बाबूराव अर्नाळकर.. मराठी रहस्यकादंबऱ्या आणि रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहून आपलं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवणारा विक्रमवीर. अशा अफाट लेखकाचा ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ हा ग्रंथ राजहंस प्रकाशनातर्फे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध होत आहे. बाबूरावांचे चरित्र, अनेक साहित्यिक व कलाकारांचे विशेष लेख तसेच अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबऱ्या आणि पाच कथा यांनी हा ग्रंथ सजलेला आहे. या ग्रंथाला ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक  महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली  प्रस्तावना..

मराठी साहित्यात लेखकांची युगे झाली. फडके व खांडेकर यांची युगे तर खूपच काळ त्याच नावांनी गाजती राहिली. ती जितकी गाजली, तितक्याच वेगाने विस्मृतीतही गेली. फडके युग तर त्यांच्या हयातीतच त्यांच्या डोळ्यांसमोर मावळले. आता हे लेखक वाचले की वाटते, ‘युग’ म्हणावे असे त्यांच्या साहित्यात काय होते? ते लोकप्रिय होते, पण लोकप्रियता याच निकषाने एखाद्याचा कालखंड ‘युग’ म्हणावयाचा; तर मला या दोन लेखकांना समकालीन असलेल्या आणखी एका लेखकाचेही ‘युग’ होते असे म्हणावे लागते. बाबूराव अर्नाळकरांचे. फडके-खांडेकरांचा वाचकवर्ग अर्नाळकरांपेक्षा वेगळा होता. तो तसा उच्चभ्रू होता व सांस्कृतिक, साहित्यिक म्हणजे काय ते आपण ठरवू ते, असा गंडही या वर्गाजवळ होता. त्यांनी व इतरांनीही अर्नाळकरांचे नाव कधी घेतले आहे असे आठवत नाही (अत्र्यांचा अपवाद). खरे म्हणजे अर्नाळकरांचा वाचकवर्ग या दोघांपेक्षाही विस्तृत होता व त्यांची लोकप्रियता सिनेनटाला अस्वस्थ करील इतकी मोठी होती. वाचक त्यांच्या नव्या कादंबरीची ज्या अधीरतेने वाट पाहत, ती अधीरता दुसऱ्या कुठल्याही लेखकाच्या वाटय़ाला आल्याचे मला आठवत नाही. शिवाय हा वाचकवर्ग समाजाच्या सर्व थरांमध्ये पसरलेला होता. असे असून अर्नाळकरांना साहित्यिक म्हणून सोडाच; लेखक म्हणून, निदान रहस्यकथालेखक म्हणून प्रतिष्ठा देण्याचे मराठी रसिक वाचक, समीक्षक, लेखक विसरले. विसरले म्हणण्यापेक्षा रहस्यकथा हा साहित्यातला एक वैध, जगन्मान्यता असलेला, हाताळायला अत्यंत कठीण असा प्रकार आहे व त्याला स्वत:चे म्हणून साहित्यमूल्य आहे- हे आम्हाला कळले नाही. मराठी अभिरुचीचा आवाका मर्यादित, कधी कधी कोता राहिला व अजून आहे. रहस्यकथेबद्दल कधी कोणी काही बोललेच, तर ते अवाङ्मयीन ठरवून आम्ही मोकळे होत होतो. हा प्रकारच निम्न दर्जाचा, ‘आपल्यासारख्यांनी न हाताळण्याचा’, सवंग आहे, असे लिहिले गेले नसले; तरी ते अनेकांच्या मनात असे. ही धारणा कधी मुखर झाली नाही, तरी ती समाजात पक्की झालेली होती व तिने रहस्यकथा व त्यांचे लेखक यांना जातिव्यवस्थेच्याही परिघाबाहेरच ठेवले. परिणामत: अर्नाळकरांसारख्या एका महत्त्वाच्या लेखकाची उपेक्षा झाली व त्यांना न्याय मिळाला नाही.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा

