‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील ‘आडवाटेची पुस्तकं’ हे निखिलेश चित्रे लिखित पुस्तक लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील लेखकाच्या मनोगतातला संपादित अंश..

मी का वाचतो? या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर ‘आनंदासाठी’ असं देता येईल. परंतु वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकाच्या आत अनेक सूक्ष्म बदल घडत असतात. पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच, पण त्याचबरोबर तो जैविक, भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो. हा संवाद लेखक आणि वाचक दोघांच्याही क्षमतेवर अवलंबून असतो. पुस्तकं केवळ आनंदच देतात असं नाही, वेळप्रसंगी भक्कम आधारही देतात.

When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate : प्राचीन वारसा असलेल्या वास्तू परत घेण्यात गैर काय? योगी आदित्यनाथांचा प्रश्न
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
Disruption, entrepreneur, startup ,
 Disruption- मन्वंतर: प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 
Amitav ghosh,
बुकबातमी : लेखकाच्या सर्व छटा…

ऐन विशीत असताना जॉन स्टुअर्ट मिल निराशेच्या गत्रेत सापडला होता. त्याच्या आत्मचरित्रात त्यानं या अनुभवाचं अस्वस्थ करणारं वर्णन केलेलं आहे. त्यात तो म्हणतो, ‘आनंदाच्या अनुभूतीविषयी मनाला एक विचित्र बधिरता आली होती. एरवी आवडणाऱ्या किंवा आनंददायक वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे मला आनंद तर वाटेनाच, उलट त्यामुळे मी जास्तच अस्वस्थ होत असे.’ या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. प्रदीर्घ उदासीनं त्याला पुरतं वेढून टाकलं. त्याचा दिनक्रम आणि रोजचे व्यवहार सुरू होते, पण यांत्रिक कोरडेपणानं. त्यातून भावना हद्दपार झाल्या होत्या. ही वेदनादायक अवस्था सुमारे दोनेक र्वष टिकली. नंतर मग हळूहळू ती ओसरत गेली. त्यात मिल त्या वेळी वाचत असलेल्या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचं त्यानं लिहून ठेवलंय. त्यातही वर्डस्वर्थच्या कवितांचा मोठा वाटा होता. त्याविषयी तो म्हणतो, ‘या कवितांमुळे मला माझ्या आतल्या आनंदाचा स्रोतच गवसला. एक सहानुभाव जाणवला. त्यातला आनंद सर्व मानवजातीला कवेत घेणारा आहे अशी लख्ख जाणीव झाली. शांत चिंतनात खरा आणि चिरस्थायी आनंद असतो हे त्या कवितांनी दाखवून दिलं. सर्व मानवजातीच्या भावनांचं निगडित असणं मला वर्डस्वर्थनं शिकवलं.’

या अनुभवातून मिलनं ललित साहित्याच्या महत्त्वाच्या गुणधर्माकडे लक्ष वेधलेलं आहे. निराशेच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाचकाला ते मदतीचा उबदार हात देतं. इतर समानधर्मी वाचकांशी जोडतं. आपल्या आतलं आणि भोवतालचं जग अधिक समंजसपणे समजून घ्यायला शिकवतं. याचा अर्थ साहित्य म्हणजे मानसोपचार केंद्र किंवा व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आहे असा नाही. मात्र साहित्यातून जगण्याचं आकलन समृद्ध होत असल्यामुळे त्यात वाचकाला आतून बदलण्याची ताकद असते. म्हणूनच साहित्याकडे आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग म्हणून पाहणारा तथाकथित सामान्य वाचक वाङ्मय व्यवहार जिवंत ठेवण्यात अकादमिक समीक्षकापेक्षा महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

लेखकाच्या जगण्याविषयीच्या ज्ञानातून साहित्य आकारतं. साहित्य जे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतं, ते मानवी अनुभवाचंच संस्कारित रूप असतं. म्हणूनच जगण्याच्या गुंतागुंतीवर एखादा समाजशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ ज्या नेमकेपणानं बोट ठेवतो त्याच, किंबहुना जास्तच नेमकेपणानं काफ्का किंवा तुकाराम आपल्या साहित्यातून ही जटिलता व्यक्त करत असतात. श्रेष्ठ लेखक आपल्या लेखनातून कोणतंही ढोबळ विधान करत नाही. तो वाचकाला मोकळं सोडतो, अधिक सक्रिय बनवतो. प्रत्येक मानवी मेंदूत असलेली अन्वयाची आणि भिन्न घटकांमधला संबंध जोडण्याची सुप्त क्षमता वाचनातून जागी होते. त्यातून निर्माण झालेल्या बौद्धिक स्पंदनांचा आनंद दीर्घकाळ टिकणारा असतो आणि आयुष्यावर सूक्ष्म परिणाम करणाराही. स्वत:हून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची, त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते. ही भिन्नता जेवढी अधिक  तेवढं वाचकाच्या समजूतदारपणाचं आणि आकलनाचं क्षितिज रुंदावत जातं.

