पुढची पावले उचलली जात आहेत. या अभियानासाठी नाम फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमात डॉ. अविनाश पोळ यांच्यासारख्या जलतज्ज्ञाचे मार्गदर्शनही आम्ही घेत आहोत. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाय शोधता येतील का, याबाबत विचारमंथन सुरू आहे. अजूनही खूप लोक स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिताहेत. पुढील महिन्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात विदर्भ आणि खान्देशातील सर्व जिल्ह्य़ांत अशा प्रकारची मदत तेथील गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
हवेत.. कार्यकर्ते आणि स्वयंसेवक
या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याकरता फक्त पैसे गोळा करून भागणार नाही. या भागात पुनरुत्थानाची चळवळ उभी करण्यासाठी फार मोठय़ा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी निरपेक्षपणे काम करू इच्छिणारे कार्यकर्ते व स्वयंसेवकांची गरज आहे. मात्र, या स्वयंसेवकांना कोणतेही मानधन देता येणे शक्य होणार नाही. दुष्काळग्रस्त भागात स्वेच्छेने काम करताना राहण्या-जेवणाचा खर्चही ज्याचा त्याने करायचा आहे. आपापल्या आवडीनुसार प्रत्येकजण काम करू शकतो. तशा टीम्स बनविण्याची योजना आहे.
एक अनुभव.. चीड आणणारा
लातूरच्या कार्यक्रमातील एक अनुभव नमूद करण्याजोगा आहे. या समारंभात अनिता भिसे ही १३ वर्षांची मुलगी वारस म्हणून मदतीस पात्र होती. आई-वडील दोघेही नसलेल्या अनिताला चार लहान भावंडं आहेत. धनादेशावर तिचे नाव चुकीचे होते. त्यामुळे आम्ही तिला रोख रक्कम देण्याचे ठरवले. मात्र, तिने ती न स्वीकारता धनादेशानेच मदत स्वीकारण्याचा आग्रह धरला. तिने त्या घाईत माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. मी घरी आल्यावर त्या मुलीचाच विचार करीत होतो. मी तिने दिलेली चिठ्ठी शोधून वाचली, तेव्हा कळले की तिचे काकासोबत जॉइंट अकाऊंट होते. अनिता आणि तिच्या भावंडांचे पालनपोषण तिची आजी करते. असे असताना काकाचा डोळा मात्र जॉइंट अकाऊंटवर..?
तरीही उरते अस्वस्थता..
आता या चळवळीबद्दल खूप काही बोललं जाईल. वृत्तवाहिन्यांवर चर्चा होईल. वर्तमानपत्रांमधून लेख येतील. आमच्यावर कदाचित टीकाही होईल. काहीजण प्रेमाने बोलतील. आम्हाला देवत्व देण्याचाही प्रयत्न होईल. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून या प्रश्नाकडे बघेल. असं सगळं काही झालं तरी या सगळ्यातून काहीतरी सकारात्मक निष्कर्ष व मार्ग निघेलच निघेल. सर्वाच्या अशा एकत्र येण्याने हरवलेली माणुसकी नक्कीच पुन्हा सापडेल याची आम्हाला खात्री आहे. परंतु सहा महिन्याच्या वयात बाप सोडून गेल्यावर २३ वर्षांच्या आईने कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्यापुरतं बिलगलेल्या मुलीला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच कदाचित हीसुद्धा आपल्याला कायमची सोडून जाईल, या भीतीने तिला घट्ट गळामिठी घालून आर्त, केविलवाण्या स्वरात रडणाऱ्या त्या मुलीचं काय करायचं?
कुणी सांगाल का प्लीज..?
मकरंद अनासपुरे
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या या मदतकार्यात स्वेच्छेने साहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी ‘नाम फाऊंडेशन’ला आर्थिक मदत केल्यानंतर त्या पावतीची फोटोकॉपी पुढील मेलवर पाठवावी; जेणेकरून त्यांना मदत पोहोचल्याच्या खात्रीचा ई-मेल पाठवता येईल. ऑनलाइन पैसे भरल्यास त्यासंबंधित बॅंकेकडून आलेले कन्फर्मेशन मेसेज अथवा ई-मेल फॉरवर्ड करावा. संपर्क ई-मेल : naamfoundationmh@gmail.com
Nam Foundation
SBI Current Account No. 35226127148
IFSC Code no. SBIN0006319
SWIFT Code no. SBININBB238
शब्दांकन : प्रशांत मोरे