अर्नाळकरांना मी महत्त्वाचे म्हणतो, ते थोर साहित्यिकाची लक्षणे त्यांच्यामध्ये आहेत म्हणून नव्हे. त्यांचे लेखक म्हणून मूल्यमापन करण्याची ही जागा नव्हे व तसा माझा हेतूही नाही. (आणि खरे म्हणजे चांगल्या लेखकाला हेवा वाटावा असे साहित्यगुण त्यांच्या लेखनात मला प्रतीत होतात.) त्यांना महत्त्वाचे म्हणण्याचे मुख्य कारण त्यांनी आधुनिक रहस्यकथा हा प्रकारच मराठीत प्रथम रुजवला. तोपर्यंत कथा-कादंबऱ्यांत रहस्य आलेच, तर कथेची रंगत वाढवणे, वाचकांची उत्सुकता ताणणे एवढय़ापुरतेच ते तिथे येई. ते काही त्या कादंबरीचे मूळ अंग नसे. पण अर्नाळकरांनी विशुद्ध रहस्यकथेचा वस्तुपाठच एक नव्हे, अनेक कादंबऱ्या लिहून सिद्ध केला. पण मराठी मन व वाचक इतके सोवळे, की या प्रकाराचा अंगीकार न मराठी लेखकांनी केला, न वाचकांनी. अर्नाळकरांनंतर काही मोजक्या लोकांनी हा प्रयत्न केला, पण त्यात फार सातत्य नव्हते व नावीन्यही. आता तर या लेखनप्रकाराचा मागमूसही दिसत नाही. वाचायचे ते उद्बोधनासाठी, माहितीसाठी, सामाजिक जाणिवा तेवत ठेवण्यासाठी, इ. सर्व उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून वाचन करणाऱ्या मराठी वाचकाला रंजनासाठी रहस्यकथा वाचणे हे अभिरुची सोडल्याचे लक्षण वाटत होते का? (वाटत होते.) पण हाच वाचक तद्दन रंजनप्रधान नाटके पाहतो, ‘विविध भारती’वरची प्राणहीन मराठी गाणी ऐकतो, कोळीनृत्य व लावणी ही त्याची सांस्कृतिक घटनांची व्याख्या असते. त्याने रहस्यकथेकडे पाठ फिरवण्याचा अर्थ मला कळत नाही.

आणि हीच माणसे पाश्चात्त्य वाङ्मयातल्या रहस्यकथा आवर्जून वाचतात. त्यांचा दर्जा मराठी रहस्यकथांना कधीच प्राप्त करता आला नाही, ही तर गोष्ट खरीच; पण हेच उणेपण आपल्या इतर साहित्यातही काही अपवाद सोडले तर दिसतेच. अगाथा ख्रिस्ती, अर्ल स्टॅनले गार्डनर, एडगर अ‍ॅलन पो यांनी रहस्यकथांची जी मजबूत पायाभरणी केली; त्यावर पुढे अनेक पाश्चात्त्य रहस्यकथाकारांनी इमले बांधले. मराठीत मात्र ते झाले नाही.

असे असले तरी माझ्या वयाच्या आठव्या ते बाराव्या वर्षांपर्यंत अर्नाळकरांनी मला झपाटून टाकले होते. एका संपूर्ण अपरिचित, दहशतीने भरलेल्या, रोमांचकारी जगात त्यांच्या कादंबऱ्या मला व इतरांना (त्यात मोठी माणसेही आली.) ओढून नेत होत्या. स्थळकाळाचे भान हरपून, तहानभूक विसरून, अभ्यासाला दांडी मारून मी त्या वाचल्या व माझ्या आयुष्याची चार वर्षे अद्भुताच्या सोनेरी धुक्यांनी भरून गेली.

आज पुन्हा अर्नाळकर मी वाचतो तेव्हा कंटाळा येतो; पण या पुस्तकांनीच माझ्या वाचनाची सुरुवात झाली. असेही असेल की, या पुस्तकांनीच मला वाचनाची गोडी नव्हे, तर व्यसनच लावले. वयाबरोबर आपले वाचन बदलते, वाचनसवयी बदलतात, तसे माझेही झाले; पण अर्नाळकरांनी वाचनाचे जादूई महाद्वार मला उघडून दिले, हे मला विसरता येत नाही.