वाचताना काही लेखकांशी पहिल्याच भेटीत मत्र जुळतं, काहींशी ते जुळायला बराच कालावधी जावा लागतो, तर काहींशी ते कधीच जुळत नाही. बऱ्याचदा एका आवडत्या लेखकाच्या लेखनातून दुसरा लेखक सापडतो. उदय प्रकाश यांच्या ‘ईश्वर की आँख’ या लेखसंग्रहात ‘उपन्यास में आख्यान से मुक्ति’ हा सुंदर लेख वाचल्यावर मिलोराद पाविचचा सुगावा लागला. त्या वेळी ‘अ‍ॅमेझॉन’ भारतात आलं नव्हतं. पाविचची पुस्तकं अतिदुर्मीळ होती; पण एखादं पुस्तक मनापासून हवं असेल तर ते सगळे अडथळे पार करून वाचकापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही! पाविचची ‘डिक्शनरी ऑफ खजार्स’ ही विलक्षण कादंबरी मला वांद्रय़ाच्या ‘लोटस’मध्ये अचानक मिळाली. तशीच ‘लास्ट लव्ह इन कॉन्स्टॅन्टिनोपल’ ‘स्ट्रँड’च्या वार्षिक प्रदर्शनात गवसली. जागतिक फिक्शनच्या अरण्यातली ही मंतरलेली आडवाट पुढे अनेक अज्ञात पायवाटांपर्यंत घेऊन गेली. पाविचचं लेखन वाचतानाच मला दानिलो किश या आणखी एका विलक्षण सर्बियन लेखकाचा शोध लागला. बोर्खेसच्या आटीव, सुघटित शिल्पासारख्या कथांच्या जातकुळीतल्या कथा असलेला किशचा ‘एनसायक्लोपिडिया ऑफ द डेड’ हा संग्रह ‘कथा’ या वाङ्मय प्रकाराचा नव्यानं विचार करायला लावणारा आहे. त्यातूनच पुढे डेव्हिड अल्बाहारी हा निर्वासित सर्बियन लेखक सापडला आणि वाङ्मय व्यवहार हा ज्याच्या कथाविश्वाचा गाभा आहे अशा झोरान झिवकोविच या समकालीन सर्बियन लेखकाचाही शोध लागला. झिवकोविचच्या वाटेवरून पुढे जाताना आणखी अनेक लेखक सापडत गेले.

मिलोराद पाविचमुळे मी आधुनिकोत्तर कादंबरीचा शोध अधिक सजगतेनं आणि गांभीर्यानं घ्यायला लागलो. पुढे पाविचच्या राजकीय आणि नैतिकभूमिकेविषयी एक टिपण वाचनात आलं. त्यानं मला धक्का बसला. आवडत्या लेखकाच्या अशा नावडत्या गोष्टी कळल्यावर वाचकासमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. लेखकाची भूमिका पटत नाही म्हणून त्याचं लेखनही बाद करायचं, की लेखकाचं जगणं आणि लेखन वेगळं मानून पुढे जायचं? या यक्षप्रश्नाला उत्तर नाही. मी त्याला सामोरा गेलो.

समकालीन साहित्य वाचताना लेखकाची जीवनदृष्टी, जिव्हाळ्याच्या जागा, निवेदन तंत्रं, घाट, आशय या सगळ्या गोष्टींची मनोमन नोंद होत राहते. कथा आणि कादंबरीच्या बंदिस्त घाटाकडून अधिक मोकळ्या, लवचीक घाटाकडे जाणारा एक समांतर प्रवाह कथासाहित्यात पूर्वीपासून अस्तित्वात आहे. एकीकडे बांधेसूदपणाचा आग्रह, तर दुसरीकडे खुल्या प्रवाहित्वाची आस. या दोन प्रवाहांच्या वैशिष्टय़ांना सामावून घेणारे एन्रिके विला मातास किंवा सेर्गिओ पितोल यांसारखे समकालीन स्पॅनिश लेखकही आहेतच.

आख्यानातल्या मोकळ्या, लवचीक घाटाची परंपरा प्राचीन कथाग्रंथांपासूनची आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून साधारण चौदाव्या शतकापर्यंत भारतात प्राकृत साहित्यग्रंथांची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर झाली. प्राकृत कथासाहित्य हा आधुनिक समीक्षकांपासून दुर्लक्षित राहिलेला प्रदेश आहे. जागतिक साहित्यातल्या विविध कथनप्रकारांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी प्राकृत कथाग्रंथांच्या रूपात अफाट सामग्री उपलब्ध आहे. राब्लेचं ‘गार्गान्तुआ अ‍ॅण्ड पान्ताग्रुएल’, चॉसरच्या ‘कँटरबरी टेल्स’, ‘डिकॅमेरॉन’, ‘अरेबियन नाइट्स’ अशा मध्ययुगीन दीर्घ कथाग्रंथांचा जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा आधुनिक आख्यानरूपांच्या संदर्भात प्राकृत कथाग्रंथांचा डोळस अभ्यास झालेला नाही. हरिभद्राची ‘समराइच्चकहा’सारखी दीर्घ गद्यकृती तर कादंबरी या साहित्य प्रकाराची पूर्वज आहे. कल्पित साहित्याविषयीचं नवं रूपभान आज मराठी लेखकांमध्ये रुजताना दिसत आहे. विशेषत: कादंबरी आणि कथेच्या क्षेत्रात संरचना आणि आख्यानतंत्राच्या अंगानं नवे घाट तयार होत आहेत. या पाश्र्वभूमीवर प्राकृत कथनपरंपरेचं भान लेखकांना असणं गरजेचं आहे.

लुप्त झालेल्या ‘बृहत्कथे’पासून हरिभद्राच्या ‘समराइच्चकहा’पर्यंत अनेक प्राकृत कथाग्रंथांनी प्रचलित लोककथांच्या संग्रहाचं मोठं काम तर केलंच, त्याशिवाय अभिजन संस्कृत साहित्याच्या चौकटी मोडून बहुजनांच्या भाषेत समृद्ध कथासाहित्याची परंपरा घडवली. आज कल्पित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी अधिकाधिक व्यापक होत असताना त्या उजेडात प्राकृत साहित्याचं पुनर्मूल्यांकन होण्याची गरज आहे.

या भारतीय कथनपरंपरेचं डोळस भान आणि समकालीन जागतिक साहित्याचं सजग वाचन आजच्या लेखकाला अनेक दृष्टीनं उपयोगी ठरू शकेल. हिंदी लेखक मनोहर श्याम जोशी यांच्या लेखनात हे आढळतं. त्यांची पुस्तकं मराठी वाचकांसाठी आजही आडवाटेला असणं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदी कादंबरीच्या भाषा आणि संरचनेत क्रांतिकारक बदल घडवणाऱ्या ‘क्याप’, ‘कसप’, ‘कुरु कुरु स्वाहा’, ‘हरिया हरक्यूलीज की हैरानी’ अशा महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिणारे मनोहर श्याम जोशी अजून मराठी लेखक, वाचक, समीक्षकांमध्ये म्हणावे तसे वाचले जात नाहीत. कादंबरी या वाङ्मयप्रकारावर अधिकाराने लिहीत-बोलत असलेल्या एका ज्येष्ठ मराठी समीक्षकानं आपल्या कथनमीमांसेवर केंद्रित पुस्तकात तर मनोहर श्याम जोशींचं चक्क ‘शरद मनोहर जोशी’ असं बारसं करून टाकलेलं आहे!