अर्नाळकरांच्या आत्मवृत्ताच्या निमित्ताने मी त्यांच्या पाच-सहा रहस्यकादंबऱ्या पुन्हा वाचल्या. थोर रहस्यकथा या निकषांवर त्या अजिबातच उतरत नाहीत. पण अर्नाळकरांच्या अनलंकृत शैलीने मला क्षणभर दचकल्यासारखे झाले. त्यांची भाषा कमालीची साधी आहे. त्यात विशेषणे जवळजवळ नाहीतच. तरीही ती प्रवाही आणि खूप बोलकी आहे. भाषासमृद्धीचा ऐवज स्वत:जवळ भरपूर असलेले लोक खूपदा या जोखडातच सापडलेले दिसतात व त्यांना साधे-सरळ पारदर्शक काही लिहिताच येत नाही. त्याची उदाहरणे मराठी साहित्यात भरपूर आहेत. खूपदा तरी ‘सुंदर’ भाषा लिहिण्याच्या खटाटोपात ते भयंकर कृतक भाषा लिहितात. त्याला आपण ‘शैली’ही म्हणतो. सध्या गाजत असलेल्या दोन पुस्तकांत तर भाषेवरचे सोनारकाम इतके दिसते, की तिथे लेखकाच्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका येते. भाषासमृद्धी असणे म्हणजे खूप शब्द, खूप अनवट शब्द, त्यांची चकित करणारी वाक्यरचना, त्यांनी निर्माण केलेला खोलपणाचा व विद्वत्तेचा आभास- याला शैली म्हटले जाते व भले भले वाचक त्यात फसले जातात. या सर्व गोष्टींना फाटय़ावर मारून जिवंत, स्पंदणारी भाषा श्री. व्यं. केतकर लिहीत होते. खडबडीत, पण निकोप अशी भाषा. तिकडे आम्ही सत्तर वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहोत. यात पुन्हा मराठी अभिरुचीचा पराभव दिसतो. अर्नाळकर बिचारे यापासून दूर राहिले. आपण ‘लेखक, साहित्यिक’ आहोत, असे त्यांनी कधी म्हटले नाही; कारण त्यांना तसे कधी वाटलेच नाही. त्यांना रहस्यकथा सांगायची होती, ती त्यांनी सोप्या भाषेत सांगितली. इतकी बिनगुंतागुंतीची, साधी, नम्र भूमिका त्यांनी कायम घेतली. त्यांच्या आत्मवृत्तातही ती दिसते. कमालीच्या शालीन सुरात, कुठलाही आव न आणता आपण लेखक कसे नाही, हेच ते सांगतात. भाषेचा मूळ ऐवज कमी असला की आहे त्या बेगमीत कथेचा संसार थाटावा लागतो. तो अर्नाळकरांनी थाटला. पण त्यामुळे आपण साध्या, प्रवाही भाषेला निर्माण करीत आहोत, हे त्यांच्या गावीही नसावे. कधी कधी योग्य तो शब्द न सुचल्याने ते स्वत: बनवतात, ते फारच मजेदार असतात. उपकारी किंवा परोपकारी याविरुद्धचा म्हणून त्यांनी ‘बेउपकारी’ असा शब्द वापरला आहे. पण अशा धडपडीतूनच त्यातले अनेक शब्द नाहीसे झाले, तरी काही टिकून राहतात, प्रचारात येऊन रुळतातही. केतकरांच्या ‘ब्रह्मकन्या’ कादंबरीत- ‘जावईपकडू धोरण’ असा शब्द निर्माण केला होता. तो रुळला नाही, ते सोडा; पण मध्यमवर्गीयांच्या मुलींची लग्ने जमवण्याच्या धडपडीच्या संदर्भात आजही तो अन्वर्थक वाटतो.