कादंबरी हा आज जागतिक साहित्यात केंद्रस्थानी असलेला वाङ्मय प्रकार. सतत बदलता आणि समावेशक असा. औद्योगिकीकरणानंतर कादंबरीच्या रूप व आशयात होणाऱ्या बदलांचा वेग वाढला आणि संगणकीकरणाच्या प्रारंभानंतर कादंबरीनं झपाटय़ानं रूप बदलायला सुरुवात केली. ‘आधुनिकोत्तर’ कादंबऱ्यांच्या खऱ्या प्रस्थापनेला इथूनच प्रारंभ झाला. एका बाजूला ‘वास्तववादी’ कादंबरीचा प्रवाह पूर्वीसारखाच जोमदारपणे वाहत असताना, आधुनिकोत्तर कादंबऱ्यांनी कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या मूलभूत निकषांनाच उद्ध्वस्त केलं. शब्दकोश, शब्दकोडं, पुस्तक परीक्षण, प्रबंध, चरित्र, कल्पित इतिहास अशा अनेक प्रांतांत हातपाय पसरणाऱ्या आधुनिकोत्तर कादंबरीनं वाचकाला अधिक सजग आणि सक्रिय बनवलं. अधिक जागरूक वाचक निर्माण केले. त्यामुळे लेखक-संकल्पनेभोवती असलेलं गूढ वलय नष्ट व्हायला सुरुवात झाली. कादंबरीच्या रचनेतल्या बोजडपणाची जागा प्रवाही खेळकरपणानं घेतली. आधुनिकोत्तर कादंबरी प्रसरणशील आणि प्रवाही बनली. तिच्या निर्मितीप्रक्रियेत वाचक सहभागी झाला. हुलियो कोर्तासारची ‘हॉपस्कॉच’ ही कादंबरी या दृष्टीनं प्रातिनिधिक आहे. त्यात प्रकरणांच्या क्रमाची जाणीवपूर्वक उलटापालट केलेली आहे. ती वाचण्याचे दोन क्रम पुस्तकाच्या प्रारंभी दिलेले आहेत. त्यातला एक सरळ रेषेत आहेत तशी प्रकरणं वाचण्याचा. दुसरा क्रम मजेशीर आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यानंतर कोणतं प्रकरण वाचायचं त्याचा क्रमांक दिलेला आहे. तो सरळ क्रमातला नाही. म्हणजे साठावं प्रकरणं पहिलं, त्यानंतर पाचवं असा. गंमत म्हणजे, या पद्धतीनं वाचत गेलं तर कथानक स्वत:चंच शेपूट गिळणाऱ्या ऑरोबोरस या सापासारखं गोल फिरत राहतं. संपतच नाही.

वर ज्याचा उल्लेख आला, त्या मिलोराद पाविच या सर्बियन लेखकानं तर प्रत्येक कादंबरीत नवे वाचनव्यूह निर्माण करून वाचनप्रक्रियेचं स्वरूपच बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. लांब कशाला, िहदीत हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या पन्नासेक वर्षांपूर्वीच्या ‘बाणभट्ट की आत्मकथा’ किंवा ‘अनामदास का पोथा’ अथवा अमृतलाल नागर यांची ‘अमृत और विष’ या कादंबऱ्या आधुनिकोत्तर वाङ्मयदृष्टीशी नातं सांगणाऱ्याच आहेत. नंतरच्या लेखकांमध्ये मनोहर श्याम जोशी, उदय प्रकाश, रघुनंदन त्रिवेदी यांच्या लेखनालाही ‘आधुनिकोत्तर’ हे विशेषण लावता येतं आणि समकालीन लेखकांमधले गीत चतुर्वेदी, मनोज रुपडा किंवा मनोज पांडेय यांसारखे लेखक अशा तऱ्हेचं लेखन करत आहेत.

मराठीत अनिल दामले यांची ‘गौतमची गोष्ट’ ही पहिली निर्विवाद आधुनिकोत्तर कादंबरी असं म्हणता येईल. मकरंद साठे यांची ‘ऑपरेशन यमू’ किंवा अलीकडची ‘काळे रहस्य’, अवधूत डोंगरे यांची ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’, राजन गवस यांची ‘ब-बळीचा’ आणि श्याम मनोहरांच्या ‘कळ’नंतरच्या कादंबऱ्या आधुनिकोत्तर विशेषण लावता येतील अशा आहेत.

आजच्या मूल्यहीन, चंगळवादी आणि खंडित जगण्याला व्यक्त करू पाहणारी आधुनिकोत्तरवाद ही महत्त्वाची दृष्टी आहे. ती परिपूर्ण नसली तरी तिच्यामुळे साहित्यापुरतं बोलायचं तर, लेखन आणि वाचन प्रक्रियेत ताजेपणा आला हे नाकारून चालणार नाही. काहीच अंतिम न मानणारा आधुनिकोत्तरवाद शून्यवादाला जवळचा असला तरी त्याच्यामुळे लेखक-वाचक संबंधात अनेक नव्या मिती जोडल्या गेल्या. रटाळ आणि एकरेषीय वास्तववादाला खीळ बसली. वाङ्मय व्यवहारातला खेळकरपणा परत आला. वाचक म्हणून मला एवढं पुरेसं वाटतं.

Story img Loader