या आद्याक्षरी, साध्या भाषेमुळे म्हणा, किंवा अर्नाळकरांच्या चारच रेषांमध्ये सगळे व्यक्तिमत्त्व उभे करण्याच्या जाणीवपूर्वक कौशल्यामुळे म्हणा, लेखनात ‘मिनिमॅलिझम’ कसा असावा, याचा आदर्श ते आपल्यापुढे ठेवतात. एखाद्या व्यक्तीचे वर्णन करताना ते त्या व्यक्तीचे सविस्तर, साद्यंत वर्णन करीत नाहीत. (सॉमरसेट मॉम करीत असे.) तर दोन वाक्यांत अख्खी व्यक्ती ते आपल्यासमोर साक्षात् उभी करतात. ‘तिचा चेहरा गोल होता व तिने कानात लांब डूल घातले होते’.. किंवा ‘त्याचे गाल आत गेलेले होते व त्याचे नाक उजवीकडे टोचलेले होते’.. एवढय़ाच वर्णनाने ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर संपूर्ण उभी होते. आता हे अर्नाळकरांचे जन्मजात अंगभूत कौशल्य की कमावलेले कसब, की हे आपापत: घडते- याबद्दल काही बोलणे कठीण आहे व त्यात शिरण्याची आपल्याला काही आवश्यकताही नाही. पण कुठल्याही लेखकाला हेवा वाटेल असा हा साहित्यगुण आहे. आशयाचे सोडा, पण एवढय़ा बाबतीत त्यांची तुलना मला एकदम हेमिंग्वेशी करावीशी वाटते. त्यांच्या व्यक्तिचित्रांची नावेही अशीच अफलातून. रजनीबाला, गुजानाथ, कचरू, दुर्वे, कामिनी, विषया. ही शेवटली दोन नावे पन्नासच्या दशकात- हे विसरू नका. त्या नावांमध्येही त्या, त्या व्यक्तींना डोळ्यांसमोर हाडमांस मिळत असे. असे काहीतरी जिवंतपण त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये असे. आज आता त्या वाचताना त्यांतल्या सुबोधपणाने कंटाळा आला, तरी त्यांतला जिवंतपणा मात्र अजूनही जाणवतो. हे यश मोठे नाही, असे कोण म्हणेल? भल्याभल्यांच्या हातून ते निसटते.

माझे लहानपण लहान गावात, मुंबईपासून दूर गेले. मुंबई आपण कधी पाहू, ही शक्यताही मनात येत नसे. त्यामुळेच सर्व भारतीयांना असते, तसे मुंबईचे अतीव आकर्षण मला होते व त्या महानगरीची विविध कल्पनाचित्रे मनात असत. ही मुंबई मला अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांत सतत भेटत असे. परळ, धोबीतलाव, नळबाजार, दहिसर, भुलेश्वर या नुसत्या नावांनी मुंबईचे विविधांगी, विविधरूपी चित्र मनात उभे राही. भाऊ पाध्यांनी मुंबईची विविध रूपे आपल्यासमोर आणली. इतर कोणी मुंबईकर लेखकाने तसे केल्याचे दिसत नाही. अर्नाळकरांनीही ते केले व तेही पाध्यांच्या खूपच आधी- १९५० च्या दशकात. हे करतानाही आपण ‘मुंबई’ दाखवीत आहोत, असले काही त्यांच्या मनात नसणार; पण त्यांचे ‘लोकेल’ मुंबईच राहिले. कारण तेवढे एकच शहर त्यांना माहीत होते व रहस्य घडवण्यासाठी मुंबईइतके दुसरे अद्भुत शहर कोणते?

आता वाटते, बालपणी अर्नाळकर आपल्याला भेटले, हे किती छान झाले. वाचनाच्या भोवऱ्यात त्यांनी मला ओढले, तिथेच मी अजूनही आनंदाने गरगरत आहे. ‘श्यामची आई’ मी वाचले होते दोन-तीनदा. पण एक पुस्तक किती वाचणार व कितीदा? माझी भूक जागवली, वाढवली व तिला नियमित रसद पोचवली ती बाबूराव अर्नाळकरांनी. त्यांचे किती आभार मानू? मुले मराठी वाचत नसतील, त्यांना वाचनाची गोडी नसेल; तर सर्व आई-बापांनी त्यांना अर्नाळकरांच्या पुस्तकांची चटक अवश्य लावावी. पाहा, किती चांगला परिणाम होतो ते.

 

Story img Loader